आपल्या एशियाटीक सोसायटीच्या समोर असलेलं 'हॉर्निमन सर्कल' सगळ्यांच्याच परिचयाचं आहे.. हे पूर्वीचं 'एलफिन्स्टन सर्कल'.. त्याही पूर्वी हा भाग 'बॉम्बे ग्रीन' या नांवाने ओळखला जायचा.. हे एक मुद्दाम राखलेलं सपाट मैदान होतं... एशियाटीक सोसायटीच्या विस्तृत पायऱ्या म्हणजे व्यासपीठ आणि समोर सर्व जनता बसण्याची जागा असा उपयोग करून 'कोटा'तले त्या काळातले सर्व महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम या जागी होत असत.. इतर वेळी बैलगाडीवाले, टांगा-व्हिक्टोरीयावाले, पालखीवाले इत्यादी सार्वजनीक वाहतूक करणारे या मैदानाभोवती भाड्याची वाट बघत उभे असत..
तर, या हॉर्निमन सर्कलमध्ये चर्चच्या बाजूकडील प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर समोरच काही अंतरावर एक गोलाकार कारंजं दिसतं.. या कारंजाच्या समोरच, आपल्या उजव्या हाताला एका देवळीत पूर्वी लॉर्ड कॉर्नवॉलीसचा पुतळा होता.. अर्थात देवळी आणि पुतळा पहिला बसवला व बागे सभोवती आता आपण जे लोखंडी कुंपण पाहतो ते नंतर बसवलं गेलं असा उल्लेख श्री. शिंगणे यांच्या 'मुंबईचा वृत्तांत' या पुस्तकात मिळतो.. आपल्या देशातील प्रशासकीय व महसूली कायद्यांची सुरूवात या कॉर्नवॉलीस महाशयांनी करून देशात 'ब्रिटीश राज'चा पाया भक्कम केला होता.. हे साहेब लढवय्येही होते.. मैसूरच्या टिपू सुलतानाच्या मुलांना बंदी बनवून टिपूकडून मोठी खंडणी आणि व्यापारी सवलती यांनी उकळल्या होत्या..
हा पुतळा स्वराज्यात इथून त्याच्या देवळीसह हलवला गेला व सध्या तो भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड म्युझीयमच्या इस्ट लॉनवर व्हिक्टोरीयाच्या पुतळ्याच्या लायनीत मुंडकं व हात छाटलेल्या अवस्थेत 'उभा' आहे.. देवळी गायब असून व्हिक्टोरीयाच्या पुतळ्याच्या मखरासारखी ती बहुदा कुणा कुबेराघरच्या दिवाणखान्याची वा बागेची शोभा वाढवत असावी..!
लेखक: गणेश साळुंखे,
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 1/30/2020
कोल्हापुरात अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींचे सुंदर व पूर...
दक्षिण मुंबईतल्या ब्रिटीशकालीन, परंतू आता विस्थापि...
महाराणी व्हिक्टोरीयाच्या हा पुतळा कदाचित 'जन्मल्या...