कुमार पद्म शिवशंकर मेनन : (१८ ऑक्टोबर १८९८– २१ नोव्हेंबर १९८२). भारतातील एक कार्यक्षम सनदी नोकर व मुत्सद्दी. त्यांचा जन्म पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानातल्या कोट्टायम येथे सधन नायर कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर ते मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये दाखल झाले. पदवी प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले. तेथे ऑक्सफर्ड मजलिसचे ते अध्यक्ष होते. तेथून त्यांनी बी. ए. ही पदवी घेतली व आय.सी.एस् . (१९२१) होऊन ते परतले. भारतात परतल्यानंतर त्यांची त्रिचनापल्ली (मद्रास प्रांत) येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नेमणूक झाली. तत्कालीन सुप्रसिद्ध केरलीय नेते सर शंकरन नायर यांच्या अनुजी या कन्येशी त्यांचा विवाह झाला (१९२३). त्यांना दोन मुलगे आणि चार मुली झाल्या. १९२५ मध्ये केंद्र सरकारच्या परराष्ट्रीय व राजकीय खात्यात उप-सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर हैदराबाद, वायव्य सरहद्द प्रांत, सीलोन (श्रीलंका) आदि ठिकाणी (१९२९–३३) भारत सरकारचे एजंट म्हणून त्यांनी काम केले. भारत सरकारने झांजीबार, केन्या व यूगांडा येथील भारतीयांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक खास आयोग नेमला. त्याचे नेतृत्व के. पी. एस्. यांच्याकडे दिले.
भरतपूरचे दिवाण, राजस्थानचे राजकीय एजंट इ. पदांवरही त्यांनी काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चीनमध्ये राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाली (१९४२). संयुक्त राष्ट्रे याच्या स्थापना परिषदेत त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख सल्लागार म्हणून महत्त्वाचे काम केले. कोरियन युद्धानंतर संयुक्त राष्ट्रांच्या कोरिया आयोगाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले परराष्ट्र सचिव होण्याचा मान के. पी. एस्. ना मिळाला (१९४८).भारताच्या परराष्ट्रधोरणाची दिशा ठरविण्यात पंडित नेहरूंना त्यांचे मोलाचे साहाय्य लाभले. पुढे त्यांची रशियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली (१९५२). त्यांनी हंगेरी व पोलंडमध्येही राजदूताचे काम केले.
निवृत्तीनंतर (१९६१) ते संगीत नाटक अकादमी,इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, भारतीय विद्या भवनाचा परराष्ट्र विभाग, इंडो-सोव्हिएट कल्चरल सोसायटी आदींचे ते अध्यक्ष होते. विविध उच्च पदांवर असताना त्यांना विविध देशांना भेटी देण्याची तसेच राजदूत म्हणून परराष्ट्रात राहण्याची संधी मिळाली आणि थोरामोठ्यांच्या विशेषतः राजकारणी व्यक्तींचा सहवास लाभला.
हा बहुविध अनुभव त्यांनी लेखणीद्वारे विविध ग्रंथातून निवेदन केला आहे. त्यांनी मेनी वर्ल्ड्स या शीर्षकाने आत्मचरित्रही लिहिले आहे (१९६५). त्यांचे काही प्रमुख ग्रंथ-रशियन पॅनोरमा(१९६२), जर्नी राउंड द वर्ल्ड, ट्वायलाइट इन चायना, इंडिया ॲन्ड द कोल्ड वार, रशिया रीव्हिजिटेड, लेनिन थ्य्रू इंडियन आयीज,बायग्राफी ऑफ सर शंकरन नायर, मेम्वाअर्स ॲन्ड म्युझिग्ज, चेंजिंग पॅटर्न ऑफ डिप्लोमसी, ए डिप्लोमॅट स्पीक्स इ. प्रसिद्ध आहेत. यांशिवाय त्यांनी अनेक मासिकांतून स्फुट लेखन केले आहे. ते हृदयविकाराने कोट्टायम येथे मरण पावले.
लेखक - वसंत नगरकर
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
इंग्लंडमधील एक राजकीय मुत्सद्दी व क्रांतिकारक. त्य...
मेक्सिकन मुत्सद्दी, निःशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता आ...
अर्जेंटिनाचा मुत्सद्दी, विधिज्ञ व शांततेच्या नोबेल...
अमेरिकन मुत्सद्दी, उपराष्ट्राध्यक्ष आणि शांतता नोब...