पश्चिम द्रुतगती मार्गावर (वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर) मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाताना बोरिवलीपासून थोड्याच अंतरावर एक चौक लागतो. त्यातील पूर्वेकडील फाटा ठाण्याकडे जातो तर पश्चिमेकडील फाटा घोडबंदर गावाकडे जातो. या फाट्यावरुन अगदी शेवटपर्यंत गेल्यास घोडबंदर किल्ला लागतो. बोरिवली रेल्वे स्थानकापासून या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बससेवा आहे.
कोकण किनारपट्टीवरील सागरावर आपली सत्ता राहावी यासाठी पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात उत्तर कोकण किनारपट्टीवर अनेक किल्ले बांधले. घोडबंदर किल्ला हा अशा किल्ल्यांपैकीच एक आहे. म्हटले तर हा किल्ला तसा मुख्य समुद्रापासून आत; पण गलबतांच्या सहाय्याने तेथेपर्यंत पोहोचण्यास सुगम. या वैशिष्ट्यामुळे अरबी समुद्रापासून काहीसा आत खाडीवर वसलेला हा किल्ला पोर्तुगीजांचे एक बलस्थान बनला होता.
नुसते व्यापारी म्हणून राहते तर कदाचित हा फिरंगाणाचा प्रदेश प्रदीर्घ काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात राहता. पण सक्तीचा धर्मप्रसार व अन्य धर्मीयांचा छळ या पोर्तुगीजांच्या धोरणामुळे फिरंगाणाला अनेक शत्रू झाले. शिवाजी महाराजांचे पोर्तुगीजांशी बिनसले ते याच कारणामुळे. गोडीगुलाबीने व सामोपचाराने हा धार्मिक छळ थांबवण्याबाबत महाराजांनी हरतऱ्हेने फिरंगाण कब्जात घेण्याचा नाही तरी आपले बलप्रदर्शन करुन पोर्तुगीजांवर वचक बसवण्याचा तरी निश्चित प्रयत्न केला. अशा काही प्रसंगांमध्ये घोडबंदरचा संबंध आलेला दिसतो.
घोडबंदर किल्ल्याची सर्वच तटबंदी आजमितीस शिल्लक नाही. किल्ल्याच्या उत्तरेकडील भागात तटबंदीच्या रुंदीचा अंदाज येईल असे तटबंदीच्या पायाचे अवशेष आढळतात. पण पश्चिम तटबंदीचा भाग वगळता पायाचा वरचा भाग मोठ्या प्रमाणावर कुठेही उपलब्ध नाही. तटबंदीच्या अशा दुरावस्थेमुळे किल्ल्याला किती आणि कुठे प्रवेशद्वारे होती हे कळणे जरा कठीणच आहे. तथापि आज किल्ल्यात जाण्यासाठी जो पायऱ्यांचा मार्ग आहे त्या मार्गाने वर गेल्यानंतर तीन बाजूने इमारत व मधोमध मोकळी जागा असे स्वरुप असलेल्या इमारतीच्या भिंती आहेत. या इमारतीचा तलविन्यास साधारणत: चौकोनी बुडाच्या इंग्रजी “यू”अक्षरसारखा आहे. या यू आकाराचा तलविन्यास असलेल्या वास्तूवर एकेकाळी कौलांची छपरे होती. या इमारतीच्या वायव्येस एक टेहेळणी बुरुज असून तो बऱ्यापैकी सुव्यवस्थित आहे. या बुरुजावर जाण्यासाठी बुरुजाच्या बाह्यांगातच एक दरवाजा आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर बुरुजाच्या माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या असलेल्या मार्गावरुन काही उंचीवर गेल्यावर एक सपाट भाग असून त्याच्या एका अंगाला एका खोलीचा दरवाजा लागतो. या खोलीचे छत म्हणजेच बुरुजाचा माथा. ही खोली बंदुका वगैरे सामुग्री ठेवण्यासाठी व टेहेळणी करणाऱ्या शिपायाच्या विश्रांतीसाठी वापरण्यात येत असावी.
या बुरुजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा बुरुज तटबंदीच्या सलगतेत नाही. ही पूर्णपणे स्वतंत्र बुरुज असून तलविन्यासात तो अगदी स्पष्टपणे किल्ल्याच्या अंतर्भागात आहे. याचाच अर्थ हा बुरुज फक्त टेहेळणीसाठीच बांधला गेला असावा. रीवा किल्ल्यावरही अशा प्रकारचा टेहेळणी बुरुज आहे. मात्र रीवा येथील बुरुज पूर्णत: भरीव असल्यामुळे त्यात प्रवेश करता येत नाही तर घोडबंदर किल्ल्यातील या बुरुजात वर जाण्यासाठी असलेला पायऱ्यांचा मार्ग व रक्षकांचे एक दालन आहे. घोडबंदरच्या किल्ल्याचा या बुरुजाचे तलविन्यासक्षेत्रही (तळभागाचा नकाक्षा) रीवा किल्ल्याच्या तलविन्यासक्षेत्रापेक्षा खूपच अधिक आहे.
किल्ल्याच्या पश्चिमतटबंदीचा काही भाग बऱ्यापैकी शाबूत आहे. यावरुन ही तटबंदी बऱ्यापैकी रुंद होती व तटाच्या वर गस्तमार्ग व कठडा होता याची स्पष्ट कल्पना येते. उत्तरेकडील तटबंदीही शिल्लक आहे पण त्यावर वनराई माजली आहे. तटबंदीवर जाण्यासाठी किल्याच्या अंतर्भागातून तटाला लागून असलेले पायऱ्यांचे मार्ग होते असे मानण्यास जागा आहे.
इंग्रजी ‘यू’ अक्षरासारख्या आकाराचा तलविन्यास असलेल्या इमारतींच्या भिंतीमध्ये दरवाज्यांची रेलचेल आढळते. पोर्तुगीज शैलीच्या दरवाज्यांचे ‘कमानयुक्त’ व ‘वक्राकार शीर्षयुक्त’ असे दोन उपप्रकार पडतात. या दोन्ही प्रकारचे दरवाजे येथे आढळतात.
घोडबंदर किल्ल्याला लागून असलेली खाडीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. शिवाय हीच खाडी पुढे ठाण्यापर्यंत जात असे. त्यामुळे वसई ते ठाणे जलमार्गावरील किल्ला म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व होते.
लेखन - संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020
पुणे-नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भुईकोट किल्ला ऊर...
पावसाळ्यातील एक आनंदाचा भाग म्हणजे ट्रेकला जाणे. आ...
जिंजी हा भारतातील सर्वात सुंदर किल्यांपैकी एक अस...
सध्याच्या ठाणे शहराच्या खाडीकडील भागात या किल्ल्या...