অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाशिक जिल्हा

प्रसावना

नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून १३०० ते २००० फूट उंचीवर वसला आहे. पश्चिमेकडील डांग भागांत बरेच पर्वत असून यांवर फक्त खरीप पिकें येणें शक्य आहे. पूर्वेकडील `देश’ भाग मात्र सुपीक असून मोकळा आहे. सातमाळ किंवा चांदवड पहाडावरून दोन्ही बाजूंनां वहाणार्‍या, पूर्वेस गोदावरी व पश्चिमेस गिरणा दोन नद्या या आहेत. सर्वांत उंच शिखर धोडप (४७४१ फूट). इतर बरींच ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचीं लहान लहान शिखरें आहेत. दिंडोरी व नाशिकमध्यें एक लहान पर्वत आहे; यावरच चांभारलेणीं आहेत. गोदावरी ही मोठी नदी असून हिला मिळणार्‍या नद्या दारणा, कादवा व गिरणा वगैरे आहेत. गिरणा नदी शेतीस फार उपयोगी असून तिला अनेक धरणें बांधिलीं आहेत. या जिल्ह्यांत किल्ले बरेच असून मराठ्यांशी लढाई झालेली अशी बरींच ठिकाणें यांत आहेत. येथील हवा फार चांगली आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंत समुद्राकडील वार्‍यामुळें हवा समशीतोष्ण असते.

इतिहास

राम, लक्ष्मण व सिता आपल्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्याला होते. असे म्हटले जाते. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, अशी आख्यायिका आहे. संस्कृतमध्ये नाकास ‘नासिका’ असे म्हटले जाते, त्यावरून ‘नाशिक’ हे नाव पडले असावे.
याच ठिकाणी इसवी सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे रूपांतर पुढे १९०४ मध्ये जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग इटली’ च्या धर्तीवरील ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेत केले गेले.
क्रांतीकारकांचे जणू तिर्थक्षेत्र ठरलेल्या या शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या महाराष्ट्राच्या सुपुत्राने कलेक्टर जॅक्सनचा वध केला व पुढे हौतात्म्य पत्करले.
सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर व ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ही कर्मभूमी होय !

नाशिक हें पौराणिक शहर असून येथें देवालयें बरींच आहेत. बौद्ध व जैन गुहाहि पहाण्यासारख्या आहेत. गोविंदेश्वर येथें जी देवळें आहेत तीं सर्वांत उत्तम आहेत. बागलाणमध्यें कळवण येथील जोगेश्वर देवळांतील नकशीकाम फार सुरेख आहे. इ.स. १९०६ त येथें सत्रप वंशाच्या वेळचीं बरींच नाणीं सांपडलीं.
या जिल्ह्यांत एकंदर ३८ डोंगरी किल्ले असून यांचे दोन प्रकार आहेत; सह्याद्रीवर असणारे व मध्यभागाच्या चांदवड पहाडावर असणारे. सह्याद्रीवर एकंदर २३ किल्ले आहेत; पैकीं मुख्य गलन, अंजनेरी, त्रिबक, कुलंग, अलंग व कळसुबाई हे होत. चांदवड पहाडावर पंधरा किल्ले आहेत; पैकी अंकई, चांदवड व धोडप हे मुख्य होत. हे सर्व किल्ले बहुधां सारखेच आहेत. हे बहुतेक शिवाजीनें बांधले आहेत. मार्कंड हा किल्ला राष्ट्रकूटांच्या वेळेस होता.

सीमा रेषा

उत्तरेला- धुळे जिल्हा, पूर्वेला- जळगाव जिल्हा, अग्नेयेला - औरंगाबाद जिल्हा, दक्षिणेला- अहमदनगर जिल्हा, नैऋत्येला - ठाणे जिल्हा, पश्चिमेला - नवसारी जिल्हा, वलसाड जिल्हा, वायव्येला- डांग जिल्हा

तालुके

१ सटाणा २ सुरगाणा ३ मालेगाव ४ देवळा ५ पेठ ६ दिंडोरी ७ चांदवड ८ नांदगाव ९ नाशिक १० निफाड ११ येवला १२ इगतपुरी १३ सिन्नर, १४ कळवण १५ त्र्यंबकेश्वर

जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ : १५,३५० चौरस किमी (५,९३० चौ. मैल)
लोकसंख्या : ६१,०९,०५२ (२०११)

लाभलेल्या नद्या

सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे.

तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते. नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात.

आर्थिक स्थिती

शेती हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहे. एकूण ८,९८,००० कामगारांपैकी ६,४७,००० शेतकरी व शेतमजूर आहेत; म्हणजे कामगारांपैकी ७२% कामगार शेतीवर आहेत.

अलीकडील काळात धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा एक अग्रगण्य ‘औद्योगिक जिल्हा’ होवू पाहात आहे !

स्त्रोत : विकिपीडिया, मराठीविश्वकोश

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 7/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate