অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एमपीएससी-महाराष्ट्राचा इतिहास

बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन या विषयामध्ये आपल्या शालेय विषयातले इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रसारखे बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटणारे विषय असतात, पण हेच विषय आपल्या पुढच्या अभ्यासाचा आणि आयुष्याचा पाया आहे.  त्यात प्रामुख्याने १८८५ ते १९४७ पर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींचा समावेश होतो. यात खालील घटकांचा समावेश होतो. मुख्यत्वे 'महाराष्ट्राच्या इतिहासा'चा प्रभाव जाणवतो.
० महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा
० महाराष्ट्रातील आर्थिक सुधारणा
० राजकीय पुढाऱ्यांचे कार्य/ समाजसुधारकांचे कार्य
० वर्तमानपत्रे व शैक्षणिक संस्थांचे कार्य
० महाराष्ट्रातील चळवळी
या सर्व घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा

१९ व्या शतकात सामाजिक जागृतीची सुरुवात महाराष्ट्र व बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यात प्रामुख्याने प्रार्थनासमाज (न्या. रानडे), आर्य समाज (स्वामी दयानंद सरस्वती) व सत्यशोधक समाजाची (महात्मा फुले) स्थापना महाराष्ट्रात झाली. नंतरच्या काळात थिऑसॉफिकल सोसायटी (डॉ. अ‍ॅनी बेझंट), रामकृष्ण मिशन (स्वामी विवेकानंद)च्या माध्यमातून महाराष्ट्रातील उपेक्षित, कष्टकरी व दलित समाजासाठी विशेष कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीसोबतच बहुजन समाजाचा विकास व्हावा म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली.

आर्थिक सुधारणा

ब्रिटिश काळात मुंबई हे कापूस व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. १८८० साली नारायणराव लोखंडे यांनी कामगारांसाठी मिल हॅण्ड असोसिएशन सोसायटीची स्थापना केली. १९०५ साली लॉर्ड कर्झनने उद्योगधंदे, व्यापार व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी केल्या. १९२० मध्ये टाटांचा जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे सुरू झाला.

महाराष्ट्रातील पहिली कागद गिरणी 'डेक्कन पेपर मिल' १८८७ मध्ये सुरू झाली. २३ डिसेंबर १९४० रोजी वालचंद हिराचंद या महाराष्ट्रीय उद्योजकाने 'हिंदुस्थान एअरक्राफ्ट' ही विमान कंपनी स्थापन केली. थोडक्यात, स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्र सामाजिक व आर्थिक सुधारणेत देशात आघाडीवर होता. या घटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये या सुधारणांना कारणीभूत असणाऱ्या संघटना, त्यांची स्थापना, संघटनेशी संबंधित नेते याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात.

राजकीय पुढारी व समाजसुधारकांचे कार्य

स्वातंत्र्यलढय़ात सहभागी असलेले महाराष्ट्रातील राजकीय पुढारी व समाजसुधारक यांच्या नेतृत्वावर आधारित प्रश्न विचारले जातात. जसे- 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' या आशयाचा 'केसरी'तून लेख लिहिणारे लोकमान्य टिळक, महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले, न्या. महादेव गोविंद रानडे, 'मुंबईचा सिंह' म्हणून ओळखले जाणारे फिरोजशहा मेहता, भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी, 'भूदान चळवळी'चे नेते विनोबा भावे, मातृभूमीसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे स्वा. सावरकर यांसारख्या नेत्यांनी स्थापन केलेल्या संघटना, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांनी सुरू केलेल्या चळवळी, त्यांचे जन्मवर्ष, जन्मठिकाण याबाबत प्रश्न विचारले जातात.

वर्तमानपत्रे व शैक्षणिक संस्था

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रवादाची भावना निर्माण करणाऱ्या घटकांपैकी महत्त्वाचे घटक म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांत सुरू झालेली वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके व समाजसुधारकांनी सुरू केलेल्या विविध शैक्षणिक चळवळी. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतून पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू केले.

लोकहितवादींनी 'शतपत्रे', 'प्रभाकर' मासिकातून प्रसिद्ध करून राष्ट्रवादाला चालना दिली. टिळक-आगरकरांनी 'केसरी', 'मराठा' व 'सुधारका'तून राजकीय स्वातंत्र्याचा व समतेचा पुरस्कार केला. गांधीजींनी 'यंग इंडिया' साप्ताहिकातून इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला.

या राष्ट्रवादी चळवळीसोबत १८४८ साली महात्मा फुलेंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. १८८० व १८८१ साली आगरकरांनी अनुक्रमे न्यू इंग्लिश स्कूल व फग्र्युसन कॉलेजची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी शैक्षणिक संस्था काढून मोठय़ा प्रमाणावर वैचारिक क्रांती घडवून आणली. या सर्वावर अनेक प्रश्न विचारले जातात.

महाराष्ट्रातील चळवळी

यात प्रामुख्याने महात्मा फुलेंनी सुरू केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना एकत्र आणून त्यांच्या हक्काबाबत जागृतीचे केलेले कार्य, त्यांनी स्थापन केलेली 'इंडिपेंडंट लेबर पार्टी', महाड येथे केलेला 'चवदार तळ्याचा सत्याग्रह', आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी केलेल्या क्रांतिकारी चळवळी, १८५७ च्या उठावातील तात्या टोपे, नानासाहेब पेशवेंसारखे क्रांतिकारी नेते, १९१३ साली लाला हरदयाल यांनी केलेली 'गदर पार्टी'ची स्थापना, स्वा. सावरकरांनी स्थापन  केलेली 'अभिनव भारत संघटना', चापेकर बंधूंचे कार्य, राष्ट्रीय क्रांतिकारक चळवळीतील विविध संघटना, क्रांतिकारकांनी लिहिलेली पुस्तके, आत्मचरित्रे त्यांनी आखलेले काकोरी कट, चितगाव कटासारख्या घटना, फासावर गेलेले क्रांतिवीर यांसारख्या अनेक घटनांवर प्रश्न विचारले जातात.

भारतातील विविध कामगार संघटना, त्यांचे नेते, 'मिरज खटला', आयटक व इंटकसारख्या संघटनांची स्थापना, शेतकरी चळवळी, दुष्काळी काळात सारा वसुलीबाबत इंग्रजांनी अवलंबलेले सक्तीचे धोरण, त्यातून १८७५ मध्ये डेक्कनचे दंगे झाले.

सेनापती बापट यांनी 'मुळशी सत्याग्रह' सुरू केला. आदिवासींच्या उठावाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले, भिल्ल, कोळी, सावंत यांनी इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्रात उठाव केला. त्याचे क्षेत्र व कार्य याबाबत प्रश्न विचारले जातात.
यासाठी आपणास जयसिंगराव पवारलिखित 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास' हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे, याशिवाय पाचवी ते बारावीची इतिहासाची क्रमिक पुस्तके, महात्मा गांधी 'माझे सत्याचे प्रयोग', स्टडी सर्कलची विविध पुस्तके यांचा आपणास सदरच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोठय़ा प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.

 

स्रोत : महान्यूज

 

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate