অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एद्वार माने

एद्वार माने

माने, एद्वार: (२३ जानेवारी १८३२३० एप्रिल १८८३). प्रख्यात फ्रेंच चित्रकार. चित्रकलेचे पारंपरिक संकेत झुगारून, त्याने आधुनिक चित्रकलेचा पाया घातला. पॅरिस येथे जन्म. मानेला चित्रकार होण्यास त्याच्या वडिलांनी प्रथम बराच विरोध केला. त्यांच्या आग्रहाखातर त्याने रीओ दे जानेरो येथे नाविक प्रशिक्षणाकरिता अर्जही केला; पण तेथील प्रवेशपरीक्षेत अपयश आल्याने त्याच्यावडिलांनी त्याला नाइलाजाने चित्रकार होण्यास संमती दिली. पॅरिसमधील एकोल दी बोजार्त या कलाशिक्षणसंस्थेत तॉमा कूत्यूर ह्या चित्रकाराच्या हाताखाली त्याने कलेचे शिक्षण घेतले (१८५०–५६). ह्याच काळात त्याने ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली ह्या देशांचा प्रवास करून जुन्या व श्रेष्ठ चित्रांच्या प्रतिकृती करून त्यांचा अभ्यास केला. तो १८५६ मध्ये पॅरिस येथे स्थायिक झाला.

त्याचे, स्वच्छंदी विषय पण धाडसी संकल्पना असलेले य्‌सिंथ ड्रिंकर (१८५९) हे चित्र सालाँ या अधिकृत कला-प्रदर्शनात नाकारण्यात आले. पुढे त्याने स्पॅनिश वैशिष्ट्ये दाखविणारी बरीच चित्रे काढली व १८६१ मध्ये त्याचे स्पॅनिश सिंगर हे चित्र सालाँमध्ये प्रदर्शित झाले व त्यासऑनरेबल मेन्शन हा पुरस्कार मिळाला. तेऑफील गोतिए या कवीने त्याची खूप प्रशंसा केली. पुढे अधिकृत कलादालनात चित्रे प्रदर्शित न झाल्याने, त्याने सालाँ दे रेफ्युजेस (नाकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन) या कलादालनात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविले. त्यातील त्याच्या लंचन ऑन द ग्रास (१८६३) ह्या चित्राने टीकेचे बरेच वादळ उठविले. पण त्यातील आधुनिक शैलीमुळे तो नवचित्रकार पिढीचा आदर्श ठरला. त्याचे ऑलिपिया (१८ ६३; पहा : मराठी विश्वकोश : खंड ७; चित्रपत्र ४७) हे चित्र तर फारच खळबळजनक ठरले व त्याला त्यामुळे फार टीका व जननिंदा सोसावी लागली. परिणामतः अत्यंत निराश मनःस्थितीत तो स्पेनच्या प्रवासास गेला. तेथे व्हेलात्थ्‌केथ व गोया ह्यांच्या चित्रांपासून त्याला खरी प्ररेणा मिळाली. ह्या प्रभावांतून त्याच्या पुढील चित्रांत फ्रेंच विषय आणि स्पॅनिश कलायंत्र व रचनाकौशल्य ह्यांचा सुरेख संगम पहावयास मिळतो.

त्याने काढलेले प्रसिद्ध लेखक एमिल झोला ह्याचे व्यक्तिचित्र (१८६८) अधिकृत कलादालनात प्रदर्शित झाले. ह्याच काळात झोलाने त्याच्यावर एक पुस्तक लिहिले व त्यात मानेचे लूव्हर मधील स्थान अटळ आहे, हे दाखविले. त्यानंतर मानेने बाह्य परिसरातील व्यक्तिचित्रे, उपाहारगृहांतील नृत्ये, समुद्रकिनाऱ्यावरील दृश्ये, नौकाशर्यती इ. विविध विषयांवर आपल्या प्रभावी शैलीत विपुल चित्रनिर्मिती केली. त्याद्वारे त्याला बरीच लोकमान्यता व लोकाश्रय मिळाला. ह्याच काळात त्याचा दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारांशी घनिष्ठ संबंध आला. त्यामुळे त्याच्या चित्रांतील रंगांत बराच चमकदारपणा आला. तसेच दृक्प्रत्ययवादी चित्रकारांनीही त्याच्यापासून प्रेरणा घेतली. तथापि मानेने दृक्‌प्रत्ययवादी चित्रकारांबरोबर आपल्या चित्रांचे प्रदर्शन कधी भरविले नाही. ह्याच काळात त्याने आधुनिक धर्तीवर काही ऐतिहासिक व धार्मिक चित्रे रंगविली. त्यांत द एक्सिक्यूशन ऑफ द एम्परर मॅक्सिमिल्‌न ऑफ मेक्सिको (१८६७), कॉम्बट ऑफ कीर्सार्ज अँडलाबॅमा (१८६४), डेड ख्राइस्ट विथ एन्जल्स(१८६४) व ख्राइस्ट मॉक्ड बाय द सोल्जर्स (१८६५) ही उल्लेखनीय आहेत.

त्याची धार्मिक विषयांवरील चित्रे सालाँमध्ये प्रदर्शित झाली. पण त्यांची प्रेक्षकांनी टरच उडवली. त्याने आपल्या काही चित्रांतून हलक्याफुलक्या आनंदी वृत्तीचा आविष्कारही केला. उदा., बॉन बॉक. १८७३ च्या सालाँ प्रदर्शनात ते नावाजले गेले. त्याने पॅरिसच्या जागतिक मेळाव्यात आपली ५० चित्रे प्रदर्शित केली. त्याचे आर्झंतई (१८७४) हे चित्र १८७५ मध्ये अधिकृत कलादालनात लागले; पण त्यावरही टीकेचे प्रचंड वादळ उठले. तरीही निराश न होता त्याने उपाहारगृहांतील संगीतजलसे, नृत्ये इ. विषयाच्या अनुषंगाने जीवनाचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या कलाकृती आपल्या समर्थ कुंचल्यातून निर्माण केल्या. या कालावधीतील त्याच्या द वेट्रेस (१८७९) व अ बार ट फॉलीस बर्गर (१८८२) या प्रमुख कलाकृती होत. त्यांपैकी अ बार ट फॉलीस बर्गर हे चित्र मानेची सर्वोत्कृष्टकलाकृती मानली जाते. त्यातील मध्यवर्ती स्त्रीप्रतिमेच्या चित्रणातील गूढता व अलिप्त भाव, तसेच चमकदार रंग व उत्कृष्ट पोत ह्यांचा एक अपूर्व संगम पहावयास मिळतो.

मानेला १८८१ मध्ये लीजन ऑफ ऑनर चे सन्माननीय सदस्यत्व मिळाले. पुढे त्याची प्रकृती खालावली, तरी त्याने रंगशलाका माध्यमात काही स्थिरवस्तुचित्रे काढली. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.मानेने रॅफेएल, तिशन, व्हेलात्थ्‌केथ, फ्रांस हाल्स इ. पारंपरिक चित्रकारांच्या कलाकृतींतून बरेच काही घेतले असले, तरी तो आपल्या काळातील एक अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेला चित्रकार होता; पण त्याला अधिकृत मानसन्मानांची ओढ होती. खंबीरपणे पारंपरिक नैतिक कल्पनांचा व चित्रणतंत्रांचा त्याग करून, रेखांकनाच्या साक्षात प्रभावातून व रंगाच्या अभिव्यक्तिक्षम गुणांद्वारे त्याने मानवाकृतींचे यथार्थ दर्शन घडविले. सौष्ठवपूर्ण रेखांकन, किंचित सपाट पातळी गाठणारे आकार, कुंचल्याचा कुशल व भावोत्कट वापर करण्याची सर्जनशील क्षमता ही त्याची वैशिष्ट्ये तत्कालीन कलेला प्रेरक ठरली. प्राचीन जपानी शैलीने प्रभावित अशा, कौशल्यपूर्ण शैलीचा वापर करून त्याने आधुनिक कलाप्रणालीचाप्रारंभ केलाआणि त्या प्रणालीला कालांतराने पॉल गोगँ, तूलूझ-लोत्रेक, आंरी मातीस इ. चित्रकारांनी पुढे चालना दिली.

संदर्भ : Schneider, Pierre, The World of Monet, New York, 1968.

लेखक :   वा. व्यं.करंजकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate