पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहणारी भीमा नदीची एक उपनदी. लोणावळ्याच्या नैर्ऋत्येस सु. ५ किमी. वर सह्याद्रीतील कुरवंडे घाटाजवळ ही उगम पावते व ९३ किमी.
पूर्व दिशेकडे वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावानजीक भीमेस मिळते. आंध्र नदी ही तिची प्रमुख उपनदी आहे.
इंद्रायणीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ७१० चौ. किमी. असून घाटमाथ्याजवळ टाटा कंपनीने बांधलेल्या लोणावळे, वळवण, शिरवट व आंध्र या चार तलावांतील पाण्याच्या साहाय्याने तळकोकणात वीजनिर्मिती होते.
देहू व आळंदी ही महाराष्ट्राची सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे या नदीच्या काठी आहेत. पुणे-मुंबई हमरस्ता व रेल्वे मार्ग खोऱ्याच्या पश्चिम भागातून गेल्यामुळे त्या भागाची चांगली वाढ झालेली आहे.
कुलकर्णी, गो. श्री.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/19/2020