অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिनीॲपोलिस

मिनीॲपोलिस

मिनीॲपोलिस

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे व औद्योगिक शहर. लोकसंख्या ३,७०,९५१, उपनगरीय - २१,१४,२५६ (१९८०). हे शिकागोच्या वायव्येस ३६५ किमी., मिसिसिपी नदीच्या दोन्ही काठांवर, मिनेसोटा नदीच्या मुखाजवळ वसले आहे. मिनेसोटाची राजधानी सेंट पॉल व मिनीॲपोलिस ही जुळी शहरे म्हणून ओळखली जातात.

बेल्जियन संशोधक आणि मिशनरी हेनेपिन याने १६८० मध्ये या भागात प्रवास करत असता मिसिसिपी नदीवरील सेंट अँथनी धबधब्यास भेट दिली. अमेरिकन सैनिकांनी कर्नल जोसाअन स्नेलिंग याच्या नेतृत्वाखाली १८२१ मध्ये बांधलेल्या सेंट अँथनी किल्ल्याचे १८२५ मध्ये ‘स्नेलिंग किल्ला’ असे नामांतरण करण्यात आले.

अँथनी धबधब्याजवळ जंगलतोड करून लाकून कापण्याच्या गिरण्या सुरु करण्यात आल्यामुळे लाकूड उद्योगाचे ते केंद्र बनले. या परिसरात गव्हाचेही उत्पन्न मिळू लागले. सेंट अँथनी गावाची स्थापना १८४८ मध्ये झाल्यानंतर नदीच्या दोन्ही काठावर वस्ती वाढू लागली व १८५२ पासून मिनीॲपोलिस हे नाव रुढ झाले.

१८५६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. पुढे १८६० मध्ये स्नेलिंग किल्ला व १८७२ मध्ये सेंट अँथनी हे गाव याच शहरात समाविष्ट करण्यात येऊन याची उपनगरीय सरहद्द वाढविण्यात आली. मिनीॲपोलिसचा परिसर गव्हाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. जगातील सर्वांत मोठी गव्हाची व धान्याची बाजारपेठ येथे असल्यामुळे जगातील प्रमुख मोठ्या पीठ गिरण्यापैकी चार गिरण्या येथे आहेत.

याशिवाय परिसरात व नदीच्या काठावर जंगल विपुल असल्यामुळे, लाकूड कापण्याच्या गिरण्याही येथे बऱ्याच आहेत. लाकूड उद्योग व गुरांचा व्यापार येथे भरभराटीस आला आहे. हे लोहमार्ग, विमानमार्ग यांचे एक महत्त्वाचे केंद्र असून मिसिसिपी नदीतून नौकानयनही चालते.

सु. तीन हजारांवर लहान-मोठे कारखाने येथे असून, त्यामध्ये प्रामुख्याने संगणक, विद्युत्‌ उपकरणे, शेती अवजारे, रेल्वेचे रूळ, यंत्रे, धातूंच्या वस्तू, कापडनिर्मिती, कागदनिर्मिती, विणकाम, अन्नप्रक्रिया, मांस डबाबंदीकरण इ. उद्योगधंदे चालतात.

मिनीॲपोलिसचे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. शहरात व उपनगरात मिळून २२ सरोवरे व १५० उद्याने असल्याने ‘सरोवरांचे शहर’ म्हणूनच हे ओळखले जाते. शहराच्या पश्चिमेस १९ किमी.वरील मिनिटोंग्का सरोवर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरते. सेंट अँथनी व मिनीहाहा धबधबे, मिनीहाहा, कोलंबिया, गेटवे, नोकोमिस इ. उद्याने व पोहण्याचे तलाव प्रेक्षणीय आहेत.

मिनीहाहा उद्यानातील स्टीव्हेन्झ हाउस (स्था. १८४९) आधुनिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. येथे मिनेसोटा विद्यापीठ (स्था. १८५१) आहे. याशिवाय सार्वजनिक ग्रंथालयाचे विज्ञान संग्रहालय व खगोलालय, हेनेपिन ऐतिहासिक संग्रहालय; वॉकर कलाकेंद्र, गथ्री रंगमंदिर इ. उल्लेखनीय आहेत.


अनपट, रा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate