অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निसर्गवाद – २

साहित्यातील व कलेतील या विचारप्रणाली एकोणिसाव्या शतकात विशेष प्रभावी होत्या. त्यांचा स्थूल परिचय पुढे दिलेला आहे.

साहित्यातील निसर्गवाद

एकोणिसाव्या शतकात फ्रान्समध्ये ही चळवळ उदयाला आली. साहित्यातील निसर्गवादात वास्तव वादाचीच बहुतेक लक्षणे अंतर्भूत आहेत; किंबहुना वास्तववादाचेच ते एक टोकाचे रूप म्हणता येईल. तथापि निसर्गवाद्यांची तात्त्विक भूमिका मात्र भिन्न आहे. विज्ञानाचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोण, लेखनाविषयाचे सूक्ष्म निरीक्षण, आनुवंशिकता आणि आसमंत यांचे परिश्रम पूर्वक उभे केलेले संदर्भ आणि अगदी काटेकोरपणाने पुरविलेले वर्णनातील विपुल तपशील निसर्गवादाला साहित्यात अत्यावश्यक वाटतात. विख्यात फ्रेंच समीक्षक, इतिहासकार आणि तत्त्वज्ञ  इपॉलित तॅन ह्याने आपल्या ला फाँतेन एसे फाब्ल (१८५३) आणि एसॅ स्यूर तीत-लीव्ह, इस्त्वार द् ला लितेरात्यूर आंग्‌लॅझ (१८६३–६४) अशा ग्रंथांतून एक वैशिष्ट्यपूर्ण साहित्यविषयक भूमिका मांडली होती. साहित्यकृतीची चिकित्सा करण्यासाठी लेखकाच्या संदर्भात ‘वंश’, ‘परिस्थिती’ आणि ‘क्षण’ ह्या तीन प्रमुख घटकांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे, अशी ती भूमिका होती. ‘वंश’ म्हणजे लेखकाचे आनुवंशिक गुण, ‘परिस्थिती’ म्हणजे त्याची सामाजिक, राजकीय व भौगोलिक पार्श्वभूमी आणि ‘क्षण’ म्हणजे ज्या विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत लेखक लिहित असतो ती. तॅनने मांडलेल्या ह्या वाङ्‌मयविषयक तात्त्विक भूमिकेचाच विकास निसर्गवादामध्ये झालेला दिसतो. जॉ. क्लोद बॅर्नार ह्याने १८६५ मध्ये अँत्रोद्युक्सियाँ आलेत्यूद द् ला मेदसीन एक्स्‌पिरिमांताल (इं. शी. अन इन्ट्रोडक्शन टू एक्सपरिमेंटल मेडिसिन) ह्या ग्रंथात मांडलेले विचारही निसर्गवादाला पूरक ठरले. तॅन आणि डॉ. क्लोद बॅर्नार ह्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन विख्यात फ्रेंच कादंबरीकार एमिल झोला (१८४०–१९०२) ह्याने निसर्गवादाची तात्त्विक भूमिका प्रथम मांडली. असे असले तरी, बाल्झॅक व गाँकूर बंधू ह्यांसारख्या काही फ्रेंच साहित्यिकांनी झोलाच्या आधीच निसर्गवादी चित्रणाचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने गाँकूर बंधूंची जेर्‌मिनी लासेर्त (१८६४) ही कादंबरी विशेष लक्षणीय आहे. आपल्या निसर्गवादी भूमिकेचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याच्या दृष्टीने झोलाने ‘ले रूगाँ माकार’ ह्या नावाची एक कादंबरीमालाच गुंफली आणि तीतून तत्कालीन फ्रेंच समाजातील शेतकरी–कामकरी वर्गांपासून राजदरबारी लोकांपर्यंतचे विस्तृत आणि सूक्ष्म असे समाजचित्रण केले. निसर्गवादी कादंबरीलेखनाची तुलना झोलाने शल्यशास्त्राशी केली. प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ ज्याप्रमाणे पदार्थांचे आपल्या इच्छेप्रमाणे नियंत्रण करून त्यांच्या परस्परांवर होणाऱ्या प्रतिक्रिया दाखवितो, त्याचप्रमाणे निसर्गवादी साहित्यिक साहित्याच्या प्रयोगशाळेत मानवी प्रकृतीवर आणि समाजजीवनावर प्रयोग करू शकतो, असे झोलाने मानले. आनुवंशिकता आणि आसमंत ह्यांतून आलेल्या एक प्रकारच्या नियतीवादाचा त्याने पुरस्कार केला. झोलाच्या निसर्गवादी लेखनाने प्रभावी झालेल्या साहित्यिकांत आल्फाँस दोदे, गी द मोपासां आणि योरिस कार्ल यूईस्‌मांस ह्यांचा समावेश होतो.

निसर्गवादाविरुद्धची प्रतिक्रिया १८९० पूर्वीच दिसू लागली. निसर्गवादी तंत्राचा एकारलेपणा टीकेचा विषय झाला. १८८३ मध्ये ब्ऱ्यूनत्येअर ह्या फ्रेंच समीक्षकाने ल रॉमां नात्युरालिस्त या नावाने निसर्गवादी चळवळीवर टीकेचा प्रखर हल्ला चढविला. १८९७ मध्ये झोलाच्या काही शिष्यांनीच एक जाहीरनामा काढून ह्या चळवळीविरुद्ध आपला आवाज उठविला आणि त्याच्या साहित्यातील सहेतूक अश्लीलतेवर टीका केली.

१८९० च्या सुमारास निसर्गवादाचा अस्त झाला, तरी त्यानंतरही नाटकादी क्षेत्रांत त्याचा प्रभाव काही प्रमाणात राहिलाच. उदा., आंरी बेक ह्याच्या नाट्यकृतींत. १८८७ मध्ये स्थापन झालेल्या ‘तेयात्र लिब्र’ (इं. शी. लिबरल थिएटर) या नाट्यसंघटनेनेही काही निसर्गवादी नाटके आवर्जून रंगभूमीवर आणली. सुप्रसिद्ध अस्तित्ववादी विचारवंत आणि साहित्यिक झां पॉल सार्त्र ह्याच्या साहित्यातूनही काही निसर्गवादी प्रवृत्ती समीक्षकांच्या प्रत्ययास आल्या आहेत.

कलेतील निसर्गवाद

निसर्गाशी आत्यंतिक जवळीक साधणे, यालाच निसर्गवाद म्हणता येईल. वास्तववादी चित्ररचनेला निसर्गवादी चित्रे म्हणण्याचा प्रघात होता. परंतु कालांतराने निसर्गवाद या संज्ञेचा अर्थ बराच वेगळा झाला. समकालीन घटना चित्रित करणाऱ्या चित्रांना निसर्गवादी म्हणून संबोधण्यात येऊ लागले.

अगदी लहानसहान बाबतींतही निसर्गाचे हुबेहूब दर्शन घडविणे, या अर्थाने निसर्गवाद सतराव्या शतकापासून फ्रान्समध्ये जोपासला गेला. हा शब्द प्रथम प्रचारात आणला, तो ‘अकादेमी रोयाल द पेन्तूर’ या चित्रकारांच्या संस्थेने. झां ऑग्यूस्त अँग्र याच्या कलाकृती निसर्गवादी रचनेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असल्याची प्रशंसा चार्ल्स बोदलेअरने केली. झ्यूल कास्तान्यरी हा कलासमीक्षक वास्तववादाचा पुरस्कर्ता होता. त्याने वास्तववाद या शब्दाऐवजी निसर्गवाद हा शब्द वापरण्यास सुरुवात केली. निसर्गवाद चित्रकाराच्या दृष्टीने कला ही जीवनाच्या विविधतेचा आविष्कार असून निसर्गाची जोरकस आणि प्रसन्न प्रतिकृती निर्माण करणे हेच कलेचे कार्य होय, अशी त्याची निसर्गवादाची व्याख्या होती. निसर्गवादाची खरीखुरी जोपासना साहित्यिकांनी केली. एमिल झोलासारख्या निसर्गवादी लेखकांनी दृक्‌प्रत्यवादी चित्रकारांना भरघोस पाठिंबा दिला. त्यांच्या निसर्गवादी विचारसरणीशी जुळणाऱ्या अनेक वास्तववादी चित्रकारांची ते मुक्तकंठाने स्तुती करीत. ल्वी एदमाँ द्युरँती हा कलासमीक्षक निसर्गवादाचा पुरस्कर्ता होता. त्याने कलेतील निसर्गवादाची रूपरेषा तयार केली. नव्या युगातील व्यक्तिमध्ये पोषाख व सामाजिक रीतिरिवाज ही दोन्हीही, घरात आणि घराबाहेरही वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे, असे त्याचे ठाम मत होते. धर्मोपदेशक, व्यापारी, किसान, कामगार, सैनिक यांसारख्या समाजातील निरनिराळ्या क्षेत्रांतील व्यक्तींचे चित्रण त्या त्या क्षेत्रांतील दैनंदिन घटनांचे दर्शन घडविणारे असले पाहिजे, असा त्याचा आग्रह असे. राष्ट्रीय समारंभ, लग्नसमारंभ, सामाजिक घटना, सर्वसाधारण कुटुंबातील दृश्ये यांसारख्या नित्य घडणाऱ्या घटना अथवा प्रसंग दर्शविणाऱ्या चित्रांतून राष्ट्राचे समग्र जीवन प्रतीत होते, अशी त्याची श्रद्धा होती. निसर्गवादी चित्रकार फारच कमी आहेत, असे यूईस्‌मांसचे मत होते. चित्रातून सामाजिक जीवनाची अंगोपांगे चित्रित व्हावीत, असे त्याला वाटत असे. मान किंवा कूर्बे यांची चित्रे त्याला मुळीच मान्य नव्हती. झां फ्रांस्वा राफाएलीचा उल्लेख त्याने ‘गरीब जनता आणि महान आकाश यांचा चित्रकार’ असा केला होता. दगाबद्दल तर त्याने ‘फ्रान्समधील विद्यमान चित्रकारांतील सर्वश्रेष्ठ चित्रकार’ असे उद्‌गार काढले. द्युरँती आणि यूईस्‌मांस यांना अभिप्रेत असलेला निसर्गवाद चित्रातून निर्विवादपणे रंगवला, तो केवळ दगानेच. रोजच्या जीवनाचे यथातथ्य चित्रण त्याने आपल्या चित्रांतून केले. त्यामुळे निसर्गवादाला नवा अर्थ प्राप्त झाला. निसर्गवादी चित्रकारांनी दैनंदिन जीवनातील घटना ज्या ठिकाणी घडतात, त्या जागा—उदा., कारखाना, शेत किंवा घरातील निवाऱ्याची जागा—घटनास्थळ म्हणून उपयोगात आणून निसर्गवादी चित्रांतून मानवी व्यवहाराचे अकृत्रिम, निरलंकृत असे साधे व सरळ चित्रण केले.

अनेक देशांतून निसर्गवादी चित्रे निर्माण झाली आहेत. कारखान्यातील कृत्रिम प्रकाशात काम करणारे कामगार, शेतात काम करणारे शेतकरी, नदीकिनाऱ्यावरील नाविक अशा विविध विषयांवरील निसर्गवादी चित्रे जर्मनी, बेल्जियम, रशिया, हंगेरी, इंग्लंड इ. देशांतील चित्रकारांनीही रंगविली.

लेखक : वसंत परब , मनोहरराय सरदेसाय

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate