অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिवकालीन इंदुरीचा किल्ला (गढी)

शिवकालीन इंदुरीचा किल्ला (गढी)

इंदुरीचा किल्ला हा फार दुर्मिळ असा किल्ला आहे. या किल्ल्याची शिल्प वास्तू ही प्राचीन कलेवर आकारली आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते.

छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांनी हा किल्ला बांधला होता. त्यांची समाधी तळेगाव शहरातील पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौद्ध कालिन गुहा आहेत. मुंबई व पुण्याहून वर दिलेली तीनही ऐतिहासिक ठिकाणे एका दिवसात पाहता येतात.

इतिहास

छ. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छ.शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली.

इ.स. १७२०-२१ मध्ये खडेराव दाभाडे यांनी इंदुरीची गढी बांधली, त्याची ‘इंदुरीचा किल्ला’ किंवा ‘सरसेनापतींची गढी’ अशीही आळख आहे. खडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जुन्या राजवाड्यात झाले. त्याची समाधी इंद्रायणी नदी काठावरील बनेश्वर मंदिराजवळ आहे.

पाहण्याची ठिकाणे

तळेगावहून चाकणला जातांना डाव्या बाजूला इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आजही पाहायला मिळतात. या तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भव्य बुरुज आहेत. किल्ल्याच्या दगडी बांधणीच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे बांधकाम मातीच्या वीटा वापरुन केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत.

दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने गेल्यास आपण दरवाज्याच्या वरचा बाजूस जातो. येथे झरोके असलेला सुंदर हवामहल आहे. याच्या छतावर कोरीव काम केलेले आहे.

किल्ल्ल्यावर कडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वाहणारे इंद्रायणीचे पात्र व दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याची तटबंदीची रूंदी ३ फूट आहे. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग विटांनी बांधलेला आहे.

तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या विरुद्ध बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौद्धकालिन लेणी पहायला मिळतात. यापैकी एका गुहेत तुकाराम महाराज साधनेसाठी बसत असत. या लेण्यांमध्ये एक दगडात कोरलेला स्तुप आहे. या स्तुपावरून ही बौद्ध लेणी हिनयान कालिन असावीत. लेण्यांसमोर एक बारमाही पाण्याचे टाक आहे.

कसे जाल

मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो, तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणाऱ्या रस्त्याने तटबंदी संपेपर्यंत चालत जावे. पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो.

मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ५ किमीवर डाव्या बाजूस भव्य कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वाहनाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते. मंदिराच्या विरुद्ध बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौद्धकालिन लेणी पहायला मिळतात.

लेखक - भूषण दूनबळे
(8308268726)
Bhushandunbale111@gmail.com

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate