इ.स.पू. सहाव्या शतकात येथे ग्रीकांची वसाहत होती, असे पुरावे सापडले आहेत. त्या काळात निर्यात व्यापारासाठी या शहराची प्रसिद्धी होती. इ.स.पू. चौथ्या शतकात हूण, १२६६ मध्ये जेनोआ, १४७५ मध्ये तुर्क आणि अखेरीस १७७४ मध्ये रशियनांची सत्ता या शहरावर होती. परकीय अंमलात ‘काफा’, ‘केफे’ अशीही याची नावे होती. १८०२ मध्ये फीओडोशिया हे नाव या शहरास देण्यात आले. दुसऱ्या महायुद्धामध्ये हे शहर व परिसर संघर्षक्षेत्र बनले होते. या काळात जर्मनांनी दोन वेळा फीओडोशियाचा ताबा मिळविला होता.
येथे स्वास्थ्य विहाराची उत्तम सोय असून आरोग्यधामे, रमणीय पुळणी, भूमध्य सामुद्रिक हवामान, खनिजयुक्त झरे इत्यादींमुळे प्रवाशांचे हे एक आकर्षण ठरले आहे. शहरातील आय्. के. आयव्हाझॉव्हस्की यांचे चित्रसंग्रहालय आणि १८११ पासूनचे पुरातत्त्वीय संग्रहालय उल्लेखनीय आहे.
शहरात अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया; अल्कोहॉल, बीर, आटा, कपडे, इ. तयार करणे तसेच मासे डबाबंदीकरण, तंबाखू, कातडी कमावणे इ. विविध उद्योग चालतात. मच्छीमारीचा व्यवसाय मोठा असून कालव (तिसरी) आणि स्टर्जन माशांची मुरविलेली अंडी यांसाठी फीओडोशिया प्रसिद्ध आहे. तसेच अन्नधान्याचा निर्यात व्यापारही मोठा आहे.
कापडी, सुलभा
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/22/2020