অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साहसाचा आनंद

साहसाचा आनंद

केवळ व्याघ्रदर्शनाने समाधानी न होणाऱ्या पर्यटकांसाठी नागपूरपासून अवघ्या 40-50 किलोमीटरवर असलेली चेरी फॉर्म आणि त्याच ठिकाणी वसलेले ॲडव्हेंचर व्हिलेज म्हणजे निसर्गसाहस अनुभवण्याचा उत्तम पर्याय आहे. सीएसी ऑलराउंडरचे जनक अमोल खंते यांनी पर्यटकांसाठी ते उपलब्ध करून दिले आहे. नागपूरपासून अवघ्या दीड तासाच्या अंतरावर असलेल्या रामटेक येथे हे ॲडव्हेंचर व्हिलेज उभारण्यात आले आहे.

पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, पॅरासिलिंग याबरोबरच एटीव्ही मोटरबाईक, छोटासा ट्रॅक्टर आणि एवढेच नव्हे तर सायकलिंगचा आनंद येथे घ्यायला मिळतो. या साहसी बेटावरील कर्पूरबावरी हे ठिकाण म्हणजे जणू स्थलांतरित पक्ष्यांचे स्वर्ग. पॅराग्लाईड फ्लॉयकॅचर हा दुर्मीळ पक्षी येथेच पाहायला मिळतो. कर्पूरबावरीचे एकावर एक दगड रचून उभारलेले हजारो वर्षापूर्वीचे जुने मंदिर, या मंदिराच्या चौकटीत साचलेले पाणी आणि त्या पाण्यावरचे आपलीच नव्हे तर झाडे, पानाफुलांची सावली अनुभवता येते. चेरींनी भरभरलेल्या झाडांच्या मध्ये टाकलेल्या तंबूत एकाचवेळी तब्बल 300 साहसी पर्यटक राहू शकतात. रात्रीच्या वेळी या तंबूच्या खिडक्यातून पहाडावर उभा असलेला चंद्र अनुभवण्यात वेगळाच आनंद मिळतो.

हवाई साहसी कलाकृती

पॅरासेलिंग, पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग सोबतचा हॉट एअर बलूनचा थरार पर्यटकांना पाणी आणि पहाडाच्या मध्यात अनुभवता येतो. सुरक्षेचा संपूर्ण ताफाच सीएसी ऑलराउंडर या संस्थेजवळ उपलब्ध असल्यामुळेच पर्यटक पहिल्यांदा या कलाकृती करत असले तरीही त्याचा मनमुराद आनंद लुटतात. विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये रोवणी करताना उडवला जाणारा चिखल, त्यानंतर निघणारे धानाचे तुरे, त्यावर आलेला पिवळा मोहर आणि हे सर्व हजारो किलोमीटर दूर अंतरावरून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून अनुभवताना निसर्गाचे एक वेगळे रूप पाहायला मिळते. साहसासोबत ग्रामीण संस्कृतीची ओळख होते. त्याच वेळी दोन झाडांना बांधलेल्या दोरीचा केलेला सेतू आणि त्या सेतूवरून समोर सरकत जाणे हाही थरारच असतो.

पर्यटक या ठिकाणी आल्याबरोबरच त्याला चहा, नाश्ता, यानंतर साहसी कलाकृती आणि या कलाकृती करून, दमूनभागून आल्यावर गावातील, रुचकर जेवण. रात्री शेकोटी पेटवून कॅम्प फायर, अशा अनेक गोष्टी पर्यटकांना सीएसी ऑलराउंडरच्या एका छताखाली अनुभवता येतात. पर्यटकांना सर्व माहिती देण्यापासून तर त्यांच्याकडून साहसी कलाकृती करून घेण्यापर्यंत आणि पर्यटकांच्या आदरतिथ्यात संचालक अमोल खंते आणि त्यांची चमू सदैव तत्पर असते. 

लेखक - अनिल गडेकर
जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर
स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate