‘आयकॉन’ या ग्रीक संज्ञेचा अर्थ प्रतिमा असा होतो. संकेताने त्यास धार्मिक चित्रे असा अर्थ प्राप्त झाला. आयकॉन चित्रांत कुमारी मेरी, येशू ख्रिस्त तसेच अन्य ख्रिस्ती संत यांसारखे विषय हाताळले जात. चर्चचा एक अपरिहार्य भाग म्हणून त्यांना धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. तसेच त्यांची निर्मिती हे पवित्र कार्य मानले गेले. ही चौकटचित्रे भित्तिचित्रांपेक्षा भिन्न असत. बायझंटिन काळातील कुट्टिमचित्रांच्या (मोझेइक) व भित्तिलेपचित्रांच्या (फ्रेस्को) परंपरेतून आयकॉन चित्रांचा विकास झाला.
प्रारंभीची म्हणजे दहाव्या शतकापूर्वीची फार थोडी आयकॉन चित्रे सापडतात. बायझंटिन परंपरेत साधारणत: १४५३ पर्यंत आयकॉनची निर्मिती वैपुल्याने होत होती. कालांतराने बायझंटिन आयकॉनच्या वारशातून रशियन आयकॉन चित्रांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली व ती साम्यवादी क्रांती काळापर्यंत टिकून होती. आयकॉन चित्रे आशयआविष्काराच्या दृष्टीने अत्यंत सांकेतिक व साचेबंद होती. तथापि मध्ययुगीन चित्रकलेच्या क्षेत्रात रशियन आयकॉन महत्त्वाची मानली जातात.
रुबलेव्ह (सु. १३७० - १४३०) व त्याच्या संप्रदायातील इतर चित्रकार यांच्या काही आयकॉन चित्रांत श्रेष्ठ प्रतीचा भावनाप्रधान व कलात्मक आविष्कार आढळतो. ओल्ड टेस्टॅमेंट ट्रिनिटी (१४११) हे त्यांपैकी एक उत्तम उदाहरण. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमधील आयकॉनॉस्टॅसिस या प्रकारचा आडोशीपट आयकॉन चित्रांनी सजविलेला आहे.
संदर्भ: 1. Kondakov, N. P.; Trans. Minns, The Russian Icon, London, 1927.
2. Lossky, V. & Ouspensky, L. The Meaning of Icons, Boston, 1956.
3. Rice, T. T. Russian Icons, London, 1963.
4. Rice, T. T. Ed. Icons, London, 1962.
लेखक : श्री. दे. इनामदार
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. '...