ब्राझील मधून वाहणारी अमेझॉन नदीची एक उपनदी. लांबी १,९८० किमी. ब्राझील मधील माटू ग्रोसू पठाराच्या उत्तर भागातील अनेक शीर्षप्रवाहांपासून तिचा उगम होतो. क्यूरिस्यू, टामीटाटोबा, बटोव्ही व रोमूरो हे त्यांपैकी प्रमुख शीर्षप्रवाह आहेत.
उगमानंतर ती माटू ग्रोसू व पारा राज्यांमधून उत्तरेस वाहत जाऊन अमेझॉन नदीला, तिच्या त्रिभुज प्रदेशाच्या शिरोभागी मिळते. सेरा दू रोंग्कदॉर व सेरा फॉर्मोसा या पर्वतश्रेण्यांदरम्यान असलेल्या जलनिस्सार खोऱ्याचतून ती वाहत जाते. पोर्तो दे मोझपासून पुढच्या सु. ६४४ किमी. लांबीच्या तिच्या पात्रात अनेक द्रुतवाह व धबधबे आढळतात.
अतिशय निबिड व निर्जन जंगलमय प्रदेशातून ती वाहते. तिच्या बऱ्याचशा प्रवाहमार्गाचे अजूनही समन्वेषण झालेले नाही. काही लोकांनी मात्र साहसाने तिच्या खोऱ्यात जाऊन काही ठिकाणी शेती केली आहे. जर्मन समन्वेषक व मानववंशशास्त्रज्ञ कार्ल व्हॉन देन श्टाइनन् याने १८८४–८७ या कालावधीत, पहिल्यांदा या नदीचे समन्वेषण केले होते.
शींगू नदीचे मुखाजवळचे पात्र ४ किमी. रुंद व बरेच खोल असले, तरी मुखापासून आत केवळ २०० किमी. लांबीचा प्रवाह जलवाहतुकीस योग्य आहे. १९७० च्या दशकाच्या अखेरीस तिच्यावर एक जलविद्युत् निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला. इरिरी (लांबी १,२८७ किमी.) ही शींगू नदीची डावीकडून मिळणारी प्रमुख उपनदी आहे. १९५० च्या दशकात ब्राझीलमधील काही अमेरिकन इंडियन जमातींच्या परिरक्षणासाठी शींगू नॅशनल पार्कची निर्मिती करण्यात आली.
चौधरी, वसंत
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/5/2019