पर्यटन म्हटले की किल्ले, थंड हवेची ठिकाणे पाहणे... तेथे भेट देणे... आरामात मुक्काम करणे... आणि तेथून निघून येणे, एवढेच. पण आम्हास असे वाटते की, पर्यटनाला जरुर जा. तेथील किल्ले, समुद्र किनारे जरुर पहा आणि तेथील माहिती जाणून घ्या. आपण ज्या स्थळांना भेट देतो. तेथील इतिहास जाणून घ्या तरच ते खरे पर्यटन होऊ शकेल. शनिवार दिनांक ४ जुलै २०१५... अशाच एका शूरवीराचा हा स्मृती दिन. त्यानिमित्ताने जिल्हा रायगड, अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याचा, वीराचा हा इतिहास...
रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे १०० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने बोटीने अलिबागला पोहोचता येईल. रस्त्याने मात्र पनवेल-पेण-आणि अलिबाग असे अंतर सुमारे तीन तास प्रवासाने जाता येते. पनवेल-पेणहून अलिबाग हा चांगला रस्ता आहे. दोन्ही बाजुंनी हिरवीगार वनश्री. काजू, आंबा, फणस आणि विविध फुलांची झाडी याठिकाणी मन आकर्षून घेते. अलिबागला पनवेल-पेण रेल्वेने जाता येते. पनवेलपर्यंत लोकलने प्रवास करता येतो. तसा प्रवास सुखदायकच वाटतो. आपण अलिबाग शहरात बसस्थानकावर पोहोचलो की, अवघ्या ५ मिनिटाच्या अंतरावर सरखेल कान्होजी आंग्रे या शूरवीराची समाधी आहे. एकूण १० समाधी त्याठिकाणी आहेत. कान्होजी आंग्रे यांच्या मुख्य समाधीनंतर त्यांच्या कुटुंबातील आणखी मान्यवरांच्या समाधी याठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. छत्रपतींच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्या पश्चात कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची प्रथम सुरुवात दिसून येते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कान्होजी आंग्रे यांचे महत्व ओळखून त्यांना छत्रपती शाहू यांच्याकडे वळविले होते. सन १६९४ पासून कोकणात कान्होजी आंग्रे पराक्रमाने गर्जत होते.
राजाराम महाराजांच्यापासूनच कान्होजी उत्तम कार्य बजावत होते. कोकणची जहागीर मोघलांच्या जुलूमापासून जतन करण्यासाठी कान्होजींनी यश संपादन केले होते पण “सिद्धी” हा कान्होजींना त्रासदायक ठरत होता. ह्या सिद्धीने इंग्रजांची मदत घेतली आणि कान्होजी आंग्रे यांची सत्ता बुडविण्याकरिता प्रयत्न केले. पण कान्होजी आंग्रे यांच्यापुढे काहीही चालले नाही. आंग्रे यांच्या ताब्यात पुष्कळ प्रदेश व कित्येक किल्ले आहेत. त्यामुळे दर्यावर त्यांची भिती सगळ्यांनाच उत्पन्न झाली होती.
कान्होजी आंग्रे यांचा जन्मकाल उपलब्ध नाही. परंतु त्यांचा जन्म सन १६६९ च्या सुमारास झाला असावा. सन १६९४ मध्ये कान्होजींना सरखेल पदवी प्राप्त झाली होती. ते परिवारासह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे यात्रेस गेल्याचा उल्लेख मिळतो. कान्होजी यांचे बालपण जोशी-ब्राम्हण यांच्या घरी गुराखीपणाच्या चाकरीत गेले होते. त्यांनी १६९४ पासून १६९८ पर्यंत अवघ्या ४ वर्षांच्या काळात कोकणपट्टीतले एकूण एक किल्ले मोघलांकडून जिंकून आपल्या अंमलाखाली आणले होते. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव राजाराम यांनी कान्होजींना सुवर्णदुर्गावर नेमले. त्यांनी तेथून जंजिराच्या भागाकडे लक्ष दिले. काही किल्ले व ठाणी आपल्याकडे जिंकून घेतली. कान्होजींचा बांधा सुदृढ होता. पण ते अंगाने स्थूल होते. त्यांची मुद्रा भव्य होती. डोळे पाणीदार होते. ते आपल्याजवळील सरदारासमवेत अतिशय प्रेमाने वागत असत. त्यांच्या वागण्यात प्रेम वात्सल्य होते. पण त्यांची शिक्षा कडक असे. सन १६९८ मध्ये त्यांनी तळ कोकणचा बंदोबस्त उत्तमरितीने केला होता.
शंभुराजे यांच्या बलिदानानंतर मोघलांच्या अतिक्रमणापासून स्वराज्य संरक्षणाच्या उज्ज्वल काळात छत्रपती राजारामांना कान्होजी आंग्रे यांचे चांगले सहाय्य होते. छत्रपती राजाराम सन १७०० मध्ये सिंहगडावर मृत्यू पावले. पण तत्पूर्वीच कान्होजींनी 1697 मध्ये “कुलाबा” हे आपले मुख्य ठाणे केले होते. कोकण किनाऱ्याचे राजे म्हणून त्यांनी घोषणाही केली होती. राज्यात जमाबंदीला आरंभ केला होता. कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे होय. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे उत्तम सेवा बजावली होती. शाहू महाराज आणि कान्होजी यांच्यामध्ये तह झाला. या तहाने 10 जंजिरे व १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांना मिळाले होते. तसेच आंग्राची सत्ता कोकण किनाऱ्यावरील मांडवे ते त्रावणकोरपर्यंत पसरली. त्यामुळे शाहूराजे समाधानी होऊन त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद दिले होते. शाहू छत्रपतीच्या दरबारात जंजीरकर सिद्दीच्या मोहिमेसंबंधात कान्होजी आंग्रेचा सल्ला घेण्यात आला होता. कान्होजींचे पश्चिम कोकण किनाऱ्यावरील वाढते यश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि विशेषत: इंग्रज यांना नकोसे वाटू लागले होते. त्यांनी संयुक्तरित्या कान्होजीबरोबर आरमारी लढाया केल्या होत्या. परंतु कान्होजीपुढे त्यांना अपयशच स्वीकारावे लागले होते. ब्रम्हेंद्र स्वामी धावडशीकर यांचा कान्होजी आंग्रे यांच्यासमवेत निकटचा संबंध होता.
कान्होजींची लष्करी व आरमारी सैन्याची शिस्त कौतुकास्पद होती. कान्होजींचे आरमार प्रबल होते. कान्होजींच्या आरमारामध्ये १५० पासून २०० टन वजनाची लढाऊ जहाजे व गलबते होती. ६ व ९ तोफाही होत्या. या प्रबळ आरमारावर निष्णात स्वामीनिष्ठ व संतोषी असे दर्यावर्दी लोकही होते. कोकण किनारा शत्रूपासून सुरक्षित ठेवण्याकरिता कान्होजींची नेमणूक छत्रपतींकडून व जास्त मान व सरखेल म्हणून अधिकृतरित्या केली गेली होती. म्हणून कोकण किनाऱ्याचे परकीय शत्रूपासून संरक्षण करणे हे कान्होजींचे कर्तव्यच होते, आंग्रे चाचे नव्हते. आंग्रे हे दर्यावरचे संरक्षक सत्ताधारी होते. कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू मिती आषाढ वा.5 शके 1651 वार शुक्रवार दिनांक ४ जुलै १७२९ रोजी झाला. कान्होजी आंग्रे हे मनाने निर्मळ होते. स्वधर्मावर त्यांची जाज्वल्य निष्ठा होती. त्यांच्या सैन्यात यवन सरदारही होते. त्यांचे न्याय फैसले अत्यंत नि:पक्षपाती होते. त्यांनी एकूण ३६ वर्ष राज्य कारभार केला. ६० वर्ष त्यांना आयुष्य लाभले. उत्पन्न वाढवून त्यांनी राज्याला फायदा करुन दिला. प्रेम, वात्सल्य व ममता देऊन जनतेला सांभाळले. अलिबाग येथील नगरशेट मोदी, गुजर यांचे घराणे कान्होजींच्या वेळेपासून होते. बाहेरुन येणाऱ्या मालावर त्यांनी जकात बसविली. आपली स्वत:ची टाकसाळही सुरु केली. परमुलकी, वेसावे, केली लोकांची वसाहत श्रीबाग पेठ रामनाथ अलिबाग येथे आंग्रेनीच वसविली आहे. श्रीबागेतही एक समाधी आहे.
अलिबाग येथील त्यांच्या समाधीजवळ पत्नी मथुराबाई आंग्रे यांची समाधी आहे. कान्होजींना तीन पत्नी होत्या. मथुराबाई, लक्ष्मीबाई आणि गहिनाबाई. सेखोजी आंग्रे यांना तुकोजी, रायाची, आणि मावजी ही तीन मुले. तुकोजी यांचे कान्होजी आंग्रे हे पुत्र. कान्होजी मथुराबाई पत्नीपासून जयसिंग, संभाजी हे दोन पूत्र. लक्ष्मीबाईपासून मानाजी, तुकाजी दोन पूत्र आणि गहिनाबाईपासून येसाजी, धोडजी हे दोन पूत्र असे सहा पूत्र होते. लाईबाई नावाची एक कन्या असल्याचा उल्लेख सापडतो. श्री क्षेत्र आळंदी येथे कान्होजी आंग्रे यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी दीपमाळ बांधल्याचा शिलालेखात उल्लेख सापडतो.
कान्होजी म्हणजे मराठी राज्यांतील प्रसिद्ध मुत्सद्दी आणि धडाडीचे दर्यावर्दी सरदार कान्होजी आंग्रे होय. संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या बिकट कारकीर्दीत कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने मोघलांना नकोसे होऊन गेले होते. राजाराम महाराज यांच्याकडून सुवर्णदुर्गावर नेमणूक झाल्यावर त्यांनी मराठेशाहीच्या पडत्या काळात पश्चिम किनाऱ्याचे संरक्षण उत्तमरितीने केले होते.
त्यामुळेच त्यांना ध्वजाधिकारी “सरखेल” इत्यादी किताब मिळाले होते. सरखेल म्हणजे आरमाराचा प्रमुख. मराठ्यांच्या आरमाराचे ते मुख्य अधिपती झाले. त्यामुळे इंग्रज, फिरंगी आणि यवनांचे कान्होजी आंग्रे यांच्यापुढे काही चालत नव्हते. कान्होजी यांनी धर्मस्थापना केली. मुंबईच्या ब्रिटीश गव्हर्नरास कान्होजी आंग्रे यांनी ठणकावून सांगितले होते की, आमचे राज्य जुलूम, बलात्कार, चाचेगिरी याच्यावर चालले आहे, असे म्हणणे तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांना शोभत नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी चार बादशहाबरोबर लढाया केल्या. स्व-पराक्रमाने राज्य स्थापन केले. यानुसार आमच्या सत्तेला आरंभ झाला आहे. त्यानुसार आमचे राज्य टिकले आहे. याचा विचार तुम्हीच केला पाहिजे, असे ते ठणकावून इंग्रजांना म्हणाले होते.
आपण अलिबाग येथे पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांना जरुर भेटी द्या. प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक वास्तू आहे.
1. महाड- छत्रपतींचा रायगड किल्ला, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी दिलेला लढा, चवदार तळे
2. पोलादपूर- कविंद्र परमानंद यांची समाधी
3. श्रीवर्धन- बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मस्थान आणि श्रीहरिहरेश्वर
4. पनवेल- वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान- शिरढोण.
5. उरण- घारापुरी लेणी
6. म्हसळा- काजूंचे आगर
7. तळा- किल्लाज
8. रोहा- सीडी देशमुख आणि पांडुरंग शास्त्री आठवले
9. कर्जत- माथेरानची छोटी रेल व थंड हवेचे ठिकाण
10. पेण- श्री गणपतीच्या मुर्तीसाठी प्रसिद्ध शहर
11. खालापूर- खोपोली विद्युत केंद्र
12. माणगाव- मुंबई-गोवा महामार्गावरील शहर संभाजी पुत्र शाहू यांचे जन्मस्थान गांगवली
13. मुरुड-जंजिरा समुद्रातील भव्य दिव्य किल्ला जंजिरा
14. अलिबाग येथील नागाव बीच, समुद्रातील कुलाबा किल्ला.
आवास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांची कर्मभूमी असलेली येथील त्यांची समाधी. आपण अलिबागला बसने येताना दैनिक कृषीवलच्या कार्यालयासमोर उभा असलेला दिमाखदार सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा दिसतो. त्यानंतर आपण शहरात आल्यावर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या भव्य दिव्य एकूण 10 समाधींचे दर्शन होते. हा परिसर उत्तम होण्यासाठी शासनाने भरपूर मदत केलेली आहे, येथेही सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अलिबागच्या जनतेने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने तसेच राज्याच्या माजी मंत्री श्रीमती मीनाक्षीताई पाटील व सर्वांच्या सहकार्याने येथील परिसर हा अतिशय रमणीय आणि उत्साही झाला आहे. येथे एक विहिरही आहे. संपूर्ण प्राचीन वास्तुंचे नुतनीकरण करण्यात आले आहे. ज्या योध्याने बलदंड शरीर, मनाने आणि प्रयत्नाने इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीजांना ठणकावून सांगितले होते, ही भूमी आमची आहे. खबरदार आमच्या सागरावर बिना परवानगीने आलात तर !
अशा कान्होजी आंग्रे ह्या स्वामीनिष्ठ सरदाराची आज २८६ वी पुण्यतिथी. दिनांक ४ जुलै १७२९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानिमित्त या शूरवीराच्या धडाडीचा, कार्याचा छोटीशी ओळख. त्यांच्या कर्तुत्वाची गाथा अशीच पुढे चालू राहील. सागर सांभाळणाऱ्या नेत्यास यानिमित्त आपला सर्वांचा मानाचा मुजरा.
-प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर, धुळे
संपर्क 9833421127, ९४०४५७७०२०
माहिती स्रोत: महान्यूज, शुक्रवार, ०३ जुलै, २०१५
अंतिम सुधारित : 8/22/2020
छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड हा गगनाला ...