অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटालियन साहित्य

इटालियन साहित्य

इटालियन साहित्यनिर्मितीचा आरंभ तेराव्या शतकात झाला. तत्पूर्वीची ग्रंथरचना लॅटिन भाषेत केली जात असे. अभिजात लॅटिन साहित्याचे अध्ययन परंपरेने चालत आले होते. युरोपातील इतर देशांच्या मानाने इटलीत स्वभाषेतील साहित्यनिर्मिती आरंभी तरी मंदगतीनेच झाली. ह्याची मुख्य कारणे दोन : अकराव्या-बाराव्या शतकांत पोपसत्ता आणि यूरोपातील राजसत्ता ह्यांची इटली ही एक युद्धभूमीच झाली होती; दुसरे म्हणजे वाङ्मयनिर्मितिक्षमता नसलेली एक क्षुद्र भाषा, असाच तिच्याकडे पाहण्याचा इटलीतील सुशिक्षित वर्गाचा दृष्टिकोण होता. अनेक कायदेशीर कागदपत्रांत मात्र इटालियन भाषेचा वापर केला गेल्याचे दिसते. बाराव्या शतकात इटलीतील राजदरबारांतून वावरणारे कवी प्रॉव्हांसाल भाषेत आपल्या कविता रचित. प्रॉव्हांसाल ही एके काळी दक्षिण फ्रान्समध्ये प्रचलित असलेली साहित्यभाषा. तेराव्या शतकातही सोरदेल्लोसारखा श्रेष्ठ इटालियन कवी आपली प्रेमगीत या भाषेतच रचित होता.

मौखिक परंपरेने इटालियन लोकसाहित्य मात्र पूर्वीपासून जतन केले होते. त्यात ‘स्त्राबोतो’ आणि ‘बाल्लाता’ हे गीतप्रकार उल्लेखनीय आहेत. स्रांबोतोमध्ये मुख्यतः प्रेमगीते रचलेली आहेत. श्रमपरिहारार्थ ही गीते खेड्यापाड्यांतून गायिली जात. ‘बाल्लाता’ म्हणजे एक प्रकारचे नृत्यगीत. याशिवाय ‘मे’ गीते (वसंतगीते) अंत्यसंस्कारगीते, अंगाईगीते, बालगीते आणि कथनकाव्येही रचलेली आढळतात. सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींच्या अतिमानवी शक्तींवर आधारलेल्या बऱ्याच कथा आहेत. काही कथा अद्‌भुतरम्य धाडसाच्या आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या जीवनाभोवती विणलेल्या आहेत. कूटप्रश्न, उखाणे, म्हणी इत्यादीही आढळतात.

तेरावे शतक : तेराव्या शतकातील इटालियन गद्य बव्हंशी लॅटिन व फ्रेंच गद्याचा आदर्श पुढे ठेवून लिहिले गेले आहे. फ्रेंच आणि लॅटिन भाषांतील अनेक ग्रंथांची भाषांतरे ह्या काळात झालेली दिसतात. फ्रेंचवरून केलेली भाषांतरे मुखतः कथात्मक साहित्याची होती. राजा आर्थरवरील Tristano riccardiano हा ⇨रोमान्स  कोणा अज्ञात लेखकाने इटालियन भाषेत लिहिला. तत्पूर्वी चारणांच्या द्वारे आर्थर राजाच्या कथा इटलीत प्रसृत होऊन लोकप्रिय झाल्या होत्याच. हा रोमान्स उत्कृष्ट निवेदनशैलीने नटलेला आहे. राजा आर्थरवरील इटालियन भाषेतील हा पहिलाच रोमान्स. Novellino हा छोट्या कथांचा संग्रह म्हणजे इटालियन कथात्मक साहित्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होय. हा संग्रह लहान आणि मोठ्या अशा दोन्ही स्वरूपांत उपलब्ध आहे व त्यात अनुक्रमे सु. शंभर व सु. दीडशे कथा आहेत.Le cento novelle antiche (लहान) आणि Libro di novelle et di bel parlare gientile (मोठा) अशा नावांनी ते ओळखले जातात. हर्क्युलीझ, नार्सिसस, हेक्टर, अलेक्झांडर, अ‍ॅरिस्टॉटल, सॉक्रेटीस इ. अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तींवरील कथा त्यात आहेत. तसेच धर्मगुरू, बिशप, जोगिणी, खगोलशास्त्रज्ञ, जादूगार, शेतकरी, सावकार इ. समाजातील विविध व्यावसायिकही कथांचा विषय झालेले आहेत. बहुधा १२८१ ते १३०० ह्या कालखंडात ह्या कथा लिहिल्या गेल्या असाव्यात. मार्को पोलोने पौर्वात्य देशांतील आपल्या प्रवासाचे वृत्त इटालियन भाषेच्याच व्हिनीशियन बोलीत लिहून ठेवले असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. तथापि त्या प्रवासवृत्ताची आज उपलब्ध असलेली प्राचीनतम प्रत फ्रेंचमध्ये आहे.

जाणीवपूर्वक वाङ्‌मयीन स्वरूपाचे लेखन करण्याचा पहिला प्रयत्न म्हणून Gemma Purpurea चा उल्लेख करावा लागेल. ह्या छोट्याशा पुस्तकात विविध प्रकारच्या पत्रलेखनासाठी उपयुक्त असे प्रत्येकी पंधरा वाक्यांचे नमुने आहेत. त्याचा कर्ता ग्वीदो फाबा हा बोलोन्या विद्यापीठात वक्तृत्वशास्त्राचा प्राध्यापक होता. बहुधा त्यानेच लिहिलेल्या Parlamenta et epistole (सु. १२४२) ह्या ग्रंथातही पत्रलेखन, वक्तृत्वकला इत्यादींचे नमुने दिले आहेत. ग्वीत्तोने दा रेत्सो (सु. १२२५–) ह्या इटालियन कवीनेही नैतिक व धार्मिक आशयाची सु. पस्तीस पत्रे लिहून ठेवलेली आहेत. ह्यांतील काही पत्रे मात्र पद्यरूप आहेत.

सिसिली हे इटालियन कवितेच्या परंपरेचे उगमस्थान. पवित्र रोमन साम्राज्याचा जर्मन सम्राट दुसरा फ्रीड्रिख (११९४–१२५०) ह्याच्या आश्रयाने इटालियन कवितेचा पहिला संप्रदाय निर्माण झाला. विद्याकलांना त्याच्या दरबारात मुक्त प्रवेश होता. कवितालेखनाला त्याने फार मोठे उत्तेजन दिले. इटालियन काव्यपरंपरेतील पहिल्या सु. तीस कवींचा फ्रीड्रिखच्या दरबाराशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध होता. फ्रीड्रिखच्या आश्रयाने निर्माण झालेल्या संप्रदायातील सु. १२५ कविता आज उपलब्ध आहेत. तथापि ह्या संप्रदायातील सगळेच कवी सिसिलियन नव्हते; तसेच काव्यरचनेसाठी त्यांनी वापरलेल्या इटालियनच्या बोलीभाषाही समान नव्हत्या. प्रॉव्हांसाल भाषेतील भावगीतरचनेचा त्यांच्यावर निश्चितपणे प्रभाव होता. त्या भाषेतील काव्यप्रकारच त्यांनी उपयोगात आणले, पण नव्या जोमाने. सिसिलियन संप्रदायातील कवींनी मुख्यतः प्रेमगीते लिहिली. ‘कांझोने’ (भावकवितेचा एक प्रकार) आणि सुनीत हे काव्यप्रकार ह्याच संप्रदायाने इटालियन कवितेला दिले आहेत. सुनीतांपैकी सु. पंचवीस जाकोमो दा लेंतीनो (सु. ११९५–सु. १२४०) ह्याने रचिलेली आहेत. सुनीत ह्या काव्यप्रकाराचा लंतीनो हाच जनक असावा, असे मानले जाते. हा काव्य प्रकार त्याने अतिशय सफाईने हाताळून त्याचे तंत्र पूर्णत्वास नेले.

सम्राट दुसरा फ्रीड्रिख हा निव्वळ रसिक नसून कवीही होता, असे दिसते. त्याच्या नावावर चार कविता मोडतात. त्याचे दोन पुत्रही काव्यरचना करीत. प्येअत्रो देल्ला व्हीन्या ह्या सम्राट फ्रीड्रिखच्या मुख्य प्रधानानेही काव्यरचना केलेली आहे.

सिसिलीयन संप्रदायाचे इतर उल्लेखनीय कवी असे : रीनाल्दो दाक्वीनो, ग्वीदो देल्ले कोलोन्ने, याकोपो मोस्ताच्ची आणि मात्सेओ दी रीत्‌चो. Rosa Fresca aulentissima (फ्रेश अँड मोस्ट फ्रँग्रंट रोझ) अशा ओळीने प्रारंभ होणारे एक सुंदर संवादगीत आढळते; पण ते सिसिलियन पंथाचे नसावे.

सिसिलियन पंथाच्या अनुकरणाने कविता लिहिणाऱ्या तस्कन कवींत ग्वीत्तोने दा रेत्‌सो हा विशेष उल्लेखनीय. त्याने काही कांझोने आणि सुनीते लिहिली. बाल्लाता ह्या लोकगीतप्रकारात गीते लिहिणारा हा पहिला इटालियन कवी.

फ्रीड्रिखच्या मृत्यूनंतरही सिसिलियन संप्रदायाची कविता लिहिली जात होती; तथापि तिचा प्रभाव कमी होत होता आणि त्याच्यानंतर सिंहासनावर आलेल्या मॅनफ्रेडच्या निधनानंतर (१२६६) तर उत्तर इटली हे वाङ्‌मयनिर्मितीचे केंद्र बनले. लाँबर्डी येथे फ्रान्सिस्कन पंथायांनी धार्मिक आणि बोधवादी कवितेचा एक संप्रदाय सुरू केला होता. इटलीतील पो नदीच्या खोऱ्यातील बोलीभाषांवर आधारलेली एक वाङ्‌मयीन भाषा निर्माण करण्याचा ह्या संप्रदायाचा प्रयत्न होता; तसेच प्रॉव्हांसाल काव्य हे ह्या संप्रदायाचे स्फूर्तिस्थान नव्हते. स्वतः सेंट फ्रान्सिसचे Cantico di frate sole (इं. शी. कँटिकल ऑफ द सन) हे सूर्यसूक्त उल्लेखनीय आहे. याकोपोने दा तॉदी (सु. १२३०–१३०६) हा ह्या संप्रदायातील प्रमुख कवी. त्याने अनेक स्तोत्रे रचिली आहेत. ख्रिस्तावरील त्याची कविता विशेष प्रसिद्ध आहे. याकोपोनेची बहुसंख्य स्तोत्रे संवादरूप असून त्यांतील नाट्यात्मकता लक्षणीय आहे. इटालियन काव्यातील हा पंथही फार काळ टिकला नाही. त्यानंतरची कविता तस्कन कवींची.

तेराव्या शतकाच्या सुमारास तस्कन शहरातील नागर संस्कृतीचा चांगला विकास झाला होता. बोलोन्या येथे कायदा, तत्त्वज्ञान, वक्तृशास्त्र– ह्यांसारख्या विषयांचे ज्ञान देणारे विद्यापीठ अस्तित्वात होते. शहरीशहरी कलेची केंद्रे होती. अशा सांस्कृतिक वातावरणात तस्कन कवी वाढले होते आणि त्रूबदूरांचा (बाराव्या-तेराव्या शतकांत प्रॉव्हांसाल भाषेत प्रेमकविता रचून त्या स्वतःच संगीतबद्ध करणारे कवी) प्रभाव ह्या शहरांवर पूर्णांशाने नव्हता. सिसिलियन काव्यसंप्रदायालाच ह्या कवींनी एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आणि त्याचा विकास घडवून आणला. ग्वीदो ग्वीनीत्सेल्ली (१२४० ?–१२७६) आणि ग्वीदो काव्हालकांती (सु. १२५०–१३००) हे ह्या काव्यप्रवाहाचे प्रवर्तक. त्यास दान्तेने Dolce stil nuovo (नवी सुमधुर शैली) असे संबोधले आहे. प्रेम आणि उदात्तता ह्यांतील अपरिहार्य दुवा प्रस्थापित करणारा ग्वीनीत्सेल्ली हा बहुधा पहिलाच कवी. स्त्रीच्या रूपाऐवजी तिच्या आत्मिक गुणांचे मोल त्याच्या काव्यात महत्त्वाचे ठरले. काव्हालकांतीने तस्कन कवितेच्या तंत्रकौशल्यात कमालीची सफाई आणली. त्याची काही कविता दुर्बोध असली, तरी अरबी तत्त्वज्ञानाचा निकटचा परिचय असलेल्या एका विचारवंताचे मन तीतून प्रकर्षाने प्रत्ययास येते.

आंजोल्येअरी चेक्को (सु. १२६०–सु. १३१२) ह्या कवीची आत्मविडंबनात्मक कविता आतापर्यंतच्या गंभीर काव्यरचनेच्या पार्श्वभूमीवर वेगळी उठून दिसते. त्याच्या सुनीतांत वैफल्य, दारिद्र्य इत्यादींविषयीच्या तीव्र कडवटपणा असला, तरी त्याला विनोदाची धार आहे. प्रेमाचे वर्णन तो ‘गुलाबविरहित काटा’ असे करतो. सर्वसामान्यांच्या जीवनातील वास्तवता त्याच्या कवितेत अवतरते. इटालियन साहित्यातील वास्तववादी आणि विनोदगर्भ कवितेचा तो जनक होय. काही टीकाकार त्याला बोकाचीओचा पूर्वसूरी मानतात.

चौदावे शतक : या शतकातील इटालियन साहित्य दान्ते (१२६५–१३२१), पीत्रार्क (१३०४–१३७४) आणि बोकाचीओ (१३१३–१३७५) ह्या तीन साहित्यश्रेष्ठींच्या प्रभावाने भारलेले आहे.

दान्तेचे दिव्हीना कोम्मेदीआ (इं. शी. डिव्हाइन कॉमेडी) हे जगद्‌विख्यात महाकाव्य. हे रूपकात्मक असून त्यात कवीचा नरकापासून (इन्फेर्नो) स्वर्गापर्यंतचा (पारादीसो) प्रवास वर्णिला आहे. ह्या काव्यकृतीनेच इटालियन भाषासाहित्याला यूरीपीय साहित्यात मानाचे स्थान प्राप्त झाले. ही काव्यकृती इटालियन भाषेच्या तस्कन बोलीत रचिली गेली असल्यामुळे ह्या बोलीलाही वाङ्‌मयीन महत्त्व प्राप्त झाले. Vita nuova मध्ये (सु. १२९३) त्याच्या भावकविता असून त्यांच्याशी संबद्ध अशी गद्य निवेदनेही आहेत. साहित्याप्रमाणेच तत्त्वज्ञान, राजकारण आदी क्षेत्रांतुनही दान्तेचे मन जिवंतपणे वावरत होते. ज्ञानाची मेजवानी देण्याच्या हेतूने लिहिला गेलेला Convivio (सु. १३०४–१३०७ स इं. शी. बँक्विट) आणि राजकीय स्वरूपाचा De Monarchia (१३१०–१३१२ ?, इं. शी. ऑन मॉनर्की) ह्या गद्यग्रंथांवरून ह्याची प्रचीती येऊ शकेल. तथापि उच्च वाङ्‌मयीन आविष्कारासाठी इटालियन भाषेचा उपयोग शक्य आणि इष्ट आहे, ह्या मताचा त्याने सैद्धांतिक दृष्ट्या केलेला पाठपुरावा आणि त्यासाठी त्याने व्यक्तिशः केलेले परिश्रम ही त्याची विशेष मोलाची कामगिरी होय. De vulgari eloquentia (इं. शी. ऑन द इलस्ट्रियस व्हर्‌नॅक्यूलर) हा ग्रंथ त्या दृष्टीने लक्षणीय आहे. इटालियन भाषेच्या समर्थनाखेरीज ह्यात भाषा आणि साहित्यशैलीविषयक मोलाचे विचार आले आहेत. ह्या गद्यग्रंथांचे आवाहन मुख्यतः इटलीतील अल्पसंख्य सुशिक्षितांना असल्यामुळे तो लॅटिनमध्ये लिहिलेला आहे. दान्तेच्या साहित्याने इटालियन साहित्यिकांच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती दिलीच; शिवाय एकूण यूरीपीय साहित्यावरही दान्तेने लक्षणीय परिणाम घडवून आणला. टी. एस्. एलियटसारख्या जागतिक कीर्तीच्या आधुनिक साहित्यश्रेष्टींनाही त्याने प्रभावित केले.

पीत्रार्क हा जसा श्रेष्ठ कवी,  तसाच एक मान्यवर विद्वनही होता. प्राचीन अभिजात साहित्याची ग्रीक-लॅटिन हस्तलिखिते जमविण्याच्या उद्देशाने त्याने यूरीपभर प्रवास केला. खंडित झालेल्या अभिजात साहित्यपरंपरेचे पुनरुज्जीवन करणे, ही पीत्रार्कची भूमिका होती, त्यामुळे लॅटिन भाषेसंबंधी त्याला आस्था होती; परंतु तिच्याकडे पाहण्याचा त्याचा हा दृष्टिकोणही नवा होता. काहीशा जिद्दीनेच त्याने लॅटिनमध्ये ग्रंथरचना केली आणि लॅटिनच्या सखोल अभ्यासामुळेच इटालियन साहित्यातही तो नवचैतन्य आणू शकला. त्याच्या काळातील इतर कोणत्याही साहित्यिकापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि साहित्यात भावी प्रबोधनाची मानवतावादी बाजू जास्त ठळकपणे उमटलेली दिसते. पीत्रार्कने कवितेतील आत्मपरतेस प्राधान्य दिले. कवीचे अंतजीवन आणि भाववृत्ती यांचा उत्कट आविष्कार त्यात आढळतो. दान्तेच्या काव्यातून अवतरणारी बीआट्रिस ही आदरणीय देवता वाटते, तर पीत्रार्कच्या प्रेमकाव्यातील लॉरा ही हाडामांसाची मानवी स्त्री वाटते, हा फरक लक्षणीय आहे. पहिला आधुनिक कवी, असाही पीत्रार्कचा उल्लेख केला जातो. Canzoniere मध्ये (इं. शी. अ कलेक्शन ऑफ लिरिक्स) त्याची सुनीते, कांझोने इ. प्रकारांतील रचना अंतर्भूत आहे. सुनीत आणि कांझोने ह्यांच्या रचनेतील पूर्णत्वाची एक नवीच पातळी पीत्रार्कने गाठली. विशेषतः सुनीतरचनेच्या संदर्भात त्याचे अनुकरण इटलीत आणि इटलीबाहेरही फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे. इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड आदी देशांतील पीत्रार्कच्या अनुकरणाची ही प्रवृत्ती ‘पीत्रार्किझम’ ह्या नावाने ओळखली जाते.

चौदाव्या शतकातच जागतिक कथासाहित्यात मोलाची भर घालणारा देकामेरॉन (Decameron) हा ग्रंथ लिहिला गेला. ह्याचा कर्ता बोकाचीओ. ह्या कथाग्रंथात शंभर कथा आहेत. फ्लॉरेन्स शहरावर प्लेगच्या साथीमुळे मृत्यूची छाया पसरलेली असताना तीन तरूण आणि सात तरुण स्त्रिया ते शहर सोडून एका सुरक्षित ठिकाणी जातात आणि तेथे असताना दहा दिवस एकमेकांना गोष्टी सांगून आपले मन रिझवतात, अशी ह्या कथांमागची पार्श्वभूमी बोकाचीओने दाखविली आहे. पीत्रार्कप्रमाणेच ग्रीक आणि लॅटिन साहित्याबद्दल त्याला आदर होता आणि देकामेरॉननंतर तर त्याने केवळ लॅटिनमध्येच लेखन केले. तथापि त्याच्या या ग्रंथाने इटालियन गद्याला दिलेले वळण महत्त्वपूर्ण आहे. तस्कन बोलीला वाङ्‌मयीन मोल प्राप्त करून देण्यात बोकाचीओचा वाटाही मोठा आहे. बोकाचीओपूर्वीची इटालियन गद्यशैली सर्वसाधारणतः कृत्रिम आणि अलंकारप्रचुर होती. बोकाचीओने ती सहजसुंदर आणि कलात्मक केली व उत्कृष्ट गद्यशैलीचा एक आदर्शच निर्माण केला. मध्ययुगातील कथाकथनाची आणि मिथ्यकथांची संपन्न परंपरा इटालियन साहित्यात त्याने जिवंत ठेवली. तसेच साहित्य आणि सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवन ह्यांच्यात निकटचे नाते निर्माण केले. इटालियन वाङ्‌मयातील वास्तववादी प्रवृत्ती जोपासून बळकट केली. कवी म्हणून तो श्रेष्ठ नव्हता; तथापि ‘ओतावा रिमा’ ह्या छंदात त्याने काही सफाईदार काव्यरचना केली आहे. हा छंद शोधून काढण्याचे श्रेयही त्याला काही अभ्यासक देतात. फात्स्यो देल्यी ऊबेर्ती (सु. १३०७–सु. १३७०), चीनो दा पीसतोया (सु. १२६५–सु. १३३६), आंतॉन्यो पूत्‌ची (सु. १३१०–१३८८), जोव्हान्नी फ्योरेंतीनो, फ्रांको साक्केत्ती (सु. १३३०–१४००), आंद्रेआ दा बार्बेरीनो (सु. १३७०–सु. १४३१), याकोपो पास्साव्हांती (सु. १३०२–१३५७), दीनो कोमपान्यी (सु. १२५५–१३२४), जोव्हान्नी व्हिल्लानी (सु. १२७०–१३४८) हे या शतकातील काही उल्लेखनीय साहित्यिक. ऊबेर्तीने Dittamondo हे काव्य लिहिले, तर चीनो दा पीसतोयाने 'नूतन सुमधुर शैली'त काही उत्कृष्ट प्रेमगीते रचिली. आंतॉन्यो पूत्‌ची याने आत्मचरित्रात्मक सुनीते लिहिली. बोकाचीओच्या धर्तीवर फ्रांको साक्केत्ती ह्याने Trecentonovelle (इं. शी. थ्री हंड्रेड टेल्स) लिहिल्या. फ्योरेंतीनोनेही अशाच कथा लिहिल्या आहेत (Pecorone). आंद्रेआ दा बार्बेरीनो ह्याने काही रीमान्स लिहिले. सार्वजनिक चौकांतून त्याचे रीमान्स वाचले जात. धार्मिक गद्याच्या संदर्भात याकोपो पास्साव्हांती हे नाव विशेष उल्लेखनीय. त्याच्या Specchio di vera penitenza मध्ये (इं.शी.द. मिरर ऑफ ट्रू पेनिटन्स) त्याने १३५४ मध्ये दिलेली प्रवचने संगृहीत केलेली आहेत. त्यांतील धर्मभावनेची उत्कटता आणि उदात्त नीत्युपदेश लक्षणीय आहे. दीनो कोमपान्यी आणि जोव्हान्नी व्हिल्लानी हे दोघे इतिवृत्तकार फ्लॉरेन्सचे रहिवासी. इतिहास. इतिवृत्तलेखनाचे फ्लॉरेन्स हे केंद्रच झालेले होते. Cronica delle cose occorrenti ne tempi suoi (१३१०–१३१२) ह्या कोमपान्यीच्या इतिवृत्तात त्याने फ्लॉरेन्समधील काही तत्कालीन राजकीय घटना नमूद केल्या आहेत. निवेदनातील जिवंतपणामुळे आणि नाट्यात्मतेमुळे ते वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे. व्हिल्लानीच्या Cronica ची व्याप्ती फार मोठी आहे. इतिवृत्तलेखनाच्या मध्ययुगीन शैलीस अनुसरून ते लिहिले आहे. या इतिवृत्तात कोमपान्यीची नाट्यात्मकता आढळत नसली, तरी ऐतिहासिक तपशील सर्वसाधारणतः विश्वासार्ह असून इतिहासकारांना उपयुक्त असा आहे.

पंधरावे शतक : पश्चिमी प्रबोधनाच्या ऐन प्रभावाचे हे शतक.त्यात दान्ते, बोकाचीओ आणि पीत्रार्क ह्यांच्या तोलाचे साहित्यिक झाले नाहीतच; परंतु  त्याच्या पहिल्या साठ वर्षात इटालियनमध्ये लिहिणारे साहित्यिकही अगदी थोडे आणि तेही सामान्य प्रतिभेचे असे होते. याउलट प्राचीन ग्रीक आणि लॅटिन साहित्याविषयीची आस्था पराकोटीस गेली होती. ह्या भाषांतील अभिजात साहित्यकृतींच्या हस्तलिखितांचे संशोधन करणे, त्यांचा साक्षेपी अभ्यास करणे अशांसारख्या कामांत इटालियन विद्वान गढून गेले होते. अशा प्रकारच्या आकादमिक कार्यासाठी त्यांना भक्कम राजाश्रय मिळत होता. फ्लॉरेन्स, मिलान, नेपल्स अशा राज्यांतून अनेक विद्वान सन्मानाने वावरत होते. मुख्यतः लॅटिन भाषेतच लेखन करण्याकडे ह्या विद्वानांचा कल होता. प्‍लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल ह्या ग्रीक तत्त्वज्ञांच्या ग्रंथांची लॅटिनमध्ये भाषांतरे करण्यात आली. फ्लॉरेन्स येथे प्लेटॉनिक अकादमीची स्थापना झाली. इटलीत प्रभावी असलेल्या मानवतावादाचीच ही वाङ्‌मयीन बाजू होय. ह्या काळातील लॅटिनच्या वर्चस्वामुळे इटालियन वाङ्‌मयावर अर्थातच प्रतिकूल परिणाम झाला. लिओनार्दो ब्रूनी (१३७४–१४४४), पॉद्‌जो ब्रात्‌चोलीनी (१३८०–१४५९), जोव्हान्नी आउरीस्पा (१३६९ –१४५९), लोरेंत्सो व्हाल्ला (१४०७–१४५७), फ्रांचेस्को फिलेल्फो (१३९८–१४८१) ही अशा मानवतावादी आणि लॅटिनप्रेमी विद्वानांची काही नावे. अशा विद्वानांनीही इटालियनमध्ये काही थोडेसे लेखन केले. उदा., ब्रूनोने दान्ते आणि पीत्रार्क ह्यांची चरित्रे लिहिली. फ्रांचेस्को फिलेल्फो ह्याने पीत्रार्कच्या Canzoniere वर भाष्य (अपूर्ण) लिहिले.  तथापि ह्या लेखनाने इटालियन साहित्याला फारशी गती मिळाली नाही.

लॅटिनविषयी प्रेम असूनही इटालियन भाषेचा अभिमान बाळगणारे काही मानवतावादी विद्वानही होते. त्यांत ⇨ लेओन बात्तीस्ता आल्बेर्ती (१४०४–१४७२), पोलित्स्यानो (आंजेलो आंब्रोजीनी, (१४५४–१४९४) आणि याकोपो सान्नाद्झारो (१४५८ –१५३०) ह्यांचा समावेश होतो. आल्बोर्ती हा जसा साहित्यिक, तसा श्रेष्ठ वास्तुकार, शिल्पकार, चित्रकार, संगीतकार, वैज्ञानिक आणि गणितज्ञ होता. एका अर्थाने लिओनार्दो दा व्हींचीचा हा पूर्वावतार होय. त्याच्या इटालियनमधील लेखनात Della famiglia (इं. शी. ऑफ द फॅमिली) हा चार भागांत रचिलेला ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे आल्बेर्ती कुटुंबातील मंडळींचे विविध विषयांवरील संभाषण आहे. पहिल्या खंडात शिक्षणविषयक मौलिक विचार आले असून दुसऱ्यात विवाहविषयक चर्चा आहे. गृहकृत्ये आणि गृहव्यवस्था ह्या विषयास तिसरा खंड वाहिलेला आहे आणि चौथ्यात मैत्रीसंबंधीचे विचार आहेत. चित्रकला आणि शिल्पकला ह्यांवरही त्याने लेखन केले असून त्यांतील दृष्टिकोण खास प्रबोधनकालीन असा आहे. आल्बेर्तीने इटालियन काव्यरचनेची एक स्पर्धा आयोजित केली होती. तिला 'Certame coronario' (काँटेस्ट फॉर द क्राउन) असे म्हणत. दर्जेदार विषय पेलण्याची ताकद इटालियन भाषेत खासच आहे, हे सिद्ध करणे हा ह्यामागील हेतू होता. ह्या स्पर्धेतील कविता फार मोलाच्या नव्हत्या; तथापि अभिजात लॅटिन छंदांत इटालियन कविता रचण्याचा प्रयत्‍न तीत दिसून आला.

पोलित्स्यानोने काही उत्कृष्ट प्रेमगीते लिहिली; तसेच ऑर्फीअस आणि यूरिडिसी ह्या युगुलावर आधारित असे Orfeo हे इटालियनमधील पहिले लौकिक नाटक लिहिले (१४८०) त्याचा गाभा संपूर्णतः पेगन (प्राचीन ग्रीक-रोमनांचा बहुदेवतावादी धर्म) आहे. जूल्यानो मेदीचीच्या सन्मानार्थ लिहिलेले Stanze per la giostra (इं. शी. स्टँझाज फॉर द टूर्नामेंट) हे काव्यही श्रेष्ठ दर्जाचे आहे. पोलित्स्यानो हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी होय.

पोलित्स्यानोला राजाश्रय देणारा फ्लॉरेन्सचा राजा लोरेंझो दे मेदीची (१४४९–१४९२) हा स्वतः कवी होता. दान्ते आणि पीत्रार्क ह्यांच्या अनुकरणाने त्याने काही प्रेमकविता लिहिल्या. शारीरिक प्रीती, निसर्गप्रेम आणि पुराणकथांशी निगडित असलेली प्रतिमासृष्टी ही त्याच्या काव्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. त्याने धार्मिक विषयावरील एक नाटकही लिहिले होते. त्याच्या साहित्यसेवेच्या तुलनेने इटालियन लेखकांना त्याने दिलेला आश्रय आणि इटालियन साहित्य-संस्कृतिविषयक त्याची आस्था विशेष मोलाची आहे.

याकोपो सान्नाद्झारोने पीत्रार्कच्या धर्तीवर काही सुनीते, तसेच काही विनोदी एकभाषिते लिहिले. तथापि त्याची ख्याती मुख्यतः Arcadia (१५०४) ह्या त्याच्या रोमान्सवर अधिष्ठित आहे. संपन्न गद्यशैलीत लिहिलेल्या ह्या रोमान्समध्ये मेंढपाळांचे जीवन चित्रित केले आहे. त्यात काही गीतेही आहेत. पुढील शतकातील अनेकांना हा रोमान्स आदर्शवत ठरला. सुप्रसिद्ध इंग्रज कवी एडमंड स्पेन्सर (१५५२?–१५९९) आणि फिलिप सिडनी (१५५४–१५८६) ह्यांच्यावर त्याचा फार मोठा प्रभाव आढळून येतो.

ह्याच शतकात लूईजी पूल्‌ची (१४३२–१४८४) आणि मात्तेओ बोयार्दो (१४४१–१४९४) ह्या दोन कवींनी अनुक्रमे Morgante (१४८२) आणि Orlando Innamorato (१५२६, १५३१) ही शिलेदारी साहसांवर आधारलेली महाकाव्ये लिहून रम्याद्‌भुत महाकाव्यांचा एक नवाच प्रकार उदयास आणला. त्याशिवाय बोयार्दोने लिहिलेल्या काही गीतांचा समावेश ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ गीतांत केला जातो. लिओनार्दो दा व्हींची ह्याने वैज्ञानिक विषयांवर केलेले लेखनही उल्लेखनीय आहे.

सोळावे शतक : ह्या शतकातही प्रबोधनकालीन मानवतावादाचा प्रभाव होताच. तथापि लॅटिनमध्ये होणाऱ्या ग्रंथरचनेचे प्रमाण कमी झालेले दिसते; तसेच इटालियन भाषेकडे पाहण्याची अनादराची दृष्टीही बऱ्याच प्रमाणात नाहीशी झालेली आढळते. सर्जनशील इटालियन साहित्यिकांना आता आत्माविष्कारासाठी इटालियन भाषांच विशेष जवळची वाटू लागली. काव्याबरोबरच नाटक, आत्मचरित्र यांसारखे इतर साहित्यप्रकारही नावारूपास आले. इतिहास, राज्यशास्त्र इ. क्षेत्रांतही श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ निर्माण झाले. दान्ते, पीत्रार्क आणि बोकाचीओ हे जसे चौदाव्या शतकातील इटालियन साहित्याचे आधारस्तंभ; तसेच प्येअत्रो बेंबो (१४७०–१५४७), लोदोव्हीको आरिऑस्तो (१४७४–१५३३), मॅकिआव्हेली (१४६९–१५२७), फ्रांचेस्को ग्वीत्‌चार्दीनी (१४८३–१५४०), तोरक्‍वातो तास्सो (१५४४–१५९५) हे सोळाव्या शतकातील इटालियन साहित्याग्रणी. प्रबोधनकाळाची वैशिष्ट्ये ह्या शतकातील इटालियन साहित्यात पूर्णत्वाने आविष्कृत झाली. उन्नत कलाभिरुची, इहलोकपर तत्त्वज्ञान आणि व्यक्तीची प्रतिष्ठा यांविषयीची सखोल आस्था ह्या काळातील श्रेष्ठ वाङ्‌मयकृतींत आढळून येते.

बेंबो याचा Prose della volgar lingua (१५२५) हा ग्रंथ म्हणजे इटालियन भाषेचा जाहीरनामाच होय. ह्याच ग्रंथात त्याने लॅटिनऐवजी वाङ्‌मयीन भाषा म्हणून इटालियनचाच स्वीकार व्हावा आणि ही इटालियन भाषा म्हणजे इटलीतील तस्कन बोलीच असावी, असे विचार व्यक्त केले. पीत्रार्क आणि बोकाचीओ ह्यांसारख्या वाङ्‌मयश्रेष्ठींनी तस्कन भाषेला प्राप्त करून दिलेले सामर्थ्य आणि संपन्नता लक्षात घेता, ती भाषा केवळ तस्कनीची राहिलेली नसून संपूर्ण इटलीचीच झालेली आहे, अशा स्वरूपाचा त्याचा विचार होता. इटालियन भाषेच्या व्याकरणविषयक नियमांचाही समावेश ह्या ग्रंथात आहे; तसेच वाङ्‌मयीन शैलीविषयीचे महत्त्वपूर्ण विचारही आहेत. काव्याच्या बाबतीत पीत्रार्कचा आदर्शच काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे, ही त्याची धारणा होती. बेंबो याला प्राप्त झालेली प्रतिष्ठा एवढी मोठी होती, की हयातभर त्याने इटलीचे वाङ्‌मयीन नेतृत्व केले. त्याने पुरस्कारलेल्या पीत्रार्कवादाचा प्रभाव सोळाव्या शतकातील इटालियन भावकवितेवर प्रकर्षाने पडला. तथापि काही पीत्रार्कवादी कवींनी केवळ पीत्रार्कचे अनुकरण न करता काही प्रमाणात स्वत:चे वेगळेपणही दाखविले. अशा कवींत जोव्हान्नी ग्वीदीत्‌चोनी (१५००–१५४१) व जोव्हान्नी देल्ला कासा (१५०३–१५५६) ह्यांचा समावेश होतो. ह्याच काळात व्हेरीनीका गांबारा (१४८५–१५५०), व्हीत्तॉर्या कोलोन्ना (१४९२–१५४७) अशा काही कवयित्री उदयास आल्या. त्यांची सुनीतादी रचना भावोत्कट आहे. मायकेलअँजेलो (१४७५–१५६४) आणि लूईजी तान्सील्लो (१५१०–१५६८) हेही उल्लेखनीय कवी. मायकेलअँजेलोच्या सुनीतांतून आणि माद्रिगलगीतांतून त्याचे समर्थ व्यक्तिमत्त्व आणि प्लटॉनिक प्रेमभावना प्रत्ययास येते. लूईजी तान्सील्लोचे Le lagrime di San Pietro (१५८५) हे एक उत्कृष्ट धर्मकाव्य होय. त्याने काही उत्कृष्ट सुनीतेही लिहिली. तथापि लोदोव्हीको आरिऑस्तोचे Orlando Furioso (१५३२) हे महाकाव्य म्हणजे ह्या शतकातील एक श्रेष्ठ काव्यकृती होय. मात्तेओ बोयार्दो ह्याच्या अपूर्ण राहिलेल्या Orlando Innamorato ह्या महाकाव्याचाच पुढील भाग म्हणून आरिऑस्तोनो हे महाकाव्य लिहिले. प्रबोधनकालीन आदर्शवाद्याचे सौंदर्यविश्व आरिऑस्तोने काव्यरूपात आविष्कारिले. Orlando... मधील नायकनायिका ही प्रबेधनकालीन आदर्शांचीच रूपे होत. बोयार्दो आणि लूईजी पूल्‌ची ह्यांनी निर्मिलेल्या रम्याद्‌भुत महाकाव्याचे तंत्र आरिऑस्तोने पूर्णत्वास नेले. आरिऑस्तोच्या धर्तीवर बेरनार्दो तास्सो (१४९३–१५६९) ह्याने L'Amadigi di Gaula (१५६०) हे महाकाव्य लिहिले. तसेच जांजोर्जो त्रीस्सिनो (१४७८–१५५०) ह्याने अ‍ॅरिस्टॉटलच्या काव्यशास्त्रांतर्गत नियमांनुसार L' Italia liberata dai Goti (१५४७) ह्या महाकाव्याचीही रचना केली. मात्र हे प्रयत्‍न फारसे लक्षवेधी ठरले नाहीत. आरिऑस्तोच्या महाकाव्यानंतर नाव घेण्यासारखे महाकाव्य म्हणजे तोरक्‍वातो तास्सोचे Gerusalemme Liberata (१५७५) हे होय. मार्टिन ल्यूथरच्या धर्मसुधारणेच्या चळवळीविरुद्ध इटलीत तीव्र वातावरण असताना हे महाकाव्य रचिले गेले. पहिल्या धर्मयुद्धात गॉडफ्री ऑफ बूयाँने जेरूसलेम कसे जिंकून घेतले, हा या महाकाव्याचा विषय. अ‍ॅरिस्टॉटलप्रणीत महाकाव्यानियमांचे तास्सोने उल्लंघन केल्याने त्यावर इटलीत बरीच टीका झाली. हे महाकाव्य भावगेय (लिरिकल) असले, तरी त्यातील नैतिक आणि धार्मिक उद्देश स्पष्टपणे प्रतीत होतात.

ह्या काळातील विनोदी काव्यलेखनात फ्रांचेस्को बेर्नी (१४९८?–१५३५) याचा उल्लेख आवश्यक आहे. तत्कालीन जीवनावरील उपरोधपूर्ण भाष्य त्याच्या कवितांत आढळते.

जोव्हान्नी रूचेल्लाई (१४७५–१५२५), लूईजी आलामान्नी (१४९५–१५५६) ह्यांसारख्या कवींनी बोधवादी स्वरूपाची काव्ये लिहिली. रूचेल्लाईचे Le api (इं. शी. द बीज) हे काव्य व्हर्जिलच्या जॉर्जिक्समधील चौथ्या खंडावर आधारित आहे. लूईजी आलामान्नी ह्याने निर्यमक छंदात Della Coltivazione (१५४६) हे शेते आणि उद्याने ह्यांची निगा कशी राखावी, ह्या विषयावरील दीर्घकाव्य लिहिले.

‘मरलायनस कॉकेयस’ ह्या टोपण नावाने लिहिणाऱ्या तेऑफीलो फोलेंगो (१४९१–१५४४) ह्या कवीने काव्यरचनेसाठी माध्यम म्हणून लॅटिन आणि इटालियन ह्यांचे चमत्कारिक मिश्रण करून घडविलेली भाषा वापरली. ह्या भाषेस ‘मॅकरॉनिक लॅटिन’ असे म्हटले जाते.

ह्या शतकातील गद्यलेखन वैविध्यपूर्ण आहे. कथालेखनावर बोकाचीओचा प्रभाव जाणवतो. त्यावेळचा एक शिल्पकार व सुवर्णकार बेनव्हेनूतो चेल्लीनी (१५००–१५७१) ह्याने लिहिलेल्या आत्मचरित्रात प्रबोधनकालीन इटलीचे जीवन प्रतिबिंबित झाले आहे. त्यातील कथनशैली निर्भीड आणि मनमोकळी आहे. जगातील नामांकित आत्मचरित्रांत त्याची गणना केली जाते. चित्रकार व वास्तुकार जोर्जो व्हाझारी (१५११–१५७४) ह्या सु. दोनशे इटालियन कलावंतांची चरित्रे लिहिली. ही चरित्रे Le vite de'piu eccellenti Pittori, scultori e architettori (१५५०, इं. शी. लाइव्ह्‌ज ऑफ द मोस्ट एक्स्लंट पेंटर्स, स्कस्प्टर्स अँड आर्किटेक्ट्स) ह्या ग्रंथाच्या तीन खंडांत विभागली असून हे तीन खंड इटालियन कलेच्या तीन विकासावस्था सुचित करतात. ह्या चरित्रमालेसोबतच वास्तुकला, मूर्तिकला आणि चित्रकला ह्यांवर महत्त्वपूर्ण विवेचक लेख आहेत. प्रबोधनकालीन इटालियन कलेचा इतिहास मसजून घेण्याच्या दृष्टीने ह्या चरित्रांचे मोल फार मोठे आहे.

प्रबोधनकालीन इटालियन साहित्यातील एक अभिजात गद्यकृती म्हणून बाल्दास्सारे कास्तील्योने ह्याने लिहिलेला Il libro del cortegiano (१५२८, इं. शी. द बुक ऑफ द कोर्टिअर) हा दरबारी आचारविषयक ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. ह्या ग्रंथाची लोकप्रियता केवळ इटलीपुरती मर्यादित राहिली नाही, तर तिला एकूण यूरीपीय साहित्यातही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले.

नाट्यलेखनाच्या क्षेत्रात श्रेष्ठ दर्जाची अशी एकही शोकात्मिका लिहिली गेली नाही. तथापि Sofonisba (१५१५) ही खऱ्याखुऱ्या अर्थाने पहिली इटालियन शोकात्मिका ह्याच काळात जांजोर्जो त्रीस्सिनो ह्याने लिहिली. ह्या नाटकात अ‍ॅरिस्टॉटलप्रणीत ऐक्यत्रयापैकी कालैक्य आणि कृती-ऐक्य ह्यांचे कसोशीने पालन केले होते. काही काळ शोकात्मिकांचा अभिजात आदर्श पुढे ठेवला गेला. तथापि जीराल्दी चींत्स्यो (१५०४–१५७३) ह्या नाटककाराने ग्रीक नाटकांऐवजी सेनीकाच्या नाट्यकृतींचा आदर्श पुढे ठेवावा, असे विचार पुढे आणले. तथापि ह्या आदर्शविषयक परिवर्तनातून नाट्यकृतींचा दर्जा मात्र उंचावला नाही.

शोकात्मिकांच्या मानाने सुखात्मिकांची गुणवत्ता अधिक वाटते. ह्या सुखात्मिकांपुढे मुख्यतः प्लॉटस आणि टेरेन्स ह्या रोंमन नाटककारांच्या सुखात्मिकांचा आदर्श होता. आरिऑस्तोचा Cassaria (१५०८) आणि I Suppositi  (१५०९) ह्या सुखात्मिका त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. बेर्नार्दो दोव्हीत्स्यो दा बीब्येअना (१४७०–१५२०) ह्याची La Calandria (१५१३) ही सुखात्मिकाही उल्लेखनीय आहे. आगोस्तीनो बेक्कारी (–१५९०) ह्याने Sacrificio (१५५४) हे नाटक लिहून गोपनाट्य हा नवा नाट्यप्रकार इटलीत आणला. त्याच्या धर्तीवर तोरक्वातो तास्सोसारख्या साहित्यिकाने Aminta (१५७३) हे गोपनाट्य लिहिले.

इतिहास आणि राज्यशास्त्र ह्या विषयांवर फ्रांचेस्को ग्वीत्‌चार्दींनी (१४८३–१५४०) आणि निक्कोलो मॅकिआव्हेली ह्या दोन विद्वानांनी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. ग्वीत्‌चार्दीनीच्या Storia d' Italiaमध्ये (१५६१–१५६४) आठव्या चार्ल्सच्या इटलीप्रवेशापासून पोप सातव्या क्लेमंटच्या निधनापर्यंतचा इटलीचा इतिहास आलेला आहे. ह्या विवक्षित काळातील संपूर्ण इटलीतील राजकीय स्थित्यंतरांचा आलेख ह्यात सापडतो. हा त्याचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. इटलीचा ह्यात एकसंधपणे विचार केला आहे, हे ह्या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. Ricordi politicie civili हा त्याचा ग्रंथ १५७६ ते १५८५ च्या दरम्यान प्रसिद्ध झाला. त्यातील काही भाग राजकीय विचारांचा असला, तरी एकंदरीने ह्या ग्रंथात मानवी जीवनाच्या विविध अंगांसंबंधीचे चिंतन सु. दोनशे सुत्रांमधून व्यक्त झालेले आढळते. त्याच्या Del reggimento di Firenze मध्ये फ्लॉरेन्सच्या शासनव्यवस्थेच्या दृष्टीने श्रेयस्कार योजना कोणती असू शकेल, ह्यासंबंधीचे प्रतिपादन आहे व त्याच्या अनुषंगाने राजकारणातील अनेक मूलभूत बाबींचा विचार त्यात आला आहे.

मॅकिआव्हेली हे तर एत चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. इतिहासविषयक आणि राज्यशास्त्रविषयक लेखनाबरोबरच त्याने नाटकासारखे साहित्यप्रकार हाताळले. त्याने लिहिलेल्या नाटकांपैकी La Mandragola (१५१३ ?, इं. शी. द मॅनड्रेक) ही प्रबोधनकाळातील एक उत्कृष्ट सुखात्मिका म्हणून ओळखली जाते. तथापि तथापिIl Principe (लेखनकाळ १५१२, प्रकाशित १५३२, इं. शी. द प्रिन्स) हा त्याचा जागतिक कीर्तीचा ग्रंथ होय. उत्तरकालीन राज्यशास्त्रीय विचारांवर त्याचा फार मोठा प्रभाव पडला आहे. मॅकिआव्हेली हा पूर्णतः वास्तववादी आहे. राजकारणात साध्यामुळे साधने समर्थनीय ठरू शकतात, ही त्याची धारणा. राजकीय सामर्थ्य आणि स्थैर्य प्राप्त करण्यासाठी शास्त्याने कोणतेही सूक्तासूक्त मार्ग अवलंबावयास हरकत नाही, ही त्याची भूमिका. व्यक्तीपेक्षा राज्याला तो अधिक श्रेष्ठ मानतो. यांशिवाय त्याने फ्लॉरेन्सचा इतिहास (Istorie Fiorentine, लेखनकाळ १५२५, प्रकाशित १५३२) लिहिला आणि युद्धशास्त्रावरही लेखन केले. इटालियन भाषेच्या विकासाविषयीही त्याला आस्था होती. Dialogo intorno alla lingua (१५१४) हा त्याने लिहिलेला ग्रंथ या संदर्भात उल्लेखनीय आहे.

सतरावे आणि अठरावे शतक : सतरावे शतक आणि अठराव्या शतकाचा पूर्वार्ध हा इटालियन साहित्यातील अवनतकाल होय. सखोल आणि परिणामकारक आशयाचे दारिद्र्य आलंकारिक शैलीने झाकून टाकण्याची प्रवृत्ती ह्या कालखंडात प्राधान्याने प्रत्ययास येते. साहजिकच अभिजात अभिरुचीची भूक भागविण्याचे सामर्थ्य ह्या साहित्यात नव्हते. ह्या प्रवृत्तीचा प्रकर्ष विशेषतः जांबात्तीस्ता मारीनो अथवा मारीनी (१५६९–१६२५) ह्याच्या काव्यात आढळतो. पराकोटीचे अलंकारप्राचुर्य आणि शब्दांचा सोस ह्यांतून ह्या काव्यशैलीचा पोकळ डौल निर्माण झालेला असला, तरी ती लोकप्रिय झाली; एवढेच नव्हे, तर तिचा एक संप्रदायही निर्माण झाला. ‘मारीनीस्मो’ किंवा ‘मारीनीझम’ ह्या नावाने तो ओळखला जातो. विस्मयाचे धक्के देण्यापलीकडे कवितेचे काही प्रयोजन असू शकेल, ह्याची जाणीव ह्या संप्रदायाला नव्हती. स्वतः मारीनोने अनेक भावकविता लिहिल्या. तथापि व्हीनस आणि अडोनिस ह्यांच्या मिथ्यकथेवर आधारलेली Adone (१६२३) ही त्याची प्रमुख काव्यकृती होय.

मारीनीझमच्या प्रभावकाळातही गाब्रिएल्लो क्याब्रेअरासारख्या (१५५२–१६३८) कवी आपले वेगळेपण टिकवून होता. अभिजात काव्यकृतींतील छंदांचे– विशेषतः ग्रीक भावकवी पिंडरच्या छंदांचे– त्याला आकर्षण होते. हे छंद त्याने अत्यंत सफाईने हाताळले. त्याची शैलीही बरीच सौम्य आणि संयत होती. त्याने काही उद्देशिका आणि उपरीधिकाही लिहिल्या.

आलेस्सांद्रो तास्सोनी (१५६५–१६३५) हा सतराव्या शतकातील आणखी एक महत्त्वाचा कवी. La Secchia rapita (१६२२, इं. शी. द कॅप्‌चर्ड बकेट) ही त्याची महाकाव्यविडंबिका (मॉक-हिरीइक एपिक) विशेष उल्लेखनीय आहे. अशा विडंबनात एखादा क्षुल्लक विषय घेऊन त्यासाठी महाकाव्याचा घाट आणि भारदस्त शैली वापरण्यात येते.

सतराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ तोम्माझो कांपानेल्ला (१५६८–१६३९) ह्याने केलेली काव्यरचना काहीशी ओबडधोबड असली, तरी तीत उत्कटता आहे. फ्रांचेस्को ब्रात्‌चोलीनी (१५६६–१६४८), लोरेंत्सो लीप्पी (१६०६–१६६४) आणि साल्व्हातोर रॉझा (१६१५–१६७३) हे सतराव्या शतकातील आणखी काही उल्लेखनीय कवी. त्यांची कविता मुख्यतः उपरीधप्रचुर आहे.

गद्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट गद्यलेखनाचे आदर्श निर्माण करण्याची स्थितीही ह्या काळातील वाङ्‌मयीन परिस्थितीवर प्रकाश टाकते. Dialogo Sopra i due massimi sistemi del mondo सारख्या (१६३२, इं. शी. डायलॉग ऑन द टू प्रिन्सिपल सिस्टिम्स ऑफ द युनिव्हर्स) त्याच्या ग्रंथांतून शास्त्रीय स्वरूपाचे प्रतिपादनही किती स्पष्ट आणि सुबोध करता येते, ह्याची कल्पना येते.

इटलीवरील स्पॅनिश वर्चस्वाबद्दलचा आत्यंतिक तिटकारा आणि स्वदेशप्रेम बोक्कालीनीच्या (१५५६–१६१३) लेखनात आढळते. तीव्र उपरीध हा त्याच्या लेखनाचा विशेष Ragguagli di Parnaso मध्ये (२ खंड, १६१२, १६१३, इं. शी. डिस्पॅचिस फ्रॉम पार्नासस) प्रकर्षाने प्रत्ययास येतो. Istoria del Concilio di Trento (१६१९, इं. शी. द हिस्टरी ऑफ द कौन्सिल ऑफ ट्रेंट) हा पाओलो सार्पीचा (१५५२–१६२३) इतिहासग्रंथ पूर्णतः निःपक्षपाती नसला, तरी त्यातील गद्यशैली प्रभावी वाटते. तो म्माझो कांपानेल्लाचाLacitta del sole (सु. १६०२, इं. शी. द सिटी ऑफ द सन) हा यूटोपियन ग्रंथ विख्यात आहे. अनेक यूरीपीय भाषांतून त्याचे अनुवाद झालेले आहेत. एका निसर्गजात धर्माच्या आधिपत्याखाली सारी मानवता एखाद्या कुटुंबाप्रमाणे प्रेमाने नांदावी, अशा विचार त्याने मांडला आहे.

इटालियन साहित्याच्या अवनतावस्थेने अनेक समकालीनांना अस्वस्थ केले होते. ह्या अस्वस्थतेतूनच इटालियन साहित्याला इष्ट आणि प्रगतिपर दिशा दाखवून देण्याच्या उद्देशाने सतराव्या शतकाच्या अखेरीस 'अकॅडमी ऑफ आर्केडिया' ह्या नावाची एक संस्था स्थापन झाली (१६९०). मारीनीझमला विरीध करून सुबोध आणि प्रासादिक आविष्काराचे महत्त्व ह्या अकॅडमीने प्रस्थापित केले. प्राचीन ग्रीस मधील आर्केडियन मेढपाळांच्या साध्यासुध्या आनंदी जीवनाने अकॅडमीच्या कवींना आकर्षित केले होते. त्याचे चित्रण काव्यातून होऊ लागले. पण लवकरच साध्या आणि सुबोध आविष्काराची ही आवडही कृत्रिमतेच्या पातळीवर उतरली. एकसुरी ठरलेल्या एका प्रवृत्तीऐवजी तशीच एकसुरी वाटणारी दुसरी प्रवृत्ती प्रभावी झाली.

अकॅडमीच्या संप्रदायातील प्येअत्रो मेतास्ताझ्यो (१६९८–१७८२) हा सर्वश्रेष्ठ कवी होय. अकॅडमीने पुरस्कारिलेल्या वाङ्‌मयीन ध्येयांचा उत्स्फूर्त आविष्कार त्याच्या भावकवितांतून प्रकटला. तथापि त्याचे खरे कर्तृत्व अतिनाट्यलेखनातच (मेलोड्रामा) दिसून आले. Didone Abbandonata ह्या त्याच्या नाट्यकृतीने तो प्रसिद्धीस आला. Attilio Regolo सारख्या (१७४०) नाटकांवर त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. त्यांतून समर्थ भावकवीचे मन उत्कटतेने प्रत्ययास येते. मेतास्ताझ्योच्या काळी अतिनाट्य हे संगीतिका (ऑपेरा) ह्या प्रकारातच मोडत असे.

इटालियन सुखात्मिकांची कालजीर्ण चौकट मोडून तिला नवे रूप आणि चैतन्य ⇨ कार्लो गोल्दोनीने (१७०७–१७९३) प्राप्त करून दिले. ठोकळेबाज व्यक्तिरेखा, निश्चित नाट्यसंहितेच्या अभावामुळे बरेचसे संवाद उत्स्फूर्तपणेच म्हणण्याचा संकेत, त्यांतून पुष्कळदा अटळपणे येणारा विदूषकीपणा यांमुळे ऱ्हासाला लागेल्या इटालियन सुखात्मिकेला त्याने सावरण्याचा प्रयत्‍न केला. आपल्या सुखात्मिकांना सुसंबद्ध स्वरूप, संहिता आणि वास्तववादाची बैठक त्याने दिली. गोल्दोनीने अनेक सुखात्मिका लिहिल्या. तथापि La bottega del Caffe (इं. शी. द कॉफी शॉप), Il ventaglio (इं. शी. द फॅन), La locandiera (इं. शी. द मिस्ट्रेस ऑफ द इन) आणि La casa Nuova (इं. शी. द न्यू हाऊस) या त्याच्या विशेष महत्त्वाच्या सुखात्मिका होत.

अठराव्या शतकाच्या आरंभी फ्रेंच शोकात्मिकांच्या धर्तीवर प्येर याकोपो मारतेल्ली (१६६५–१७२७) ह्याने काही शोकात्मिका लिहिल्या होत्या. तसेच फ्रांचेस्को शीप्योने दी माफ्फेई (१६७५–१७५५) ह्याने Merope (१७१३) ही शोकात्मिका लिहून इटालियन शोकात्मिकेला काही दिशा दाखवून दिली होती. तथापि व्हीत्तॉर्यो आल्फ्येअरी (१७४९–१८०३) ह्याची Saul (१७८२) ही शोकात्मिका इटालियन रंगभूमीवर अवतरताच इटालियन शोकात्मिकेचा एक नवाच प्रवास सुरू झाला. इतिहास, बायबल आणि पुराणकथा ह्यांतून त्याने आपल्या नाट्यकृतींचे विषय निवडले. देशभक्तीच्या भावनेला आल्फ्येअरीने आपल्या शोकात्मिकांतून आवाहन केले आणि राजेशाहीचा व जुलमी सत्ताधीशांचा प्रखर निषेध केला. आल्फ्येअरीच्या शोकात्मिकांचे एकूण स्वरूपच काहीसे राकट आहे. तथापि आल्फ्येअरीने इटालियन साहित्यावर काही काळ, विशेषतः स्वच्छंदतावादाच्या कालखंडात, निश्चितच प्रभाव गाजविला.

प्येअत्रो क्यारी (१७११–१७८५) आणि कार्लो गोत्सी (१७२०–१८०६) हे ह्या कालखंडातील आणखी दोन उल्लेखनीय नाटककार. गोत्सीने जुन्या सुखात्मिकांचे समर्थन करून गोल्दोनीला विरीध केला. प्येअत्रो क्यारीने नवसुखात्मिकेचे काही प्रमाणात अनुकरण केले; तथापि गोल्दोनीला विरोधच केला.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जूझेप्पे पारीनी (१७२९–१७९९) ह्याने Il giorno (इं. शी. द डे) हे चार भागांचे दीर्घकाव्य लिहून इटालियन भाषेतील उपरोधपूर्ण काव्यात मोलाची भर घातली. उच्चवर्गीयांच्या दिखाऊ आणि पोकळ मनोवृत्तीवर त्याने टीका केली.

कार्लो गोत्सीचा वडील बंधू गास्पारी गोत्सी (१७१३–१७८६) ह्याने विविध साहित्यप्रकार हाताळण्याचा प्रयत्‍न केला; पण त्यात तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही. तथापि त्याने काढलेली Gazzetta Veneta (१७६०–१७६१) आणि L' osservatore (१७६१–१७६२) ही दोन नियतकालिके उल्लेखनीय आहेत. स्पेक्टेटर आणि टॅटलर  ह्या इंग्रजी नियतकालिकांचा प्रभाव त्यांवर दिसून येतो. Gazzetta Veneta म्हणजे व्हेनिसमधील तत्कालीन जीवनाची एक दैनदिनीच होय. L' osservatore मध्ये वाङ्‌मयीन आणि तात्त्विक स्वरूपाचे लेखन असे, जूझेप्पे बारेत्ती (१७१९–१७८९) ह्याने La frusta letteraria (१७६३, इं. शी. द लिटररी व्हिप) हे वाङ्‌मयीन समीक्षापर नियतकालिक काढून इटालियन साहित्यातील अनिष्ट प्रवृत्तींवर व त्यांना जबाबदार असणाऱ्या साहित्यिकांवर टीकेची झोड उठविली. बारेत्तीच्या समीक्षेपेक्षा त्याची घणाघाती शैलीच अधिक महत्त्वाची आहे.

वैचारिक लेखनाच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रांत जांबात्तीस्ता व्हीको (१६६८–१७४४) आणि लोदोव्हीको मूरातोरी (१६७२–१७५०) ही नावे विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या Scienza nuova मधून (१७२५–१७४४, इं. शी. न्यू सायन्स) व्हीकोने मानवी प्रगती, इतिहास आणि विविध संस्कृतींचा उत्कर्षापकर्ष ह्यांसंबंधीचे नियम चिकित्सक विवेचन करून प्रतिपादले आहेत. मूरातोरीने ५०० ते १५०० ह्या कालखंडातील अनेक इतिवृत्ते, चरित्रे, पत्रे, रोजनिशा इ. इतिहाससामग्री Rerum italicarum scriptores च्या (१७२३–१७५१) एकूण अठ्ठावीस खंडांत प्रसिद्ध केली. तसेच Antiquitates italicae medii aevi मध्ये (६ खंड, १७३८–१७४३) ह्याच कालखंडातील चालीरीती, सामाजिक संस्था इत्यादींसंबंधीचे चिकित्सक लेखन करून इतिहासातील अनेक गुंतागुतीच्या प्रश्नांची चर्चा केली. Annali d' Italia (१२ खंड, १७४४–१७४९) ह्या नावाचा इटलीचा इतिहास याने लिहिला. त्याला इटलीतील आधुनिक इतिहासलेखनाचा संस्थापक मानण्यात येते. इतिहासलेखनाखेरीज आपल्या Della perfetta Poesia italiana मध्ये (१७०६) त्याने आपले वाङ्‌मयविषयक सिद्धांत मांडले. वाङ्‌मयविषयक लेखन करणाऱ्यांत जोव्हान्नी ग्राव्हीना (१६६४–१७१८) आणि जिरॉलामो तीराबॉस्की (१७३१–१७९४) ही नावेही उल्लेखनीय होत. ‘अकॅडमी ऑफ आर्केडिया’चा ग्राव्हीना हा एक संस्थापक होय. आपल्या Della Ragion Poesia मध्ये (२ खंड, १७०८, इं. शी. ऑन द नेचर ऑफ पोएट्री) त्याने काव्यातील मूलभूत प्रश्नांचा विचार केला आहे. तीराबॉस्कीने Storia della letteratura italiana हा इटालियन साहित्याचा इतिहास बावीस खंडात लिहिला (१३ खंड, १७७२–१७८२ आणि ९ खंड, १७८७–१७९४).

वाङ्‌मय आणि इतिहास ह्यांखेरीज इतर विषयांतही लक्षणीय स्वरूपाचे लेखन झाले. चेझारे बेक्कारिआ (१७३८–१७९४) ह्याने आपल्या Dei delitti e delle pene (१७६४, इं. भा. ऑफ क्राइम्स अँड पनिशमेंट्स, १९६५) ह्या ग्रंथात पुरीगामी दंडव्यवस्थेविषयी विचार मांडले, तर जोव्हान्नी मारीआ ओर्तेस आणि फेर्नादो गाल्यानी (१७२८–१७८७) ह्या दोघांनी अर्थशास्त्रविषयक मौलिक लेखन केले. विविध विषयांवरील ह्या आस्थापूर्वक लेखनातून नवजागृतीची जाणीव सुस्पष्टपणे प्रतीत होते. प्येअत्रो व्हेर्री (१७२८–१७९७) ह्याने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांचा सुरस्कार करण्यासाठी १७६४ मध्ये Il caffe (इं. शी. द कॉफी हाऊस) हे नियतकालिक सुरू केले होते. नव्या जाणिवा वाढीला लावण्यास ह्या नियतकालिकाने महत्त्वाचा हातभार लावला.

एकोणिसावे शतक : या शतकारंभी सबंध इटली नेपोलियनच्या वर्चस्वाखाली आला. परकीय दास्याच्या जाणिवेतून प्रखर राष्ट्रवादी प्रेरणा वाढीस लागल्या. फ्रेंच राज्यक्रांचीने प्रसृत केलेल्या तत्त्वज्ञानाने त्यांची जोपासना केली. परिणामतः ह्या शतकातील एकंदर वातावरण राजकीय जागृतीने भारलेले आढळते. हा काळ 'Risorgimento' किंवा नवजागृतीचा काळ म्हणून ओळखला जातो. ह्या नवजागृतीचे प्रतिबिंब साहित्यातही अपरिहार्यपणे पडलेले दिसते. ह्या काळात राजकीय हेतूंनी लिहिले गेलेले बरेचसे साहित्य म्हणजे इटलीचा राजकीय वारसाच ठरला. हे साहित्य केवळ इटालियनांनाच नव्हे, तर स्वातंत्र्यमूल्यांचा आदर करणाऱ्या कोणत्याही राष्ट्रातील जनतेला आवाहन करणारे आहे. एकोणिसाव्या शतकात इटलीत प्रभावी ठरलेल्या स्वच्छंदतावादाची राष्ट्रवाद ही एक प्रमुख प्रेरणा होती आणि ह्या शतकाच्या आरंभी नव-अभिजाततावादाचे वातावरण असूनही राष्ट्रवादाच्या अनुषंगाने येणाऱ्या स्वच्छंदतावादी प्रेरणाही त्यात मिसळून गेल्यासारख्या दिसतात.  ऊगो फॉस्कोलो (१७७८–१८२७) ह्या श्रेष्ठ इटालियन लेखकाचे उदाहरण ह्या संदर्भात विशेष लक्षणीय आहे. त्याच्यापुढील नव-अभिजाततावादी वाङ्‌मयीन आदर्श त्याच्या साहित्यकृतींतून प्रतीत होत असले, तरी त्याचा देशभक्तिविषयक आविष्कार स्वाभाविकपणेच स्वच्छंदतावादी स्वरूप धारण करतो. फॉस्कोलो हा केवळ साहित्यिक नव्हता. नवजागृतीच्या चळवळीमागील ती एक चैतन्यदायी शक्ती होती. ह्या दृष्टीने नव-अभिजाततावादी भूमिकेतून संस्कारिलेल्या त्याच्या उद्देशिका आणि स्वच्छंदतावादी प्रवृत्तींची जाणीव करून देणारी त्याची Ultime lettere di Jacopo Ortis (१८०२) ही कादंबरी उल्लेखनीय आहे. I sepolcri (१८०७) ही त्याची सर्वश्रेष्ठ काव्यकृती होय. व्हींचेत्सो मोंती (१७५४—१८२८) ह्याने नव-अभिजाततावादाचा पुरस्कार केला. तत्कालीन विषयांवर त्याने प्रासादिक काव्यरचना केली, इलिअडचा इटालियन भाषेत अनुवाद केला आणि काही शोकात्मिकाही लिहिल्या.  जाकोमो लेओपार्दी (१७९८–१८३७) हा ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कवी. साहित्यकृतीच्या घाटाविषयीची नव-अभिजाततावादी शिस्त आणि स्वच्छंदतावादी प्रवृत्ती त्याच्या काव्यात एकजीव झालेल्या आढळतात. अस्वस्थता आणि नैराश्य ह्या दोन भाववृत्तींची त्याच्या काव्यावर गडद छाया आहे. हेतुशून्य आणि कंटाळवाणे आयुष्य सुसह्य करण्यासाठी बालपणीची सुखस्मरणे आपल्या काव्यातून पुनरुज्‍जीवित करण्याचा ध्यास त्यातून उत्कटपणे प्रतीत होतो. कमालीची आत्मपरता आणि समुचित शब्दयोजना ही त्याच्या कवितेची वैशिष्ट्ये. I canti (१८३१) ह्या काव्यसंग्रहात त्याच्या उत्कृष्ट कविता समाविष्ट केलेल्या आहेत.  आलेस्सांद्रो मांझोनीने (१७८५–१८७३) लिहिलेल्या I promessi sposi (१८२७, इं. भा. द बिट्रोद्ड, १९५१) ह्या त्याच्या ऐतिहासिक कादंबरीने इटालियन साहित्याची क्षितिजे ओलांडून एकूण यूरोपीय साहित्यात मानाचे स्थान मिळविले. इटालियन कथात्मक साहित्यापुरतेच बोलावयाचे, तर बोकाचीओच्या देकामेरॉननंतर एवढी श्रेष्ठ साहित्यकृती त्यात अवतरलेली दिसत नाही. सतराव्या शतकात स्पॅनिश वर्चस्वाखाली इटालियनांना भोगाव्या लागलेल्या व्याथा-वेदनांचे अत्यंत परिणामकारक चित्रण ह्या कादंबरीत केलेले आहे. Il conte di Carmagnola (१८२०) आणि Adelchi (१८२२) ह्या शोकात्मिकांत त्याने अभिजाततावादी लेखनपरंपरांचा त्याग केलेला आढळतो.

मांझोनी आणि लेओपार्दी ह्यांनी इटालियन साहित्याला नवे वैभव प्राप्त करून दिले. ह्या थोर साहित्यिकांच्या अवतीभोवती आपापल्या मगदुराप्रमाणे साहित्यनिर्मिती करून नवजागृतीच्या चळवळीस हातभार लावणारे अनेक लेखक होते. मांझोनीच्या I promessi sposi ह्या कादंबरीनंतर ऐतिहासिक कादंबऱ्यांची एक लाटच आली. ह्या कादंबऱ्यांची पार्श्वभूमी भूतकालीन असली, तरी त्यांतून वर्तमानकालीन राजकीय वातावरणाचे– विशेषतः स्वतंत्र आणि एकात्म इटलीच्या स्वप्नाचे– पडसाद उमटलेले दिसून येतात. तोम्माझो ग्रॉस्सी (१७९०–१८५३), मास्सीमो आद्झेअल्यो (१७९८–१८६६), फ्रांचेस्को दोमेनीको ग्वेर्रात्सी (१८०४–१८७३) आणि ईप्पॉलीतो न्येव्हो (१८३१–१८६१) हे अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिणारे काही उल्लेखनीय लेखक. ईप्पॉलीतोची Le confessioni di un Italiano (१८५८) ही एक श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरी होय. इटलीतील राष्ट्रीय जाणीव अठराव्या शतकापासून ऐकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कशी विकसित होत गेली, याचा आलेख तीत दिसून येतो.

राजकीय श्रद्धा, प्रखर देशाभिमान आणि जोमदार गद्यशैली ही जोसेफ मॅझिनी (१८०५–१८७२) याच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्याच्या राजकीय ग्रंथांत Doveri dell' Uomo (१८६०, इं. भा. द ड्यूटीज ऑफ मॅन, १८६२) हा विशेष उल्लेखनीय आहे. त्यात ईश्वर, त्याचा कायदा, स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि मानवजातीच्या संदर्भात माणसाची कोणकेणती कर्तव्ये असू शकतात, ह्यांचे विवेचन साध्या पण परिणामकारक भाषेत त्याने केले आहे.

कार्लो पॉर्ता (१७७६–१८२१), जूझेप्पे बेल्ली (१७९१–१८६३), जूझेप्पे जूस्ती (१८०९–१८५०) इत्यादींनी कवितालेखन केले. पॉर्तने आपल्या उपरीधपूर्ण कवितेतून फ्रेंचांवर आणि ऑस्ट्रियनांवर हल्ला केला. बेल्लीच्या कवितेचे सामाजिक अंग अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक संस्थांचे आणि समाजातील विविध थरांतील व्यक्तींचे त्यात चित्रण आहे. जूस्तीती कविता पॉर्ताप्रमाणेच उपरीधप्रधान आहे.

साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात फ्रांचेस्को दे सांत्तीस (१८१७–१८८३) ह्याने Storia della letteratura italiana (२ खंड, १८७०–१८७१, इं. भा. अ हिस्टरी ऑफ इटालियन लिटरेचर) हा इटालियन साहित्याविषयक चिकित्सक ग्रंथ लिहून मोलाची भर घातली. इटलीतील साहित्यनिर्मितीमागील प्रेरणांचे सखोल विश्लेषण करून लिहिलेला इतक्या व्यापक स्वरूपाचा इटालियन साहित्येतिहासावरील ग्रंथ तोपर्यंत लिहिला गेला नव्हता.

सिल्व्ह्यो पेल्लीको (१७८९–१८५४) ह्या देशभक्त साहित्यिकाने तुरुंगवासातील आपले अनुभव Le mie prigioni मध्ये (१८३२, इं. शी. माय प्रिझनमस) सोप्या परंतु वेधक शैलीत मांडले आहेत. तत्कालीन तुरुंगांतील हालअपेष्टांची त्यामुळे कल्पना येऊ शकते. त्याने काही नाटकेही लिहिली आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीतील स्वच्छंदतावादास ओहोटी लागली. नव-अभिजाततावादाची बाजू खंबीरपणे उचलून धरणारा जोझ्वे कार्दूत्‌ची (१८३५–१९०७) उदयास आला. उत्कट निसर्गप्रेम, पेगन जीवनमूल्यांचा उद्‌घोष, प्राचीन अभिजात साहित्यकृतींसंबंधीचा आदर ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये. निसर्गाविषयीचे त्याचे प्रेम मात्र काहीसे स्वच्छंदतावाद्यासारखेच आहे. त्याच्या उत्कृष्ट भावकवितांतून त्याने प्राचीन रीमचे वैभव, इटलीतील रम्य वनश्री, स्मृतिकोषात दडलेली शैशवातील स्मरणे आणि आपली पेगन जीवनदृष्टी समर्थपणे व्यक्त केली. इटालियन काव्यरचनेसाठी लॅटिनमधील छंद प्रचारात आणण्याचाही त्याने प्रयत्‍न केला. Odi barbare (इं. शी. बार्‌बॅरिक ओड्स) आणि Rime nuove हे त्याचे विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह. कार्दूत्‌ची हा केवळ कवी नव्हता, तर एक विद्वान आणि इटालियन साहित्येतिहासाचा साक्षेपी अभ्यासक होता. त्याच्या वाङ्‌मयीन निबंधांचे मोल काळाच्या ओघातही टिकून राहिले आहे. कार्दूत्‌चीला १९०६ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

कार्दूत्‌चीच्या हयातीतच जोव्हान्नी पास्कोली (१८५५–१९१२) श्रेष्ठ कवी म्हणून ख्याती पावला. इटालियनप्रमाणेच लॅटिनमध्येही त्याने काव्यरचना केली. पास्कोलीही अभिजाततावादी होता. कार्दूत्‌ची त्याला गुरुस्थानी होता. तथापि त्याच्या काव्यातील नैराश्याचे आणि कारुण्याचे सूर त्याला लेओपार्दीच्या जवळपास घेऊन जातात. जीवनमृत्यूच्या द्वंद्वातून उद्‌भवणाऱ्या समस्यांचे चित्रण त्याच्या अनेक कवितांत आढळते. निसर्गप्रेमाचा उत्कट आविष्कार हे त्याच्या कवितेचे एक विलोभनीय वैशिष्ट्य. Myricae (१८९१), Canti di Castel-vecchio (१९०३), Poemi oncviviali (१९०४) व Poemi conviviali (१९१३) हे त्याचे काही विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रह.

जुझेप्पे जाकोसा (१८४७–१९०६) आणि पाओली फेर्रारी (१८२२–१८८९) हे ह्या शतकाच्या उत्तरार्धातील दोन महत्त्वपूर्ण नाटककार. Una partita a scacchi (१८७२, इं. शी. अ गेम ऑफ चेस) आणि I Tristi amori (१८८८, इं. शी. हॅप्लेस लव्ह्‌ज) आणि Come le foglie (१९००, इं. शी. अ‍ॅज द लीव्ह्ज फॉल) ह्या जाकोसाच्या काही विशेष महत्त्वाच्या नाट्यकृती. फेर्रारीच्या नाटकांत Il Goldoni e le sue sedici commedie nuove (१८५१) ही कार्लो गोल्दोनीच्या जीवनावरील सुखात्मिका सर्वश्रेष्ठ गणली जाते. मानवी कृतींमागे दडलेल्या प्रेरणांचा वेध घेण्याची प्रवृत्ती ह्या दोन्ही नाटककारांत दिसते.

प्रवासवर्णने आणि शिक्षणविषयक लेखनाच्या संदर्भात एदमोंदो दे आभीचिस (१८४६–१९०८) ह्याचे नाव उल्लेखनीय आहे. उत्साहाने ओसंडणारी आकर्षक शैली हे त्याच्या प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य. त्याने खास मुलांसाठी लिहिलेल्या शिक्षणविषयक ग्रंथांत Cuore (१८८६, इं. शी. हार्ट) हा अत्यंत लोकप्रिय झाला. शिक्षणातील नैतिक बाजूंवर विशेष भर देण्याविषयीची त्याची भूमिका त्यात प्रत्ययास येते.

आलफ्रेदो ओर्यानी (१८५२–१९०९) ह्याने कादंबऱ्या, नाटके, सामाजिक आणि राजकीय विषयांवरील पुस्तके असे बरेच लेखन केले. Fino a Dogali (१८८९, इं. शी. ईव्हन टू दोगाली), La lotta politica in Italia (१८९२, इं. शी. द पोलिटिकल स्ट्रगल इन इटली) आणि La rivolta ideale(१९०८, इं. शी. द आयडिअल रिव्होल्ट) हे तीन राजकीय ग्रंथ आणि La disfatta (१८९६, इं. शी. द डिफीट) व Olocausto(१९०२) ह्या कादंबऱ्या ह्यांसाठी तो आज मुख्यतः ओळखला जातो. फॅसिझमचा तो प्रेषित मानला जातो. La rivolta ideale मध्ये त्याच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे स्वरूप व्यक्त होते. त्याचा प्रस्थापित समाजव्यवस्थाविरोधी कटाक्ष Olocausto ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीत आढळतो.

ह्या शतकातील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार जोव्हान्नी व्हेर्गा (१८४०–१९२२) हा होय. इटालियन कादंबरीला त्याने वास्तववादी बनविले. सिसिलीतील शेतकरी आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय ह्यांच्या जीवनाभोवती त्याने आपल्या कादंबऱ्यांची कथानके गुंफली आहेत. सिसिली हे त्याचे स्फूर्तिस्थान होते. आपल्या कादंबऱ्यांत सिसिलियन बोलीचा उपयोग त्याने अनेकदा करून घेतलेला आहे. I malavoglia (१८८१) आणि Mastro Don Gesualdo(१८८९) ह्या त्याच्या विशेष महत्त्वाच्या कादंबऱ्या होत. व्हेर्गाने उत्कृष्ट कथालेखनही केले.

लूईजी काप्वाना (१८३९–१९१५) हाही ह्याच वास्तववादी संप्रदायातील. सहा कादंबऱ्या, सं. पंधरा कथासंग्रह आणि सुंदर परीकथा त्याने लिहिल्या. त्याच्या बहुतेक श्रेष्ठ कादंबऱ्या आणि कथा सिसिलीच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या आहेत. Giacinta (१८७९), Profumo (१८९०) ह्या त्याच्या काही विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. Le appassionate (१८९३) ह्या त्याच्या कथासंग्रहात त्याच्या अनेक उत्तम कथा अंतर्भूत आहेत. काप्वानाची मनोविश्लेषणाकडे असलेली प्रवृत्ती त्याच्या लेखनातून प्रतीत होते. C'era una Volta (१८८२, इं. भा. वन्स अपॉन अ टाइम........, १८९२) हा त्याच्या परीकथांचा संग्रह.

जीवनाचे वास्तववादी दर्शन घडविण्याच्या प्रेरणेने अनेक इटालियन लेखकांनी आपला नजीकचा आसमंत न्याहाळण्यास सुरुवात केली आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडू लागेल. प्रादेशिक साहित्याचाच हा एक प्रकार. आंतॉन्यो फोगात्सारो (१८४२–१९११) ह्याच्या कादंबऱ्यातून आढळणारे मनोविश्लेषण लक्षणीय आहे. तसेच त्यांत विज्ञानाने प्रभावित झालेल्या नव्या सामाजिक जाणिवांच्या प्रकाशात रोमन कॅथलिक चर्चचा धार्मिक द्दष्टिकोण संस्कारण्याची तळमळही दिसून येते. व्हेर्गाची उंची तो गाठू शकला नसला, तरी एकोणिसाव्या शतकातील तो एक महत्त्वाचा कादंबरीकार आहे. II piccolo mondo antico(१८९५, इं. भा. द लिट्ल वर्ल्ड ऑफ द पास्ट, १९६२), II piccolo mondo moderno (१९००, इं. शी. द स्मॉल मॉडर्न वर्ल्ड) आणि II Santo (१९०५, इं. भा. द सेंट, १९०६) ह्या त्याच्या कादंबऱ्या विशेष ख्याती पावल्या आहेत.

विसावे शतक : नवजागृतीच्या चळवळीने बाळगलेले एकात्म इटलीचे स्वप्न १८७० मध्ये साकार झाले. इटलीने विसाव्या शतकात दोन महायुद्धांचा अनुभव घेतला आणि फॅसिस्ट राजवटही पाहिली. महायुद्धांच्या आणि फॅसिझमच्या प्रभावकाळात इटालियन वाङ्‌‌मयाला प्रतिकूल स्थितीला तोंड द्यावे लागले. तथापि युद्धोत्तर काळातील इटालियन साहित्याने – विशेषतः कथात्मक साहित्य आणि काव्य ह्या क्षेत्रांत– महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आपल्या परंपरेच्या मूलस्रोतापासून दूर न होता इटालियन साहित्याने आधुनिक यूरोपीय साहित्याच्या प्रवाहात मोलाची भर घातली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक साहित्यिक ह्या शतकात उदयास आले आहेत आणि जगातील नामवंत समीक्षकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे.

विसाव्या शतकाच्या आरंभीचा विख्यात कवी, कादंबरीकार आणि नाटककार ग्राब्रिएले दान्नून्त्स्यो (१८६३–१९३८) हा होय. आज त्याचा प्रभाव विशेष उरलेला नसला, तरी त्याच्या हयातीत त्याने बरीच कीर्ती मिळविली. कार्दूत्‌‌ची, स्विन्‌‌बर्न, नीत्शे आणि समकालीन रशियन कादंबरीकार ह्यांचा वैविध्यपूर्ण परिणाम दान्नून्त्स्योच्या लेखनावर झालेला होता व त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संकुल झाले होते. याचे प्रतिबिंब त्याच्या कवितेत उमटलेले आढळते. लैंगिकता आणि इंद्रियजन्य सुखे ह्यांच्या विचारांनी भारलेले मन, नैतिक बंधने झुगारून देण्याची प्रवृत्ती, मृत्यू, हिंसा आणि पशुता ह्यांबद्दलची ओढ आणि हे सारे आविष्कृत करणारा एक आदिम, आक्रमक सूर त्याच्या काव्यात आणि नाट्यकृतींत आढळतो. त्याची उत्कृष्ट भावकविता Laudi (१९३९) ह्या नावाने संगृहीत झालेली आहे. La figlia di Jorio (१९०४) हे त्याचे सर्वोत्कृष्ट नाटक. त्याच्या बऱ्याचशा कादंबऱ्यांतून सामाजिक भ्रष्टाचाराचे वातावरण आढळते. II trionfo della morte (१८९४, इं. भा. द ट्रायंफ ऑफ डेथ, १८९८) ही त्याची एक विशेष उल्लेखनीय कादंबरी. तिच्यावर नीत्शेच्या तत्त्वज्ञानाचा परिणाम जाणवतो.

दान्नून्त्स्योनंतरच्या काही तरूण कवींच्या भाववृत्तीवर नैराश्याची गडद झाक दिसून येते. उराशी बाळगलेली मूल्ये कोसळत चालल्याची जाणीव, तीमधून येणारा एक प्रकारचा रितेपणा आणि तरीही काहीतरी नवे घडविण्याची ओढ त्यांच्या काव्यातून आढळते. नवजागृतीच्या तेजस्वी चळवळीचे अखेरचे पर्व संपल्यानंतर उरलेल्या संधिप्रकाशात हे कवी वावरत होते. त्यामुळेच त्यांना ‘संधिप्रकाशातील कवी’ असे म्हणले गेले. ग्वीदो गोझ्झानो (१८८३–१९१६) हा ह्या संप्रदायातील प्रमुख कवी. Colloqui आणि L'amica di nonna Spreranza (इं. शी. द फ्रेंड ऑफ ग्रँडमदर स्पेरांझा) ह्या त्याच्या श्रेष्ठ काव्याकृती. सेर्जीओ कोराझ्झीनी (१८८७–१९०७), मारीनो मोरेत्ती (१८८५– ) आणि फाउस्तो मारीआ मारतीनी (१८८६–१९३१) हे ह्या संप्रदायातील इतर कवी होत. फिलीप्पो तोम्माझो मारीनेत्ती (१८७६–१९४४) ह्याने विसाव्या शतकाच्या आरंभी नवकालवाद (फ्यूचरिझम) ह्या साहित्य-कला संप्रदायाची उभारणी केली (१९०९). प्रचलित सौंदर्यमूल्यांना क्रांतिकारक धक्के देण्याची त्याची घोषणा होती. वैज्ञानिक आणि उद्योगप्रधान संस्कृतीला साजेशी गतिमानता कला-साहित्यात आणली पाहिजे असा त्याचा आग्रह होता. शब्दाची स्वायत्तता त्याने मोलाची मानली. ठराविक वाक्यरचनेच्या कोंडीतून कविता मूक्त व्हायला हवी, अशी त्याची धारणा होती. धैर्य, औद्धत्य आणि बंडखोरी हे कवितेचे आवश्यक घटक आहेत, असे त्याला वाटत होते. मारीनेत्तीची Zang-tumb-tuuum ही दीर्घ कविता आणि आदेंगो सोप्फीची ह्याचा Bif §Zft 18 हा काव्यासंग्रह नवकालवादी कवितेच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय होय. अभिव्यक्तीचे अनेक धीट प्रयोग ह्या संप्रदायातील कवींनी केले. तथापि एकंदरीने साहित्यापेक्षा ललित कलांच्या क्षेत्रातच हा संप्रदाय विशेष प्रभावी ठरला.

पारंपरिक काव्यरचनेपेक्षा वेगळी वाट शोधण्याचा आणखी एक उल्लेखनीय प्रयोग फॅसिस्ट राजवटीच्या काळात झाला. हा ‘संप्रदाय एर्मेतिझ्मो’ ह्या नावाने ओळखला जातो. हा संप्रदाय फ्रेंच प्रतीकवाद्यांच्या प्रभावाने निर्माण झाला होता. विशुद्ध कविता हे ह्या संप्रदायातील कवींचे उद्दिष्ट. नेमक्या अभिव्यक्तीसाठी योग्य शब्द निवडणे आणि कवीच्या अभिप्रेत अर्थाहून वेगळ्या अर्थच्छटांपासून त्याला अलग करणे, ही ह्या काव्यरचनेची मुख्या प्रक्रिया. एखाद्या हवाबंद वस्तूसारखा आशय बंदिस्त ठेवण्याच्या ह्या प्रवृत्तीमुळेच ह्या संप्रदायास ‘एर्मेतिझ्मो’ अथवा ‘हर्मेटिक संप्रदाय’ असे नावे प्राप्त झाले. तुकट अभिव्यक्ती, असाधारण अलिप्तता आणि तीव्र उदासीनता ही ह्या संप्रदायातील काव्याची वैशिष्ट्ये. जुझेप्पे उंगारेत्ती (१८८८– ), दीनो कांपाना (१८८५–१९३२), ⇨ साल्व्हातोरे क्‍वाझीमोदो (१९०१– ), ऊंबेर्तो साबा (१८८३–१९५७), लिओनार्दो सिनिस्गाल्ली (१९०८– ) एऊजेन्यो मोंताले (१८९६– ) हे ह्या संप्रदायातील काही प्रमुख कवी. साल्व्हातोरे क्वाझीमोदा ह्यास १९५९ मध्ये नोबेल पारितोषिकाचा बहुमान प्राप्त झाला.

नाटकाच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ नाटककार म्हणून ⇨ लूईजी पीरांदेल्‍लो (१८६७–१९३६) मान्यता पावला. त्याच्या अनेक नाट्यकृतींपैकी Sei personaggi in cerca d'un autore (१९२१, इं. भा. सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर, १९२३) ही विख्यात आहे. नाटककाराच्या शोधात सहा पात्रं ह्या नावाने त्याचा मराठी अनुवाद माधव वाटवे ह्यांनी केला आहे (१९६८). आधुनिक जगात वावरणाऱ्या माणसाची मानसिक अस्वस्थता, आपल्या अंतःविश्वाचा बाह्य जगाशी सुसंवाद साधण्यासाठी त्याची चाललेली धडपड आणि त्याला जाणवणारे कंटाळवाणे एकाकीपण आपल्या नाट्यकृतींतून दाखविण्यात पीरांदेल्लो यशस्वी झाला आहे. नाटक ह्या साहित्यप्रकाराकडे वळण्यापूर्वी पीरांदेल्लोने कथा-कांदबऱ्या लिहिल्या होत्या. II fu Mattia Pascal (१९०४, इं भा. द लेट मात्तीआ पास्कल, १९२३) ही कादंबरी आणि La giara सारख्या (इं. शी. द जार) अनेक लघुकथा कीर्ती पावल्या आहेत. पीरांदेल्लोला १९३४ चे नोबेल पारितोषिक मिळाले.

विसाव्या शतकातील आरंभीच्या काळात आघाडीचे कादंबरीकार म्हणून ⇨ ग्रात्स्या देलेद्दा (१८७१?–१९३६) आणि ईतालो झ्वेअव्हो (१८६१–१९२८) ह्यांची नावे उल्लेखनीय आहेत. ग्रात्स्या देलेद्दा ही १९२६ ची नोबेल पारितोषिक विजेती. सार्डिनिया बेटाची पार्श्वभूमी तिच्या अनेक कादंबऱ्यांत घेतलेली आढळून येते. आपल्या व्यक्तिरेखांच्या अंतर्जीवनावर तिचे लक्ष विशेष केंद्रित झालेले दिसते. समकालीन लेखकांना जाणवणारे नैराश्य तिच्या कादंबऱ्यांतूनही प्रगट झालेले आहे. Elias Portolu (१९०३) ही तिची सर्वश्रेष्ठ कादंबरी. La coscienza di Zeno (१९२३, इं. भा. द कन्फेशन्स ऑफ झीनो, १९३०) ही ईतालो झ्वेअव्होची सर्वोत्कृष्ट कादंबरी. सूक्ष्म मनोविश्लेषण हे त्याच्या कादंबरीलेखनाचे वैशिष्ट्य. त्याच्या लेखनस्वभावाचे नाते जेम्स जॉइस आणि प्रूस्त ह्या साहित्यिकांशी जोडण्यात येते. रिक्कार्दो बाच्चेल्ली (१८९१– ) ह्याने ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या II diavolo al pontelungo (१९२७, इ. भा. द डेव्हिल अ‍ॅट द लाँग ब्रिज, १९२९) आणि II mulino del Po (३ खंड, १९३८–१९४०, इं. भा. द मिल ऑन द पो, २ खंड, १९५२) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. द मिल ऑन द पो ह्या कादंबरीत १८१५ ते १९२१ पर्यंतच्या इटालियन जीवनाचा आलेख आढळतो. ह्या कादंबरीमुळे इटालियन संस्कृतीचा उद्‍‍गाता म्हणून मांझोनीइतके महत्त्वाचे स्थान बाच्चेल्लीला प्राप्त झाले. जोव्हान्नी पापीनी (१८८१–१९५६) ह्याच्या Un uomo finito (१९१२, इ. भा. अ मॅन–फिनिश्ड, १९२४) ह्या आत्मचरित्रास जागतिक कीर्ती लाभली.Fontamara (१९३३) आणि Pane e vino (१९३७, इं. भा. ब्रेड अँड वाइन) ह्या ईन्यात्स्यो सीलोने (१९००– ) ह्याच्या दोन प्रसिद्ध कादंबऱ्या. ईन्यात्स्यो राजकीय अज्ञातवासात वावरत असल्यामुळे इटलीबाहेरील वाचकांस त्या आधी परिचित झाल्या. फॅसिस्ट राजवटीविरुद्ध दिलेला लढा हा ह्या दोन्ही कादंबऱ्यांचा विषय. दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ कथात्मक साहित्याच्या दृष्टीने विशेष सर्जनशील ठरला. महायुद्धाचा प्रत्यक्ष अनुभव इटलीने घेतलेला असल्यामुळे युद्धकालीन जीवनाच्या व्यथा, युद्धोत्तर काळातील नव्या वातावरणाची जाणीव आणि नव्या जीवनाच्या आकांक्षा ह्या कथात्मक साहित्यातून व्यक्त होऊ लागल्या.

एलीओ व्हित्तोरीनी (१९०८–१९६६) आणि ⇨ चेझारे पावेसे (१९०८—१९५०) ह्यांच्या अनुक्रमे Conversazione in Sicilia (इं. भा. कॉन्व्हर्सेशन इन सिसिली, १९४९) आणि Paesi tuoi  ह्या दोन कादंबऱ्या १९४१ मध्ये प्रसिद्ध झाल्या आणि इटालियन कादंबरीने विकासाचा एक नवा टप्पा गाठला. युद्धोत्तर काळात इटलीत प्रभावशाली ठरलेल्या नव-वास्तववादाला ह्या दोन कादंबऱ्या बऱ्याचशा प्रेरक ठरला. ह्या नव-वास्तववादाची बीजे एकोणिसाव्या शतकातील इटालियन वास्तववादातच आढळतात. साधी, अकृत्रिम शैली आणि सूक्ष्म मनोविश्लेषण ही ह्या संप्रदायातील कथा-कादंबऱ्यांची मुख्य वैशिष्ट्ये. La spiaggia (१९४२), Feria d'agosto (१९४६), II compagno (१९४७, इं. भा. द कॉम्रेड, १९४९) आणि La luna ei falo (१९५०, इं. भा. द मून अँड द बॉनफायर, १९५२) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. सर्वंकष राजकीय सत्तेमुळे होणारा संस्कृतीचा विध्वंस, त्यामुळे आयुष्यात जाणवणारी हेतुशून्यता आणि दारुण भ्रमनिरास ह्यांचे परिणामकारक चित्र त्याच्या कादंबऱ्यांतून उभे राहते. फॅसिस्ट राजवटीचे विदारक मूल्यमापन व्हित्तोरीनीच्या कादंबऱ्यांतून आढळते. Le donne di Messina (१९४९, इं. भा. विमेन ऑन द रोड, १९६१), La Garibaldina ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या.

ह्या दोन कादंबरीकारांनंतर व्हास्को प्रातोलीनी (१९१३–) याचा उल्लेख आवश्यक आहे. Cronache di poveri amanti (१९४७, इ. भा. अटेल ऑफ पुअर लव्हर्स, १९४९) ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी. फ्‍लॉरेन्समधील श्रमिकांच्या जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण तीत आहे.

कार्लो लेव्ही (१९०२–),  आल्बेर्तो मोराव्हीआ (१९०७– ) आणि ईतालो काल्व्हीनो हे आणखी काही नामवंत साहित्यिक. Cristo si e fermato a Eboli (१९४६, इं. भा. ख्राइस्ट स्टॉप्ड अ‍ॅट एबोली, १९४७) ह्या कादंबरीत कार्लो लेव्हीने एका जिल्ह्यातील जीवनाचे चित्र रेखाटले आहे.  ह्या कादंबरीतील सामाजिक आणि राजकीय अंतःसूर स्पष्ट आहेत. तसेच तीमधील काही भाग आत्मचरित्रात्मकही आहे.

आल्बेर्तो मोराव्हीआ हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कथा-कादंबरीकार आहे. La Romana (१९४७. इं. भा. द वूमन ऑफ रोम, १९४९) ही त्याची विख्यात कादंबरी. वेश्याजीवनात अधःपतित झालेल्या एका स्त्रीच्या जीवनाचे प्रखर वास्तववादी चित्रण तीत आहे. मोराव्हीआच्या एकूण लेखनात मानवी मनाच्या व्यापारांविषयी एक मूलगामी कुतूहल आढळून येते. त्याच्या निरीक्षणाचे क्षेत्रही उत्तरोत्तर सखोल आणि व्यापक होत गेले आहे.

युद्धोत्तर काळातील इटालियन लेखकांचा इतर यूरोपीय साहित्याशी आणि अमेरिकन साहित्याशी निकटचा संपर्क आला. कार्लो एमील्यो गाद्दा (१८९३– ) ह्याची Quer pasticciaccio ... सारखी (१९५७) कादंबरी जेम्स जॉइसचा प्रभाव दर्शविते, तर दीनो बझ्झातीच्या कथांवर काफ्काचा परिणाम जाणवतो.

तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र आणि समीक्षा ह्या क्षेत्रांत बेनीदेत्तो क्रोचेचे (१८६६–१९५२) नाव सर्वाधिक महत्त्वाचे आहे. इटालियन बौद्धिक जीवनास एक आधुनिक द्दष्टी देण्याचा प्रयत्‍न त्याने केला. हे कार्य त्याने मुख्यतः La Critica (१९०३–१९४४) ह्या आपल्या द्वैमासिकातून केले. La filosofia dello spirito (४ खंड, १९०२–१९१२, इं. शी. फिलॉसॉफी ऑफ स्पिरिट) ह्या त्याच्या ग्रंथाने समकालीन वैचारिक विश्वात क्रांती घडवून आणली. ह्या ग्रंथात त्याने कलेच्या आणि अंतःप्रज्ञेच्या निकट संबंधांवर भर दिला आहे. विसाव्या शतकात इटलीमध्ये प्रत्यक्षार्थवादाविरुद्ध जी प्रतिक्रिया घडून आली तिचे नेतृत्व क्रोचेने केले. तो चिद्‌‌वादी होता. जागतिक कीर्तीच्या समीकरणांत क्रोचेचे नाव अंतर्भूत आहे. त्याच्या विचारांनी अनेक समीक्षक प्रभावित झाले. जोव्हान्नी जेंतीले (१८७५–१९४४) ह्याने क्रोचेच्याच चिद्‌‌वादी विचारांचा पाठपुरावा केला. तथापि केवल चिद्‌‌वादाचे समर्थन करताना राजकीय संदर्भात त्याने सर्वंकष सत्तेचा पुरस्कार केला. La filosofia dell' arte (१९३१, इं. शी. फिलॉसॉफी ऑफ आर्ट) हा त्याचा ग्रंथ महत्त्वाचा आहे. जूझेप्पे आंतॉन्यो बोर्जेसे (१८८२–१९५२), रेनातो सेर्रा (१८८४–१९१५), लूईजी रूसो (१८९२–१९६१), फ्रांचेस्को फ्लोरा (१८९१– ), कार्लोबो, मारीओ प्राझ (१८९६– ), मारीओ फूबीनी (१९००– ) हे आणखी काही उल्लेखनीय समीक्षक होत.

बोर्जेसेने आपल्या II corriere della sera (इं. शी. द ईव्हनिंग पोस्ट) ह्या दैनिकातून आल्बेर्तो मोराव्हीआसारख्या अनेक श्रेष्ठ साहित्यिकांचा परामर्श घेतला. सेर्रा हा क्रोचेचा एक समर्थ विरोधक. लूईजी रूसो ह्याने Storia della critica contemporanea (१९३५–१९४२, इं. शी. हिस्टरी ऑफ कंटेंपररी क्रिटिसिझम) लिहून इटलीतील आधुनिक समीक्षासिद्धांताचा परिचय करून दिला. फ्रांचेस्को फ्लोरा आणि कार्लो बो ह्यांनी वन्याजुन्या इटालियन साहित्यिकांचे मूल्यमापन केले. मारीओ प्राझ ह्याने क्रोचेच्या सौंदर्यशास्त्रावर टीका केली. La carne, la morte e il diavolo nella letteratura romantica (इं. भा. द रोमँटिक अ‍ॅगनी) हा त्याचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. काही कादंबऱ्यांतून आणि कवितांतून आढळणाऱ्या युरोपच्या र्‍हासाचे अभ्यासपूर्ण चित्र त्याने त्यात उभे केले आहे. मारीओ फूबीनी हा आजचा प्रमुख इटालियन समीक्षक असून तो क्रोचेच्या विचारांचे पुनर्मूल्यांकन करीत आहे. वाङ्‌‌मयकृतीच्या शब्दकळेचा तिच्या निर्मितिकाळाच्या संदर्भात चिकित्सकपणे विचार करणाऱ्या समीक्षासंप्रदायात व्हीत्तॉर्यो ब्रांका ह्याचा अंतर्भाव होतो.

फॅसिस्ट राजवटीच्या काळातील तात्पुरत्या पीछेहाटीनंतर इटालियन साहित्य पुन्हा नव्या जोमाने आणि ताज्या सर्जनशील सामर्थ्याने वाटचाल करीत आहे.

संदर्भ : 1. Burckhardt, Jacob: Trans. Middlemore, S. G. C. The Civilisation of the Renaissance in Italy, London, 1951.

2. De Sanctis, Francesco, A History of Italian Literature, New York, 1960.

3. Pacifici, S. A Guide to Contemporary Italian Literature, New York, 1962.

4. Whitfield, J. H. A Short History of Italian Literature, Gloucester (Massachusetts), 1960.

5. Wilkins, E. H. A History of Italian Literature. Cambridge (Massachusetts), 1954.

लेखक: अ. र. कुलकर्णी ; राजेंद्र सिंह (इं.) आहलूवालिया; द. स. (म.) शिरोडकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate