भारताच्या मध्य भागातील, सामान्यपणे पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेली एक पर्वतश्रेणी. देशाच्या साधारण मध्यातून गेलेल्या ह्या पर्वतश्रेणीमुळे उत्तरेकडील गंगा नदीचे खोरे दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे. म्हणजेच विंध्य पर्वताने भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पाडले आहेत. पश्चिमेस मध्य प्रदेश राज्यातील जोबाटपासून पूर्वेस बिहारमधील ससरामपर्यंत विंध्य श्रेणीचा विस्तार असून यांदरम्यानची तिची एकूण लांबी सु. १,१२६ किमी. आहे. तिची सर्वसाधारण उंची ४६० ते ६०० मी. असून काही शिखरे ९०० मी. पेक्षा उंच असली, तरी ती विशेष प्रसिद्ध नाहीत. पूर्वी नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील सातपुडा पर्वतश्रेणीचाही यात अंतर्भाव केला जाई, परंतु आता नर्मदेच्या उत्तरेकडील टेकड्यांचाच फकत विंध्यमध्ये समावेश केला जातो. पूर्वेकडील शोण नदीखोऱ्याच्या उत्तरेस तटासारख्या उभ्या असलेल्या कैमूर टेकड्या म्हणजे विंध्यचाच विस्तारित भाग मानला जातो. कैमूर टेकड्यांच्या उत्तरेस एकमेकींस समांतर अशा खोल दऱ्या व कटक आढळतात. कैमूर टेकड्यांच्या पूर्वेस ससराम ते राजमहाल यांदरम्यान असलेल्या राजमहाल टेकड्यांचा समावेश निश्चितपणे विंध्यमध्ये केला जातोच असे नाही. नर्मदेच्या खोऱ्यातून विंध्य पर्वताकडे पाहिल्यास तो उत्तुंग तटबंदीसारखा दिसतो. या श्रेणीचे मोठ्या प्रमाणामध्ये विदारण झाले आहे.
विंध्य पर्वतश्रेणीतील वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. पश्चिमेकडील विंध्यचे वैशिष्ट्य म्हणजे नर्मदा नदीखोऱ्याच्या दिशेने (दक्षिण) असणारा तीव्र उतार होय. बाघ टेकड्यांच्या प्रदेशामध्ये हा उतार सौम्य आहे. या भागात शेतीचे महत्त्व कमी असून खनिज संपत्तीही फारशी उपलब्ध नाही. लोकसंख्येची घनताही कमी आहे. उरी-कानर प्रदेशात जमिनीचे मोठ्या प्रमाणात विच्छेदन झाले असून त्याही भागात शेती महत्त्वाची नाही. खांडवा-अजमेर लोहमार्ग आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग याच भागातून विंध्य पर्वत ओलांडतात. कन्नोड-सेहोर हा प्रदेश भूशास्त्रीय दृष्ट्या मिश्र आहे. येथे मर्यादित प्रमाणात खनिज संपत्ती आढळते. या भागात टेकड्यांचे उतार तीव्र असून त्यावरील सागसाल यांसारख्या अरण्यांमुळे वनात्पादन मोठ्या प्रमाणात मिळते. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये शेती केली जाते. हुंशगाबादजवळ विंध्य श्रेण्या नर्मदा नदीपर्यंत पसरलेल्या आहेत. इटारसी-भोपाळ हा लोहमार्ग येथे विंध्य पर्वत ओलांडतो.
जबलपूर जिल्ह्यापासून पश्चिमेस नर्मदा खोऱ्याची उत्तर सरहद्द विंध्य श्रेणीने बनलेली आहे. नर्मदेने या भागात अनेक ठिकाणी आपले खडकाळ पात्र खरवडून काढले आहे. येथील खडक वालुकाश्म प्रकारचे असून त्यांचा रंग गुलाबी आहे. येथे खडकांच्या प्रचंड आडव्या चिपा आढळतात. या भृगुप्रदेशाच्या उत्तरेस ४०२ किमी. लांबीचे बुंदेलखंड व माळवा हे पठारी प्रदेश आहेत. ही पठारे ओबडधोबड असून त्यांवर टेकड्यांच्या लहान लहान रांगा दिसतात. या सर्व रांगा विंध्य प्रणालीमधीलच आहेत.
अगदी उत्तरेकडे उत्तर प्रदेश राज्यातील झांशी, बांदा, अलाहाबाद व मिर्झापूर जिल्ह्यांतून गेलेल्या साधारण ६१० मी. उंचीपर्यंतच्या श्रेण्यांना विंध्याचल नावाने ओळखले जाते. विंध्यपासून गंगेच्या किनाऱ्यापर्यंत उत्तरेकडे सौम्य उतार असलेले पठारी प्रदेश आढळतात. या जिल्ह्यांमध्ये आजूबाजूच्या मैदानी प्रदेशातून वर आलेल्या अनेक एकाकी टेकड्या पहावयास मिळतात. यमुना नदीच्या डाव्या तीरावर पभोसा नावाची एक लहानशी टेकडी असून नदीच्या दुआब प्रदेशात आढळणारा हा एकमेव खडकाळ भाग आहे. सागर, दमोह व मैहर यांच्या उत्तरेकडील पन्ना टेकड्या विंध्यचाच भाग आहेत. तेथेच मुख्य विंध्य श्रेणीचा कैमूर टेकड्या हा भाग येतो. कलुमर (उंची ७७५ मी.) हे या भागातील सर्वोच्च शिखर आहे. विंध्यच्या आणखी दोन शाखा माळव्याच्या पठारी भागात असून त्यांची सुरुवात पूर्वेस भिलसा विदिशा व पश्चिमेस झाबुआजवळून होते. साधारणपणे उत्तरेस गेलेल्या या रांगा त्या पठाराच्या पूर्वेस व पश्चिमेस आहेत.
विंध्य आणि सातपुडा हा भारताच्या मध्यभागातील प्रमुख जलोत्सारक आहे. चंबळ, बेटवा, सोनार, धसान, केन इ. मुख्य नद्या विंध्यच्या भूगुप्रदेशात उगम पावत असून त्या सामान्यपणे उत्तरेस किंवा ईशान्येस वाहत जातात. शोण आणि नर्मदा या नद्या अमरकंटकजवळ उगम पावत असून तेथेच विंध्य व सातपुडा या पर्वतश्रेण्या एकमेकींत मिसळलेल्या आहेत.
भूवैज्ञानिकदृष्ट्या विंध्यची निर्मिती प्रामुख्याने प्रचंड अशा संपुंजित वालुकाश्मापासून झालेली आहे. अधूनमधून थराथरांचा फरशीचा दगड आणि शेल खडकरचना आढळते. अधूनमधून थराथरांचा फरशीचा दगड आणि शेल खडकरचना आढळते. विंध्य श्रेणीवरून एका महत्त्वाच्या खडक श्रेणीला ‘विंध्य’ हे नाव देण्यात आले आहे. माळव्याच्या पठारावरील बऱ्याचशा भागातील वालुकाश्मांवर दक्षिण ट्रॅपमधील उत्प्रवाही लाव्हाचा थर आढळतो. भोपाळजवळील गिन्नुरगढपासून जोबाटपर्यंत बेसाल्ट खडक आहे. जोबाटपासून पश्चिमेस १०० किमी. जंभुघोडापर्यंतच्या प्रदेशात रूपांतरित खडकरचना आहे. उत्तरेकडील भागात पट्टिताश्मे खडक उघडे पडलेले दिसतात. विंध्य श्रेणीतील दगड अत्यंत मौल्यवान आहे. येथील वालुकाश्म अनेक शतकांपासून बांधकामासाठी वापरण्यात येतो. सांची व भारहूत येथील बौद्ध स्तूप, खुजराहो येथील अकराव्या शतकातील मंदिरे, ग्वाल्हेर येथील पंधराव्या शतकातील राजवाडे तसेच इतर अनेक किल्ल्यांचे बांधकाम विंध्यमधील दगडांपासून केलेले आढळते. काही ठिकाणी चुनखडक सापडतो. पोवळ्यासारखा सुंदर खडक वाघजवळ सापडत असून त्याचा उपयोग मांडू येथील राजवाडे व थडग्यांच्या बांधकामासाठी विस्तृत प्रमाणावर करण्यात आलेला आहे. पन्ना हे गाव हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. विंध्य श्रेणीतील वेगवेगळ्या भागांत लोहखनिज, मँगॅनीज व ॲस्बेस्टस ही खनिजे थोडीफार सापडतात. श्रेणीतील सपाट माथ्याच्या टेकड्या व मोठमोठे कडे पूर्वीच्या काळी गढीच्या बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे ठरली आहेत. ग्वाल्हेर, चंदेरी, मांडू, अजयगढ व बांधोगढ इ. ठिकाणे याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
विंध्य श्रेणीतील टेकड्या सामान्यपणे खुरट्या व काटेरी वनस्पतींनी आच्छादलेल्या आहेत. मध्ये भारतात आढळणाऱ्या शुष्क अरण्यांतील वृक्षप्रकार या श्रेणीत पहावयास मिळतात व ठिकठिकाणी सागाचे वृक्ष आढळतात.
विंध्य पर्वताचे भारताच्या भूवैज्ञानिक तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासाच्या वर्णनामध्ये ‘विंध्यन प्रवर्तन’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्राचीन भारतीय समजुतीनुसार विंध्य हा सात कुलपर्वतापैकी एक मानला जातो. कुलपर्वतांच्या यादीत समाविष्ट केलेले ऋक्षवान व पारियात्र हे स्वतंत्र पर्वत नसून, ते विंध्य श्रेणीचेच भाग आहेत असे एक मत आहे. विंध्य म्हणजेच ‘विंध्याद्रि’ हा भारतातील सर्वांत प्राचीन पर्वत असल्याचे मानले जाते. रामभक्त हनुमान द्रोणागिरी लंकेला घेऊन जात असताना वाटेत त्यातील काही भाग गळून पडला; तोच विंध्य होय, अशाही एक कथा आहे. ‘विंध्य’ या संस्कृत शब्दाचा अर्थ पारधी असा होतो. टॉलेमीने याचा उल्लेख Ouindion असा केला आहे. तर गौतमीपुत्र सातकर्णीच्या नासिक प्रशस्तीमध्ये याचा ‘विंझ्य’ असा नामनिर्देश आला आहे. पुराणवाङ्मयातही विंध्य पर्वताविषयीच्या कथा आहेत. त्यांतील एका कथेनुसार सर्वप्रथम अगस्त्य ऋषीने विंध्य पर्वत ओलांडून आर्यांचा दक्षिणेकडे पायरव सुरू केला. आर्यांनी नंतर त्याच मार्गाने दक्षिणेत येऊन ठिकठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. श्रीराम विंध्य पर्वताला वळसा घालून चित्रकूटमार्गे दक्षिणेत आल्याचे उल्लेख रामायणात आहेत. दक्षिणपथाची सुरुवात विंध्यपासून होते. विंध्य प्रदेशात प्राचीन काळी मालद, करूष, मेकल, उत्कल, दशार्ण, भोज, तोसल, कोशल, त्रैपुर, वैदिश, नैपध व अवंती ही जनपदे होती. विंध्याद्रीवर मोठे अरण्य असल्याचे व तेथे भिल्ल, शवर, पिशाच व विद्याधर यांची वस्ती असून यातील कित्येक जमाती रानटी, क्रूर व नरबली देणाऱ्या आहेत, असे उल्लेख गुणाढ्याच्या बृहत्कथेत आले आहेत.
विंध्य पर्वताचा विस्तार व निबिड अरण्य, त्यातील वन्य जमाती यांमुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्यांना हा पर्वत एक मोठा अडसर होता. येथील चंबळचे खोरे तर पूर्वीपासून दरोडेखोरांच्या टोळ्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. विंध्य पर्वताच्या दोन्ही बाजूंना राज्य करणारे कलचुरी हे पहिले राजघराणे होते. दक्षिण दिग्विजयाला निघालेल्या विक्रमादित्याचा पराभव करून उत्तर दिग्विजयाच्या इच्छेने त्याचा पाठलाग करणाऱ्या शालिवाहनाचे सैन्य विंध्यकन्या नर्मदा हिने बुडविले, अशी एक दंतकथा आहे. इ. स. सातव्या शतकाच्या पूर्वार्धात दक्षिण दिग्विजयासाठी निघालेल्या हर्षवर्धनाचा पराभव पुलकेशी चालुक्याने विंध्याद्रीत नर्मदातीरीच केला. मुसलमान राज्यकर्त्यांना त्यांच्या उत्तर-दक्षिण हालचालींत प्रामुख्याने विंध्यचा अडथळा येत असे. मुसलमानी अमदानीतील दख्खनी परंपरेची विंध्य ही उत्तरेकडील सीमा होती. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ‘विंध्य प्रदेश’ नावाचे छोटे राज्य होते.
चौधरी, वसंत.
स्त्रोत - स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/23/2020
सातपुडा : भारतीय द्वीपकल्पावरील महाराष्ट्र–मध्य प्...