অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इस्लामी वास्तुकला

इस्लामी वास्तुकला

इस्लामी वास्तुकलेवर इस्लामी धर्मकल्पनांचा आणि इस्लामच्या प्रादेशिक विस्ताराचाही प्रभाव आहे. इस्लामी वास्तूची जी एक विशिष्ट घडण झाली, तिचे प्रादेशिक वर्गीकरण सामान्यत: पुढीलप्रमाणे करता येईल :

  1. सायरो ईजिप्त.
  2. मेसोपोटेमिया (इराक) व पर्शिया (इराण).
  3. उत्तर आफ्रिका आणि अँडलूझीया म्हणजे मुस्लिम स्पेन.
  4. तुर्कस्तान.
  5. भारत.

मशिदी, दर्गे, उद्याने, राजवाडे, शिक्षणसंस्था (मदरसा), शासकांची स्मारके, विजयस्तंभ, विजयद्वारे, भव्य अतिथिगृहे, रुग्णालये, नृत्यगृहे या वास्तुप्रकारांनी इस्लामी राज्यकर्त्यांनी आपली नगरे सजविली. त्यांच्या उभारणीत त्या त्या प्रदेशांतील कलाकारांनी आपापल्या वैशिष्ट्यांची भर घातली. धातूंचे जाळीदार दीप, सजविलेले उंची गालिचे, नक्षीकामाने नटविलेली सुरया, थाळ्या, डब्या यांसारखी पात्रे; त्याचप्रमाणे कलाकुसरीने भूषविलेले पोषाख, फुलदाण्या, अत्तरदाण्या यांसारख्या कलात्मक वस्तूंच्या सान्निध्यात रंगलेले अरबांचे जीवन हा इस्लामी लौकिक वास्तुनिर्मितीचा गाभा आहे. तंबूपासून राजवाड्यापर्यंत याच जीवनाचा स्वर उमटला आहे. इस्फाहान येथील राजगृह, अल्-हम्ब्राचा राजवाडा, फतेपुर सीक्रीचे महाल, दिल्लीतील मोगल राजवाडे इ. वास्तूंत हाच स्वर आढळतो.

इस्लामच्या उदयापूर्वी यूरोपात विकसित झालेल्या ग्रीक व रोमन वास्तुकलांचे संमिश्र स्वरूप ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांत दिसून येते. जेरूसलेम व दमास्कस या ठिकाणी इस्लाम व ख्रिस्ती धर्मांचे संघर्ष प्रथम झाले. ख्रिस्ती बॅसिलिका व चर्च यांचे मशिदीत रूपांतर करण्यात आले. त्याचप्रमाणे पाडण्यात आलेल्या ख्रिस्ती धार्मिक इमारतींच्या अवशेषांतून मशिदी व स्मारके उभारण्यात आली. संगमरवरी स्तंभ, तुळ्या, लाकडी छते ही मुख्यत: त्यांमध्ये वापरण्यात आली. ग्रीकांच्या डोरिक, आयोनिक यांसारख्या स्तंभरचनांत रोमनांनी नटवेपणा आणला व त्यांच्यामध्ये कमानीची वास्तुरचना गुंफून रोमन वास्तुकलेस आगळे स्वरूप दिले. पृष्ठभागास अलंकृत करण्यासाठी ग्रीक वास्तूच्या भौमितिक आकारविशेषांचे रोमनांनी संवर्धन केले.

लाकडी बांधकामावर संरक्षक कवच देण्यासाठी संगमरवरी जाळ्या, ब्राँझचे पत्रे; जमीन, भिंती, छते यांवर सुशोभित आवरण चढविण्यासाठी कुट्टिमचित्रण; काँक्रीटच्या ओतीव विविध आकारांच्या घुमटांवर त्याचप्रमाणे भिंतींवर संगमरवरी लाद्यांचे आवरण अथवा विविध आकारांच्या पक्क्या भाजलेल्या चमकत्या रंगदार विटांचे अस्तर इ. विशेष रोमन वास्तूंत  अतिशय कौशल्याने योजण्यात आले होते. या रोमन वास्तूंचा प्रभाव जेरूसलेम व दमास्कस येथील इस्लामी वास्तूंवर प्रामुख्याने दिसून येतो. जेरूसलेमचा गिरिघुमट (डोम ऑफ द रॉक) या दृष्टीने उल्लेखनीय आहे. इराण-इराकमध्ये ज्या मशिदी उभारल्या गेल्या, त्यांवर पारशी लोकांच्या अग्‍निमंदिराची छाप आहे. स्तंभांवर वृषभमुखाची शिल्पे असून मशिदीच्या प्रार्थनादालनावरील लाकडी तक्त्यांच्या नक्षीकामात पर्शियन राजांच्या दरबारदालनाचे अनुकरण केलेले दिसते.

इराक आणि इराण येथील वास्तुरचनेत विटांची विविध घुमटाकृती छते, भिंती, कमानी, चुन्याचे गिलावे व त्यांवर चुनेगच्चीचे शोभिवंत नक्षीकाम हे विशेष आढळतात. मशिदीच्या उभारणीत कमानी, स्तंभ, तुळया, विटांच्या भिंती व त्यांवर चुन्याचे गिलावे यांचा वापर करण्यात आला. मशिदीच्या आवारात मनोरा बांधण्यासाठी ‘झिग्‌रात’ या बॅबिलोनियातील वास्तूच्या मनोऱ्याचा नमुना स्वीकारलेला  होता. इब्‍न तुलून या सुलतानाने बांधलेली कैरो येथील भव्य मशीद इस्लामी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. या मशिदीच्या प्रार्थनादालनात विटांचे उभार ठराविक अंतरांवर योजून त्यांवरील विटांच्या टोकदार कमानींवर लाकडाचे छत अधिष्ठित केले आहे. दोन कमानींमध्ये परत टोकदार कमानीचे विवर योजल्यामुळे विटांच्या वास्तुरचनेतील अवजडपणा दूर झाला. संगमरवरी जाळ्यांच्या खिडक्या या मशिदीत वापरण्यात आल्या.

मुस्लिम स्पेनमधील इस्लामी वास्तुरचनेत कमानीचा विविध प्रकारे उपयोग केला आहे. प्राय: घोडनालेच्या आकाराची कमान व धावती महिरप यांवर भर होता. सेव्हिल येथील विजयमनोऱ्यावर धावती महिरप आढळते. महिरपींची गुंतवण व तीतून प्रकट होणारे नयनरम्य धावते आकार वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

अल् हम्ब्रा येथे खलीफासाठी बांधलेला राजवाडा इस्लामी वास्तूच्या वैभवाची व सौंदर्याची झलक दाखवितो.

ऐसपैस फरसबंद प्रांगणाभोवती कमानींच्या व्हरांड्यांनी जोडलेली न्यायदानाची दालने, दरबार, हमामखाने, अतिथिगृहे, लाकडी कातीव खांबांवर विसावलेल्या कमानी, धावते आकार दिलेल्या कमानी, प्रांगणाच्या मध्यभागी असलेले जलाशय किंवा सिंहाच्या आकारांची कारंजी, कमानींच्या लाकडी कामावर सुवर्णरंगाने सुशोभित केलेले गिलावे या सर्वांच्या परिणामाने मृगजलाचा पूर्णाभास निर्माण करणारी वास्तू उदयास आली.

सुलतान हसन याने कैरो येथे उभारलेली मशीद (सु. १३६२) इस्लामी वास्तूच्या प्रगतीचा पुढील टप्पा होय. तिच्या वास्तुयोजनेतील मदरसा व कबर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संयोजनामुळे ही मशीद शिक्षणाचे पावित्र्य, धर्माची गूढता, मृत्यूनंतरची शाश्वत शांती यांचा प्रत्यय देणाऱ्या वातावरणाने भारलेली आहे. या मशिदीचे मनोरे भव्य असून सुलतानाच्या थडग्यावर बांधलेल्या घुमटाशी त्यांनी आकर्षक समतोल साधलेला आहे. भिंतीच्या पृष्ठभागापासून पुढे झेपावणारी आडवी पट्टी हिमस्फटिकी कोनाड्यांच्या रांगांनी तोलून धरली आहे. इस्लामी वास्तूंत हिमस्फटिकांचे कोनाडे प्रामुख्याने छतांस शोभिवंत करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. कैरो येथे बांधलेल्या अल् अकमार या मशिदीच्या दर्शनी भागावरील चिरेबंदी काम शिंपली कोनाडे वापरून सुशोभित केले आहे.

हिमस्फटिकी कोनाडे दिल्ली येथील कुतुबमीनारच्या सज्‍जांना तोलून धरण्यासाठी वापरले आहेत. कॉर्दोव्हा (स्पेन) येथील जामी मशिदीत खांब एकमेकांवर उभारले असून त्यांच्या स्थैर्यासाठी शिरोभागी कमानींची गुंफण योजिली आहे. इस्लामी वास्तूचा अंतर्बाह्य प्रभाव कमानींवर अवलंबून आहे. कमानींच्या विविध दिशांना नजर सारखी धावती राहते व त्यामुळे वास्तूस गतीचा दर्शनी भाव प्राप्त होतो. या मशिदीचा उल्लेख भारतात गुलबर्गा व मांडू येथील मशिदींच्या शिलालेखांत आढळतो. चिरेबंद भिंतीचे दर्शनी भाग नयनरम्य करण्यासाठी बांधकामात विविध रंगांचे दगड वापरून त्यांची आकारयोजना छायाप्रकाशाच्या संयोगात उठावदार केली आहे. दगडी कमानींमधील सांधे शोभिवंत केले आहेत.

इस्फाहान या ठिकाणी इस्लामी वास्तुकलेचा उत्कर्ष झाल्याचे दिसून येते. तेथील वीटकामात फार शोभिवंतपणा आला. भिंतीच्या दर्शनी भागावर विविध भौमितिक आकारांत विटा रचण्यात आल्या. घुमटावर रंगीत चकाकणारे स्फटिकपोताचे कुट्टिमचित्रण विविध भौमितिक आकारांच्या गुंफणीत योजून वास्तुरचनेत एक नवीन क्षेत्र निर्माण करण्यात आले. त्याचप्रमाणे भिंतीस रंगीत व चकाकणाऱ्या पानाफुलांच्या आकारांनी नटविलेल्या पातळ चौकोनी विटांचे अस्तर लावण्यात आले. इस्लामी वास्तूत कायम स्वरूपाची रंगयोजना आल्यामुळे तीमधील परिणामकारक वातावरण अमर झाले आहे. इस्फाहान येथील भव्य कमानीचे प्रवेशद्वार, त्याच्या छतासाठी योजिलेले व त्या कमानीच्या चौकटीत एकजीव झालेले अर्धघुमट, या कमानीच्या पाठीमागून ऊर्ध्वगामी होणारे घुमट यांतून राजशाही भारदस्तपणा, रुबाब, ऐश्वर्य, कलासक्ती यांचे दर्शन घडते. भारतातील बुलंद दरवाजा (आग्रा), मशिदींची व थडग्यांची प्रवेशद्वारे, विजापूरच्या भव्य शाही इमारती यांच्या रचनेचे इस्फाहानमधील वास्तूशी फार साम्य आढळते.

इस्तंबूल (तुर्कस्तान) येथील सुलेमानी या मशिदीच्या वास्तूवर बायझंटिन काळात बांधलेल्या सांता सोफिया या भव्य चर्चची छाप थोड्याफार फरकांनी आढळून येते. मशिदीच्या प्रांगणाभोवती ओवर्‍यांप्रमाणे खोल्या, प्रार्थनादालनावर भव्य घुमट व घुमटास तोलून धरण्यासाठी त्याभोवती विटांचे पसरट पायाचे उभार ही या मशिदीची वैशिष्ट्ये होत. घुमट पायथ्याशी पसरट आकाराचा आहे. स्थापत्यशास्त्राप्रमाणे घुमटाचा हा आकार तर्कशुद्ध आहे. इमारतीच्या स्थैर्यासाठी जे रचनात्मक भाग आवश्यक असतात, ते दर्शनी भागावर स्पष्टपणे दाखविल्यास इमारतीस एक आगळे सौंदर्य प्राप्त होते. आधुनिक वास्तुशास्त्राच्या या तत्त्वाचे दर्शन प्रस्तुत वास्तूत प्रामुख्याने घडते. या मशिदीच्या आवाराच्या चार कोपऱ्यांवर गोलाकार मनोरे आहेत. त्यांवरून ताजमहालाच्या डौलदार मनोऱ्यांची आठवण होते.

इस्लामी वास्तूंमध्ये मनोरे व घुमट यांनी एका विशिष्ट प्रकारे अवकाशछेद करून त्याची परिभाषा निर्माण केली आहे. या घुमटांचे दर्शनी आकार व कमानींचे आकार यांचा एकसंध मेळ आहे. इस्लामी वास्तूंमधील घुमटांचे आकार ईजिप्त, इराण येथील वास्तूंच्या घुमटरचनेतून उत्क्रांत होत गेले. जेरूसलेमच्या गिरिघुमटात लाकडी सांगाड्याचा द्विकवची घुमट आढळतो. बाह्य कवचावर सोन्याचे पत्रे व आतील कवचावर सुशोभित रंगीत गिलावे वापरले आहेत. त्याचप्रमाणे घुमटाच्या पायथ्याला झरोके ठेवून त्यांत रंगीत काचेची तावदाने योजून अंर्तभागांत विविध रंगांची काव्यमय प्रकाशयोजना केली आहे. द्विकवची घुमटरचना दिल्लीतील हुमायूनची कबर व आग्रा येथील ताजमहाल यांत योजिली आहे. या प्रकारचे घुमट उष्ण हवामानात फार हितावह असतात. चौकोनी क्षेत्रफळाच्या घनावरती वर्तुळाकार अर्धघुमट साकार करण्यासाठी कोनकमान किंवा हिमस्फटिकाकृती ऊर्ध्वगामी पसरत जाणारे कंगोरे चौरसाच्या कोपऱ्यात योजिले होते. घुमटावरील कलश-योजना मात्र हिंदुस्थानातच सुरू झाली.

ईजिप्तमधील घुमट शिरोभागी वक्राकार आहेत. इराणमध्ये घुमट शिरोभागी निमुळते आहेत. दोन्ही प्रकारचे घुमट गोलाकृती चबुतर्‍यांवर उचललेले आहेत. यांशिवाय उगमस्थानापासून थोडे फुगीर होऊन निमुळता असा कांद्यासारखा आकार धारण करणारे घुमट साकार झाले. हिंदुस्थानात हे घुमट मोठ्या प्रमाणात इस्लामी वास्तूत योजिले आहेत. अर्धगोलाकृती घुमट हे हिंदूंच्या वास्तूतून इस्लामी वास्तूत पूर्णत्वास गेले.

इस्लामी वास्तुकलेचा आरंभ सातव्या शतकात झाला. सोळाव्या शतकापर्यंत ती विकसित होत गेली. इस्लामी सत्ता भारतात साधारण: अकराव्या शतकात स्थापन होऊन एकोणिसाव्या शतकापर्यंत टिकून राहिली. या दीर्घ कालखंडात भारताबाहेर इस्लामी वास्तूंत जी उत्क्रांती झाली, तिचे पडसाद भारतातील इस्लामी वास्तूत उमटले आहेत. भारतीय वास्तुशास्त्रज्ञांनी भारतात इस्लामी वास्तूची निर्मिती करताना इराणी घुमट, कमानी, मनोरे, झरोके या परदेशी वास्तुविशेषांची पूर्ण ओळख करून घेतली व त्यांना खास भारतीय स्वरूप दिले. वास्तूला विविध शिल्पांचे भरघोस अलंकार देण्यात भारतीय कलाकार कसलेले होते. धार्मिक प्रतिबंधामुळे इस्लामी वास्तूत मानव, पशू, पक्षी यांच्या शिल्पाकृतींचे दर्शन घडत नाही. त्यामुळेच पाने, फुले, स्फटिकांची नक्षी, भौमितिक नक्षी यांनी इस्लामी वास्तू नटविलेली दिसते. इराणी, स्पॅनिश महिरपी व स्पॅनिश नालाकृती असे कमानींचे त्रिविध प्रकार तीत प्रामुख्याने आढळतात.

इतिहासकारांच्या मते महिरपी कमानीचा प्रकार भारतातूनच इ. स. पू. काही शतके स्पेनला गेला असावा. टोकेरी कमान व महिरपी कमान भारतीय इस्लामी वास्तूंत प्रामुख्याने रचनात्मक व शोभिवंत कामासाठी योजिली आहे. तैमूरलंगाच्या स्वारीनंतर (१३९८) भारतातील इस्लामी वास्तुरचना खास प्रादेशिक वास्तुशैलींनी प्रभावित झाल्याचे दिसते. बंगाल, माळवा, गुजरात, दख्खन अशा भिन्न प्रदेशांत भिन्न प्रकारे तिचा विकास झाला. विजापूरकडील इस्लामी वास्तुरचनेवर द्राविडी वास्तुशैलीची छाप आहे. अकबर व शहाजहान यांसारख्या मोगल सम्राटांच्या कारकीर्दीत भारतातील प्रादेशिक वास्तुशास्त्रज्ञांना व कलाकारांना एकत्रित येऊन किल्ले, राजवाडे, शहरे, मशिदी, कबरी बांधण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यामुळे राजपूत, बंगाली, गुजराती इ. वास्तुशैलींचा संयोग होऊन इस्लामी वास्तूस भारतात वैशिष्ट्यपूर्ण स्वरून प्राप्त झाले.

भारतातील सुरुवातीच्या कालखंडातील इस्लामी वास्तू भरदार व मर्दानी आहेत. मांडू व धार येथील इस्लामी वास्तूंत प्रमाणबद्धता व डौलदारपणा आहे. जहाजमहाल (मांडू) या इमारतीत इराणी घुमटाबरोबर जयपुरी कोनाकृती घुमट असून त्यामुळे सबंध वास्तुरेखाच डौलदार बनली आहे. तीत टोकेरी कमानी चौकटीच्या साच्यात शिस्तबद्ध बसविल्या आहेत. त्यामुळे वास्तूची लयबद्धता स्पष्टपणे जाणवते. देवळातील गर्भगृहावर उत्तुंग शिखरे योजून त्यांना उठावदार केले आहे. हेच तत्त्व मशिदीच्या प्रार्थनादालनातील महिरप विभागास योजून मशिदीचा मध्य प्रवेशभाग ऊर्ध्वगामी केला आहे. अहमदाबाद येथील जामी मशिदीचे उदाहरण भारतीय विचारप्रणालीचे दर्शन घडविते. थडग्यात चिरनिद्रा घेत असलेले मृत देह पवित्र मानून ह्या थडग्यावरती उत्तुंग घुमट योजिले आहेत. इब्राहिम रोझा (विजापूर), हुमायूनची कबर (दिल्ली), ताजमहाल (आग्रा) इ. वास्तूंत हेच तत्त्व जाणवते. अकबराने फतेपुर सीक्री बांधताना बौद्ध धर्माच्या विहारांप्रमाणे पंचमहालावर संस्कार केले आहेत. त्याच धर्तीवर सिकंदरा येथे अकबराची कबर जहांगीराने पूर्ण केली. शेषशायी विष्णूच्या कल्पनेचे अनुकरण अकबराने दिवाण-इ-खास यात केले आहे.

दालनातील मध्यभागी असलेल्या खांबावर सिंहासन ठेवून राज्यकारभार करण्याची धाटणी हे दिवाण-इ-खासचे वैशिष्ट्य. त्यांचेच उत्क्रांत रूप आग्रा व दिल्ली येथील मोगल किल्ल्यांतील दिवाण-इ-आम व दिवाण-इ-खास या वास्तूंत दिसून येते. फतेपुर सीक्रीत जोधाबाईच्या राजवाड्यात मंदिर उभारणे, हा प्रकार इस्लामी राज्यकर्त्यांच्या सहिष्णुतेचे उदाहरण होय. पवित्र धर्मस्थाने उंच चबुतऱ्यावर अधिष्ठित करून त्यांचे पावित्र्य मनावर बिंबविण्याचे वास्तुतत्त्व हिंदू देवालयात दिसते. हेच तत्त्व कबरी, मशिदी यांनाही लावण्यात आले. मांडू, जौनपूर, दिल्ली येथील जामी मशिदी, विजापूरचा गोलघुमट, इब्राहिम रोझा, आग्र्याचा ताजमहाल, दिल्लीची हुमायूनची कबर या वास्तूंत हा भारतीय पवित्रपणा जाणवतो. अहमदाबाद येथील मनोरे जैन देवालयांच्या चबुतऱ्याच्या शिल्पाची आठवण देतात.

मुख्य घुमटाभोवती चार बाजूंच्या कोपऱ्यांत चार छोटे घुमट ही हुमायून कबरीची वास्तुरचना, त्याचप्रमाणे ताजमहालाची अशाच धाटणीची वास्तुरचना भारतीय वास्तूतील ‘पंचरत्‍न’ या वास्तुतत्त्वाचा आविष्कार आहे, असे ई. बी. हॅवेल याचे मत आहे. मोगली किल्ले व त्यांतील राजवाडे, बागा, दालने यांच्या आलेखांत भारतीय नगररचनाशास्त्राचे पालन केले आहे. चंद्रशाला किंवा गच्चीच्या पडदीवर ठराविक अंतरांनी घुमटाकार छत्र्या योजून वास्तुरेषेस आकर्षकता आणली आहे. विजापूर, आग्रा, दिल्ली या ठिकाणच्या इस्लामी वास्तूंत हा प्रकार आढळतो. खिडक्यांतील जाळ्या, स्तंभ, तोरणे, छज्‍जा तोलणारे तीर यांच्या निर्मितीत इतकी विविधता आहे, की वास्तुदर्शन कधीच कंटाळवाणे होत नाही. अहमदाबाद येथील जाळ्या, फतेपुर सीक्रीतील पंचमहालाची दालने ही याची प्रमुख उदाहरणे होत. धार्मिक इस्लामी वास्तूंमध्ये सुशोभित नक्षीकामाबरोबर कुराणातील वचने त्याच शैलीत कोरलेली आहेत.

शांततेच्या व समृद्धीच्या मोगल काळात किल्लेकोटाच्या वास्तुरचनेत सुरक्षितपणावर भर देण्याऐवजी सौंदर्यात्मक नक्षीकामावर तो देण्यात आला. त्याचप्रमाणे वैभवाचे कलात्मक प्रदर्शन करण्यासाठी वास्तूचा अंतर्बाह्य पृष्ठभाग संगमरवरी अस्तरात व मौल्यवान रंगीत रत्‍नांची वा ‘अगेट’ सारख्या किंमती दगडांची त्यात गुंफण  करून सजविण्यात आला. त्यामुळे वास्तूस शृंगारलेल्या युवतीसारखे रूप प्राप्त झाले. ताजमहाल, मोती मशीद, जस्मीन बुरूज, शीशमहाल, इत्‌मद अल्-दौलाची कबर ही आग्रा येथील उदाहरणे याची साक्ष देतील. दिल्ली किल्ल्यातील हमामखाने, रंगमहाल, दिवाण-इ-खास यांत ही कला जास्त उत्कटतेने जाणवते. इटलीतील काही सुवर्णकार मोगल दरबारात होते. त्यांच्या कलेचा थोडाफार परिणाम या साजशृंगारावर झालेला आहे. मोगल अमदानीतील राजवाडे, कबरी, महाल या वास्तूंस जलाशय, कारंजी, बगीचे यांची कलात्मक जोड आहे. नदीच्या काठी मुख्यत्वे या इस्लामी वास्तू आढळतात. गुलाब, जस्मीन, अंगुर, सायप्रस यांचे बागेतील ताटवे भौमितिक आकारांत रचलेले असत. काश्मीर, लाहोर येथील बागा इस्लामी वास्तूच्या निसर्गदर्शी घटकांच्या विकासाचे प्रतीक होत.

संदर्भ:1. Brown, Percy, Indian Architecture (The Islamic Period). Bombay, 1959.

2. Creswell, K. A. C. Early Muslim Architecture, 2 Vols., London, 1932 – 41.

3. Creswell, K. A. C. The Muslim Architecture of Egypt, 2 Vols., London, 1952 – 1959.

4. Grabar, Olege; Hill, Derek,Islamic Architecture and its Decoration, London, 1964.

लेखक : कृ. ब. गटणे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate