অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिवराम हरि राजगुरू

शिवराम हरि राजगुरू

शिवराम हरि राजगुरू : (२४ ऑगस्ट १९०८ - २३ मार्च १९३१) भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात पुणे जिल्ह्यात खेड येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायाम शाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या १५ व्या वर्षी ते बनारसला संस्कृत अध्ययनासाठी गेले. तेथे न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा ते उत्तीर्ण झाले. लघु सिध्दान्त कौमुदीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या अवगत होत्या. शिवाजी आणि त्यांची गनिमी युध्दपध्दती यांबद्दल त्यांना विशेष कौतुक होते. काही काल ते काँग्रेस सेवा दलातही होते. बनारसला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिनेत्यांशी ओळख झाली. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतीकार्यात भाग घेतला. रघुनाथ या टोपणनावाने ते प्रसिध्द होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिनेत्यांशी मैत्री झाली.

शिवराम हरी राजगुरूसायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलीस हल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले. त्यामुळे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी या थोर पंजाबी नेत्याला मृत्यू आला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा पंजाबी क्रांतिनेत्यांनी निर्धार केला. यासाठी चंद्रशेखर आझाद, शिवराम राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही संयुक्त प्रांतातून आले. पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली. ब्रिटिश पोलीस अधिकारी साँ डर्स याच्यावर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बाँ बफेकीनंतर पकडले गेले; पण आझाद व राजगुरू सु. दोन वर्षे अज्ञात स्थळी भूमिगत होते. साँ डर्स वधानंतर २२ महिन्यांची म्हणजे ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोरच्या कारावासात सुळावर चढविण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे राजगुरूनगर असे नामांतर करण्यात आले.

 

लेखक - व. बि. नगरकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate