অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जेरूसलेम

जेरूसलेम

जेरूसलेम

(अरबी एल् कूट किंवा बेट अल् मुकद्दास; हिब्रू येरूशलायम). इझ्राएलची राजधानी. लोकसंख्या ३,२६,४०० (१९७३ अंदाज). जॉर्डन नदीमुखाच्या पश्चिमेस, तेल-आवीव्ह या सागरी बंदराच्या आग्नेयीस आणि भूमध्य समुद्रापासून ५६ किमी. अंतरावर ज्यूडीया डोंगरावर जेरूसलेम वसले आहे. त्याच्या १९७० च्या २·८८ लक्ष अधिकृत लोकसंख्येपैकी ज्यू सु. ७५%, मुस्लिम २१% व ख्रिस्ती ४% होते.

तिहासिक दृष्ट्या नोंद झालेले जेरूसलेमचे पहिले धनी ईजिप्शियन होत. पूर्व-ब्राँझयुगात तेथे वसाहत असावी. इ. स. पू. १००० च्या सुमारास डेव्हिडने जेरूसलेम येथे ज्यूंची राजधानी वसविली. पुढे सॉलोमन याने शहराचा विस्तार करून मंदिर बांधले. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इ.स. पू. १९८ मध्ये जेरूसलेम सेल्युकस निकेटरच्या वंशजांकडे गेले. रोमन सम्राट पाँपेईने इ. स. पू. ६३ मध्ये जेरूसलेम काबीज केले.

हेरॉड द ग्रेटने ३६ वर्षे ज्यूडावर राज्य करून जेरूसलेमची पुनर्रचना केली. इ. स. ६ मध्ये ज्यूडा रोमन साम्राज्याचा एक प्रांत बनले. ज्यूंनी रोमनांविरुद्ध इ. स. ६६ मध्ये बंड केले. ७० मध्ये रोमनांनी टायटसच्या नेतृत्वाखाली शहर बेचिराख केले. हेड्रिएनसने ते पुन्हा वसविले. इ. स. ३२४ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटीनच्या कारकीर्दीत जेरूसलेममध्ये प्रसिद्ध चर्च बांधण्यात आले. ६३८ मध्ये खलीफा पहिला उमर याने जेरूसलेम बळकावले; ६८८–९१ या काळात दहाव्या खलीफने मशिदीचा घुमट बांधला. ९६९ मध्ये ईजिप्तच्या शिया खलीफांनी शहराचा ताबा घेतला.

१०१० मध्ये अल्-हकीम खलीफाने ख्रिस्ती लोकांची प्रार्थनास्थाने नष्ट केली. १०७१ मध्ये सेल्जुक तुर्कांनी बायझंटिनांचा पराभव केला. जेरूसलेमचे लॅटिन राज्य १०९९–११८७ पर्यंत टिकले. ते पुन्हा १२२९–३९ व १२४३–४४ एवढा काळ ख्रिस्ती लोकांच्या ताब्यात होते. पुन्हा ते तातारांच्या हाती सापडले. १२४७–१५१७ पर्यंत ते मामलूकांच्या ताब्यात होते. १५१७ मध्ये ऑटोमन सुलतान पहिला सेलीम याने तेथे तुर्क्री अंमल स्थापिला. तो ४०० वर्षे (१९१७) पर्यंत टिकून राहिला. १९१७ मध्ये ब्रिटिश फौजा जेरूसलेममध्ये शिरल्या आणि तेथे ब्रिटिश महादेश सुरू झाला.

१९४८ मध्ये ब्रिटिश अंमल संपुष्टात आला. जेरूसलेमचे १९४८–६७ या काळात इझ्रायली आणि जॉर्डेनियन असे दोन विभाग झाले होते; इझ्रायली भाग ही इझ्राएलची राजधानी होती. जून १९६७ मधील सहा दिवसांच्या युद्धानंतर इझ्राएलने जॉर्डेनियन जेरूसलेमही बळकावले आणि तेव्हापासून इझ्राएल त्याही भागावर आपला हक्क सांगत आला आहे; परंतु त्याचा हा दावा जॉर्डन व संयुक्त राष्ट्रे यांना मान्य नाही. अद्यापि त्याचे स्थान व दर्जा यांबाबत बोलणी चालूच आहेत.

हरातील धार्मिक स्थानांची व्यवस्था, संरक्षण व काळजी त्या त्या धर्माच्या अधिकारी व्यक्तीकडे सोपविलेली असते. त्यांची मोडतोड वा विनाश केल्यास सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा मिळते. ज्यूंच्या श्रद्धास्थानांपैकी सर्वांत पवित्र टेंपल मौंट होय. मौंट झायन येथे डेव्हिडचे थडगे आहे. मौंट ऑफ ऑलिव्ह्‌ज येथे जुन्या ज्यू संतांची थडगी आहेत. प्राचीन सिनॅगॉगखेरीज नव्या शहरात अनेक नवी सिनॅगॉग आहेत. येशुरन सिनॅगॉग राष्ट्रीय समारंभसमयीचे प्रार्थनास्थान असून हेखाल शेलोमो येथील सिनॅगॉग प्रमुखराब्बींचे 

वसतिस्थान आहे. मुसलमानांच्या मते जेरूसलेम हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पवित्र स्थान असून, हाज यात्रेनंतर जेरूसलेमची यात्रा केली म्हणजे मुख्य यात्रा केल्याचे श्रेय मिळते.

ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेली सुप्रीम मुस्लिम कौन्सिल ही १९६७ मध्ये पुनर्घटित करण्यात आली. ख्रिस्ती ‘ईस्टर्न चर्च’च्या तीन संस्थापकांची पीठे येथे आहेत. ‘चर्च ऑफ द होली सेपल्कर’ यावर विविध ख्रिस्ती धर्मपंथांचे नियंत्रण आहे. अँग्लिकन, ग्रीक, रशियन, लॅटिन, फ्रान्सिस्कन, आर्मेनियन अशी विविध चर्च येथे आहेत.

जुन्या शहराच्या सभोवार सुलेमानने १५३७ ते ४० च्या दरम्यान बांधलेल्या भिंती व सॉलोमनच्या देवळाची उभी असलेली एकमेव भिंत (वेलिंग वॉल) आहे. जाफा गेटाशेजारील मनोरा (सिटॅडेल-टॉवर ऑफ डेव्हिड) सोळाव्या शतकात बांधण्यात आला. बॅसिलिका ऑफ द होली सेपल्कर (ख्रिस्ताचे थडगे), ‘टूम ऑफ द व्हर्जिन’चे चर्च, सेंट ॲनीचे चर्च, आर्मेनियन बॅसिलिका ऑफ सेंट जेम्स या वास्तू उल्लेखनीय आहेत.

१३ ते १५ या शतकांतील मामलूकांच्या रचना, त्यांमधील चुनखडी झुंबर व रंगीत पट्ट्या यांमुळे उल्लेखनीय ठरल्या आहेत. आधुनिक वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंमध्ये रॉकफेलर संग्रहालय, हिब्रू युनियन कॉलेज, वाय्. एम्. सी. ए., ‘द एक्यूमेनिकल इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड थिऑलॉजिकल स्टडीज’, विद्यापीठीय इमारती, नेसट (संसदभवन), इझ्राएल संग्रहालय इत्यादींचा समावेश होतो.

हरामध्ये इ. स. पू. आठव्या शतकातील जमिनीखालील पाण्याचे नळ आजही चालू असून, पाण्याच्या प्राचीन टाक्या व कुंडेही आहेत. एन्-केरेम येथील हादासा विद्यापीठाचे वैद्यकीय केंद्र हे जगप्रसिद्ध आहे. हिब्रू विद्यापीठही येथेच आहे. राष्ट्रीय ग्रंथालय व विद्यापीठ ग्रंथालय यांमध्ये दोन लाखांवर ग्रंथ आहेत. ह्यांशिवाय बेझालेल कला अकादमी, रूबिन राष्ट्रीय संगीत अकादमी, नेल्सन ग्ल्यूएक हिब्रू युनियन कॉलेज ह्यांसारखी उच्च विद्याकेंद्रे प्रसिद्ध आहेत.

हरातील सु. ८०९ हे क्षेत्र उद्याने, उपवने, जंगले, यांसाठी असून सर्वांत मोठे उद्यान (१२१ हे.) जुन्या शहराभोवती उभारण्यात येत आहे. यांशिवाय १६०च्या वर लहान उद्याने, क्रीडांगणे व मनोरंजन केंद्रे आहेत  प्राचीनकालीन प्रणिमात्रांचे नमुने ‘बायबल’ उद्यानात ठेवण्यात आले आहेत. १०,००० प्रेक्षक बसू शकतील असे फुटबॉल क्रीडांगण, तसेच ७,५०० प्रेक्षक मावतील असे कामगार-क्रीडागृह शहरात आहे. ३०,००० प्रेक्षक बसू शकतील असे ४० हे.

परिसराचे क्रीडागार बांधण्यात येत आहे. १९६८ पासून शहरात मोठ्या प्रमाणात उत्खननकार्य चालू आहे. शहरात हिरे, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, औषधे व रसायने, पादत्राणे, पेन्सिली, कापड व तयार कपडे इत्यादींचे कारखाने आहेत.


गद्रे, वि. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate