অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घडलेले देवघडे वडनेर

घडलेले देवघडे वडनेर

वेशीवरच्या पाऊलखुणा : वडनेर दुमाला

घडलेले देवघडे वडनेर

एखादे गाव अगदीच झाकोळल्यागत शांत पडून असते. मात्र, त्या गावातील कला गुण अन्‌ इतिहास स्वस्थ बसलेला नसतो. तो तुम्हाला खुणावत असतो अन् एकदा का तुम्ही त्या गावाची सफर केलीत, की त्या गावाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहवत नाही. असाच प्रकार वडनेर दुमालाबाबत घडतो. गावाच्या चारही बाजूंनी लष्कराची हद्द असल्याने गावाचे फारसे अस्तित्व जाणवत नसले तरी गावचा इतिहास, हेमाडपंती मंदिरे अन्‌ देवपण मिळवून देणारे कलाकार ही या गावची खरी ओळख आहे. ते पाहिले की वडनेर दुमाला हे गाव नजरेत भरते.

देवळाली कॅम्पच्या कवेत अन्‌ वालदेवीच्या किनारी वसलेले वडनेर दुमाला नाशिकहून १२ किलोमीटरवर आहे. ५०० उंबऱ्यांचे गाव निसर्गाच्या कुशीत विसावले आहे. गावाचे नाव वडनेर दुमाला कसे पडले याबद्दल मजेशीर अख्यायिका सांगितली जाते. वडनेर म्हणजे वड नेहर म्हणजेच वडांच्या झाडांचा समूह अथवा थापी. नदी किनारीच्या एखाद्या गावात वडाची झाडे जास्त असतील तर ती भूमी उपासकांसाठी आकर्षण ठरते. वडनेरबाबतही हे घडलेले दिसते. गावात प्राचीन काळापासून अनेक साधू, महंतांनी तपस्या, साधना केल्याने या भूमीतही त्यांचा प्रभाव दिसतो अन्‌ तो तेथील प्रेमळ लोकांमधून अनुभवायला मिळतो. पण वडनेर दुमालाचे मूळ नाव आहे देवघडे वडनेर! गावात प्राचीन काळापासून सोने, चांदीत मूर्ती घडविणारे अनेक कलाकार होते. तांबे, पितळ, कासे, सोने, चांदी, लोखंड, शिसे अशा निरनिराळ्या धातूंच्या वस्तू बनविण्याची पद्धत भारतात अत्यंत प्राचीन काळापासून रूढ आहे. या वस्तूंमध्ये यज्ञ, देवपूजा व अन्य धार्मिक विधींसाठी लागणारी उपकरणे टाक, देव मूर्ती, भांडी, दागदागिने तसेच शोभिवंत वस्तू, नक्षीकामाचे नमुने व हत्यारे आदी बनविले जात.

ही परंपराही नाशिकला दक्षिणेतून लाभली अन्‌ येथे स्थिरावली. वडनेरमध्ये हे कारागीर विसावल्याने व आपल्या अनोख्या कामामुळे प्रसिद्धीस पावल्याने हे गाव देव घडविणारे वडनेर म्हणून प्रसिद्धीस आले. गावात पूर्वी अनेक कारागीर होते. गावात सध्या देव घडविणारे गडकर हे एकमेव कुटुंब राहिले आहे. अनेक पिढ्यांपासून चालत आलेली देवघडेची परंपरा रामदास गडकर यांनी पुढेही सुरू ठेवण्यासाठी ती आपल्या चार मुलांमध्येही रूजवली आहे. त्यांची मुले संतोष, महेश, अतुल, संदीप हा व्यवसाय कुशलतेने पुढे घेऊन जात आहेत. अगदी टाकापासून मंदिराच्या कळसापर्यंत, दागदागिन्यांपासून नाजूक कोरीव कामापर्यंत त्यांचा हातखंडा नावाजला जातो. सोन्या चांदीच्या पत्र्यावर पेन्सिलने नक्षी काढून त्याला उठाव देण्याचे काम पाहताना त्यांच्या कुशलतेचा अंदाज येतो. आता देव बनविण्याची पद्धत बदलत आहे. देवाबरोबर देव्हारे अन् शोभेच्या अनेक वस्तू बनविण्यातही मागणी वाढल्याचे कारागीर सांगतात. त्यामुळे देवघड्यांचे वडनेर ही ओळख आजही कायम आहे. गावात कुंभार व्यवसायही मोठ्या प्रमाणात असल्याचे मूर्तीकार राजू रसाळ सांगतात.

१९३०च्या दरम्यान गावाच्या चारही बाजूने लष्कराची वस्ती वसल्याने गावची जमीन त्यांच्या ताब्यात गेली. त्यामुळे वडनेर दुमाला गावचे क्षेत्र इतर गावांपेक्षा थोडे कमी आहे. असे असले तरी गावाचा इतिहास मात्र आपली ओळख ठसठशीतपणे करून देतो. राजे पृथ्वीराज चौहान यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक सरदार भारतभर विखुरले. त्यातील बिऊजी चौहान महाराष्ट्रातील होळकरांच्या पदरी आले. होळकरांनी त्यांना मंगरूळ या गावची जहागिरी दिली. त्यानंतर ते विंचूरकरांकडे गेले. मात्र, अंतर्गत राजकारणामुळे त्यांना विंचूरकर संस्थानातून बाहेर ढकलण्यात आल्याने त्यांना ढकले व नंतर ढिकले म्हटले जाऊ लागले. हे ढिकले शूरवीर असल्याने त्यांच्याकडे इंग्रजांनी वडनेर दुमाला सोपविले, तर जहागिरी ब्राह्मणांकडे दिली. दुमाला म्हणजे कर वसुलीचा अधिकार (जमीन महसूल पूर्णतः किंवा भागशः वसूल करण्याचा शासनाचा अधिकार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे मालकीहक्काने हस्तांतरित होतो, त्यास दुमाला अर्थात इनाम जमिनी म्हणतात.) होय.

त्यामुळे पुढे या गावाला वडनेर दुमाला म्हटले जाऊ लागले. त्यानंतर गावात मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खार गावातून पवार आले ते पुढे पोरजे म्हणून ओळखले गेले. नगरसेवक केशव पोरजे त्या घराण्यातील आहेत. तसेच, चितोडचे पाळदे व इतरही ग्रामस्थ गावात विसावले. यादरम्यान गावात कुलकर्णी भाऊसाहेब आले. सटाण्याच्या देवमामलेदारांप्रमाणे वडनेर दुमालामध्ये कुलकर्णी भाऊसाहेबांना देवमाणूस म्हणून ओळखले जाते. गावाने झाडे लावावीत यासाठी कुलकर्णी भाऊसाहेबांनी खूप प्रयत्न व जनजागृती केल्याने आज गाव निसर्गाच्या सानिध्यात आहे. भाऊसाहेबांनी गाव अडचणीत असताना खूप मदत केल्याने त्यांना गावाने नेहमीच मोठे स्थान दिले. कुंभारवाडा, नाव्ही वाडा, चांभार वाडा, राजवाडा, ब्राह्मणवाडा, बैरागी वाडा, पोरजेवाडा अशा बाराबलुतेदारी पद्धतीने वसलेले हे गाव अजून एका अनोख्या कारणांसाठी ओळखले जाते. ते म्हणजे बाराही बलुतेदारांमधून त्या त्या समाजाच्या कर्त्या पुरुषाने गावाच्या सर्व दिशांना जिवंत समाधी घेतल्याचे दत्तात्रेय पाळदे सांगतात. गावावर संकट येऊ नये तसेच गावाच्या संरक्षणासाठी बाराही बलुतेदारांनी आपले योगदान दिल्याच्या या समाधी म्हणजे साक्षच आहेत. ग्रामस्थ भक्तीभावाने या समाधींची पूजाअर्चा करतात.

उपासकांचे गाव असल्याने गावात मंदिरेही खूप आहेत. शंकराची पाच प्राचीन मंदिरे असणारे हे एकमेव गाव असावे. गावात शिवपंथीय व हट योगीचा राबता असल्याने धार्मिक वातावरण नेहमीच चैतन्य देत रहाते. नुकतेच एका शिवमंदिराचा जीर्णोद्धार करून सुंदर मंदिर साकारण्यात आले आहे. तर हेमाडपंती शैलीतील दोन मंदिरे अजूनही गावात पाहता येतात. त्यांची कालौघात दुरवस्था झाली आहे. मात्र ही मंदिरे आवर्जून पहावीत, अशीच आहेत. श्री सिद्धेश्वर हेमाडपंती मंदिराची कमानच शिल्लक आहे. मात्र त्यावरील नक्षीकाम अनोखे आहे. तसेच गावभर विखुरलेल्या मूर्तींचे अवशेष गावचे वैभव दाखवून देतात. नदीपात्रातही शिवमंदिर असून किनाऱ्यावरील गाळात अनेक मंदिरे गाडली गेल्याने ग्रामस्थ सांगतात. याशिवाय गावात दत्त मंदिर, शंकर पार्वती मंदिर आहे. प्राचीन हनुमान मंदिर हे गावचे ग्रामदैवत आहे.

पूर्वी गावात मोठ्या जल्लोषात बोहाड्यांचा कार्यक्रम व्हायचा; मात्र गेल्या १५ वर्षांपासून बोहाडे बंद पडल्याची हुरहुर ग्रामस्थ व्यक्त करतात. गावच्या अनेक परंपरा अन्‌ त्याचे वेगळेपण जपण्यासाठी गावकरी एकत्रित प्रयत्न करीत असल्याचे कावू पोरजे व ओमबाबा रसाळकर सांगतात. गावाला प्राचीन इतिहासाचा वारसा लाभल्याची कल्पना ग्रामस्थांना असल्याने हा इतिहास व त्याचे साक्षीदार जपले जावेत यासाठी वडनेर दुमालाचे ग्रामस्थ एकोप्याने झटत असल्याचेही पहायला मिळते. त्यांच्यातील हा गोडवा गावची सफर अनोखी करतो.

 

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate