অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इझ्राएल

इझ्राएल

(मेदिनात इझ्राएल). पश्चिम आशियातील नवोदित ज्यू-राष्ट्र. क्षेत्रफळ २०,७०० चौ. किमी.; लोकसंख्या २९,९९,००० (१९७१); २९०३०' उ. ते ३३०१५' उ. व ३४०१७' पू. ते ३५०४१' पू. याच्या सीमा उत्तरेस ७९ किमी. लेबाननशी, पूर्वेस ५३१ किमी. जॉर्डनशी व ७६ किमी. सिरियाशी, दक्षिणेस व पूर्वेस मिळून २०६ किमी. ईजिप्तशी आणि पश्चिमेस ५९ किमी. गाझा पट्टीशी भिडल्या आहेत. याशिवाय सु. ७८ किमी. भूमध्यसमुद्र-किनारपट्टी तांबड्या समुद्राच्या अकाबाच्या आखातावरील सु. ४ किमी. किनाराही या देशाच्या सत्तेखाली आहे.

भूवर्णन

भौगोलिक दृष्ट्या देशाच्या सरहद्दी नैसर्गिक नाहीत. १९४८ साली अरब राष्ट्रांशी झालेल्या तहांन्वये त्या ठरविण्यात आल्या आहेत. स्थूलमानाने इझ्राएलचे चार प्रमुख नैसर्गिक विभाग पडतात :

(१) भूमध्यसामुद्रिक किनारपट्टी : ही देशाच्या पश्चिम विभागात असून उत्तरेस चिंचोळी व दक्षिणेस रुंद होत गेलेली आहे.

(२) टेकाड प्रदेश : उत्तरेस गॅलिली, मध्यभागी ज्यूडीया व सामेरिया आणि दक्षिणेस नेगेव्हमधील टेकड्यांचा प्रदेश असे याचे उपविभाग मानता येतील.

(३) जॉर्डन नदीचे खोरे : या खोऱ्याचा काही भाग जॉर्डनमध्ये तर उरलेला भाग इझ्राएलमध्ये आहे. ह्या विभागात असलेल्या टेकड्यांची उंची स्थूलमानाने समुद्रसपाटीपासून ६०० मी. असून मौंट मायरॉन (जेबेल जारमाक) हे शिखर १,२०८ मी. उंचीचे आहे.

(४) नेगेव्हचा वाळवंटी प्रदेश : या वाळवंटी प्रदेशात, दक्षिण ज्यूडीया विभागातील टेकड्यांत काही ठिकाणी सुप्त ज्वालामुखीही आढळतात. या विभागात तांबड्या समुद्रावरील अकाबाच्या आखातापर्यंतचा भूभाग मोडतो.

इझ्राएलमध्ये नैसर्गिक जलाशय अगदी कमी प्रमाणात आहेत. जॉर्डन नदीच्या एकूण ३२० किमी. लांबीपैकी ११८ किमी. इझ्राएल व जॉर्डन यांच्या सरहद्दीवर आहे. याशिवाय यॉरकोन, किशॉन व यारमूक या येथील प्रमुख नद्या होत. १६५चौ. किमी. क्षेत्रफळाचे किनेरेट सरोवर (गॅलिली समुद्र), मृतसमुद्राचा दक्षिणेकडील एक चतुर्थाश भाग व उत्तरेकडील हुला सरोवर यांवर एझ्राएलची सत्ता चालते.

या देशाचे हवामान भूमध्यसागरी आहे. हिवाळ्यात पाऊस पडतो. व उन्हाळे कोरडे असतात. जानेवारी महिन्यातील सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे २०·९० से. व ४·४० से. असून ऑगस्ट महिन्यातील सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे ४०·२० से. व १८·४० से. असते. पर्जन्यमान उत्तरेकडे सु. १०७ सेंमी. व दक्षिणकडे ३ सेंमी. असते.

दक्षिणोत्तर असमान पर्जन्य, उंचसखल भूभाग, वाळवंटी प्रदेशाचे सान्निध्य व समुद्रसान्निध्य या सर्व कारणामुळे इझ्राएलमधील जमीन शेतीसाठी तितकीशी उपयुक्त नाही. तिच्यात चुनखडीचे प्रमाण जास्त आहे.

येथील नैसर्गिक वनस्पती बहुतेक नष्ट झाली आहे. तथापि शासनाने काही ठिकाणी पाईन, ओक, निलगिरी इत्यादींची लागवड केली आहे. यांशिवाय येथे बाभूळ, कारोबा, खजूर, निरनिराळ्या औषधी वनस्पती तसेच हायसिंथ, क्रोकस, ट्यूलिप इ. फुलझाडे आढळून येतात. मोसंबी, संत्री, पेरू, केळी, अननस इत्यादींच्या बागा लावलेल्या आहेत.

कोल्हा, तरस, रानडुक्कर, हरिण, रानमांजर, मुंगूस इ. प्राणी येथे असून निरनिराळ्या सु. ४० जातींचे पक्षी येथे आढळतात. अधूनमधून टोळघाडी येतात.

इतिहास

बायबलच्या जुन्या करारात वर्णन केल्याप्रमाणे ख्रिस्ताआधी दोन हजार वर्षापूर्वी झालेल्या अब्राहम याने ðज्यू संस्कृतीचा पाया घातला.

अब्राहमचा नातू जोसेफ याने बारा ज्यू टोळ्या एकत्र आणून ज्यू राष्ट्राची निर्मिती केली. त्याच्या वंशजांनी ज्यूडा व इझ्राएल अशी दोन राज्ये भरभराटीस आणली. सॉल, डेव्हिड व सॉलोमन हे महत्त्वाचे राजे होऊन गेले. इ. स. ७० मध्ये रोमनांनी ही राज्ये नष्ट केली व त्यांना पॅलेस्टाइन नाव देऊन आपल्या साम्राज्याचा प्रांत बनविले. यानंतर धार्मिक छळामुळे कित्येक ज्यू देशांतर करून गेले.

रोमानांनंतरचा येथील  इतिहास अरब, ख्रिस्ती, क्रूसेडर, मोंगल, तुर्क व ब्रिटिश ह्यांच्या सत्तांचा होय. ज्यू लोक जगभर पसरले तरी त्यांची एकात्मता मात्र कायम होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगातील ज्यू लोकांच्या प्रतिनिधींनी 'झाय्‌निझम्'ची स्थापना केली. ज्यूंसाठी पॅलेस्टाइन हे स्वतंत्र राज्य असावे हे झाय्‌निझम्‌चे उद्दिष्ट होते. १८८२ मध्ये रशियातून आलेल्या ज्यू लोकांची पहिली वसाहत पॅलेस्टाइनमध्ये झाली. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस ब्रिटिशानी पॅलेस्टाइन जिंकले व युद्धानंतर त्यांच्याकडे ते महादिष्ट प्रदेश म्हणून राहिले.

ब्रिटिश राज्यकर्त्यानी १९१७ सालच्या बाल्फोर जाहीरनाम्यानुसार ज्यूंच्या स्वतंत्र राज्यकल्पनेस दुजोरा दिला. स्थानिक अरब जमीनदारांकडून जमिनी विकत घेऊन ज्यू लोकांनी तेथे आणखी वसाहती केल्या. परंतु जमिनीचे मालकी हक्क ज्यू भांडवलदारांकडे गेल्यामुळे ज्यू आणि अरब लोकांत तेथे तंटे सुरू झाले, म्हणून दुसरे महायुद्ध सुरू झाल्याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी ज्यू लोकांच्या स्थलांतराला बंदी घातली. तरीसुद्धा जागतिक दडपणामुळे त्यांनी अखेर ज्यूराज्यनिर्मितीला मान्यता दिली.

२९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाइनची फाळणी करून ज्यू लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र व जेरूसलेम शहरास आंतरराष्ट्रीय दर्जा असावा असा ठराव केला. त्यानुसार १४ मे १९४८ रोजी आजच्या इझ्राएलची स्थापना झाली. डेव्हिड बेन-गुरिअन हे राज्याचे पहिले पंतप्रधान व कायीम व्हाइट्‌समान हे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १९४९ मध्ये इझ्राएल संयुक्त राष्ट्रांचा सदस्य बनला.

अरब लोकांना फाळणी मान्य न झाल्यामुळे थोड्याच अवधीत अरब राष्ट्रांनी संयुक्तरीत्या इझ्राएलवर चाल केली. तथापि या चिमुकल्या राष्ट्राने त्या संयुक्त फौजांना हरविले. संयुक्त राष्ट्रांनी दोघांच्या सीमावादांकरिता प्रथम बर्नार्ड व नंतर राल्फ बुंच यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक केली होती. तथापि अरब व इझ्राएलमधील कुरबुरी चालूच राहिल्या.

नोव्हेंबर १९५६ मधील सिनाईच्या चढाईत झालेला इझ्राएलचा विजय व इझ्रायली शस्त्रबलाचा वाढता धोका लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी इझ्राएल व इतर अरब राष्ट्रे यांमधील सरहद्दी ठरवून दिल्या व गाझापट्टीत आपले सैन्य ठेवले. १९५९ मध्ये इझ्राएलच्या बोटी ईजिप्तने सुएझमार्ग नेण्यास बंदी केल्याने थोडे तंग वातावरण झाले होते; जॉर्डन, सिरिया यांच्याशी सरहद्दींवरून अधूनमधून तंटेबखेडे होत.

जून १९६७ मध्ये या कुरबुरीचे मोठ्या युद्धात रूपांतर झाले. सहा दिवसांच्या युद्धात इझ्राएलने संपूर्ण जेरूसलेम शहर, गाझापट्टी, सिनाई द्वीपकल्प, जॉर्डन नदीचा पश्चिम तीर व सिरियाच्या सीमेवरील काही प्रदेशाचा ताबा मिळवून अरबांचा पराभव केला. संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करून युद्धबंदी केली.

ऑक्टोबर १९७३ मध्ये अरबांशी झालेल्या सशस्त्र संघर्षानंतर परिस्थिती पुन्हा गंभीर झाली. अरब राष्ट्रांनी तेलाचा शस्त्र म्हणून प्रथमच वापर केला व जागतिक दडपणामुळे परिस्थिती थोडी निवळली. तथापि आजही इझ्राएल व अरब यांचे संबंध स्फोटकच आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate