অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वेंगलिल कृष्णन् कृष्ण मेनन

वेंगलिल कृष्णन् कृष्ण मेनन

वेंगलिल कृष्णन् कृष्ण मेनन : (३ मे १८९७–६ऑक्टोबर १९७४). एक प्रसिद्ध राजकीय नेते व मुत्सद्दी. त्यांचा जन्म केरळातील कालिकत (विद्यमान कोझिकोडे) या ठिकाणी सधन नायर ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील कोमथ कृष्ण करूप व आई लक्ष्मी कुट्टी. वडील कालिकतला वकिली करत असत. तेल्लिचेरी आणि कोझिकोडे येथे प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी नंतर मद्रास आणि लंडन येथे उच्च शिक्षण घेतले. बी. ए. (मद्रास विद्यापीठ), बी. एस्‌सी. (अर्थशास्त्र), एम् . एस्‌सी. (अर्थशास्त्र), डिप्लोमा इन एज्युकेशन (लंडन विद्यापीठ), तसेच बॅरिस्टर या पदव्या त्यांनी मिळवल्या. अड्यार येथील अध्यापन व्यवसायातील सुरुवातीची काही वर्षे (१९१९–२२) वगळता, भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत त्यांचे वास्तव्य इंग्लंड-आयर्लंडमध्ये होते. इंडिया लीगचे सचिव (१९२९–४७), लंडनमधील सेंट पान्क्रासचे कौन्सिलर (१९३४–४७), आर्टस् कौन्सिलचे अध्यक्ष, डंडी स्कॉटलंड येथील मजूर पक्षाचे उमेदवार, भारत सरकारचे विशेष प्रतिनिधी (१९४६–४७) अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. त्या काळात भारतीय स्वातंत्र्याचा ते प्रसार-प्रचार करीत.

इंग्लंडमधील वास्तव्यात हॅराल्ड लास्की, ॲनी बेझंट आणि जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांचा घनिष्ट परिचय झाला. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात इंग्लंडमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांचीच निवड झाली. पंडित नेहरूंचे व्यक्तिगत प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक यूरोपीय देशांना भेटी दिल्या. लोकसभेवर ते दोनदा निवडून आले. (१९५७ व १९६२). संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भारतीय शिष्टमंडळाचे ते अध्यक्ष (१९५२–६२) होते. यावेळी त्यांचा कल जगातील कम्युनिस्ट राजवटीकडे सहानुभूतीने पाहण्याचा होता. त्यामुळे भारतावर चीनचे आक्रमण कधी होऊ शकेल, याची चीनचे आक्रमण होईपर्यंत त्यांना कल्पनाही आली नाही. संयुक्त राष्ट्रे या संस्थेमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून तीन-चार दिवस त्यांनी अखंडपणे अथक भाषणे केली. बिन खात्याचे मंत्री (१९५६–५७), परराष्ट्र मंत्री (१९५७–६१), आणि संरक्षणमंत्री (१९६१–६२), इ. उच्च पदांवर त्यांनी काम केले.

इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅ शनल लॉ ॲन्ड डिप्लोमसी या संस्थेचेही ते अध्यक्ष होते. तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ अधिवक्ता म्हणूनही त्यांनी काम केले. भारताच्या परराष्ट्रीय धोरणांच्या-विशेषतः तटस्थतेच्या-जडणघडणीत पंडित नेहरूंना त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. चीन-भारत युद्धात (१९६२) भारताचा पराभव झाल्यानंतर, त्याचे सर्व खापर मेनन यांच्यावर फोडण्यात आले. संरक्षण खात्याच्या एकूण कारभारावर काँग्रेसच्या खासदारासह सर्व पक्षांनी टीकेची झोड उठविली, तेव्हा लोकसभेतील वादळी चर्चेनंतर पंडित नेहरूंना त्यांचा राजीनामा स्वीकारण्यावाचून गत्यंतर नव्हते. पुढे नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचे राजकीय क्षेत्रातील महत्त्व जवळजवळ संपुष्टात आले. अखेरच्या दिवसात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून स्वतंत्र व अलिप्त राहण्याचे ठरविले. वृद्धापकाळाने त्यांचे निधन नवी दिल्ली येथे झाले.

व्ही. के. के. या नावाने परिचित असलेल्या मेनननी अविवाहित राहून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन, परदेशात जनजागृती केली. त्यांच्या हेकेखोर व तापट स्वभावामुळे त्यांना फारसे अनुयायी लाभले नाहीत. अखेरच्या दिवसात त्यांचा कल डाव्या विचारसरणीकडे झुकलेला. त्यामुळे भारत-चीन मैत्रीविषयीच्या त्यांच्या संकल्पीत योजनेविषयी बरीच उलटसुलट टीका झाली. परीणामतः भारत-चीन युद्धामुळे त्यांना राजकारणातून बाहेर पडावे लागले. पेलिकन बुक्स व ट्‌वेंटिएथ सेंचुरी लायब्ररी (वॉडले हेड) यांचे ते संपादक होते. मेनन यांनी वृत्तपत्रीय, स्फुट तसेच ग्रंथलेखन विपुल केले; तथापि त्यांची पुस्तके विशेष लोकप्रिय झाली नाहीत. ब्रिटन अँण्ड फ्रिडम, व्हाय मस्ट इंडिया फाइट, ब्रिटन्स प्रिझनर, युनिटी वुइथ इंडिया, अगेन्स्ट फॅसिझम इ. त्यांची काही पुस्तके होत.

 

लेखक - वि. मा. बाचल

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate