অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऐतिहासिक पांडवलेणी

ऐतिहासिक पांडवलेणी

नाशिक शहराची ओळख ही प्राचीन काळापासून पर्यटकांना आहे. इतिहासकाळापासून पुरातन काळापर्यंत साऱ्याच खाणाखुणांनी इथला प्रत्येक भाग पर्यटकांना आकर्षित करत आहे. तपोवन, पंचवटी, सीतागुंफा, ब्रम्हगिरी, अंजनेरी, काळाराम, गोदाराम इत्यादी स्थळे नाशिकचा इतिहास सांगत आहेत. त्यातच पांडवलेणी बद्दलही पर्यटकांना विशेष आकर्षण आहे.

नाशिक शहरापासून ६ किलोमीटरवर मुंबई-आग्रा महामार्गावर पांडवलेणी वसलेली आहेत. खरेतर हा मार्ग २००० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आला आहे. पूर्वी हा मार्ग व्यापारीकरणामुळे व तत्कालीन सत्ताधीशांच्या आश्रयाने प्रचलित झाल्याचा दिसून येतो. त्यामुळे तेथील डोंगरात बौद्धलेणी खोदली गेली. या परिसरात एक बौद्ध स्मारकही आहे. सांचीचा स्तूप आणि तोरणांच्या आकारातील या भव्य वास्तूमध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान मांडलेले आहे. पांडवलेणी पूर्व-पश्चिम अशा २४ लेण्यांची तयार झालेली आहेत. त्या लेण्यांमधील दारातील ओसरी, ओसरीचे कोरीव खांब, शिल्पावर, बारीक नक्षीकामाने सजवलेला दर्शनी भाग या साऱ्यांनीच चकित व्हायला होते. ही कला, कसब, कौशल्य, सौदर्य, ज्ञान, तंत्र आणि दृष्टी हे सारे त्या काळात मानवाने कसे आत्मसात केले असेल,असा प्रश्न पडतो.

खरेतर पर्यटक, अभ्यासक, इतिहासकार, पुरातत्व यांनी या लेण्यांना भेटी दिल्याचे अनेक शतकापासून दिसत आहे. पण इथली सामान्य जनता हा स्थापत्याविष्कार गेल्या कित्येक पिढ्यांपासून पाहत आहे. त्यांच्या लेखी हे सारे मानवी शक्तीपलीकडचे आहे. पांडवांनी ही लेणी एका रात्रीत तयार केली, अशी लोककथा ऐकायला मिळते. म्हणूनच या लेणींना पांडवांचे नाव मिळाले. या लोककथा मागचा भावार्थ लक्षात घेऊन खऱ्या इतिहासाकडे वळावे असे अभ्यासकांचे मत आहे.

बऱ्याच काळानंतर या लेण्यांचा वापर जैनांनी सुरु केला आणि त्यांनीही इथे काही खोदकाम, शिल्पकाम केले पुढे मध्ययुगात हिंदूंनी त्यांची हनुमान, शिवलिंग आदी शिल्पे उतरवली आहेत. एकूणच अनेक पंथ, धर्म, आणि कालखंड यामधून या लेण्यांचे स्थित्यंतर झाले आहे. येथे एकूण २४ लेणी पहावयास मिळतात. त्यातील काही लेणी ही विशेष महत्त्वाची आहेत.

३ क्रमांकाचे लेणी तर साऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासासाठी महत्त्वाचे आहे. ही लेणी राणीचे लेणे म्हणून ओळखली जाते. या लेण्याचे कोरीव मुखदर्शनच आपल्याला खेचून घेते. ओसरीतील भारदस्त सालंकृत खांब, घट आमलकांची रचना, कोपऱ्यावरचे यक्ष, या खांबांच्या शिरोभागी असलेली प्राण्यांची शिल्पे आणि त्यावर स्वार झालेले मानवी शिल्प हे सारेच विलक्षण. यातील काही प्राण्यांना तर पक्ष्यांची तोंडे, शरीर वाघ सिंहाचे तर तोंड एखाद्या गरुडाचे हे पाश्चात्यांच्या स्थापत्यशैलीवर स्थान मिळविलेले हे ग्रिफिन शिल्प आहे. चौथऱ्याच्या दर्शनी बाजूवर काही शक्तिशाली मानवी आकृत्या कोरल्या आहेत.

वृक्षतोड आणि अन्य कारणांमुळे त्यांची आता मोठी हानी झालेली दिसून येते. या लेण्यांचे मुखदर्शनही असेच विविध कोरीव थरांनी सजलेले आहे. यातील पहिल्या थरात पशु-पक्षी, फळे-फुले आहेत. त्यावरच्या थरात कमळ आणि त्रिरत्नांची शुभप्रतीके आहेत. वरच्या थरात अर्ध कमळाचे एक तोरण लगडलेले आहे. प्रत्येक मूर्तीभोवती पुन्हा कुठे नागराज, पदपाणी असलेले बोधिसत्व, भक्तीभावातील दाम्पत्य, सेवक, अवकाशातून निघालेले गंधर्व यांसारख्या शिल्पांनीही ही लेणी जिवंत सजीव केली आहे.

लेखक - अजिंक्य पालवे
९७७३०७७४८३

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate