पूर्णपणे रोमन म्हणता येतील अशा पुराणकथा थोड्याच आहेत. रोमन लोकांनी इ.स.पू. तिसऱ्या आणि दुसऱ्या शतकांत मोठ्या प्रमाणात ग्रीक पुराणकथा उचलल्या. ग्रीक देवतांना रोमन नावे देण्यात आली. क्रोनसला सॅटर्न, झ्यूसला ज्यूपिटर, हेराला ज्यूनो, अथीनाला मिनर्व्हा, आर्टेमिसला डायना, सीलीनीला ल्यूना, हर्मीझला मर्क्युरी, एरीझला मार्झ, फ्रोडाइटीला व्हीनस, ईरॉसला क्यूपिड, पोसायडनला नेपच्यून, हेस्टिआला व्हेस्टा, डीमीटरला सीरझ, डायोनायससला बॅकस, हेडीझला प्लूटो आणि पर्सेफोनीला प्रोझर्पिना म्हटले जाऊ लागले. यांखेरीज पर्शियन, सिरियन, ईजिप्ती, आल्बन, एट्रुस्कन, सॅबीन इ. अनेक कथांच्या प्रभावातून सध्या उपलब्ध असलेल्या रोमन पुराणकथा तयार झालेल्या आहेत. ईजिप्तची इसिस व सिरियाची अतारगॅटिस हि देवता रोमन लोकांनी स्वीकारली होती. आशिया मायनरमधून सिबिल आणि सुफलतेची देवी मा यांचा रोममध्ये प्रवेश झाला. सिरियातील सैनिकांनी रोमन सैन्यास भरती होताना आपले बेअल नावाचे देव सोबत आणले. पर्शियातून आलेल्या मिथ्रदेवांची रोमन सम्राटही पूजा करीत असत.
ज्यूपिटर हा रोमन लोकांना सर्वश्रेष्ठ देव होय. तो सूर्य, चंद्र, प्रकाश, वादळ, पाऊस इत्यादींचा देव होता. राज्याचा संरक्षक युद्धदेव व न्यायदेवता म्हणून त्याची संपूर्ण इटलीत पूजा चाले. त्याची बहीण व पत्नी असलेली ज्यूनो ही रोमन लोकांची संरक्षिका आणि चंद्रदेवी होती. रोमन मातृत्वाचे प्रतीक असलेली, प्रसूती आणि वंशवृद्धी यांचीही ती देवता होती.सॅटर्न हा कृषिदेव होता. मूळचा कृषिदेव असून नंतर युद्धदेव बनलेला मार्झ हा अत्यंत महत्त्वाचा देव होता. हा मार्झ म्हणजे एका फुलाशी झालेल्या संबंधातून ज्यूनोला झालेला मुलगा होय.
रीआ सिल्व्हिआ ही त्याची पत्नी आणि रॉम्यूलस व रीमस त्याचे पुत्र होत. त्याची कन्या, बहीण अथवा पत्नी असलेल्या बेलोनाचे रोममध्ये प्रसिद्ध मंदिर होते. जेनस हा द्वारांचा देव असल्यामुळे किल्ली हे त्याचे चिन्ह होते. तो मूळचा सूर्यदेव होता. वर्षाच्या पहिल्या महिन्याला जानेवारी हे त्याचेच नाव देण्यात आले आहे. हातोडा, ऐरण व चिमटा ही व्हल्कन या अग्निदेवाची चिन्हे होत. मर्क्युरी हा व्यापाऱ्यांचा देव होता. मूळची एट्रुस्कन पण नंतर ग्रीक अथीनाशी एकरूप मानलेली मिनर्व्हा ही कलावंत, उद्योगधंदे, शाळा, व्यापार इत्यादींची देवता पंखानी युक्त अशी मानलेली होती. संस्कृत ‘वस्’ धातूशी जिचे नाव निगडित आहे, ती व्हेस्टा सर्व रोमन देवतांपेक्षा अधिक सुंदर होती. मूळची पृथ्वीदेवता असूनही ती पुढे अग्निदेवता बनल्यामुळे ज्वाला हे तिचे प्रतीक बनले. प्रत्येक चुलीची स्वतंत्र व्हेस्टा असे आणि तिला पहिले अन्न व पेय दिले जाई. ज्यूपिटरची कन्या फॉर्च्युना ही नशिबाची देवी होती.
बोनस इव्हेन्टस हा यश देणारा देव होता. मुलांच्या जीवनातील सर्व घटनांवर लक्ष ठेवणारी शक्ती म्हणजे जीनिअस व मुलींच्या बाबतीतील अशी शक्ती म्हणजे ज्यूनो होय. साहस, आशा, धार्मिकता इ. अनेक सद्गुणांनाही देवता मानले जाई. व्हिक्टोरिया ही यश देणारी देवी होती. घरातील महत्त्वाच्या प्रसंगी ल्हर या देवाला आवाहन केले जाई. कुऱ्हाड, उखळ, केरसुणी इ. वस्तूंच्याही देवता असत. अधोलोकात असलेल्या मेन्सची म्हणजे पितरांची खाजगी व सार्वजनिक पूजा चाले. ऑर्कस हा मृत्युदेव लोकांना मृत्युलोकात नेई. लीबीटीन ही अंत्यसंस्काराची देवी होती. मृत्युलोकावर एइटा वा डे आणि त्याची पत्नी पर्सीप्नी यांचे राज्य असे. पर्या (नींफ्स) या सामान्यतः जलदेवताच असत. कॅमेनी या नींफ्सपैकी एक भूतकाळ आणि दुसरी भविष्यकाळ जाणते. जटुर्ना या नींफला ज्यूपिटरने प्रेमाखातर नद्यांची सम्राज्ञी बनवले. सीरझ ही धान्याची, फ्लोरा ही फळाफुलांची आणि व्हीनस ही उद्यानांची देवता होती.
व्हर्च्युम्नस हा फळाझाडांचा देव होता. कॉन्सस या पेरणीच्या देवाचा उत्सव साजरा होई, तेव्हा रथांच्या व घोड्यांच्या शर्यती होत. पीलीअस हा आधी देव होता; परंतु नंतर त्याचे कळपांच्या संरक्षक देवीत रूपांतर झाले. टेलस मॅटर ही विवाह व अपत्यनिर्मिती यांची देवी, तर लीबरपॅटर हा कृषीच्या सुफलतेचा देव होता. रॉम्यूलस आणि रीमस हे दोन वीरपुरुष म्हणजे मार्झचे पुत्र होत. रीआ सिल्व्हिआ झोपलेली असताना मार्झने तिच्याशी समागम केला व तिला जुळे झाले. या जुळ्याला सुपात ठेवून नदीत सोडल्यावर एका लांडगीने दूध पाजले व मेंढपाळ दांपत्याने सांभाळले. पुढे रॉम्यूलसने रीमसला ठार मारले. समुद्रातील प्रवाशांचे रक्षण करणारे आणि युद्धमोहिमेत योद्ध्यांबरोबर जाणारे असे कॅस्टर आणि पॉलक्स हे दोन वीर होत. रोमचा राष्ट्रीय वीर असलेल्या ईनीअसपासून आपला वंश सुरू झाला, असे अनेक रोमन लोक मानत. क्लॉडिअस, ऑगस्टस इ. बादशहांचे दैवतीकरण करण्यात आले होते.
संदर्भ : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.
2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.
3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.
4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.
5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.
6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.
7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922
8. Gray, L. H. Ed. The Mythology of all Races, 13 Vols., Boston 1925-36.
9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.
10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.
11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.
12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.
13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.
14. Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.
15. Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.
16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.
17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.
18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth ,London 1963.
19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.
20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.
21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends, 4. Vols., London, 1976-78.
लेखक: आ. इ. साळुंखे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
आफ्रिकन पुराणकथा विषयक माहिती.
अमेरिकन इंडियन जमातींच्या पुराणकथा विषयक माहिती.
ईजिप्ती पुराणकथा विषयक माहिती.
ओशिअॅनिक पुराणकथा विषयक माहिती.