অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किंग, मार्टिन ल्यूथर

किंग, मार्टिन ल्यूथर

किंग, मार्टिन ल्यूथर :(१५ जानेवारी १९२९ – ४ एप्रिल १९६८). अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचा, म. गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेला, अहिंसा व नि:शस्त्र प्रतिकार यांचेवर दृढ श्रद्धा असलेला ख्यातनाम निग्रो नेता आणि नागरी हक्क समानतेचा कट्टर पुरस्कर्ता. ॲटलांटा या गावी धर्मोपदेशकाच्या घरी जन्म. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मोर हाऊस महाविद्यालयातून १९४८ मध्ये पदवीधर झाला. त्यानंतर तीन वर्षांनी क्रोझर थिऑलॉजिकल सेमिनरीची त्याने पदवी घेतली. बॉस्टन विद्यापीठाने १९५५ मध्ये त्याला पीएच्. डी. ही पदवी दिली. बॉस्टन येथे अध्ययन करीत असता कोरेटा स्कॉट या युवतीशी त्याचा परिचय होऊन त्याची परिणती विवाहात झाली. क्रोझर येथे असताना म. गांधींच्या जीवन व तत्त्वज्ञानाचा किंग यांचेवर विलक्षण प्रभाव पडला.

मंगमरी खेड्यात किंग आपल्या वडिलांप्रमाणे धर्मोपदेशक बनला. डिसेंबर १९५५ मध्ये अभावितपणे तो स्थानिक वाहतूक कंपनीच्या, निग्रोंना वाहनांमध्ये गोऱ्या लोकांच्या शेजारी बसू न देण्याच्या वर्णविरोधी व पक्षपाती धोरणामुळे सुरू झालेल्या अहिंसात्मक चळवळीचा नेता बनला. ती चळवळ यशस्वी झाली. येथून किंगच्या आयुष्यास कलाटणी मिळाली. यानंतर अनेक वेळा त्याला कारागृहामध्ये जावे लागले. २८ ऑगस्ट १९६३ रोजी त्याने आयोजित केलेल्या वॉशिंग्टनच्या मोर्च्यात, २,५०,००० लोकांनी भाग घेतला होता. त्यावेळी केलेल्या संस्मरणीय भाषणात त्याने निग्रोंना समानतेने वागविण्याबद्दल आवाहन केले.अमेरिकेच्या सामाजिक दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या त्याच्या महान कामगिरीबद्दल, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी, १९६४ मध्ये त्याला नोबेल पारितोषिक देण्यात आले. किंगने कारागृहात तसेच इतर उद्योगांतून सवड काढून अनेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी स्ट्राइड टोअर्ड फ्रीडम (१९५८), स्ट्रेंग्थ टू लव्ह (१९६३), व्हाय वुई कांट वेट (१९६४), व्हेअर डू वुई गो फ्रॉम हीअर (१९६७), द ट्रंपेट ऑफ कॉन्शन्स (१९६८), आय हॅव्ह ए ड्रीम (१९६८) वगैरे महत्त्वाची होत. त्यांतून त्याची विचारसरणी व तत्त्वज्ञान यांचे दर्शन घडते. १९६८ मध्ये ‘प्युअर पीपल्स कॅंपेन’ वॉशिंग्टन येथे भरविण्याची त्याने ठरविले होते. परंतु त्यापूर्वीच ४ एप्रिल १९६८ रोजी त्याचा रेम्स् अल् रे या श्वेतवर्णीय इसमाने बंदुकीने गोळी घालून खून केला. त्याच्या पत्नीने १९७० मध्ये भारतास भेट दिली. किंग याचे उर्वरित कार्य तिने पुढे चालविले आहे.

 

 

संदर्भ : 1. King, Coretta, My Life With Martin Luther King, Jr., New York, 1969.

2. Lewis, D. L. King : A Critical Biography, New York, 1970.

लेखक - धारूरकर य. ज.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate