অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंबालाल साराभाई

अंबालाल साराभाई

(२५ फेब्रुवारी १८९०–१३ जुलै १९६७). भारतातील एक प्रसिद्घ उद्योगपती आणि साराभाई उद्योग समूहाचे संस्थापक. त्यांचा जन्म गुजरातमधील प्रसिद्घ वस्त्र उद्योजक कुटुंबात अहमदाबाद येथे झाला. ते पाच वर्षांचे असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यांना अनुसया व कांता या दोन बहिणी. या तीन मुलांचे संगोपन-शिक्षण त्यांचे चुलते चिमणभाई नगिनदास यांनी केले; परंतु तेही १९०८ मध्ये निधन पावले. त्यामुळे अठरा वर्षांच्या अंबालालवर कुटुंबाची सर्व जबाबदारी पडली. त्यांनी गुजरात महाविद्यालयातील शिक्षण सोडून वडिलार्जित दोन गिरण्या– कॅलिको आणि जुबिली– व करमचंद प्रेचंदांची पेढी या व्यवसायात लक्ष घातले आणि अल्पावधीत त्यांनी औद्योगिक क्षेत्रात साहसी योजना कार्यवाहीत आणल्या. त्यांनी वस्त्रोद्योगात सुधारणा करण्यासाठी लँकशर व मँचेस्टर (इंग्लंड) येथून काही तज्ज्ञांना पाचारण केले आणि १९२३ मध्ये प्रथमच कापड उद्योगात फाइन काउंट स्पिनिंगचा उपयोग केला. याशिवाय अंबालाल यांनी बिहारमध्ये साखर कारखाना, पूर्व बंगालमध्ये रेल्वेलाइन, पूर्व आफ्रिकेत कॉटन जेनिंग फॅक्टरीज, बडोद्यात साराभाई केमिकल्स, मुंबईत स्वस्तिक ऑइल मिल इ. उद्योग सुरू करून आपल्या औद्योगि साम्राज्याचे जाळे विस्तृत केले.

औद्योगिकीकरणाबरोबरच त्यांनी शिक्षण व बँकिंग क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी बजाविली. अहमदाबादमध्ये त्यांनी ‘कासा दई बाम्बीनी’ नावाचे विद्यालय काढले, तसेच ‘एम्. जी. सायन्स इन्स्टिट्यूट’ सुरू केली. भारतभर विविध प्रकारच्या शिक्षण देणाऱ्या संस्था अंबालाल साराभाईंच्या औदार्याच्या प्रतीक होत. बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता आणि तिचे संचालकपदही त्यांनी भूषविले. ‘अंबालाल साराभाई एंटरप्राइझिस’ ही त्यावेळी एक पहिली औद्योगिक कंपनी असावी, जिथे कामगार संघटनेला मान्यता होती. एवढेच नव्हे, तर कामगारांसाठी त्यांनी रुग्णालय बांधले आणि त्यांच्या मुलांसाठी पाळणाघरही सुरू केले. अंबालाल यांनी सरलादेवी (पूर्वाश्रमीची रेवा) ह्या सुविद्य युवतीशी विवाह केला (१९१०). रेवा ह्या हरिलाल गोसालिया या प्रसिद्घ वकिलांच्या कन्या होत. त्यांना मृदुला, भारती, लीना, गीता व मीरा या पाच मुली आणि सुहृद, गौतम व विक्रम हे तीन मुलगे झाले. ही आठही मुले पुढे आपापल्या क्षेत्रात ख्यातनाम झाली. भारतीने नाट्यक्षेत्रात नाव कमाविले; तर गौतमने अहमदाबाद येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन’ आणि ‘बी. एम्. इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ’ या दोन संस्था स्थापन केल्या. लीनाने ‘श्रेयस विद्यालय’ सुरू केले. गीताने नृत्य-नाट्य यांत लक्ष केंद्रित केले व मीराने सुप्रसिद्घ टेक्स्टाइल संग्रहालय स्थापन केले; मात्र मृदुला व विक्रम यांनी भिन्न सार्वजनिक मार्ग हाताळले.

मृदुलाने स्वातंत्र्य चळवळीत प्रामुख्याने गांधीजींच्या तत्त्वांचा प्रसार-प्रचार केला आणि विक्रम हे शास्त्रज्ञ बनले. भरतनाट्यम् नृत्यशैलीसाठी विशेष ख्याती असलेल्या नर्तकी मृणालिनी ह्या त्यांच्या स्नुषा होत. [⟶ साराभाई मृणालिनी; साराभाई विक्रम]. अंबालाल यांनी सु. आठ हेक्टर प्रशस्त जागेत ‘रिट्रीट’ नावाचा सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त असा भव्य प्रासाद बांधला आणि तिथेच आपल्या मुलांना शिकविण्यासाठी सर्व सोयींनी युक्त व सर्व विषयांचे (विविध क्रीडा व संगीत प्रकारांसह) विद्यालय सुरू केले. तेथे त्यांनी उच्च शिक्षित भारतीय व पाश्चात्त्य शिक्षक नेमले. त्यांच्या मॅट्रिकपर्यंतच्या परीक्षा शासकीय आर्. सी. हायस्कूलद्वारे होत. ‘रिट्रीट’ या बंगल्याव्यतिरिक्त त्यांनी मुंबईत ‘मॅल्डन हॉल’ नावाचा बंगला बांधला. तसेच हॅमस्टेड (इंग्लंड) येथे एक घर विकत घेतले. व्यवसायानिमित्त त्यांची भ्रमंती सतत चालू होती. इंग्लंडला ते अनेकदा सहकुटुंबही जात असत. अंबालाल हे मूलतः धार्मिक वृत्तीचे, अहिंसावादी असले तरी प्रागतिक व व्यवहारी होते. महात्मा गांधीजी व साबरमती आश्रम यांच्याशी त्यांचे अकृत्रिम व सलोख्याचे संबंध होते. म. गांधीजींच्या असहकार चळवळीस त्यांनी सढळ हाताने मदत केली. मिठाच्या सत्याग्रहात अंबालाल यांच्या पत्नीसह मुलामुलींनी सक्रिय सहभाग घेतला (१९३०). त्यांत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. या वेळेपासून अंबालाल यांच्या सर्व कुटुंबियांनी खादी वापरण्यास सुरुवात केली. म. गांधींना अटक झाल्यानंतर अंबालाल यांनी त्याच्या निषेधार्थ ब्रिटिश सरकारकडून प्राप्त झालेले ‘कैसर-इ-हिंद’ हे सुवर्णपदक सरकारला परत दिले. गांधीजी आजारी असताना अंबालाल व सरलादेवी यांनी त्यांना रिट्रीटवर नेऊन औषधोपचार केले. गांधीजी सरलादेवीस आपली भगिनी मानीत. त्यांनी त्यांची गुजरातच्या ‘कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरिअल ट्रस्ट’च्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. अंबालाल यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला औद्योगिक व व्यावसायिक व्यापातून निवृत्ती घेतली (१९६५); तथापि साराभाई उद्योगसमूहाचे सुकाणू त्यांच्याच हाती होते.

अल्पशा आजाराने त्यांचे अहमदाबादमध्ये निधन झाले.

 

संदर्भ : Shah, Amrita, Vikram Sarabhai : A Life, London, 2007.

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate