भव्य वास्तुशिल्पासाठी, विशेषत: कामशिल्पाकरिता, जगप्रसिद्ध असलेले भारतातील मध्ययुगीन नगर. ते मध्य प्रदेश राज्याच्या छत्तरपूर जिल्ह्यात छत्तरपूरच्या आग्नेयीस सु.२९ किमी., महोबाच्या दक्षिणेस सु. ५५ किमी. व पन्नाच्या उत्तरेस ४० किमी. वर असून, केन नदीच्या उजव्या तीरावर निनोराताल (खजुराहो सागर) नामक सरोवराच्या काठी वसले आहे. प्राचीन जेजाकभुक्ति अथवा जेजुकभुक्ति (बुंदेलखंड) ह्या प्रदेशात नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत राज्य करणाऱ्या चंद्रवंशीय राजपूत चंदेल्ल वंशाची खजुराहो ही राजधानी होती. मध्ययुगात कित्येक शतके हे विशाल व समृद्ध नगर प्रवाशांचे आकर्षण होते. दहाव्या ते बाराव्या शतकांच्या दरम्यान तेथे शैव, वैष्णव व जैन संप्रदायांची अनेक मंदिरे बांधली गेली. प्राचीन परंपरेनुसार तेथे अनेक तलाव व सु. पंच्याऐशी मंदिरे होती, असे उल्लेख सापडतात. तथापि सध्या फक्त चोवीस मंदिरे अवशिष्ट असून त्यांपैकी थोडी सुस्थितीत आहेत.
प्राचीन साहित्य, कोरीव लेख तसेच परकीय प्रवाशांची वर्णने ह्यांमधून खजुराहोची खजूरवाटिका, खर्जूरवाहक, खजूराहट्ट, खज्जूरपूर, कजुरा किंवा कजर्रा (कज्राओ) वगैरे भिन्न नामांतरे आढळतात. सुवर्णाचे दोन खजूरवृक्ष नगराचे सिंहद्वार विभूषित करण्यासाठी उभे केले होते, म्हणून त्यास खजूरवाहक हे नाव प्राप्त झाले असावे व त्याचेच पुढे खजुराहो असे रूपांतर झाले, असे म्हणतात. कदाचित कनिंगहॅमच्या म्हणण्याप्रमाणे ह्या भागात त्या वेळी खजुराची भरपूर झाडे असल्यामुळे हे नाव त्यास प्राप्त झाले असावे.
सु. २० चौ.किमी. असणाऱ्या ह्या प्राचीन नगराच्या आवारातील मंदिरे सर्वसाधारणत: पश्चिम, पूर्व व दक्षिण अशा तीन समूहांत विखुरलेली आढळतात. पश्चिम समूह बॅमिथा-राजनगर रस्त्याच्या पश्चिमेस, पूर्व समूह खजुराहो खेड्याजवळ व तिसरा समूह खजुराहो खेड्याच्या दक्षिणेस सु. ४·८० किमी.वर आहे. पश्चिम समूहात चौसष्ट योगिनी, लालगुआन, कंदरिया महादेव, देवी जगदंबी, महादेव, चित्रगुप्त, विश्वनाथ, पार्वती, लक्ष्मण, वराह, मातंगेश्वर, हनुमान. इ. मंदिरांचा समावेश होतो, तर पूर्व समूहात ब्रह्मा, वामन, जवेरी, घंटा (ई), पार्श्वनाथ, आदिनाथ, शांतिनाथ वगैरे मंदिरे अंतर्भूत होतात. दक्षिण समूहात दुलादेव व चतुर्भुज ह्या दोन मंदिरांचा समावेश होतो. ह्यांतील चौसष्ट योगिनींचे मंदिर हे सर्वांत प्राचीन (इ.स. ९००) असून, दुलादेव मंदिर हे चंदेल्लांच्या काळातील (इ.स. ११५०) असावे.
हे खजुराहो येथील सर्वांत जुने मंदिर काली देवतेला अर्पण केलेले आहे. त्यात काली व चौसष्ट योगिनींच्या मूर्ती होत्या. ५ मी. उंचीच्या आयताकृती चौथऱ्यावर मंदिर बांधले असून, हे एकच मंदिर पूर्णत: ग्रॅनाइट दगडांनी बांधलेले आहे.
खजुराहो येथील सर्वांत मोठे मंदिर. चौसष्ट योगिनींच्या उत्तरेस आहे. नागर वास्तुशैलीचे सर्व घटक येथे प्रकर्षाने आढळतात. हे मंदिर ३१ मी. लांब, २०·३ मी. रुंद व ३०·९ मी. उंच आहे. त्याच्या सभोवती बांधलेली चार उपमंदिरे आज जरी नष्ट झाली असली, तरी मूळ मंदिर सुस्थितीत आहे. त्याच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिराच्या भिंतींवर देवता, मकर, कीर्तीमुख, मिथुन, तपस्वी, अप्सरा, शार्दूल इत्यादींची शिल्पांकने आहेत. प्रवेशद्वारावरील सुंदर तोरण विविध मूर्तींनी अलंकृत केले असून, त्यातील संगीतकार व त्यांची वाद्ये, मगरी, मीलनोत्सुक तरुण-तरुणी, सुरसुंदरी, किन्नर व गंधर्व ह्यांच्या मूर्ती विलक्षण वेधक आहेत. अर्धमंडप, मंडप व महामंडप यांच्या छतांवर सुंदर नक्षीकाम असून, चारही बाजूंच्या भिंती, सर्व स्तंभ व गाभाऱ्याचे द्वार ही विविध देवता व अन्य प्रकारच्या शिल्पाकृती यांनी सुशोभित केलेली आहेत. मुख्यत्वे कलाकुसरीची स्तंभशीर्षे, चित्रविचित्र व्यंग्य मूर्ती, शार्दूल तसेच तीरशिल्पातील स्त्रियांच्या आकृत्या प्रमाणबद्ध व मोहक असून त्यांच्या चेहऱ्यांवरील उत्कट भावनाविष्कार हृद्य वाटतात. गर्भगृहांच्या गणेशपट्टीवर आणि द्वारांच्या बाजूंवरील शाखांत पुष्परचना, योगासनस्थ मुनी इत्यादींचे शिल्पांकन असून, द्वारांच्या दोन्ही बाजूंकडील स्तंभांच्या तळभागात मगरीवर आरूढ झालेली गंगा नदी आणि कासवावर आरूढ झालेली यमुना नदी ह्यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील पृष्ठभागावर देवदेवता, विविध अवस्थांतील प्रणयी युगुले, स्वर्गीय अप्सरा व व्याल ह्यांच्या असंख्य आकृत्या आहेत. कनिंगगहॅमने ह्या सर्वांची मोजदाद करून मंदिरात २४६ व बाहेर ६४६ मूर्ती आहेत, असे नमूद केले आहे.
कंदरिया महादेवाच्या उत्तरेस असणाऱ्या या मंदिरात मुळात विष्णूची मूर्ती होती; परंतु ती काढून तिथे काळ्या पाषाणाची काली देवतेची मूर्ती बसविलेली आहे. हे मंदिर कंदरिया महादेवापेक्षा लहान आहे. त्यास प्रदक्षिणापथ नाही. बाहेरच्या भिंतीवर शिल्पांकनाचे तीन पट आहेत. मात्र अधिष्ठान आणि जंघा यांवर कोरीव काम आढळत नाही. त्रिमुखी अष्टभुजांचा शिव व वराहरूपी विष्णू यांच्या मूर्ती विशेष उल्लेखनीय आहेत.
हे देवी जगदंबी मंदिराच्या उत्तरेस असणारे पूर्वाभिमुख मंदिर सूर्यदेवास अर्पण केलेले आहे. गर्भगृहात १·५ मी. उंचीची कलात्मक सूर्यमूर्ती असून तिचे कबंध, उरुभाग व पाय ह्यांमधून तिची सारथ्यविषयक निपुणता सूचित होते. मूर्तीच्या खाली सात अश्वांच्या आकृत्या आहेत. गणेशपट्टीवर या प्रकारचीच प्रतिकृती आहे. बाहेरच्या कोरीव कामात शिकारी दृश्ये, राजाची मिरवणूक, हत्तींच्या झुंजी व विविध मुद्रा दर्शविणाऱ्या नृत्यांगना यांच्या प्रतिमा आढळतात. ह्याशिवाय ब्रह्मा व सरस्वती, शिवपार्वती, विष्णू व लक्ष्मी तसेच वराह ह्यांच्या प्रतिमा मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीने लक्षणीय आहेत. गर्भगृहाच्या दक्षिण कोनाड्यात अकरा शीर्षे धारण करणाऱ्या विष्णूची प्रतिमा असून, मधली वगळता, उर्वरित प्रतिमांत त्याचे दशावतार दर्शविलेले आहेत.
ही पूर्वेकडे एकमेकांसमोर बांधलेली आहेत. त्यांच्या पायऱ्यांच्या एका बाजूस सिंहांची जोडी व दुसऱ्या बाजूस हत्तींची जोडी आहे. ह्यांची रचना कंदरिया महादेव मंदिराप्रमाणे असून लांबी २७·१ मी. व रुंदी १३·९ मी. आहे. तीरशिल्पातील स्त्रीप्रतिमा आकर्षक असून बाहेरच्या पृष्ठभागावर ब्रह्मा, त्रिमुखी शिव आणि पार्वती ह्यांच्या सुंदर मूर्ती आहेत. येथील लिंग पाचूचे होते, पण पुढे तेथे अश्मलिंगाची स्थापना करण्यात आली. मंदिराबाहेरील पृष्ठभागावर तीन कोरीव शिल्पपट्ट आहेत. त्यांत अनेक देवदेवता व सुरसुंदरी यांचे विविध हावभाव, त्यांचे भ्रमसंभ्रम इ. अत्यंत कुशलतेने शिल्पित केलेले आहेत. ह्यांतील उजव्या हातात फळांचा डाहळा घेणारी व डाव्या हातावर पोपटास खेळवणारी तरुणी, तसेच बासरीवादक स्त्री व मुलास रिझविणारी यवन माता ह्यांच्या प्रतिमा आकर्षक आहेत. मंदिराच्या अधिष्ठानावर दैनंदिन जीवनातील दृश्यांचे शिल्पांकन केलेले आढळते. ह्या मंदिरात १००२ मधील धंग या चंदेल्ल राजाचा एक कोरीव लेख आहे. नंदिमंदिरात गुळगुळीत नंदीची ऐटबाज व भव्य मूर्ती असून तिची उंची १·८ मी. व लांबी २·१ मी. आहे.
हे विश्वनाथ मंदिराच्या नैर्ऋत्येस आहे. ह्यात पूर्वी विष्णूची प्रतिमा होती. ती आज उपलब्ध नाही. आज त्या ठिकाणी मगरीवर उभी असलेल्या गंगेची प्रतिमा असून तीस पार्वती ही अपसंज्ञा प्राप्त झाली आहे.लक्ष्मण मंदिर : हे कंदरिया महादेवाच्या जवळच आहे. ते विष्णूस अर्पण केलेले असून, त्याची लांबी २९·९ मी. व रुंदी १३·८ मी. आहे. अधिष्ठानाच्या कोपऱ्यात चार उपमंदिरे आहेत. ह्याचे प्रवेशद्वार व तोरण अलंकृत कोरीव कामासाठी ख्यातनाम आहे. गणेशपट्टीवर मध्यभागी लक्ष्मीची प्रतिमा असून, तिच्या डाव्या बाजूस ब्रह्माची व उजव्या बाजूस शिवाची मूर्ती आहे. गणेशपट्टीवरील भागाच्या कोरीव पट्टावर नवग्रह शिल्पिलेले आहेत. द्वारमार्गावर एका बाजूस समुद्रमंथनाचे अपोत्थित शिल्प व दुसऱ्या बाजूस दशावतार आहेत. गर्भगृहातील त्रिमुखी मूर्ती चतुर्भुज आहे. मूर्तीच्या पायथ्याच्या नक्षीमालिकेत हत्तींच्या आकृत्या असून इतर देखाव्यांमध्ये झुंज, मिरवणूक, घोडे आणि डुकराची शिकार यांचे शिल्पांकन आढळते.
हे लक्ष्मण मंदिराच्या दक्षिणेस असून त्यात २·५४ मी. लांबीचे व १·१२ मी. रुंदीचे भव्य शिवलिंग आहे.
हे मातंगेश्वराच्या समोरचे मंदिर विष्णूच्या वराह अवतारास अर्पण केलेले असून मूर्ती २·६७ मी. लांब व १·७५ मी. रुंद आहे. वराहाचे डोके, शरीर व पाय हे हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांनी व्यापलेले आहेत. वराहमूर्तीच्या डाव्या बाजूस भग्नावस्थेतील पृथ्वीदेवतेची मूर्ती असून खालील बाजूला सर्पाकृती दिसते.
हे खजुराहो सागराजवळ आहे. ग्रॅनाइट व वालुकाश्मांनी बांधलेले हे मंदिर मुळामध्ये विष्णूस अर्पण केलेले होते, परंतु सध्या चतुर्मुखी लिंग गर्भगृहात असून त्यास ब्रह्मा हे चुकीचे नाव रूढ झाले आहे. प्रवेशद्वारावर विष्णूची मूर्ती आहे. पुरातत्त्वज्ञांच्या मते येथील ग्रॅनाइट दगडाच्या वापरामुळे ते नवव्या शतकातील मंदिर असावे.
वामन अवताराचे हे मंदिर ब्रह्मा मंदिराच्या उत्तरेस आहे. ह्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावर दोन विभागांत विपुल नक्षीकाम आहे. त्यातील आकृत्या स्त्रियांच्या असून, त्यांत भिन्न नृत्यमुद्रांतील अप्सरा विविध हावभावांद्वारे आपल्या विलासी वृत्तीचे प्रदर्शन करीत आहेत, असे चित्रण केले आहे. त्यांत नग्न, आलिंगनातुर आणि मिथुनावस्थेतील शिल्पांचे वैपुल्य आढळते.
खजुराहोच्या आग्नेयीस असलले हे मंदिर तेथील स्तंभांवरील घंटा व साखळीच्या अलंकृत रचनेमुळे ‘घंटा (ई)’ म्हणून ओळखले जाते. ह्याची रचना स्तंभरूपी उघड्या मंडपाची आहे. पूर्वी येथे सर्व प्रकारचे मंडप (सभागृहे) असावेत. येथे बुद्धाची मूर्ती बाहेरच्या बाजूस सापडली; तसेच काही जैनमूर्तीही आढळल्या. ह्याशिवाय गरुडावर आरूढ झालेली अष्टभुजा जैनदेवतेची मूर्ती प्रवेशद्वारावर असून गणेशपट्टीच्या शिल्पपट्टावर महावीराच्या मातेची सोळा स्वप्ने दर्शविलेली आहेत.
हे जैन मंदिरांतील सर्वांत मोठे व अप्रतिम मंदिर आहे. ते २० मी. लांब व १०·६ मी. रुंद असून, बहुतेक जैन मंदिरांचे विधान व वास्तुकाम इतर हिंदु मंदिरांप्रमाणेच आहे. त्यात फक्त महामंडप नाही. गर्भगृहात अलंकृत नक्षीकामाचे व्यासपीठ (सिंहासन) आहे व त्यासमोर नंदीची मूर्ती आहे. पार्श्वनाथाची मूर्ती १८६० मध्ये तेथे प्रस्थापित केली. गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर विविध आविर्भावांतील सुंदर स्त्रियांच्या आकृत्या आहेत. त्यांतील अपत्यास रिझविणारी माता, पत्र लिहिणारी स्त्री, पायातील काटा काढणारी स्त्री, प्रसाधन करणारी स्त्री व मालाधारी स्त्री ह्यांच्या प्रतिमा भावस्पर्शी व जिवंत भासतात.
हे पार्श्वनाथ मंदिराच्या जवळच उत्तरेस असून पार्श्वनाथापेक्षा खूपच लहान आहे.
ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे इतरांपेक्षा भिन्न असलेले शिखर. ते लहानलहान वर्तुळांनी वर चढविलेले असून सोपानवजा दिसते. त्याच्या भिंतींवरील शालभंजिकांच्या मूर्ती लक्षणीय आहेत.
जातकारी खेड्याजवळच्या ह्या मंदिरात चतुर्भुज विष्णूची भव्य मूर्ती आहे. बाहेरील पृष्ठभागावर तीन विभागांत शिल्पकाम आहे. त्यातील सिंहाचे मुख असलेली स्त्रीप्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही नरसिंहावताराच्या विरोधी कल्पनेतून मुद्दाम खोदलेली असावी.
वास्तुकलेच्या दृष्टीने खजुराहोची बहुतेक मंदिरे नागर शैलीत किंवा ‘इंडो-आर्यन’ शैलीत बांधलेली आहेत. त्यातही काही मंदिरांतून (उदा., कंदरिया, महादेव, लक्ष्मण इ.) ‘पंचायतन’ ही उपशैली आढळते : ह्यात मुख्य मंदिराच्या चारही बाजूंच्या कोपऱ्यांत चार उपमंदिरे असतात. नागर शैलीतील एकूण आठ घटक येथील मंदिरांतून स्पष्टपणे दिसतात; ते म्हणजे मूळ अधिष्ठान (रूट टेरेस), मसूरक (सॉक्ल), जंघा (वॉल), कंगणी (कॉर्निस), शिखर (टॉवर), ग्रीवा (नेक), आमलसारक (सर्क्यूलर टॉप) आणि कुंभाकार कळस. ह्यांशिवाय, अर्धमंडप, मंडप, महामंडप, अंतराल आणि गर्भगृह ह्यांत आकारमानांनुसार मंदिर विभागलेले असून मोठ्या मंदिरास प्रदक्षिणापथ आहे. बहुतेक मंदिरे वालुकाश्मांनी बांधलेली आहेत. क्वचित ग्रॅनाइट दगडाचाही उपयोग केलेला आहे. वालुकाश्माचा रंग पिंगट व धुरकट पांढरा आहे.
खजुराहोची शिखररचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती शंक्वाकार असून वर निमुळती होत गेलेली आढळते. मूळ शिखराच्या सभोवती समोच्चतादर्शक रेषांत अंगशिखराची दाट रचना केलेली आढळते. शिखराच्या टोकास कुंभ बसविलेला दिसतो. असे क्रमाने वर चढत जाणारे शिखर बांधण्यामागे कैलास किंवा मेरू पर्वताची पौराणिक कल्पना अभिप्रेत असावी. ह्या स्थानी ऋषी, मुनी, गंधर्व, किन्नर इ. देवमानवांची वसती आहे, अशी कल्पना आहे. गिरिमंदिर ही कल्पना येथे प्रगल्भ झालेली दिसते. वरील पद्धतीच्या रचनेमुळे मंदिराची भव्यता दुरूनही नजरेत भरते.
मंदिराबाहेर रिकामी जागा सोडलेली दिसून येते. अर्धमंडपाचे प्रवेशद्वार शिल्पांकित तोरणांनी अलंकृत केलेले असून मंडपाच्या द्वारावर तसेच गणेशपट्टीवर स्त्रीपुरुषांच्या आकृत्या खोदलेल्या आहेत. मात्र जैन मंदिरात हिंदूंच्या त्रिमूर्ती दिसत नाहीत; त्यांऐवजी जैनांचे इतर तीर्थंकर व दासदासी ह्यांचे शिल्पांकन आढळते. द्वाराच्या दोन्ही बाजूंना स्त्रीपुरुषांच्या आकृत्या दिसतात; क्वचित शार्दूल आणि अन्य प्राणी आढळतात. वास्तुशास्त्रदृष्ट्या इतर सुसूत्र बांधकामाबरोबर ह्या सर्व मंदिरांत प्रकाशाची योजनाही गवाक्षांद्वारे केली आहे; मात्र काही प्रदक्षिणापथ अंधारमय आहेत.
येथील बहुतेक मंदिरे शिल्पांकित आहेत. शिल्पे मुख्यत्वे मंदिराच्या पृष्ठभागांवरील विभागांत, भिंतीवर, कधी दोन तर कधी तीन पटांमध्ये खोदलेली आहेत. ह्यांशिवाय मंदिराचे तोरण व प्रवेशद्वार, गर्भगृहाचे द्वार, गणेशपट्टी, द्वारशाखा, प्रदक्षिणापथाच्या भिंती व आतील इतर भिंती यांवर मूर्तिकाम आढळते. कामशिल्पे विशेषत: बाहेरच्याच भिंतींवर आढळतात. शिल्पे व्युत्थित, अपोत्थित, उत्थित आदी विविध प्रकारांत खोदलेली असून प्रतिमांची प्रमाणबद्धता, उठावदारपणा आणि भाव उल्लेखनीय आहेत.
खजुराहोच्या शिल्पकारांनी येथील शिल्पांत दैनंदिन मानवी जीवनातील विषय हाताळलेले आहेत. ह्यांशिवाय तत्कालीन देवदेवता व धार्मिक संप्रदाय ह्यांचे चित्रण ह्या ठिकाणी पहावयास सापडते. युद्ध, मिरवणुका, शिकार, नृत्य ह्यांबरोबरच तत्कालीन राजकीय व शैक्षणिक पद्धती यांचेही दर्शन येथील शिल्पांतून घडते. येथील कामशिल्पे आणि त्यांतील विविध आसने हा तर एक विशेष चर्चाविषय आहे. खजुराहोच्या शिल्पांतून तत्कालीन अलंकार, वाद्ये, पोशाख, प्रसाधने, मनोरंजनाची साधने, केशभूषा वगैरेंचे तर दर्शन होतेच; शिवाय तत्कालीन प्राणी आणि वनस्पती हे विषयही शिल्पकारांनी हाताळलेले आहेत. सिंह, हत्ती, बैल, डुक्कर, विंचू, साप, विविध पक्षी तसेच अनेक प्रकारचे वृक्ष आणि वेली ह्यांमधून वास्तवता प्रतीत होते. हे सर्व वास्तव जग शिल्पांकित करूनही शिल्पकारांनी स्वर्गीय जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांतील अवकाशगामी अप्सरा, सुरसुंदरी, पऱ्या ह्यांच्या शिल्पांकनातून हे प्रत्ययास येते. तत्कालीन वस्तुस्थितीचे चित्रण करण्याचा प्रयत्न येथील शिल्पकारांनी केला आहे.
खजुराहोच्या एकूण वास्तुशिल्पात जी विपुल कामशिल्पे आढळतात, त्यांविषयी तज्ञांत विविध मते आहेत. मंदिरासारख्या पवित्र स्थळी आलिंगन-चुंबन-संभोग यांचे दर्शन घडविणारी चित्रे का खोदली गेली असावीत, ह्याविषयी अनेक मते आहेत [ कामशिल्प].
खजुराहो येथे मातंगेश्वर मंदिराच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर जार्डाइन वस्तुसंग्रहालय आहे. हे १९१० मध्ये बुंदेलखंडातील ब्रिटिश राजकीय प्रतिनिधी डब्ल्यू. ई. जार्डाइन ह्याने स्थापन केले. वस्तुसंग्रहालयात सु. दोन हजारांवर मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यांत हिंदू मूर्तींची संख्या अधिक असून, त्यांपैकी उमामहेश्वर, लक्ष्मीनारायण, विष्णू व त्याचे दशावतार, नृत्त गणेश, कुबेर, सदाशिव इ. देवता विशेष कलात्मक आहेत. जैन तीर्थंकर व जैन देवता यांच्याही मूर्ती पुष्कळ असून बुद्धाची मात्र एकच मूर्ती आहे.
ह्या सर्व वास्तुशिल्पांमुळे खजुराहो हे देशीपरदेशी प्रवाशांचे आकर्षण ठरले आहे. त्या ठिकाणी अलीकडे विमानवाहतूकही सुरू केलेली आहे. भारताचे पुरातत्त्वखाते ह्या वास्तूंची योग्य ती डागडुजी करून देखभाल करते.
लेखिका : सु. र देशपांडे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2023
खजुराहो म्हटले कि आठवतात भव्य मंदिरे, अत्युच्च शिल...
चंदेल्ल घराणे : मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध राजपूत...
कामशिल्प विषयक माहिती