অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंरी द सँ-सीमाँ

आंरी द सँ-सीमाँ

आंरी द सँ-सीमाँ : (१७ ऑक्टोबर १७६०–१९ मे१८२५). फ्रेंच सामाजिक विचारवंत आणि ख्रिस्ती समाजवादाच्या प्रमुख प्रणेत्यांपैकी एक. जन्म पॅरिसमध्ये, विपन्नावस्थेस आलेल्या एका उमराव कुटुंबात. त्याचे शिक्षण अनियमित आणि खाजगीरीत्या झाले होते. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने सैनिकी सेवेत प्रवेश केला. इंग्लंड-विरुद्घच्या युद्घात अमेरिकन वसाहतींना मदत करण्यासाठी पाठविलेल्या सैनिकांच्या तुकड्यांमध्ये त्याचा समावेश होता. फ्रेंच राज्यक्रंत्योत्तर काळातील हिंसाचाराच्या आणि दहशतीच्या कालखंडात (१७९३-९४) त्याला तुरुंगवास घडला आणि मृत्युदंडापासून तो कसाबसा वाचला. तेव्हापासून क्रांतीत होणाऱ्या हिंसक कृत्यांचा तो विरोधक बनला. तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर तत्कालीन फ्रान्समधील विशिष्ट आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन त्याने केलेल्या काही व्यवहारांत त्याला विपुल पैसा मिळाला. त्याचा विनियोग त्याने पॅरिसमध्ये एक दिमाखदार सालाँ उभा करण्यासाठी केला.

अनेक बुद्धिमंत ह्या सालाँकडे आकृष्ट झाले; पण ह्यात बराच पैसा खर्च झाल्याने त्याची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आणि आपले उर्वरित आयुष्य त्याला सतत पैशाच्या विवंचनेत काढावे लागले. विज्ञानाकडे त्याचा ओढा होता आणि त्यातून विज्ञानाचे काही अभ्यासक्रमही त्याने पूर्ण केले होते. १८०३ मध्ये ‘लेटर्स ऑफ अ‍ॅन इन्हॅबिटंट ऑफ जिनीव्हा टू हिज कंटेंपररीज ’ (इं. शी.) हे त्याचे पहिले पुस्तक प्रसिद्घ झाले. ह्यापुढे समाजव्यवस्थेत धर्मोपदेशकांची जागा वैज्ञानिकांनी घेतली पाहिजे, हा विचार त्यात त्याने मांडला. १८१४ मध्ये त्याचा ‘ऑन द रिऑर्गनायझेशन ऑफ यूरोपिअन सोसायटी’ (इं. शी.) हा ग्रंथ प्रसिद्घ झाला. सँ सीमाँ हा इतिहासाकडे क्रमविकासाच्या दृष्टिकोनातून पाहात होता. समाजाची एक सांस्कृतिक अवस्था यथावकाश संपून दुसरी, अधिक प्रगत अशी, अवस्था त्यानंतर सुरु होते. अधिक उन्नत अशा तत्त्वांवर ही नवी अवस्था आधारलेली असते; तथापि ही अवस्थाही शाश्वत नसते, कालांतराने ती गतार्थ होते आणि तिच्याहून अधिक प्रगत अशी नवी सांस्कृतिक अवस्था अस्तित्वात येते, अशी त्याची धारणा होती.

यूरोपीय समाजाच्या पुनर्रचनेबाबत त्याने विचार केला होता. त्याचे असे प्रतिपादन होते, की पंधराव्या शतकापासून यूरोप एका संक्रमणावस्थेतून जात आहे. सरंजामशाही आणि कॅथलिक पंथ ह्यांचा प्रभाव असलेली मध्ययुगीन समाजव्यवस्था पंधराव्या शतकापासून ढासळावयाला सुरुवात झाली आणि तिची जागा विज्ञान व उद्योग ह्यांचे अधिष्ठान असलेली समाजव्यवस्था घेऊ लागली. ही समाजव्यवस्था भक्कम पायावर उभी करण्यासाठी समाजने त्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, रोमन कॅथलिक चर्चचे स्थान त्यांना मिळाले पाहिजे, वैज्ञानिक, अभियंते आणि उद्योगाच्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती ह्यांनी समाजाला दिशा दिली पाहिजे, मानवतेच्या बहुतेक समस्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे सोडविता येतील, अशी त्याची धारणा होती. जीवनोपयोगी वस्तूंचे उत्पादन करावे आणि उत्पादकश्रमांवर समाज उभा करावा, असे त्याला वाटत होते.

आपल्या ‘द न्यू क्रिस्टिअ‍ॅनिटी’ (१८२५, इं. शी.) ह्या गंथात त्याने दरिद्री जनतेच्या प्रश्नांचा विचार केला. गरिबांची स्थिती लवकरात लवकर सुधारण्यासाठी धर्माने समाजाला दिशा दाखविली पाहिजे, असा विचार त्याने या ग्रंथात मांडला होता. ह्या ग्रंथामुळे ख्रिस्ती समाजवादाच्या चळवळीला प्रेरणा मिळाली. इहवादी दृष्टिकोनातून आर्थिक प्रगतीच्या आणि मानवी बंधुत्वाच्या विचारांशी बांधीलकी ठेवणारी ही चळवळ होती.

युद्घाला त्याचा विरोध होता. युद्घे दडपून टाकण्यासाठी यूरोपीय देशांनी एक संघटना बांधावी, असे त्याचे मत होते. फ्रेंच तत्त्वज्ञ ऑग्यूस्त काँत हा त्याच्या विचारांनी प्रभावित झालेला होता व सँ-सीमाँबरोबर त्याने काही काळ कामही केले होते. ‘इंडस्ट्री ’ (इं. शी.) या ग्रंथलेखनात ऑग्यूस्त काँत सहलेखक होता; तथापि पुढे तो सँ-सीमाँपासून दूर झाला.

सँ-सीमाँच्या हयातीतच त्याला अनुयायी मिळाले होते. सँ-सीमाँच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला. त्याच्या विचारांना ‘Doctrine de Saint-Simon’ ह्या नावाने एका बांधीव विचारसरणीचे (सँ-सीमाँवाद) स्वरूप देण्यात आले. वस्तूंची सामायिक मालकी, वारसाहक्क नष्ट करणे, स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणे, ह्या मागण्यांसाठी त्यांनी जाहीरनामा काढला होता; पुढे ह्या अनुयायांमध्ये झालेले वाद आणि मतभेद ह्यांमुळे ही चळवळ थंडावली. त्याच्या विचारांचा प्रभाव मात्र पुढे सामाजिक लोकशाहीवाद, मार्क्सवाद, औद्योगिक समाजवाद, कॅथलिक सुधारणावाद यांवर पडला.

एकोणिसाव्या शतकातील बौद्घिक जीवनावरही सँ-सीमाँचा लक्षणीय प्रभाव पडला. त्याचे विचार त्याच्या काळाच्या पुढे होते. टॉमस कार्लाइल, फ्री ड्रिख एंगेल्स ह्यांसारख्या विचारवंतांनी त्याच्या विचारांचे महत्त्व ओळखले होते. आधुनिक विचार तसेच सामाजिक शास्त्रेही त्याच्या विचारांनी संस्कारित झाल्याचे दिसते.

पॅरिस येथे तो निधन पावला.

 

लेखक - अ. र. कुलकर्णी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate