অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लहान व्यवसाय कसा प्राप्त कराल…

एक स्टार्टअप सुरु करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. कोणी तरी जमलेला व्यवसाय विकत घेऊन तो विस्तारित करण्याचे योजू शकतो अथवा डबघाईला आलेला धंदा विकत घेऊ शकतो. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा पण एक उत्तम उपाय आहे, स्टार्टप सुरु करण्याचा. छोटे उद्योग अथवा कंपनी विकत घेणे थोडीशी अवघड गोष्ट आहे. पण त्याचे फायदे आणि प्रभाव दीर्घकालीन असतात.

तुम्हाला नक्की काय हवे आहे

जेव्हा आपण छोटा व्यवसाय विकत घेता तेव्हा तुम्ही तेथील कौशल्य व बौद्धिक मालमत्ता आपलीशी करतात. अशावेळी किमान १.५ वर्षे तरी आपण त्या व्यवसायाला स्वतंत्र दिले पाहिजेत. व्यवसायातील लोकांना एकत्र येऊ दे. लहान-सहान गोष्टींना एकत्रितरित्या तोंड देऊ दे. अशाने त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि ते आणखी जबाबदार बनतील. जर तुम्ही व्यवसाय फक्त तेथील कौशल्य बघून विकत घेत आहात तर त्वरित त्या कर्मचाऱ्यांना तुमच्या महत्वाच्या कामाशी जोडा. अशाने तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील, शिवाय नवीन येणाऱ्या प्रकल्पना मदत होईल.

जुने उत्पादन आणि ग्राहक सांभाळा

जर तुम्ही जुना व्यवसाय पुढे चालू ठेवणार असाल तर त्यातील उत्पादन आणि ग्राहक जोपासणे हे आपले प्रथम कर्तव्य असेल. तुम्ही व्यवसाय फक्त कौशल्य बघून विकत घेतला असेल तर सद्यकालीन अथवा चालू उत्पादन आणि त्यांचे ग्राहक सांभाळणे आवश्यक आहे. प्रोडक्ट किंवा उत्पादन बनविणाऱ्या कामगार त्या सर्व गोष्टींशी भावनिक व तांत्रिकदृष्ट्या जोडलेले असतात. त्यांनी बरीच मेहनत आणि वेळ, हे सर्व प्राप्त करण्यासाठी दिलेली असते. त्यांच्या कष्टाचे चीज हे प्रोडक्ट आहे. त्यामुळे त्याला डावलून चालणार नाही. त्या दोघांचा मान राखला गेला पाहिजे. अशाने कामगारांचा तुमच्याविषयी विश्वास वाढेल व ते सुद्धा आपल्याला योग्य ती मदत करतील. आपल्या नवीन प्रकल्पामध्ये ते सर्वजण मनापासून साथ देतील.

जुने कर्मचारी/कामगार जपा

जुने कामगार अथवा कर्मचारी हे आपल्यासाठी ॲसेट ठरू शकतात. त्यांना कामाची, मालाची, ग्राहकांची व वापरलेल्या तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती असते. कंपनीला जर कोणी टेकओव्हर केले कि १५ ते २० टक्के कर्मचारी कपात ही एक निश्चित बाब आहे. काहीवेळा जुने लोक स्वत: काम सोडून जातात किंवा मग नवीन मालक आपली माणसे भरतात. अशावेळी किमान ८५ % जुना स्टाफ जपणे अनिर्वाय आहे. जुन्या कंपनीतील मोठ्या हुद्यावर असणाऱ्या व्यक्तींना सांभाळून घ्या. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा मान राखा. एका छोट्या कंपनीत एक व्यक्ती एकापेक्षा जास्त जबाबदारी सांभाळतात, अशावेळी प्रत्येक कर्मचारी महत्वाचा आहे. जर अशी मातब्बर व्यक्ती सोडून गेली तर आपली चांगलीच पंचायत होईल. त्यामुळे कोणाला ठेवायचे आणि कोणाला नाही याची आखणी अगोदरच केलेली बरी.

विसंगत विषयांवर लक्ष केंद्रित करू नका

छोट्या आणि बिन महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊ नका. शुल्क गोष्टींवरून योग्य माणूस दुखावणार नाही व कंपनी सोडून जाणार नाही याची काळजी घ्या. कामाबरोबर माणसाला महत्व द्या, म्हणजे तो आपल्याविषयी प्रामाणिकपणा राखेल. आवश्यक बदल घडवा, बदलामुळे आपल्या व्यवसायावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. आपण हा व्यवसाय का मिळवला आहे हे लक्षात ठेवा. आपल्या मूळ उद्देशापासून कधीही विचलित होऊ नका.

आर्थिक पाठबळ

वर्तमान कर्मचाऱ्याकरिता कंपनी टेकओव्हर हा एक मोठा बदल असेल. त्यांना स्वतःला परत सिद्ध करावं लागेल अशी भीती वाटू शकते. आतापर्यंत केलेल्या कामाचा योग्य तो मोबदला मिळेल कि नाही ? अशी चिंता त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. या सर्व गोष्टींवर मात करून नवीन विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी ठरलेला बोनस अथवा कामगार/कर्मचाऱ्यांचा आर्थिक फायदा करून दिला पाहिजे. थोडे आर्थिक पाठबळ सर्वांनाच हवे असते. अशा गोष्टी उमेद आणि विश्वास वाढवतात.

दूरदृष्टी

जर लोकांना आपला फायदा दिसला तर ते अशी गोष्ट सोडत नाहीत. कर्मचाऱ्यांना आपली प्रगती आणि योग्य मोबदला मिळाला तर ते प्रामाणिकपणे अचूक काम करतील. कंपनीबरोबर त्याची प्रगती कशी होईल हे पटवून देणे गरजेचे आहे. अशावेळी एखादा कुशल व्यक्ती जोपासताना कंपनीने थोडी तडजोड करायला हरकत नाही. तसेच कर्मचारी सुद्धा त्यांची दीर्घकालीन प्रगती लक्षात घेऊन पुढचे पाऊल टाकत आहेत. यावर कंपनी लक्ष केंद्रित करू शकते. अशाने दोघांचा फायदा आणि प्रगती होईल.

कामाची अदलाबदल

माणूस एकाच पद्धतीचे काम करून कंटाळतो. हेच कर्मचाऱ्यावर सुद्धा लागू होते. अशावेळी आपण थोडीशी अदलाबदल करू शकता. दोन निगडित विभागाची निवड करा. त्यांचे एकमेकांशी काय काम असते ते समजून घ्या आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांची बदली करा. अशाने सर्वजण काही तरी नवीन शिकतील व सर्व कर्मचाऱ्यांना आपापल्या विभागाची संपूर्ण काम येईल. भविष्यात कंपनीला या गोष्टीचा खूप फायदा होईल. सर्वांना सगळी कामे येतात, यामुळे कुणाच्या अनुपस्थितीमुळे काम बंद पडणार नाही.

उच्च पदाधिकारी

मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अधिकारी आणि मोठे अधिकारी या दर्जाच्या कर्मचाऱ्यांशी आपले चांगले संबंध असणे गरजेचे आहे. हे सर्वजण आपल्या नवीन संकल्पनेशी एकरूप असणे अनिर्वाय आहे. जर त्यांच्या आणि आपल्यामध्ये काही मतभेद असतील तर ते त्वरित दूर करणे गरजेचे आहे. आपले लक्ष त्यांना समजले तर ते त्या योग्य दिशेने वाटचाल करू शकतात. कंपनी ही एकट्याची नसते, कामगारांपासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी व मालक असे ते समीकरण असते. हे सर्वजण एकमेकांच्या सहाय्यानेच प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकतात. या सर्व गोष्टी आपल्याला टेकओव्हर किंवा कंपनी मिळवण्यासाठी मदत करतील.

 

लेखक - सुजाता नायकुडे.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate