प्राचीनतम यूरोपियन साहित्य म्हणून ग्रीक आणि लॅटीन साहित्याखालोखाल केल्टिक पुराणकथांचा क्रम लागतो. केल्टिक लोकांचे पुरोहित ड्रुइड यांच्या विद्याप्रेमामुळे या पुराणकथा सुरक्षित राहिल्या. इ. स. आठव्या शतकानंतर झालेल्या अनेक ग्रंथांतून या कथा आढळतात. फ्रान्स, दक्षिण ब्रिटन, स्पेन आणि इतर काही प्रदेशांतून केल्टिक देवतांविषयीचे शिलालेख आढळतात.
त्यांच्या अभ्यासावरून असे दिसते, की केल्ट लोक स्थानिक देवदेवतांची पूजा करीत असत. एपोना या देवतेला फार महत्त्व होते. मात्रेस या सुफलतेच्या तीन देवींची गॉल व ब्रिटनमध्ये पूजा चालत असे. या कथांच्या अभ्यासाला उपयुक्त अशी बरीच माहिती पुरातत्त्वविद्येतूनही मिळते. अल्स्टरमध्ये नव्या राजाचे घोडीबरोबर प्रतीकात्मक मीलन दाखविले असून त्यातून पृथ्वीची सुफलता सूचित केली आहे. ख्रिस्ती विचारांचा प्रभाव पडल्यामुळे मूळच्या केल्टिक पुराणकथांत बरेचशे बदल झाले असले, तरी या कथांतून इ.स. पूर्वीच्या केल्ट लोकांची संस्कृती कळण्यास मदत होते. नव्या प्रभावाने जुनी संस्कृती पूर्णपणे लुप्त होत नाही. म्हणूनच, रोमन साम्राज्याबरोबर आलेल्या रोमन देवतांचा स्वीकार केल्यावरही केल्टिक लोक स्थानिक देवतांची पूजा करीतच होते. या पुराणकथांतील देवता प्रामुख्याने अमीर-उमरावांच्या होत्या. सामान्य लोक या देवतांवर विश्वास ठेवत होते की नाही, हे सांगता येत नाही. हे सामान्य लोक जादूगारांची मात्र पूजा करीत असत.
देव हे अतिमानवी सामार्थ्याने व आपल्याजवळ असलेल्या चार अद्भूत गोष्टींच्या प्रभावाने लोकांचे कल्याण करीत असत. लूगचा भाला, डेअग्धाची कढई, न्वादाची तलवार आणि राजाने पाय दिला की ओरडणारा फालचा दगड या त्या चार गोष्टी होत.मॅनॅनॅन हा आयर्लंडमधील त्वाथा लोकांचा समुद्रदेव होता. आज मारून खाल्ल्यानंतर उद्या लोकांच्या भोजनासाठी पुन्हा जिवंत होणारी डुकरे, सूर्यासारखे तेजस्वी शिरस्त्राण आणि इच्छा येईल तिकडे घेऊन जाणारे जहाज या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी होत्या. तो बहुधा सुफलतेचा देव असावा, असे मानले जाते. लूग हा देव कुशल कारागीर म्हणून प्रसिद्ध होता. त्याचा संप्रदाय स्पेन, स्वित्झर्लंड, गॉल आणि आयर्लंडमध्ये होता. त्याच्याजवळ भाला आणि गोफण होती. त्याने गोफणीतून दगड मारला आणि फमोरियन लोकांचा नेता बाह्लॉर याचा एकमेव प्रचंड डोळा फोडून त्याला ठार मारले.
नंतर तो त्वाथांचा नेता बनला. बाह्लॉरच्या एका डोळ्याने सूचित होणाऱ्या सूर्याची उपासना मागे पडून लूगची उपासना सुरू झाली असावी, असे म्हणतात. डेअग्धा हा देव सर्वांचा पिता, सर्वशक्तिमान व सर्वज्ञ मानला जाई. पोषणकर्ता असल्यामुळे तो सुफलतेचा देव असावा, असे म्हणतात. कधीही रिकामी न होणारी आणि कोणालाही अतृप्त न ठेवणारी एक कढई त्याच्याजवळ होती. सारंगी वाजवून तो ऋतूंना बोलावू शकत असे. माणसांना मारून पुन्हा जिवंत करू शकत असल्यामुळे त्याला जीवन व मृत्यू यांचा स्वामी म्हटले जाई. त्वाथांचा राजा न्यादा हा लूग व डेअग्धा या देवांच्या गुणधर्मांनीच युक्त होता. त्याच्याजवळ एक अत्यंत प्रभावी तलवार होती. युद्धात त्याचा मूळचा हात तुटल्यावर त्याच्या वैद्याने त्याला चांदीचा हात बसवला होता. या देवांशिवाय लोहार व मद्यकर्ता गॉब्निड, वैद्य डीआनकेख्ट आणि क्रीडापटू ऑग्मा हे इतर प्रमुख देव होते.
आयर्लंडमधील देव म्हणजे दानू देवीची प्रजा, असे अनेकदा म्हटले जाते. डेअग्धा हा मात्र काही वेळा तिचा पिता म्हटला जातो. यूचार्बा, ब्रायन व यूचान या त्रिमूर्तीची दानू ही आई होय. विद्या, संस्कृती व कसब यांची देवता ब्रिगिट ही कधी कधी दानूशी एकरूप मानली जाते. तीच स्थिती अनू वा अन या देवीचीही आहे. इतर दोघींपेक्षा ब्रिगिटची पूजा अधिक प्रचलित होती. ती ख्रिस्ती धर्मातही सेंट ब्रिगिड (ब्राईड) म्हणून आढळते. एकाच मातृदेवीची ही तीन वेगवेगळी रूपे असावीत, असे म्हणतात. नेमीड या वीराची पत्नी माछा ही देवी मानली होती. केल्ट लोक आयर्लंडमध्ये येण्यापूर्वी तेथे ज्या मातृदेवीची पूजा चालत होती, तिचेच अवशिष्ट रूप म्हणजे ही देवी असावी.
ब्रिटिश पुराणकथांमध्ये ह्लीरचा मुलगा मॅनाविधन हा सुफलतेचा व कारागिरीचा देव होता. त्याचा भाऊ ब्रॅन हा अत्यंत सामर्थ्यशाली होता. शेवटच्या युद्धात त्याच्या पायाला विषारी बाण लागला, तेव्हा आपले मस्तक कापून ते लंडनमध्ये न्या आणि आक्रमकांपासून राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवा, असे सांगून त्याने आत्मसमर्पण केले. डनच्या मुलांपैकी ग्विडिऑन हा सर्वांत महान होता. तो युद्ध व शांती या दोहोंत कुशल होता. त्याची पूजा वायव्य वेल्सपुरती मर्यादित होती. आह्रिनरोड ही देवी डनची कन्या होय. ती ह्लियूची माता होती. आयरिश लूगप्रमाणेच त्याच्याजवळ भाला व गोफण असे. डनच्या मुलांपैकी अनेकांची नावे ताऱ्यांना दिली गेली. म्हणून डनची मुले म्हणजे आकाशदेवता, असे म्हटले जाते.
प्रजाहितदक्ष असे केल्टिक वीरपुरुष हे मूळचे मानव असूनही अतिमानवी शक्तीने युक्त होते. कूकुलिन हा वीर सर्वांत जास्त प्रसिद्ध होता. एका कथेनुसार तो लूग या देवाचा पुत्र होता. तो केल्टिक लोकांच्या पराक्रमाचा आदर्श होता. त्याच्या कपाळावर चंद्र होता. त्याने अनेक उग्र कृत्ये केली. फिन हा अतिमानवी शक्तीने युक्त असलेला आणखी एक वीर होता. आर्थर नावाचा एक ऐतिहासिक राजा होऊन गेला. त्याच्या संबंधातही पुराणकथा तयार झाल्या आहेत.
आयर्लंडमध्ये आलेल्या टोळ्यांविषयी पुराणकथांच्या स्वरूपाचे विपुल साहित्य आढळते. केल्ट लोकांचा परलोक हा अत्यंत सुखयुक्त होता. तेथील युद्धात कोणाला जखम झालीच तर ती दुसऱ्या दिवशी बरी होई आणि कोणाचा मृत्यू झालाच तर तो दुसऱ्या दिवशी जिवंत होई. सिद या स्वर्गाच्या राज्यकर्त्यांना युद्धात मदत करण्यासाठी केल्टिक वीरपुरुषांना बोलावले जाई आणि त्याबद्दल त्यांना देवांगनांचे प्रेम मिळे. केल्टिक लोकांनी दुःख व भय यांनी युक्त असा एक परलोकही मानला होता. ब्रिटिश कथांत ह्लीरची मुले म्हणजे अधोलोकातील देवता असे मानले होते. प्विल या अधोलोकाच्या स्वामीने रीॲननशी विवाह केला. त्यांचा पुत्र प्रिडेरी हा नंतर अधोलोकाचा स्वामी बनला.
संदर्भ : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.
2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.
3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.
4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.
5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.
6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.
7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922
8. Gray, L. H. Ed. The Mythology of all Races, 13 Vols., Boston 1925-36.
9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.
10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.
11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.
12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.
13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.
14. Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.
15. Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.
16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.
17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.
18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth ,London 1963.
19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.
20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.
21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends, 4. Vols., London, 1976-78.
लेखक: आ. इ. साळुंखे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
ईजिप्ती पुराणकथा विषयक माहिती.
अमेरिकन इंडियन जमातींच्या पुराणकथा विषयक माहिती.
इस्लामी पुराणकथा विषयक माहिती.
ओशिअॅनिक पुराणकथा विषयक माहिती.