जोमो केन्याटा : (२० ऑक्टोबर १८९१ ते २२ ऑगस्ट १९७८) ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध झगडणारा अग्रगण्य आफ्रिकी नेता व केन्याच्या प्रजाकसत्ताकाचा १९६४ पासूनचा अध्यक्ष. त्याचा जन्म केन्यातील किकुयू जमातीत इचवेरी येथे झाला; परंतु आपल्या कर्तबगारीमुळे तो फक्त आपल्या जमातीचाच नव्हे, तर संपूर्ण केन्याचा पुढारी झाला. त्याने उच्च शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये घेतले व नंतर यूरोपभर दौरा काढून तेथील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. केन्याटा हा मध्यवर्ती किकुयू मंडळाचा चिटणीस होता आणि १९२८ मध्ये त्याने आफ्रिकी मालकीचे पहिले वृत्तपत्र काढले. त्यानंतर केन्याच्या स्वातंत्र्याच्या बाजूला ब्रिटिश लोकमत अजमवण्यासाठी तो इंग्लंडला गेला आणि तेथेच राहिला व एका आंग्ल युवतीशी विवाहही केला. आपल्या यूरोपमधील वास्तव्यात काही काळ त्याने राष्ट्रसंघात इथिओपियाचे प्रतिनिधित्व केले. १९४५ मध्ये इंग्लंडमध्ये भरलेल्या पहिल्या अखिल आफ्रिकी काँग्रेसचा तो अध्यक्ष होता. पुढे (१९४७-५२) जोमो केन्याटाजोमो केन्याटा केन्या आफ्रिकन युनियनचा अध्यक्ष ह्या नात्याने त्याने केन्यात प्रचंड चळवळ केली.
माऊ-माऊ ह्या दहशतवादी चळवळीशी प्रत्यक्ष संबंध असल्याच्या आरोपावरून त्यास ब्रिटिशांनी कैदेत टाकले (१९५२—६१). परंतु त्यामुळे त्याची लोकप्रियता कमी न होता वाढली आणि कैदेत असतानाच तो केन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आला. ऑगस्ट १९६१ मध्ये कारावासातून तो मुक्त झाला व पुढे केन्यास स्वायत्त वसाहतीचा दर्जा मिळाला व नंतर एक वर्षाने केन्या प्रजासत्ताक झाल्यावर त्याचा पहिला अध्यक्षही तोच झाला. केन्या आफ्रिकन नॅशनल युनियन (KANU) ह्या सर्वश्रेष्ठ राजकीय पक्षाचा तो अध्वर्यू आहे. आफ्रिकेच्या सामान्य राजकारणातही तो आत्मीयतेने भाग घेतो. विशेषतः पूर्व आफ्रिकेतील देशांचे संघराज्य स्थापण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. जोमो केन्याटा हा चांगला ग्रंथकर्ताही आहे. फेसिंग मौंट केन्या (१९३८), केन्या : द लँड ऑफ कन्फ्लिक्ट (१९४४), माय पीपल ऑफ किकुयू (१९४४) वगैरे त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
संदर्भ : Wallerstein, I. M. Africa-Politles of Unity, New York, 1967.
लेखक - जगताप दिलीप
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिके...
इंग्लंडमधील स्त्रीमताधिकार (सफ्रजेट) चळवळीतील एक ...
सहजीवनाचा पुरस्कार करणारा पहिला रशियन साम्यवादी ने...
आयर्लंडमधील होमरूल पक्षाचा पहिला अध्यक्ष व एक राष्...