অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सह्यादीच्या कुशीत विसावलेले महाबळेश्‍वर

सह्यादीच्या कुशीत विसावलले महाबळेश्‍वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वपरिचित आहेच; पण या महाबळेश्‍वरचे खरे सौंदर्य पाहायचे असेल तर आडवाटांचे रस्तेच चोखाळले पाहिजेत. जंगलांतून वाट काढताना पावलापावलावर निसर्ग विलक्षण रूपात भेटत असतो. निसर्गाचे हे उनाड रूप पाहण्याची मजा काही औरच. महाराष्ट्राच्या पश्‍चिमी तटावर दक्षिणोत्तर उभा पसरलेला काळाकभिन्न, रौद्र, निबिड जंगलांनी वेढलेला सह्याद्री राज्याचे भौगोलिक वैभव आहे. याच सह्याद्रीवर असलेले ‘महाबळेश्‍वर’ हे समस्त पर्यटकांचे लाडके हिलस्टेशन असल्याने विकेन्डला किंवा एक दिवसाच्या सहलीसाठीही पर्यटक महाबळेश्‍वरला जातात. इतर अनेक हिलस्टेशन्स पाहूनही महाबळेश्‍वरला जाण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळेच वेळ मिळाला की महाबळेश्‍वरच्या आडवाटांवर भटकणे, वेगळ्या वाटांवर लाँग ड्राईव्हला जाणे, वेगवेगळ्या ऋतूत महाबळेश्‍वरचे वेगवेगळे रूप पाहणे हे हौशी पर्यटकांचे आवडते छंद आहेत. पण खरे महाबळेश्वर पहावयाचे असेल तर ते पावसाळ्यातच... महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच इतिहासातील शौर्याचा साक्षीदार असलेले ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पंच नद्यांचे उगमस्थान आणि पवित्र महाबळेश्वराचे देऊळ म्हणजेच महाबळेश्वर.

महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सातारा‍ जिल्ह्यात महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा लौकिक आहे. महाबळेश्वर इंग्रजांच्या काळात मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होती.

महत्वाची सौंदर्यस्थळे (पॉइंट्‌स)

मंकी पॉइंट

या ठिकाणाला हे नाव दिलेले आहे त्याला कारण असे की नैसर्गिकरित्या येथे तीन दगड आहेत ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते आणि गांधीजींच्या शब्दांची आठवण करून देतात. तेथील खोल दरीत डोकावले की एका मोठ्या पाशानात ३ हुशार मंकी समोरासमोर बसलेले आहेत असे चित्र नजरेला दिसते. आर्थर सीट पॉइंटला जान्याच्या मार्गावर हा पॉइंट आहे.

आर्थर सीट पॉइंट

समुद्र सपाटीपासून 1,340 मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले. अतिशय नैसर्गिक देखाव्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे. खाली खूप खोल दरी आहे.

वेण्णा लेक (वेण्णा तलाव)

महाबळेश्वर हे विश्रांतीचे ठिकाण व सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वेन्ना लेक हे पर्यटकांसाठी महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षक ठिकाण आहे. हे लेक सर्व बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेले आहे. महाबळेश्वर मध्ये सामान्य ते 3 स्टार हॉटेल्स कमी बजेट मध्ये उपलब्ध आहेत आणि तेथून तुम्ही लेकचा देखावा नजरेत सामाऊ शकता किंवा प्रसिद्ध बाजारपेठेत राहूनही आनंद घेऊ शकता.

केटस् पॉइंट

महाबळेश्वरचे पूर्व बाजूस हा पॉइंट आहे. येथून तुम्ही बलकवडी आणि धोम धरणांचा देखावा पाहू शकता. या पॉइंटची ऊंची साधारण 1280 मीटर आहे.

नीडल होल पॉइंट / एलीफंट पॉइंट

काटे पॉइंट जवळच हा निडल पॉइंट आहे. नैसर्गिक रित्या खडकाला सुईसारखे भोक आहे ते सहजतेने दिसते म्हणून त्याला नीडल होल नाव दिलेले आहे. हा पॉइंट हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून त्याची डेक्कन ट्रप म्हणून ही प्रसिद्धी आहे.

विल्सन पॉइंट

सर लेस्ली विल्सन हे सन 1923 ते 1926 मध्ये मुंबईचे राज्यपाल होते तेव्हा या पॉइंटला त्यांचे नाव दिले आहे. महाबळेश्वर मधील हा 1439 मी. ऊंचीचा सिंडोला टेकडीवरील सर्वात उंच पॉइंट आहे. महाबळेश्वर मधील हा एकच पॉइंट असा आहे की, येथून तुम्ही सुर्योदय आणि सुर्यास्तही पाहू शकता. महाबळेश्वरचे सर्व स्थळांची आकर्षकता तुम्ही येथून न्याहाळू शकता. महाबळेश्वर मेढा मार्गाच्या पाठीमागील बाजूस हा विल्सन पॉइंट महाबळेश्वर शहरापासून 1.5 की.मी. अंतरावर आहे.

प्रतापगड

प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर जवळ आहे. हा शिवाजी राजानी बांधला आहे. शिवाजी राजांनी विजापूरचे सरदार अफझुलखानला हरवले आणि ठार केले म्हणून हा प्रतापगड किल्ला भारताचे इतिहासात प्रसिद्ध आहे.

लिंगमाला धबधबा

महाबळेश्वर जवळ हा धबधबा आहे. साधारण पणे 600 फुट उंचीवरून हे पाणी वेण्णा तलावात पडते. खडकाचे योजनापूर्वक विभाजन करून हा धबधबा बनविलेला आहे.

या पॉईंटवर जाऊन सूर्यास्त पाहण्याची मजा काही वेगळीच. महाबळेश्वरचे पठार जवळपास 150 किलोमीटरमध्ये व्यापले आहे. समुद्रसपाटीपासून ते 4710 फुट उंचीवर आहे. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. महाबळेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला तो प्रतापगड येथून जवळ आहे. पाचगणी हे आणखी एक थंड हवेचे ठिकाणही पाहण्यासारखे असून तेही येथून जवळ आहे. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीही जगप्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद काही औरच आहे.महाबळेश्वरला गेल्यावर नेमके काय पाहायचे आणि किती पाहायचे? हा पर्यटकांना नेहमीच पडणारा प्रश्न.

कसे जाल –

महाबळेश्वर पुण्यापासून 120, मुंबईहून 247 औरंगाबादहून 348 तर पणजी पासून 430 किलोमीटरवर आहे.

काय खरेदी कराल?

आकर्षक नक्षीकाम केलेल्या पांढरीच्या काठ्या, उत्तम प्रकारच्या टोप्या, नैसर्गिक मध, प्रसिद्ध शेंगदाणा चिक्की, फळांपासून तयार केलेले विविध प्रकारचे जॅम – जेली, सरबते.

लेखक - सिध्दी बोबडे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate