महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा असो की उल्कापाताने निर्मित जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार येथील सरोवर असो; बुलढाणा जिल्हा पर्यटकांना अध्यात्मासह हिरव्यागर्द वनराईची एक आगळी वेगळी अनुभूती देऊन जातो!
लोणार येथे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे ज्याची निर्मिती एका उल्केमुळे झाली असून हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे आणि अल्कधर्मी सरोवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी लोणार सरोवर हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली त्यातच या जगप्रसिद्ध सरोवराचा उल्लेख आहे.
मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावरील श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले शेगाव हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदीर बांधले गेले असून त्याची व्यवस्था तेथील 'गजानन महाराज संस्थान' पाहते. तेथील संस्थानाच्या 'भक्त निवास' मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय आहे. येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था आहे. याच संस्थानाने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ सुमारे ३५० एकर जागेपैकी सध्या १२० एकर जागेवर निर्माण केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या विस्ताराचे काम सुरु आहे. ते शेगांव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच 'आनंद सागर विसावा' येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे. आनंद सागर, शेगांव या संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा, निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भोजन व्यवस्था, विविध वैद्यकीय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात. येथील खास खमंग 'शेगाव कचोरी' पर्यटकांना विशेष भावते.
स्वराज्याचा तोरण उभारण्यासाठी शिवबाला ज्या आदर्श मातेने प्रेरक बाळकडू पाजत रयतेला एक आदर्श राजा दिला त्या विदर्भकन्या जिजाऊंचे जन्मस्थान आणि माहेर सिंदखेड राजा !
सिंदखेड राजा शहरात जुन्या काळात बांधलेला जिजाबाईंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे या प्रेक्षणीय वास्तू आहेत.
मराठा सेवा संघाने सिंदखेडराजा येथे नागपूर-मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वतःच्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अशा सामुहिक ‘जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊ सृष्टीसाठी जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या तसेच ह्या ठिकाणी त्या युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या असे सांगितले जाते. त्याच जागेवर जिजाऊ सृष्टी हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
जिजाऊ सृष्टी हा देशाच्या स्वाभिमानाचा राष्ट्रीय प्रकल्प व्हावा, हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे, असा विचार आहे. त्यानुसार जिजाऊ सृष्टी हा विविध विषयांना सामावून घेणारा एकत्रित स्वरूप प्रकल्प व्हावा ते अद्ययावत तीर्थक्षेत्र वा ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे.
जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलिटरी अॅकेडमी, संशोधन केंद्र, महिला विद्यापीठ अशा संस्थांची निर्मिती व्हावी, अशीही योजना आहे. त्यात ध्यानमंदिर, संशोधन विभाग, प्रार्थनास्थळांची रचना करणे, विज्ञाननिष्ठ परंपरा वृद्धिंगत करणारे मेळावे भरविणे, विश्वशांती व एकसंघतेसाठी विविध चर्चासत्राचे आयोजन, विविध विषयाचे प्रशिक्षण, कार्ड कॅम्पस, कमांडो फोर्स, ट्रेनिंग सेंटर यासारख्या विविध योजना, सर्व बहुजन समाज, विज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ बनवून संपूर्ण विश्वामध्ये मानवा-मानवामध्ये समता, समानता, बंधुत्वाची आचारसरणी व विचारसरणी मांडणारा तयार व्हावा, अशी मांडणी व आखणी करणे, हा जिजाऊ सृष्टीचा मुख्य उद्देश आहे.
खामगांव शहर ही कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे. गावातील घाटपुरी संस्थानाचे देवीचे मंदिर फार प्राचीन आहे. मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून १० दिवस जगदंबा उत्सव साजरा होतो.
जळगाव जामोदपासून १२ किमी दुर धानोरा हे एक खेडे आहे. महासिद्ध महाराजांचे मंदिर आहे. तेथे दरवर्षी माघ शुक्ल पौर्णिमेला यात्रा असते. जळगाव जामोद तालुक्याच्या उत्तरेकडील भागात सातपुडा पर्वत आहे. येथे भिंगारा हे थंड हवेचे व अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.
ब्रह्मांड पुराणात (मेघंकर आताचे मेहकर) या नगरीचा उल्लेख आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ब्रह्मदेवाने तप करून यज्ञारंभ केला. त्या यज्ञकर्माला आवश्यक ‘प्रणितापात्र’ हे भांडे मेघंकरात होते. या भांड्यातील पाणी मंत्रपूर्वक जमिनीवर सांडले व त्यातून प्रणिता (सध्याची पैनगंगा) नदीचा उगम झाला. पैनगंगेला प्राणहिता, पावनगंगा अशीही नावे आहेत. गौतमी महात्म्य ग्रंथातही या यज्ञकथेचा उल्लेख आहे व त्यातच मेहकरातील प्रसिद्ध शारंगधराचा (श्री बालाजीचा) उल्लेख आहे. मत्स्य पुराणातही मेघंकर नगरी व शारंगधराचा उल्लेख आढळतो.
पद्म पुराणातील अध्यायात शारंगधराच्या ज्या मूर्तीचे सुंदर वर्णन केलेले आहे, ती ११ फूट उंचीची अखंड शाळिग्राम शिळेत अतिशय कलात्मकरीत्या कोरलेली बालाजीची मूर्ती मेहकरमध्ये आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीलक्ष्मी व उजव्या बाजूला भूदेवीची मूर्ती आहे. जय-विजय यांच्या सुबक मूर्तीसोबतच मुख्य मूर्तीभोवती १० लहान मूर्ती कोरलेल्या आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म या चार आयुधांना ४ हातात धारण केलेली ही मूर्ती म्हणजे श्रीविष्णूचे त्रिविक्रम रूप मानले जाते. बालाजीची इतकी भव्य व कलात्मक मूर्ती देशात कुठेही नाही. देव-देवतांना छळणाऱ्या मेघंकर नामक राक्षसाचा श्रीविष्णूने त्रिविक्रम रूप धारण करून नाश केल्याची कथा आहे.
बालाजी मंदिरात दरवर्षी डिसेंबरात मूर्तीचा प्रगटदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. चैत्र, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष महिन्यांमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. गढीचे खोदकाम सुरू असताना १८८८ मध्ये ही बालाजीची मूर्ती सापडली. अखंड शिळेत अत्यंत कलाकुसरीने कोरलली ही रेखीव मूर्ती पाहून तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु, परिसरातील लोकांचा विरोध पाहून त्याने निर्णय बदलला पण, मूर्तीसोबत सापडलेले तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर मात्र हा इंग्रज अधिकारी सोबत घेऊन गेला, असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आहे, असे म्हणतात. १८९२ मध्ये बालाजी मंदिराचा गाभारा व तीर्थ मंडपाचे काम झाले. कालांतराने मंदिराचे बांधकाम वाढत गेले.
मेहकर हे अजिंठ्याच्या पर्वत रांगेत वसलेले शहर आहे. शहराजवळून पैनगंगा नदी वाहते आणि कोराडी, उतावळी, पेनटाकळी या सिंचन प्रकल्पांमुळे तालुक्यातील शेतीस सुपिकता लाभली आहे.
मेहकर या पौराणिक व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध शहराला लागूनच साखरखेर्डा गाव आहे. तेथे निजाम व मुबारकखानात लढाई झाली होती. त्यावेळी थोरले बाजीराव पेशवे आले होते. जाणूजी भोसले यांच्याशी २२ मार्च १७६९ ला तह करण्यासाठी आलेले थोरले माधवराव पेशवे यांचे काही काळ वास्तव्य मेहकरलाच होते. महानुभाव पंथाचे भगवान चक्रधरस्वामींचा दीर्घकाळ मेहकरात मुक्काम होता. भैरव व बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. दक्षिणेकडे प्रस्थान करताना भगवान श्रीराम, हे मेहकर परिसरातून गेले होते, असे मानले जाते. मेहेकर ही दंडकारण्यातील तपस्व्यांची तपोभूमी होती असेही मानले जाते. या तालुक्यात बगदालभ्य ऋषींचे देळप, वशिष्ठांचे वडाळी, गौतम ऋषींचे गोमेश्वर, पाराशराचे पाथर्डी, दुर्वासाचे द्रुगबोरी व विश्वमित्रांचे विश्वी, अशा ७ गावी, जंगल झाडीतल्या नैसर्गिकदृष्ट्या देखण्या ठिकाणी सप्तर्षीची पुरातन मंदिरे आहेत. श्रावण महिन्यात तेथे भाविकांच्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप असते. श्रीमद्भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात पैनगंगा नदी व मेहकरचा गौरवपूर्ण उल्लेख आला आहे. या मेहकर येथे अहिल्यादेवी होळकरांनी अन्नछत्र बांधून दिले होते. मेहकरला यज्ञभूमी मानले जाते.
बुलढाणा अजिंठा मार्गावरील बुलडाण्यापासून २० किमी अंतरावरील बुधनेश्वर हे पैनगंगा नदीचा उगमस्थान असलेल हे ठिकाण निसर्गरम्य आहे. चिखली पासून १२ किलोमीटर च्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने हेमाडपंथी शिवमंदिर आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव चिखली ते सैलानी या रोडवर आहे.
मोताळा तालुक्यातील तारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र द्वारा स्थापित असुन नवरात्रोस्तव काळात मोठी गर्दी असते. जिल्ह्यातील नांदुरा येथे श्री तिरुपती बालाजी संस्थानाची विश्वविख्यात १०५ फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. असा हा बुलढाणा जिल्हा आपले अध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक महात्म्य जपतो ! तेव्हा या जिल्हातील पर्यटक स्थळास अवश्य भेट द्या !
लेखन आणि संकलन - तृप्ती अशोक काळे
नागपूर – मोबा. ८२७५५२१२६३
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/20/2020
सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा वापर करीत बुलडाणा जिल्...
हागणदारीमुक्त लेख.
बुलढाणा जिल्हा अजिंठा आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत...