অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेम्ब्रँट

(१५ जुलै १६०६–४ ऑक्टोबर १६६९). श्रेष्ठ डच चित्रकार. रेम्ब्रँट हार्‌मेन्स व्हान राइन हे त्याचे पूर्ण नाव. लिडेन येथे जन्म. लिडेन येथील ‘लॅटिन स्कूल’मध्ये त्याने वयाच्या सु. सातव्या वर्षी प्रवेश घेतला आणि तेथील शिक्षण पूर्ण करून १६२० मध्ये त्याने लिडेन येथील विद्यापीठात नाव दाखल केले. तथापि काही महिन्यांतच तेथील शिक्षण अर्धवट सोडून, १६२१ मध्ये तो चित्रकलेच्या शिक्षणासाठी स्वानेनबुर्कच्या चित्रशाळेत (स्टुडिओ) दाखल झाला. पण त्या चित्रशाळेचा फारसा प्रभाव त्याच्यावर दिसत नाही. मात्र नंतरचे सहा महिने त्याने ॲम्स्टरडॅम येथे (१६२४–२५) पीटर लास्टमानच्या चित्रशाळेत जे धडे घेतले, त्याचा खोल प्रभाव त्याच्या चित्रांवर दिसतो. १६२५ मध्ये लिडेन येथे परतल्यावर, त्याने स्वतंत्र चित्रनिर्मितीस यान लिव्हेन्स समवेत प्रारंभ केला.

रेम्ब्रँटची कला-कारकीर्द एकूण चार कालखंडांमध्ये विभागता येते : लिडेन येथील कालखंड; म्स्टरडॅम येथील सुरुवातीचा व प्रगल्भावस्थेतील असे दोन कालखंड व १६४८ नंतरचा अखेरचा कालखंड.

लिडेन येथील कालखंड

(१६२५–३१). लिडेनच्या सुरुवातीच्या काळातील वास्तव्यात रेम्ब्रँटने जी चित्रे रंगवली, त्यांचा ह्यात समावेश होतो. या काळातील स्टोनिंग ऑफ सेंट स्टीफन (१६२५) हे सर्वांत आद्य चित्र होय. या चित्रावर काराव्हादजो, पीट लास्टमान आदी चित्रकारांचा प्रभाव जाणवतो. चित्ररचना पूर्णपणे इटालियन धर्तीची असून, छायाप्रकाशाचा गाढ परिणाम त्यात दाखवला आहे. या चित्रातील रंग सतेज वाटतात. १६२५ च्या सुमारास त्याने रंगवलेली बहुतेक चित्रे आकाराने लहान असून, ती सूक्ष्म बारकाव्यांवर भर देत अत्यंत काळजीपूर्वक रंगवलेली आढळतात.

रेम्ब्रँटला नंतरच्या काळात त्याच्या व्यक्तिचित्रांमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली असली, तरी या काळात त्याचे सारे लक्ष ऐतिहासिक विषयांवरच केंद्रित झालेले दिसते. ह्या सुरुवातीच्या काळात तत्कालीन डच कलेचा प्रभाव रेम्ब्रँटच्या चित्रांवर आढळतो. या काळातील द मनी चेंजर (१६२७) हे सध्या बर्लिन कलासंग्रहालयात असलेले चित्र रेम्ब्रँटच्या स्वतंत्र शैलीची साक्ष देते. या काळातील त्याची अन्य उल्लेखनीय चित्रे म्हणजे जूडास रिटर्निंग द थर्टी पीसेस ऑफ सील्‌व्हर (१६२९), द प्रेझेंटेशन इन द टेम्पल (१६३१), पोट्रेंट ऑफ निकोलेस रुट्‌सस (१६३१) इत्यादी.

ॲम्स्टरडॅमचा सुरुवातीचा काळ

(१६३२–४०). रेम्ब्रँटने या काळात व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व मुद्रानिर्मिती या प्रकारांत प्रामुख्याने निर्मिती केली. या कालखंडाच्या सुरुवातीलाच १६३२ मध्ये द ॲनॅटोमी लेसन ऑफ डॉ. निकोलस टल्प (पहा : मराठी विश्वकोश खंड ११; चित्रपत्र ४७) यांसारखी प्रख्यात चित्रे त्याने रंगविली. अशा चित्रांतील नाट्यपूर्ण व्यक्तिसमूहचित्रणामुळे रेम्ब्रँटचा व्यक्तिचित्रकार म्हणून नावलौकिक झाला. ही व्यक्तिचित्रे डच परंपरेतील स्थितिशील व्यक्तिचित्रांपेक्षा वेगळी होती. या कालखंडात रेम्ब्रँटने अनेक पोशाखी भपकेबाज व्यक्तिचित्रे रंगविली. उदा., माटेंन सूलमान्स (१६३४) इत्यादी. १६३४ मध्ये रेम्ब्रँटचा सास्कीआबरोबर विवाह झाला.

रेम्ब्रँटचे आवडते चित्रप्रतिमान (मॉडेल) म्हणून त्याने तिची अनेक चित्रे रंगविली आहेत. १६३५ च्या सुमारास रंगविलेले त्याचे सास्कीआबरोबरचे स्वव्यक्तिचित्र प्रसिद्ध आहे. याच सुमारास प्रिन्स फ्रेडेरीक हेन्ड्रिककडून ‘ख्राइस्ट पॅशन सीरिज’ या चित्रमालिकेचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. या मालिकेतील पाचही चित्रे सध्या म्यूनिक येथील ‘पिनाकोटेक’ कलासंग्रहालयात आहेत १६३३ मध्ये रूबेन्सच्या मूळ चित्रावर आधारित डिसेंट फ्रॉम द क्रॉस हे चित्र रेम्ब्रँटने रंगविले. रूबेन्सच्या चित्रांत अभावानेच आढळणारी दैवी प्रकाशयोजना दाखवून रेग्ब्रँटने हे चित्र पूर्णपणे स्वतःच्या शैलीत बदलून टाकले. १६३६ मध्ये ब्लाइंडिंग ऑफ द सॅमसन  हे भव्य आकाराचे व बरोक शैलीचे सूचक असे चित्र त्याने काढले. ह्या सुमारास व्यक्तिचित्रकार म्हणून यशस्वी होत असतानाच, त्याने वेगवेगळ्या कलाकृतींचा संग्रह करण्यास सुरुवात केली व संग्राहक म्हणून त्याची ख्यातीही झाली.

ॲम्स्टरडॅम येथील प्रगल्भ काळ

(१६४०—४८). रेम्ब्रँटच्या ॲम्स्टरडॅम येथील प्रारंभीच्या आणि प्रगल्भावस्थेच्या संधिकाळातील १६४२ मध्ये रंगविलेले प्रख्यात चित्र म्हणजे नाइटवॉच (पहा: मराठी विश्वकोश : खंड ५; चित्रपत्र ६६) होय. या चित्राला नाइटवॉच हे शीर्षक एकोणिसाव्या शतकातील समीक्षकांनी दिले पण चित्राचे मूळ शीर्षक द कंपनी ऑफ कॅप्टन फ्रान्स बॅनिंग कॉक् अँड लेफ्टनंट विलेम व्हान रूदेनबुर्क असे होते. चित्रातील व्यक्ती व वस्तू यांना जागोजागी स्पर्शून जाणारा सोनेरी प्रकाश दर्शविणारा अद्‌भुत रंगसंगती हे या चित्राचे खास वैशिष्ट्य. प्रकाशाचा नाट्यपूर्ण वापर, चित्रांतर्गत व्यक्तींच्या हालचालींतील गतिमानता व रंगांची सुयोग्य योजना ही वैशिष्ट्ये इथे प्रकर्षाने जाणवतात.

नाइटवॉच हे चित्र रंगवीत असतानाच रेम्ब्रँटच्या शैलीत मूलभूत स्वरूपाचा बदल घडत होता. हा बदल मुख्यतः पार्श्वभूमीच्या रंगयोजनेत गूढता व नाट्यपूर्ण परिणाम साधण्याबाबत असून हॉलंडमधील तत्कालीन चित्रकारांच्या पद्धतीपेक्षा व लोकाभिरुचीपेक्षा वेगळ्याच प्रकारचा होता.

रेम्ब्रँटची पत्नी सास्कीआचा १६४२ मध्ये मृत्यू झाल्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जे दुःख निर्माण झाले, त्याचे पडसाद त्याच्या स्वव्यक्तिचित्रात उमटलेले दिसतात. याच काळात त्याने अनेक दर्जेदार व अभिजात कलाकृती निर्माण केल्या. उदा., यंग लेडी विथ अ फॅन, ख्राइस्ट अँट एम्माउस (१६४८) इत्यादी.

हेन्द्रिकये स्टॉफेल्स ही स्त्री १६४५ पासून रेम्ब्रँटच्या सहवासात आली व तिने त्याला तिच्या मृत्यूपर्यंत (१६६३) साथ दिली. तिच्या प्रतिमानावरून त्याने अनेक व्यक्तिचित्रे रंगवली आहेत.

शेवटचा कालखंड

(१६४८ नंतरचा). हा कालखंड रेम्ब्रँटच्या व्यक्तिगत जीवनात अत्यंत आर्थिक ताणाचा असूनही, त्याच्या कलानिर्मितीच्या दृष्टीने समृद्धीचा व भरभराटीचा ठरला. या काळात त्याने काही महत्वपूर्ण भव्य चित्रे आणि विशेषतः स्वव्यक्तिचित्रे रंगवली. १६५६ मध्ये त्याची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली, की त्याची सर्व मालमत्ता त्याच्या चित्रसंग्रहासकट जप्त करण्यात आली व दिवाळखोर म्हणून त्याची कायदेशीर संभावना करण्यात आली. त्याच्या व्यक्तिगत संग्रहात अनेक मूल्यवान व कलात्मक वस्तूंबरोबरच रॅफेएल, ल्यूकास, व्हॉन लेडन, व्हॅन डाइक इ. चित्रकारांची चित्रे व काही भारतीय लघुचित्रेही होती.

अखेरच्या काळात रेम्ब्रँटने व्यक्तिचित्रे व व्यक्तिसमूहचित्रे यांवरच जास्त भर दिल्याचे दिसून येते. या चित्रांतून व स्वव्यक्तिचित्रांतून मानवी जीवनाचे करुणप्रधान दर्शन घडवण्यात त्याने आपले सामर्थ्य वेचले. त्याच्या या चित्रांमधून मानवतेबद्दलची त्याची आस्था व प्रेमच दिसून येते. मानवी भावजीवनातील स्थित्यंतरे, आशा, आकांक्षा, निराशा, प्रेम, करुणा इ. भावभावना त्यांतून समर्थपणे व्यक्त केलेल्या आढळतात. ही चित्रे तंत्रदृष्ट्याही अत्यंत प्रभावी वाटतात. माध्यम हाताळणीतील एक आदर्शच जणू त्यांनी निर्माण केला.

त्याच्या आयुष्यातील शेवटची २० वर्षे अनेक दुःखद घटनांनी भरलेली होती. या काळातील धार्मिक चित्रे, व्यक्तिचित्रे, स्थिरवस्तु चित्रे ह्या प्रकारांतून त्याची श्रेष्ठ प्रतीची सर्जनशीलता प्रत्ययास येते. उदा., द स्लॉटर्ड ऑक्स (१६५५). या चित्राच्या विषयाबद्दल त्यावेळी लोकांच्या मनात घृणाच उत्पन्न झाली; परंतु हे चित्र म्हणजे वास्तवता व गूढता यांचे एक अद्‌भुत मिश्रण आहे. रेम्ब्रँटने १६४८–६१ या कालावधीत ख्रिस्ताची किमान ११ चित्रे काढली. १६५० च्या दरम्यान त्याच्या ख्रिस्तविषयक चित्रांतून एक खिन्न छाया उमटू लागली. कदाचित हा परिणाम त्यावेळी व्यक्तिगत आयुष्यात कोसळलेल्या संकटांमुळेही असेल.

रेम्ब्रँटने आपली निर्मिती मुख्यतः अम्लरेखने, रेखाचित्रे व रंगचित्रे या तीन माध्यमांमध्ये केली. त्याच्या चित्रांत मुख्यत्वे व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, बायबलमधील विषय व पौराणिक कथानके, ऐतिहासिक घटना आदींचा समावेश आहे. डच लोकांच्या खास आवडीचा विषय म्हणजे व्यक्तिसमूहचित्रे. या समूहचित्रांमुळे त्याला उदंड लोकप्रियता लाभली. स्वतःचीही वेगवेगळ्या वयोवस्थांतील आणि भिन्न भिन्न मनःस्थितींतील व्यक्तिचित्रे त्याने विपुल रंगवली. ही स्वव्यक्तिचित्रे म्हणजे एका परीने त्याचे चित्रमय आत्मचरित्रच होय.

रेखाचित्रे

रेम्ब्रँटच्या रेखाचित्रांतील विविधता इतरत्र क्वचितच आढळते. मानवी जीवनातील विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रांचे विषय दैनंदिन जीवनातील आहेत. उदा.,सीटेड इन ॲन आर्मचेअर, बेबी विथ बॉटल, यंग वुमन ॲट हर टॉयलेट. यांखेरीज नग्न अभ्यासचित्रे (न्यूड स्टडीज) तसेच हत्ती, सिंह यांसारख्या प्राण्यांच्या रेखनांचाही त्यांत समावेश होतो. टू विमेन टीचिंग अ चाइल्ड टू वॉक हे रेखाचित्र म्हणजे त्याची एक उत्तम कलाकृती म्हणावी लागेल.

लहान मुलाला चालायला शिकवणारी वृद्ध आजी व आई; आईची सडपातळ व लवचिक अंगकाठी व चालता येण्याबद्दल खात्री नसणाऱ्या लहान मुलाच्या भाबड्या चेहऱ्यावर दिसणारी साशंकता, हे सर्व विशेष मोजक्या रेषांतून समर्थपणे व्यक्त झाले आहेत.

अम्लरेखने

रेम्ब्रँटच्या अम्लरेखनांमध्ये असलेली शोधकता त्याच्या पूर्वकालीन अम्लरेखनांत आढळत नाही. अम्लरेखित ठशांचा (एचिंग प्रिंट) आकार साधारणपणे ५३ × ४५ सेंमी.  यापेक्षा मोठा नाही. आजही रेम्ब्रँटची सु. २८ अम्लरेखने उपलब्ध आहेत. रेम्ब्रँटच्या हयातीत त्याची कीर्ती चित्रकार म्हणून असण्यापेक्षा अम्लरेखनकार म्हणूनच अधिक होती. या माध्यमातून त्याने बायबलमधील प्रसंग, निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, नग्न मानवाकृती असे अनेक विषय चितारले. १६२८ मध्ये रेम्ब्रँटच्या अम्लरेखनांची सुरुवातलिडेन येथे झाली व १६३० च्या दरम्यान त्याने तंत्र पूर्णपणे विकसित केले.

१६२८ मधील त्याच्या आईचे व्यक्तिचित्र हे या माध्यमावरील त्याच्या प्रभुत्वाची कमाल दाखवणारे होते. अम्लरेखनातील त्याच्या बदलत्या आविष्काराचे प्रतिबिंब थ्री ट्रीजमध्ये पहायला मिळते. यात छायाप्रकाशाचा तीव्र भेद व दृश्यातील नाट्यमयता यांतून बरोक कलाशैलीची वैशिष्ट्ये दृग्गोचर होतात. ख्राइस्ट हीलिंग द सिक (१६४८−५०) या चित्रातील व्यक्तिरेखा प्रत्ययकारी होण्यासाठी रेम्ब्रँटने प्रत्येक रेषा किती जाणीवपूर्वक रेखली आहे, याची प्रचीती येते. हे चित्र त्याच्या उत्तम कलाकृतींपैकी एक आहे.

रेम्ब्रँट हा बरोक शैलीतील अग्रगण्य व सर्वश्रेष्ठ कलावंत होता. बरोक कलेची खास वैशिष्ट्ये, सौंदर्य, साधेपणा व उदात्तता यांचा संगम होऊन रेम्ब्रँटची शैली विकसित झालेली दिसते. तसेच प्रबोधनकालीन चित्रकारांच्या चित्रांतील अभिजात गुणवत्तेचा प्रत्ययही त्याच्या चित्रांतून येतो. प्रबोधनकाळात उदयास आलेले ⇨छायाप्रकाशन (क्यारोस्कूरो) तंत्र अत्यंत कलात्मकतेने हाताळून त्याने ते परिपूर्णत्वास नेले. प्रकाशाचा नाट्यपूर्ण वापर व रंगलेपनातील वैविध्य यांतून त्याने अद्‌भुतरम्य वातावरणनिर्मिती साधली. दृश्य विश्वातील छाया-प्रकाश, त्रिमिती व अवकाश यांच्यातील परस्परसंबंधांचा व शक्यतांचा रेम्ब्रँटने केलेला आविष्कार मन थक्क करणारा आहे. त्याच्या चित्रांतून प्रकाशाबद्दलची असीम ओढ, मानवी जीवनातील गूढता व अद्‌भुतता यांची जाणीव, ईश्वरी शक्तीबद्दल निष्ठा, मानवी जीवितातील विविध भावभावनांचे आकर्षण सह्रदयता जाणवते. परंतु कोणत्याही दुःखद घटनांनी व प्रतिकूल परिस्थितीतही त्याच्या कलानिर्मितीत कधी खंड पडला नाही. आयुष्याच्या अंतापर्यंत ती अविरतपणे चालूच होती.

संदर्भ : 1. Rosenberg, Jacob, Rembrandt : Life and Work, London, 1968.

2. Wallace, Robert, The World of Rembrandt, New York, 1968.

3. White, Christopher, Rembrandt and His World, London, 1964.

लेखिका : साधना  खडपेकर−बहुलकर,

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate