অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तेल आवीव्ह–जाफा

तेल आवीव्ह–जाफा

तेल आवीव्ह–जाफा

इझ्राएलची जुनी राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या ३,५७,६०० (१९७४ अंदाज). हे भूमध्य समुद्र किनाऱ्यावरील सारन मैदानात, यॉरकोन नदीमुखाच्या दक्षिणेस वसले असून जेरूसलेमच्या वायव्येस ५६ किमी. आहे. इ. स. पू. दुसऱ्या शतकात याची स्थापना झाली. जाफा शहराचा जुना भाग ६०० मी. लांबीच्या एका भूशिरावर आहे. जवळच असलेली एक टेकडी उत्तरेकडे व पश्चिमेकडे तीव्र उताराची असल्याने हे सुरक्षित आहे.

दक्षिणेकडे व आग्नेयीकडे वाळुच्या टेकड्या व दलदली आहेत आणि किनाऱ्याला समांतर असलेल्या खडकाळ द्वीपाच्या रांगांमुळे प्राचीन काळी या स्थानाला नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले होते. टेकडीच्या पार्श्वभूमीत भरपूर गोडे पाणी व शेतीयोग्य सुपीक जमीन आहे.

आद्य ज्यू राष्ट्रीय आंदोलन वसाहतवाल्यांनी १९०९ मध्ये जाफाजवळ ज्यूंचे ‘उद्यान उपनगर’ म्हणून तेल आवीव्हची स्थापना केली. १९२१ साली बाल्फोर लवादानुसार जाफा हे तेल आवीव्हपासून वेगळे करण्यात आले. पण १९४८ साली ज्यू सैन्याने ते जिंकून घेतले. १९५० साली तेल आवीव्ह व जाफा मिळून एक संयुक्त नगरपालिका स्थापण्यात आली. अ‍ॅशदॉद बंदर सुरू झाल्यावर १९६५ पासून तेल आवीव्हहून होणारी स्थानिक जलवाहतूक पुर्णपणे बंद झाली.

तेल आवीव्ह येथे भूमध्य सागरी हवामान असून उबदार हिवाळा व उष्ण–दमट उन्हाळा असतो. पाऊस मुख्यतः हिवाळ्यात नोव्हेंबर–मार्च या काळात पडतो. तपमान क्वचितच ५° से.च्या खाली जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीतून येथे ज्यू लोक मोठ्या संख्येने आले व त्यांनी शहराच्या नूतनीकरणास खूपच मदत केली.

किनाऱ्यास समांतर असणाऱ्या वालुकाश्माच्या तीन टेकड्यांवर आधुनिक तेल आवीव्हची उभारणी करण्यात आलेली आहे. किनाऱ्यावर असलेल्या चौपाट्या व पुळणी पर्यटकांची व नागरिकांची मुख्य आकर्षणे आहेत. शहराच्या प्रशासनव्यवस्थेसाठी ४ वर्षांसाठी निवडलेल्या ३१ सदस्यांची नगर परिषद असते.

ही परिषद १ महापौर व ६ उपमहापौर यांची निवड करते. तेल आवीव्ह हे इस्त्राएलमधील दळणवळणाचे केंद्र आहे. देशातील वेगवेगळ्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांपैकी सु. २५% लोक एकट्या तेल आवीव्हमध्ये आहेत व इस्त्राएलमधील एकूण कारखान्यांपैकी निम्मे या शहरात आहेत. वस्त्रोत्पादन, अन्नावर व तंबाखूवर प्रक्रिया करणे, वाहतुकीची साधने आणि यंत्रे तयार करणे, हिऱ्यांना पैलू पाडणे, विजेची उपकरणे, फर्निचर व लाकडी सामानाचे कारखाने या शहरात आहेत.

इस्त्राएलच्या घाऊक व्यापारापैकी ७०% व्यापार तेल आवीव्हमध्ये आहे. इस्त्राएलमधील पर्यटनाचा व्यवसाय तेल आवीव्ह येथे केंद्रित झालेला असल्याने अनेक पंचतारांकीत उपहारगृहे येथे आहेत. हे इस्त्राएलमधील प्रमुख शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रे असून येथे बालवाडीपासून विद्यापीठापर्यंत शिक्षणाच्या सोयी आहेत. तेल आवीव्ह विद्यापीठ (१९५३), द बार–इल्लान विद्यापीठ (१९५५) ही विद्यापीठे प्रमुख आहेत.


भागवत, अ. वि.; लिमये, दि. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate