অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रेट ब्रिटन

ग्रेट ब्रिटन

यूरोपातील वायव्येकडील, जागतिक महत्त्वाचा द्वीपरूप देश. क्षेत्रफळ २,२९,८८७ चौ. किमी. एकूण लोकसंख्या ५,३८,२१,३६४ (१९७१). यामध्ये युनायटेड किंग्डमपैकी उत्तर आयर्लंड व प्रत्यक्ष ब्रिटिश राजाच्या अंकित असलेली परंतु आकडेवार माहितीपुरती युनायटेड किंग्डममध्ये धरली जाणारी आइल ऑफ मॅन व चॅनेल आयलंड्स सोडून इंग्लंड, वेल्स व स्कॉटलंड यांचा समावेश होतो. इंग्लंडचे क्षेत्रफळ १,३o,३६o चौ. किमी. व लोकसंख्या ४,५८, ७o,o६२ (१९७१); वेल्सचे अनुक्रमे २o,७६१ चौ. किमी. व २७,२३,५९६ व स्कॉटलंडचे ७८,७६७ चौ. किमी. व ५२,२७,७०६ आहे.

शेटलंड, ऑर्कनी, औटर व इनर हेब्रिडीझ आणि किनाऱ्याजवळची इतर लहानमोठी बेटे यांचा समावेश ग्रेट ब्रिटनमध्येच होतो. ग्रेट ब्रिटनच्या दक्षिणेस इंग्लिश खाडी, पश्चिमेस सेंट जार्जची खाडी, आयरिश समुद्र, नॉर्थ चॅनल व अटलांटिक महासागर, उत्तरेस अटलांटिक महासागर व पूर्वेस उत्तर समुद्र आहे.

हा देश दक्षिणेस सिली बेटे ४९° ५५' उ. व उत्तरेस शेटलंड बेटे ६o° २५' उ. आणि पश्चिमेस हेब्रिडीझमधील बॅरा हेड ७° ३८' प. व उत्तर समुद्रावरील लोस्टॉफ्ट १° ४६' पू. यांदरम्यान असून मुख्य भूमीवर याची दक्षिणोत्तर लांबी सु. ९६o किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ५१२ किमी. आहे. स्कॉटलंडच्या मुख्य भूमीवरील अगदी उत्तरेचे टोक डनेट हेड ५८° ४१' उ. तर इंग्लंडच्या भूमीवरील अगदी दक्षिणेचे टोक लिझार्ड पॉइंट ४९° ५८' उ. आहे. शून्य अंश रेखावृत इंग्लंडमधील ग्रिनिच येथील जुन्या वेधशाळेवरून जाते. लंडन ही या देशाची राजधानी आहे.

भूवर्णन

ग्रेट ब्रिटन हे एक मोठे बेट असून त्याच्या किनाऱ्याजवळ शेकडो लहानमोठी बेटे व द्वीपसमूह आहेत. हा देश प्राचीन काळी यूरोपच्या मुख्य भूमीशी जोडलेला होता; परंतु दोहोंमधला प्रदेश खचून सागरमग्न झाल्यामुळे तो अलग झाला. किनारा खूपच दंतुर असून त्यावर अनेक लहानमोठी आखाते व उपसागर तयार झाले आहेत. समुद्राचे चिंचोळे फाटे देशात बरेच आतपर्यंत गेल्यामुळे देशाचा कोणताही भाग समुद्रापासून १२५ किमी.पेक्षा जास्त दूर नाही. स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक फ्योर्ड तयार झालेले आहेत. नद्यांच्या मुखांजवळ विस्तृत व खोल खाड्या बनल्या असून तेथे उपयुक्त बंदरे उदयास आली आहेत. देशात सर्व प्रकारचे खडक आढळून येतात.

इंग्लंडच्या नैर्ऋत्य, पश्चिम व उत्तर भागांत डोंगर असून पूर्व व आग्नेय भाग छोट्या टेकड्या, ऊर्मिल ‘डाउन्स’ व सखल प्रदेश यांचा आहे. पूर्व किनाऱ्यावर काही ठिकाणी जोरदार वारे व मोठी भरती यांमुळे समुद्राचे पाणी आतवर येऊन प्रदेश जलमय होऊ नये, म्हणून संरक्षक भिंती बांधाव्या लागल्या आहेत. उत्तरेकडे टाईन नदीच्या पूर्व-पश्चिम खोऱ्याच्या उत्तरेस, स्कॉटलंडच्या सीमेवर चेव्ह्य डोंगररांग असून तिचे चेव्ह्यट शिखर ८१६ मी. उंच आहे.

स्कॉटलंड सीमेपासून मध्य इंग्लंडच्या डर्बीशरपर्यंत पेनाइन श्रेणी दक्षिणोत्तर गेलेली आहे. तिच्या पश्चिमेकडील टेकड्यांचा प्रदेश व अगदी पश्चिमेचा–इंग्लंडमधील स्कॉफेल पाइक हे ९७८ मी. चे सर्वोच्च शिखर असलेला–डोंगराळ प्रदेश यांच्या दरम्यान इंग्लंडच्या वायव्य भागामधील अत्यंत निसर्गरमणीय, पर्वतवेष्टित, स्फूर्तिदायक सर:प्रदेश आहे. पेनाइनच्या दक्षिणेस मध्य इंग्लंडचा मिडलँड हा ऊर्मिल टेकड्यांचा व सखल, सुपीक खोऱ्यांचा मैदानी प्रदेश आहे.

नैर्ऋत्य भागात कॉर्नवॉलचे डोंगर आहेत. ३३६ किमी. लांबीची पश्चिमवाहिनी सेव्हर्न व ३३४ किमी. लांबीची आग्नेयवाहिनी टेम्स यांशिवाय हंबर, टाईन, टीझ, ट्‌वीड, आयर, ट्रेंट, वेलंड, ऊझ या पूर्वेकडील; ॲव्हन आणि एक्स या दक्षिणवाहिनी व मर्सी ही पश्चिमवाहिनी या इंग्लंडमधील इतर प्रमुख नद्या होत. वेल्स हा डोंगराळ प्रदेश असून त्याच्या दक्षिण व पश्चिम किनाऱ्यावर अरुंद सखल किनारपट्ट्या आहेत. उत्तर किनाऱ्यावरही छोटेछोटे सखल मैदानी प्रदेश असून त्यांत डी नदीचे खोरे आहे. वाय, अस्क, टाउई, टाइव्ही या वेल्समधील इतर नद्या होत. वेल्सचा डोंगराळ भाग बराचसा उजाड असून मौंट स्नोडन हे त्यातील १,o८५ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर होय. वेल्समध्ये शेतजमीन फारशी नाही.

स्कॉटलंडचा दक्षिण भाग डोंगराळ असून त्यात रुंद, गोलाकार टेकड्या आहेत. यातून उत्तरेकडे रम्य नद्या वाहतात. स्कॉटलंडचा मध्यवर्ती सखल भाग सु. १५o मी. उंचीचा असून तो क्लाईड, फोर्थ व टे या नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे. याच भागात स्कॉटलंडची ग्लासगो व एडिंबरो ही प्रसिद्ध शहरे आहेत. याच्या उत्तरेस हायलँड हा ग्रॅम्पियन पर्वतप्रदेश असून त्यात ग्रेट ब्रिटनचे सर्वांत उंच बेन नेव्हिस हे १,२२१ मी. उंचीचे शिखर आहे.

स्कॉटलंडमध्ये समुद्राचे अरुंद फाटे आतपर्यंत येऊन आणि ‘यू’ दऱ्यांचे खोल भाग पाण्याने भरून जाऊन सुप्रसिद्ध नयनरम्य ‘लॉक’ सरोवरे बनली आहेत. अशा काही दऱ्या–ग्लेन–जोडल्या जाऊन आरपार मार्ग तयार झाले आहेत. ग्रॅम्पियनच्या उत्तरेची नैर्ऋत्य-ईशान्य गेलेली ग्रेट ग्लेन ही यांपैकीच होय. स्कॉटलंडच्या वायव्य भागातही हायलँड हा उंच डोंगराळ भाग आहे. डी, डॉन, स्पे या स्कॉटलंडमधील इतर नद्या होत्त. हेब्रिडीझ बेटे डोंगराळ असून मल बेटावरील बेन मोर शिखर ९५५ मी.उंच आहे.

खनिजे

ग्रेट ब्रिटनचे सर्वांत महत्त्वाचे खनिज म्हणजे कोळसा. त्यामुळेच ब्रिटनमध्ये इतर कोणत्याही देशाच्या आधी सु. २oo वर्षे औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. गेल्या ३oo वर्षांत कोळशाचा साठा संपत आला असला, तरी १९४७ मध्ये कोळसाखाणींचे राष्ट्रीयीकरण व यांत्रिकीकरण करून कोळसा उत्पादन चालू ठेवले आहे.

उत्तर समुद्रात ब्रिटनच्या हद्दीत नैसर्गिक वायू व तेल आणि कोळसाही सापडल्याने शक्तिसाधनांबाबत देशाला आधार मिळाला आहे. लोखंड, चिनी व इतर उपयुक्त माती, खडू, चुनखडी, वाळू यांशिवाय ब्रिटनमध्ये कथील, शिसे, जस्त व टंगस्टन यांच्याही खाणी थोड्या फार आहेत. दूसऱ्या महायुद्धानंतर जलविद्युत् उत्पादनाकडेही अधिक लक्ष दिले जात आहे.

हवामान

ग्रेट ब्रिटनच्याच अक्षांशांतील इतर प्रदेशांच्या मानाने ग्रेट ब्रिटनचे हवामान बरेच सौम्य, कमी थंड आहे; याचे कारण या देशाजवळून वाहत जाणारा उत्तर अटलांटिक प्रवाह हा गल्फ स्ट्रीमचा फाटा होय. नैर्ऋत्येकडून येणारे वारेही उबदार असतात. ग्रेट ब्रिटनमधील हिवाळ्याचे सरासरी तपमान उत्तरेकडून दक्षिणेकडे ४° से. ते ६° से. असते, तर उन्हाळ्यातील ११.७° से. ते १७.२° से. असते. वार्षिक सरासरी तपमान अगदी दक्षिणेस ११° से. पासून अगदी उत्तरेस ६° से. पर्यंत असते.

उन्हाळ्यात २४° से. च्या वर व हिवाळ्यात -५° से. च्या खाली तपमान क्वचितच जाते. ग्रेट ब्रिटनमधील पर्जन्यमानाचे वैशिष्ट्य असे, की वर्षाच्या प्रत्येक महिन्यात थोडा तरी पाऊस पडतोच. काही भागांत फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यांत सर्वांत जास्त पाऊस पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान १oo सेंमी. पेक्षा जास्त असते. इंग्लंडमध्ये ते ८६ सेंमी. असते, तर पश्चिमेकडील व उत्तरेकडील उंच प्रदेशांत ते ३८o सेंमी. पर्यंत जाते.

पूर्व व आग्नेय भागांतील सरासरी पर्जन्यमान ६७ सेंमी. असते. चुनखडीच्या प्रदेशात जिरणारे पाणी सोडले, तर वितळणाऱ्या बर्फाचे आणि पावसाचे बहुतेक पाणी वाहून जाते; त्यामुळे बहुतेक सर्व प्रदेशाला वाहत्या पाण्याचा भरपूर पुरवठा होतो. तथापि आता वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे व जलविद्युत्‌शक्ती उत्पादन यांमुळे पाण्याचा मुक्त वापर पूर्वीप्रमाणे करणे सुलभ राहिलेले नाही.

अटलांटिकवरून येणारी सौम्य आवर्ते या बेटांवरून जात असल्यामुळे हवामानात वारंवार बदल होत राहतो. यामुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रदेशात ज्याप्रमाणे लोकांच्या बोलण्यात नेहमी पावसापाण्याची चौकशी असते, त्याप्रमाणे ग्रेट ब्रिटनमध्ये संभाषणात सहज येणारा विषय हवा हा असतो. कधीकधी यूरोपच्या मुख्य भूमीवरून येथे प्रत्यावर्ते येतात आणि हवा अधिक स्थिर व आल्हादकारक बनते.

हिवाळ्यात दिनमान फारच कमी आणि वारंवार पडणारे धुके यांमुळे वातावरण बराच काळ धूसर व कुंद राहते. यामुळे ग्रेट ब्रिटनमध्ये सूर्यप्रकाश हिवाळ्यात अर्धा तास ते दोन तास आणि उन्हाळ्यातही जेमतेम साडेपाच ते आठ तास मिळतो. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला की येथील लोक आनंदाने प्रफुल्लित होतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate