অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भिलारच्या पार्टे यांची स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीचे माहेरघर महाबळेश्‍वर (जि. सातारा) तालुक्‍यातील भिलार येथील गणपत रामचंद्र पार्टे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून स्ट्रॉबेरीची शेती अधिकाधिक फायदेशीर केली आहे. पर्यटक शहरात न राहता खेड्यात कसे राहतील, या विचारातून त्यांनी शेतालगत अद्ययावत पद्धतीचे कृषी पर्यटन केंद्रही विकसित केले आहे.

पुणे- बंगळूर महामार्गावरून वाईमार्गे महाबळेश्‍वरकडे जाताना पाचगणी शहरापासून थोड्या अंतरावर भिलार गाव आहे. दर्जेदार स्ट्रॉबेरी उत्पादनात या गावची खासियत आहे. येथील गणपत पार्टे तीस वर्षांपासून स्ट्रॉबेरी शेतीत आहेत. शिक्षणानंतर त्यांनी गावात छोटासा कापड व्यापार सुरू केला. कालांतराने ते पूर्णवेळ शेतीकडे वळले. सन 1992 पासून त्यांनी आधुनिकतेची कास पकडली. सुधारित वाणांचा वापर, पाटपाण्याऐवजी ठिबकचा अवलंब अशा गोष्टींवर भर दिला. सन 1995 मध्ये त्यांनी इस्राईल दौरा पूर्ण केला. ते म्हणाले की 1992 पर्यंत या विभागात ऑस्ट्रेलियन वाणाच्या स्ट्रॉबेरीची लागवड व्हायची, त्यातून एकरी दोन टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. राज्य पणन महामंडळ व श्रीराम फळप्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून बाळासाहेब भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकन चॅण्डलर, ओसो ग्रॅण्डे, कॅमेरोजा, स्वीट चार्ली, विंटर डॉन या जातींचा वापर होऊ लागला.
पार्टे यांची वडिलार्जित पाच व खरेदी केलेली चार अशी एकत्रित नऊ एकर शेती आहे. निचरा होणाऱ्या व लाल मातीच्या जमिनीस दोन विहिरी व तीन विंधनविहिरींतून पाणीपुरवठा होतो. दरवर्षी सुमारे तीन एकरांवर स्ट्रॉबेरी होते. उर्वरित क्षेत्रात गहू, हरभरा, वाटाणा, फरसबी, भाजीपाला यांची फेरपालट होते. या भागात 20 ऑगस्टपासून 20 ऑक्‍टोबरपर्यंत स्ट्रॉबेरीची लागवड सुरू असते. पार्टे लागवडीपूर्वी मे महिन्यातील पंधरवड्यापर्यंत अमेरिकेहून मातृवृक्ष मागवून त्यांची नर्सरी बनवतात. ऑगस्टनंतर लागवडीसाठी त्यांचा उपयोग करतात. काटेकोर व वेळेत व्यवस्थापन केल्याने आतापर्यंत एकदाही त्यांचे पीक नियोजन बिघडलेले नाही. 
पार्टे यांना आई सौ. फुलाबाई, वडील श्री. रामचंद्र, पत्नी सौ. तारा, मुले विक्रम व जयदीप यांची मोलाची मदत मिळते. कृषी सहायक संतोष जगताप यांचे मार्गदर्शन मिळते. 

नियोजनातील गोष्टी

  • अधिकाधिक सेंद्रिय खतांचा वापर, संपूर्ण क्षेत्रावर पॉलिमल्चिंग. यामुळे फळांचा जमिनीशी संबंध न आल्याने उत्कृष्ट दर्जाची फळे उत्पादित होतात.
  • लागवडी वेळी मजुरांपेक्षाही घरच्या मंडळींची मदत होत असल्याने रोपांची काळजी घेऊन मर कमी राहते.
  • फळांची तोडणी व पॅकिंगचे कामही घरच्यांकडून अतिशय नाजूकपणे होत असल्याने नुकसान फारसे नाही.
  • पूर्वीपासून संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा अवलंब आहे.
  • लागवडीपूर्वी बेड तयार करताना स्वतःच्या शेतावर तयार केलेले गांडूळ खत व विश्‍वसनीय कंपनीच्या सेंद्रिय खताचा दरवर्षी वापर.
  • रासायनिक खतांसोबत विद्राव्य खतांचाही वापर.
  • गरजेनुसार निंबोळी अर्क व सेंद्रिय कीडनाशकांचा वापर.
  • निचऱ्याची जमीन असल्याने दिवसाआड अर्धा तास व उष्णतेच्या कालावधीत एक तास सिंचन.
  • मधमाशी पालनासाठी शेताच्या बांधावर सहा पेट्या ठेवल्या आहेत.

स्ट्रॉबेरी उत्पादकता 

  • पूर्वी एकरी आठ टनांपर्यंत.
  • माती व पाणी परीक्षणानुसार खत व पाणी व्यवस्थापन, तसेच सुधारित तंत्रज्ञानातून एकरी 10 ते 12 टनांपर्यंत उत्पादन वाढले.

खर्च

प्रति रोप दहा रुपये, कीडनाशके व खतांसाठी एकरी 50 ते 60 हजार रुपये, मजुरी 90 हजार ते एक लाख रुपये (यात घरच्या सदस्यांच्या मजुरीचाही समावेश), पॅकिंग व वाहतूककामी 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो.
दर - गेल्या तीन ते चार वर्षांत मिळालेला दर प्रति किलो 45 ते 50 रु. 
  • उत्पादित मालाची मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, दिल्ली, गुजरात या ठिकाणी विक्री.
  • पीक काढणीच्या सुरवातीच्या कालावधीत उत्पादन कमी म्हणजे एकरी चार ते पाच किलो मिळते. अशावेळी प्रति किलोस 200 रुपयांपर्यंत दर राहतो. आवक वाढेल तसा हाच दर किलोला 25 ते 30 रुपयांपर्यंत मिळतो.
  • पाच ते सहा महिन्यांच्या हंगाम कालावधीत सरासरी दर 45 ते 50 रुपये मिळतो.
  • खर्च वजा जाता एकरी एक लाख 50 हजार रुपये ते एक लाख 80 हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो.

पर्यटन केंद्रात उभारल्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

महाबळेश्‍वरला देशी, परदेशी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. त्यांना खेड्यापर्यंत आणण्यासाठी पार्टे यांनी शेतालगत अद्ययावत पद्धतीचे कृषी पर्यटन केंद्र विकसित केले आहे. 

पर्यटकांसाठी सुविधा

भिलारपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर महाबळेश्‍वर आहे. पर्यटक शहरात राहिल्याने शेतकऱ्यांकडील स्ट्रॉबेरी व्यापारी शहरात नेऊन दुप्पट दराने विकतात. ही गोष्ट प्रकर्षाने जाणवल्याने "शेतात या, स्ट्रॉबेरी स्वहाताने तोडून खा' ही संकल्पना राबवण्यास सुरवात केली. 
  • शेतावर जेवणे व राहणे आदी सुविधा, वास्तव्यासाठी माफक शुल्क.
  • त्यांच्या केंद्राला दरवर्षी पाच ते आठ हजार पर्यटक भेट देतात. एकावेळी 30 ते 40 लोक राहतील अशी व्यवस्था.
  • पर्यटन केंद्राच्या सभोवती 20 गुंठ्यांत अर्जुन, अडुळसा, बदाम, पेरू, लिची, आवळा आदी वृक्ष लागवड असल्याने नैसर्गिक सौंदर्य खुलले आहे. त्या ठिकाणी मिश्र पद्धतीचा भाजीपाला असून, त्याचा उपयोग पर्यटकांच्या भोजनासाठी होतो.

असा झाला फायदा

  • महाबळेश्‍वर व पुणे येथे दरवर्षी होणाऱ्या स्ट्रॉबेरी महोत्सवात आपल्या पर्यटन केंद्राचा प्रसार करतात.
  • दरवर्षी सुमारे पाच टन ताजी स्ट्रॉबेरी जागेवर विक्री करण्यात यश. जागेवरून खपणाऱ्या मालास बाजारभावापेक्षा सुमारे 30 टक्के अधिक दर मिळतो.
  • शेतीत नुकसान झाले तर पर्यटनातील उत्पन्नातून ते भरून काढणे शक्‍य होते.
  • आर्थिक जीवनमान उंचावण्यास हा जोडधंदा उपयुक्त ठरला आहे.

पार्टे यांनी व्यक्त केल्या अपेक्षा

  • थेट विक्री व्यवस्था उपलब्ध केल्यास शेतीमालास अधिक दर मिळू शकतो.
  • स्ट्रॉबेरी रोपे निर्मितीसाठी हरितगृहांची आवश्‍यकता आहे, हरितगृहात रोपे निरोगी व सशक्त ठेवता येतात.
  • हे पीक महागडे असल्याने उत्पादनासाठी भांडवलाची कमतरता भासते.
  • पीक नाजूक असून टिकवणक्षमताही कमी असल्याने मालाचे नुकसान होते. यासाठी प्रीकूलिंगची शेतावर उभारणी, कूलिंग व्हॅनमधून बाजारपेठेत थेट विक्रीचा परवाना व ठिकाण उपलब्ध केल्यास ग्राहकांना वाजवी दरात फळ उपलब्ध होईल, शेतकऱ्यालाही 20 ते 30 टक्के अधिक दर मिळू शकतो.
  • चांगल्या पद्धतीचे पॅकिंग साहित्य व पॅकिंग हाऊस उभारल्यास नुकसान कमी होईल. एकाच वेळी सर्व ठिकाणाहून उत्पादन निघाल्यास आवक वाढते. अशावेळी साठवणक्षमता, वाहतूक व्यवस्था, वेगळ्या मार्केटकडे जाण्याची सोय नसल्याने नुकसान सोसावे लागते.

पार्टे यांच्या जमेच्या बाजू

  • स्ट्रॉबेरी पिकात तब्बल तीसहून अधिक वर्षांचा अनुभव.
  • मालाची तोडणी, हाताळणी व पॅकिंग याकडे काळजीपूर्वक लक्ष.
  • माल कोणत्या टप्प्यावर तोडला पाहिजे याचा अचूक अंदाज, त्यासाठी मजुरांचा वापर न करता हे काम घरचे सदस्य करतात.
  • फूडग्रेड मटेरिअल व कोरूगेटेड बॉक्‍समधून मालाची विक्री. पॅकिंगसाठी अधिक खर्च होतो; परंतु नफाही वाढीव स्वरूपात मिळतो. यातून मालाचे नुकसान कमी होते. हे पॅकिंग ग्राहकांना आकर्षित करते.
  • स्वतःकडील वजनकाट्यावर पारदर्शकपणे मालाचे मोजमाप.
  • एक व दोन ग्रेडचा माल बाजारपेठेत, तर तीन ग्रेडचा माल प्रक्रियेसाठी पाठवतात. तीन ग्रेडचा माल एकूण उत्पादनात 25 ते 30 टक्के निघतो. यास प्रति किलो 25 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो. उत्पादित मालाच्या खरेदीसाठी व्यापारी जागेवर येतात.

गणपत पार्टे - 9423033809

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate