वास्तू बांधण्याची कला आणि शास्त्र. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची, गावाची, शहराची, राज्याची, देशाची किंवा खंडाची वास्तुविषयक जडणघडण; शैली किंवा स्वरूप, तसेच दर्जा व्यक्त करताना वापरण्यात येणारा शब्दप्रयोग. उदा., भारतीय वास्तुकला, चार्ल्स कोरिया यांची वास्तुकला इत्यादी.
मानवी जीवनात ही अत्यंत उपयुक्त आणि अनिवार्य कला आहे. मानवाच्या ज्या मूलभूत गरजा-अन्न, वस्त्र, निवारा-त्यांपैकी निवारा निर्माण करण्याची कला आणि शास्त्र म्हणजे वास्तुकला. त्यामुळे अतिप्राचीन काळापासून या क्षेत्रात मानव कार्यरत असलेला आढळतो. किंबहुना यामुळेच या कलेला सर्व कलांची जननी मानण्यात येते. ऊन, वारा, पाऊस, तसेच पशू इत्यादींपासून संरक्षण मिळवण्यासाठी निवारा निर्माण केल्यानंतरच मानवाच्या मनात इतर कलानिर्मितीविषयी विचार निर्माण झाले. वास्तुकलेनेच कालौघात इतर संलग्न दृश्य कलांना जन्म दिला. चित्रकला, शिल्पकला, स्थलशिल्प (लँडस्केप आर्किटेक्चर) इ. त्यांपैकी प्रमुख मानण्यात येतात. सर विन्स्टन चर्चिल यांनी या कलेचे वर्णन ‘प्रथम आपण वास्तू घडवितो आणि मग त्या आपल्याला घडवितात’, असे केले आहे. संस्कृतनिर्मितीच्या प्रक्रियेत जगाच्या इतिहासात प्रथम वास्तुनिर्मिती झाली आणि मग सांस्कृतिक संचित परिपक्व होऊन इतिहास निर्माण झाला. या कलेस ‘सुप्त संगीत’ ही मानले जाते. कारण संगीत हा कालाशी बांधलेला रचनाकल्प असतो; तर वास्तुकला हा अवकाशरचनेने निर्माण केलेला संगीतमय आविष्कार असतो. संगीत ही श्राव्य अनुभूती देणारी कला आहे; तर वास्तू ही दृक् संवेदनांना संगीतमय करणारी कला मानली जाते. आकार स्थिर असले, तरी त्यांच्या प्रवाही रचनाघटकांद्वारे ते गतिमानतेचा आभास निर्माण करू शकतात. दृक् संगीताची अनुभूती आणून देऊ शकतात.
वास्तूला कलापूर्णता येण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक असते. माणसाने बांधलेली कोणतीही अथवा प्रत्येक वास्तू ‘वास्तुकला’ मानली जात नाही. कोणत्याही बांधीव आकाराला ‘वास्तुकला’ म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी काही मूलभूत निकष पार करावे लागतात. ते म्हणजे - (१) ज्या कार्यासाठी ती वास्तू बांधली आहे त्या वापरातील वास्तूची उपयुक्तता, सोय;
(२) वास्तूच्या बांधकामातील भक्कमपणा आणि टिकाऊपणा;
(३) कार्यानुरूप कल्पक अवकाशरचनेची अभिव्यक्ती;
(४) देखभालीचा कमीत कमी व्याप;
(५) वास्तूची कार्यानुरूप चैतन्यवृत्ती (स्पिरिट) जागृत ठेवणारे अंतर्बाह्य अलंकरण;
(६) बांधीव आकार व अवकाश-सौंदर्य यांतील सुयोग्य मेळ.
यांतील फक्त अलंकरण कालानुरूप बदलू शकते. परंतु बाकी निकष शाश्वत असतात. प्रत्येक दर्जेदार वास्तुनिर्मितीत हे निकष प्रत्ययाला येतात व म्हणूनच अशा इमारतीला ‘वास्तुकला’ मानले जाते. उदा., एखाद्या कारखान्याच्या आकाराचे देऊळ बांधले, तर ते देऊळ म्हणून अयोग्य वाटते. वेरूळचे कैलास लेणे आणि एखाद्या गावातील सरकारी शाळेची इमारत ह्या दोन्ही वास्तूच; परंतु कैलास लेणे हे वास्तुकला म्हणून गणले जाते, तर शाळेची वास्तू साधी इमारत मानली जाते. याचा अर्थ असा नव्हे, की शाळेची इमारत ‘वास्तुकला’ होऊ शकत नाही. छोटीशी झोपडीदेखील ‘वास्तुकला’ होऊ शकते. सर्जनशील वास्तुतज्ञाने आपल्या क्रियाशीलतेची कार्य, उपयुक्तता व सौंदर्य या वास्तुशास्त्रीय निकषांशी सांगड घालून वास्तुनिर्मिती केली, की वास्तुकला निर्माण होते.
वास्तुकलेचा कला-माध्यम म्हणून विचार करताना कला निर्मितीची मूलतत्त्वे या माध्यमात त्रिमितीय परिमाण घेऊन येतात. ही तत्वे या कलानिर्मितीच्या प्रक्रियेत संकल्पना, अभिव्यक्ती व रसास्वाद ह्या प्रत्येक टप्प्यावर विस्तारत जातात. या प्रवासात प्रथमावस्था द्विमितीय रेखाचित्रांद्वारे कागदावर आकार घेऊ लागते; परंतु त्याच वेळी वास्तुतज्ञाच्या मनात त्या आकाराचे त्रिमितीय चित्र उभे राहते आणि त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर त्याची अभिव्यक्तिप्रक्रिया सुरू होते. यासंबंधी अधिक विवेचन पुढे आले आहेच. दृश्य कलेची जी मूलतत्त्वे
(१) आकारदर्शक – बिंदू, रेषा, पृष्ठभाग
(२) पोतदर्शकः पोत, रंग
(३) अवकाशदर्शकः घनता
अवकाश - ती अर्थातच वास्तुकलेचीही मूलतत्त्वे आहेत. परंतु वास्तुकला ही त्रिमितीय, सर्वस्पर्शी कलाजननी असल्यामुळे याव्यतिरिक्त प्रमाणबद्धता, प्रमाणभूतता (स्केल), प्रकाशमानता, रचनात्मकता (काँपोझिशन) इ. दृश्य कलांच्या तत्वांचा वास्तुकलेत महत्वपूर्ण सहभाग असतो. या सर्व घटकांच्या गुंफणीतून कलाकृतीत गुणवैशिष्ट्ये निर्माण होतात व ती वास्तूला रचनात्मक सौंदर्य प्रदान करतात. ते गुणघटक म्हणजे - (१) एकात्मता, (२) लय, (३) ऊर्ध्वगामित्व, (४) समतलत्व (हॉरिझाँटॅलिटी), (५) पुनरावृत्ती, (६) आकारसौष्ठव, (७) समतोल, (८) वास्तुमत्त्व (कॅरॅक्टर), (९) प्रतीकात्मकता, (१०) अवकाशीय चित्रात्मकता, (११) पातळीभेदातील बदल (लेव्हल डिफरन्स), (१२) अलंकरण, रंग, पोत, पृष्ठ, अवकाश यांद्वारे साधली जाणारी अखंडता (कंटिन्यूइटी), (१३) रंगसंगती, (१४) पोतसंगती इ. दृश्य परिणाम वास्तूला कलापूर्ण करतात. ही कलाविषयक घटकतत्त्वे इतर कलामाध्यमांतही असतात. परंतु वास्तुकला ही केवळ ललित कला नसून उपयुक्त कलाही असल्यामुळे या तत्त्वांपलीकडील अनेक गोष्टींचा अंतर्भाव वास्तुनिर्मितीच्या प्रक्रियेत करावा लागतो. विविध परिमाणे या प्रक्रियेचे नियंत्रण करतात. प्रथम म्हणजे, ज्या भूखंडावर वास्तू बांधायची आहे त्याचे क्षेत्रफळ, आकार, भूरचना, स्वरूप; ज्याच्यासाठी बांधायची आहे त्याची आर्थिक क्षमता, कुवत; किती कालावधीत बांधायची आहे त्यानुसार प्रत्यक्ष बांधकामाचे समय - नियोजन; ज्या कार्यासाठी वास्तू बांधायची आहे त्यासंबंधी कार्यवादी दृष्टिकोनातून सखोल अभ्यास; वायुवीजन, ऊन, पाऊस या दृष्टीनीं वास्तूची ठेवण; अंतर्गत रचनेतील कार्यानुरूपता, उपयुक्तता, सोयी; विविध प्रकारच्या निःसरणयोजना; कमीत कमी आर्थिक खर्चात जास्तीत जास्त उपयुक्त वास्तुसाहित्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अभ्यास, त्याची निवड; स्थलशिल्परचनेचा शोध व प्रत्यक्ष रचना; वास्तूच्या प्रत्येक घटकाची उपयुक्त, सौंदर्यपूर्ण, माफक किंमतीची रचना इ. अनेक वास्तुशास्त्रीय घटकांची सांगड कलाघटकांशी घालावी लागते. त्याचबरोबर ज्याच्यासाठी वास्तू बांधली जाणार आहे त्याच्या पारंपरिक, धार्मिक, सांकेतिक गरजांचादेखील विचार करून त्यानुसार सोयीसुविधांचा अंतर्भाव वास्तुशास्त्रीय रचना करताना करावा लागतो. याच पातळीवरून वास्तुतज्ञ व्यावहारिक भाग अभ्यासतो आणि हे करीत असताना कलात्मक आणि तांत्रिक गोष्टींचा विचार त्याला सतत जागृत ठेवावा लागतो.
तांत्रिक पातळीवर मुख्यतः प्रत्यक्ष उभारणीची प्रक्रिया होत असते. त्यात कोणत्या पद्धतीने बांधकाम करावयाचे, कोणते साहित्य कसे वापरावयाचे, साहित्यमिश्रणाचे प्रमाण कोणते व ते कसे सातत्याने राखावयाचे; भक्कमपणा व टिकाऊपणा आणण्यासाठी नवनवीन वास्तुसाधने व तंत्रे कशी उपलब्ध करावयाची, त्यांची निवड कशी करावयाची; ह्या सर्व दृष्टींनी वास्तुतज्ञाला निर्मितिप्रक्रियेत सतत विचार करावा लागतो. विविध व नवनवीन गरजांच्या पूर्तीसाठी योग्य त्या तरतुदी रचनेतच अंतर्भूत कराव्या लागतात. त्याच्या तपशीलवार सूचना तोंडी व नकाशावर लेखी द्याव्या लागतात. बांधकामावरील नियमित पर्यवेक्षण गरजेचे असते. अनेक छोट्या गोष्टींची तपशीलवार माहिती नकाशे वगैरेंमार्फत तयार ठेवावी लागते. अशा रीतीने वास्तुनिर्मितीची प्रक्रिया ही कला, शास्त्र व तंत्र या तीन पातळ्यांवरून नियंत्रित केली जाते. यांतील प्रत्येक अंग हे एकमेकाला पूरक असते व संकल्पनात्मक अवस्थेत तिन्हींचा एकत्रित विचार केला जातो. वास्तुकला व इतर कला यांमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे, या क्षेत्रात कलाकृतीला प्रथम ग्राहक मिळतो व त्याच्याच आर्थिक पाठबळावर वास्तुतज्ञ ती पूर्णत्वास नेतो; तर इतर कलाक्षेत्रांत कलावंत प्रथम कलाकृती पूर्ण करतो आणि मग तिचा मोबदला घेऊन विक्री करतो.
या कलानिर्मितीत इतर अनेक संलग्न कलांचा, शास्त्रांचा सहभाग असतो. वास्तूच्या प्रकारावर व व्याप्तीवर संलग्न शास्त्रांच्या सहभागाचे प्रमाण अवलंबून असते. उदा., घर वा बंगला बांधावयाचा असल्यास व त्याची छत-लादी (स्लॅब), तुळई, स्तंभ, पाया इ. रचनाघटक सलोह काँक्रीटमध्ये असल्यास, त्यांची तपशीलवार आरेखने करण्याकरिता एखाद्या सलोह काँक्रीट रचनातज्ञाची (आर्. सी. सी. कन्सल्टंट) व अभियंत्याची नेमणूक वास्तुतज्ञास करावी लागते. शिवाय जमीन कशी आहे, घर किती मजली आहे, त्याचा पाया किती खोल व कसा घ्यावयाचा, ह्याचे मार्गदर्शनही अभियंता करतो. परंतु जेव्हा वास्तूचे कार्य व व्याप्ती वाढते, तेव्हा विविध शाखांतील तज्ञांचे वास्तुतज्ञास साहाय्य घ्यावे लागते. म्हणजे नाट्यगृहाची वा चित्रपटगृहाची रचना असेल, तर ध्वनिनियंत्रणतज्ञ प्रत्यक्ष वास्तूच्या नकाशाचा अभ्यास करून कशा प्रकारचे छत असावे, शोभेच्या छताचे साहित्य काय असावे, बाजूच्या व मागच्या भिंतींवरील अलंकरण कसे असावे, इत्यादीसंबंधी संपूर्ण आंतरगृहात ध्वनीचे मार्गक्रमण कसे होते ह्याची गणिती मांडणी करून हा तज्ञ सर्व तपशील ठरवितो, त्यामुळे नाट्यगृहातील आवाज सुसह्य पातळीवर नियंत्रित करता येतो. अर्थातच हे काम विद्युत् अभियंत्याच्या एकत्रित सल्ल्याने अंतिमावस्थेत जाते. याशिवाय वातानुकूलन-अभियंत्याच्या मार्गदर्शनाचा लाभदेखील प्रत्यक्ष नकाशे तयार करीत असताना आणि बांधकाम सुरू करण्यापूर्वी वास्तुतज्ञाकडून घेतला जातो. काही प्रकल्पांबाबत वास्तुशास्त्रीय संकल्पना पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत सजावटीसाठी कुशल सजावटीकाराची (इंटीरियर डेकोरेटर) खास नेमणूक केली जाते. विशेषतः उपहारगृहाच्या वास्तुप्रकरात ही पद्धत अवलंबिली जाते. याचे कारण अंतर्गत सजावट हे क्षेत्र आज इतके प्रगत आणि खास गुणवत्तेचे झाले आहे, की प्रत्येक वास्तुतज्ञास वास्तुरचना आणि सजावट ही दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी सांभाळता येत नाहीत. वास्तुतज्ञ इमारतीची संरचना करताना सतत मीटरमध्ये विचार करतो; तर सजावटकार सतत सेंटिमीटरमध्ये विचार करतो. सजावटकार हादेखील बहुतेक वेळा वास्तुतज्ञच असतो. केवळ त्याने आपले कार्यक्षेत्र इमारतीकडून सजावटीकडे केंद्रीत केलेले असते. यानंतर मोठ्या वास्तुप्रकल्पामध्ये इमारतीभोवतीची जागा सुशोभित करण्यासाठी स्थलशिल्पज्ञाची नेमणूक केली जाते. हा स्थलशिल्पज्ञ वास्तूभोवतीच्या परिसरात जमिनीची रचना उंचसखल, तद्वत फुगीर करून, विविध बांधकाम-साहित्याच्या पदपथांची रचना करून, कुंपण-भिंती यांची निर्मिती, संकल्पना करून परिसर सजवतो. यासाठी तो एखादा जलमय घटक-उदा., छोटे तळे, धबधबा, प्रवाह इ. -परिसरात अंतर्भूत करतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण परिसरात विविध आकार-प्रकारांच्या, रंगांच्या वृक्षवाटिकांचे रोपण वास्तुसौंदर्यास पूरक ठरेल अशा पद्धतीने करण्याचा अभिन्यास तो तयार करतो.
छोट्या फुलझाडांपासून, हिरवळीच्या प्रकारांपासून ते आंबा, अशोक, काशिद यांसारख्या वृक्षांपर्यंतचे तपशीलवार वर्णन स्थलशिल्पज्ञाच्या अभिन्यासात (लँडस्केप लेआउट) दाखविलेले असते. या तज्ञाच्या सहकार्यामुळे एकंदर वास्तुप्रकारास उठाव येतो. वास्तू आणि निसर्ग यांचा सुसंवादी समन्वय नेत्रसुखद ठरतो. आग्रा येथील ताजमहालमध्ये तसेच विजापूर येथील ऐतिहासिक वास्तुप्रकल्पांत याचा प्रत्यय प्रकर्षाने येतो. आधुनिक काळातही या समन्वयाचे महत्व जाणून वास्तुतज्ञ आणि वास्तुमालक त्यासाठी खास आर्थिक तरतूद करतात. जमीन हा वास्तुकलेचा मूलभूत घटक होय. तिच्यावर वास्तू एखाद्या शिल्पाप्रमाणे उभी राहते. यामुळे तिच्याभोवती परिसरात या समन्वयाची छोटी प्रतिमा प्रत्यक्ष अनुरूप शिल्प उभे करून साकार केली जाते. यासाठीदेखील शिल्पज्ञ आणि वास्तुतज्ञ-स्थलशिल्पज्ञ यांच्या एकत्रित वैचारिक देवाणघेवाणीतून अंतिम निर्णय घेतला जातो.
विद्यमान काळात प्रत्येक क्षेत्रात असंख्य विशेषीकरण - क्षेत्रे निर्माण झाली आहेत. त्यामुळे वास्तुकलेसारख्या विस्तृत क्षेत्रात-विशेषतः मोठ्या वास्तुप्रकल्पांत-अनेक विशेषज्ञांचे मार्गदर्शन भिन्न-भिन्न पातळ्यांवर घेतले जाते. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राचा या क्षेत्राशी फारच घनिष्ट संबंध अलीकडच्या काळात प्रस्थापित झाला आहे. पूल, धरणे व बंधारे, विद्युत् शक्ति-उत्पादन केंद्रे ही अभियांत्रिकीची खास क्षेत्रे मानली जातात. या क्षेत्रांत सौंदर्यापेक्षा सुस्थिरता, कार्यवाही व गुणवत्ता या बाबींकडे जास्त लक्ष दिले जाते. याचा अर्थ नदीवरील पूल सौंदर्यपूर्ण करता येत नाही, असा नव्हे. कोणतेही रचनाघटक, मग ते खास अभियांत्रिकी उद्देशाचे असले, तरी सौंदर्यदृष्टी दाखवून व त्या वास्तुसाहित्याचे ज्ञान वापरून कलात्मक करता येतात, हे जगभरच्या अनेक अभियांत्रिकी उद्दिष्टांच्या वास्तूंनी दाखवून दिले आहे. उदा., सलोह काँक्रीटमधील सौंदर्यपूर्ण रचना ही काही पूल, अनेक दूरसंचार-मनोरे, पाण्याच्या उंचावरील भव्य टाक्या इत्यादींद्वारे प्रत्ययास येऊ शकते. अभियंता आणि वास्तुतज्ञ यांची क्षेत्रे संलग्न असली, तरी अभियंता हा वास्तुरचना, त्याचे घटक, साहित्य -गुणधर्म, रचनेतील स्थिरता इ. गणिती बाजूंकडे सर्व लक्ष केंद्रित करतो; तर वास्तुतज्ञ हा अवकाशाची शास्त्रीय व कलात्मक गुंफण, वास्तूचा आकार, रंग, सौंदर्य, कार्यानुरूपता इ. घटकांचा विचार करतो. कागदावरील संकल्पना प्रत्यक्षात उभी करताना तो तपशीलवार भारवाही रचना-घटकांसाठी अभियंत्यांचा सल्ला घेतो. म्हणजे वास्तुतज्ञाने गोल स्तंभ कल्पिला, तर त्यात किती लोहदोर घालावयाचे हे अभियंता गणिताने ठरवितो व त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर ती संकल्पना, तो आकार अस्तित्वात येतो. थोडक्यात, वास्तुतज्ञ हा कागदावर वास्तुप्रकल्पाची रचना करतो व तिला कागदावरच अंतिम स्वरूप देताना विविध क्षेत्रांतील विशेषज्ञांच्या सल्ल्याने त्यात सौंदर्यास हानिकारक ठरणार नाहीत असे फेरफार करतो व अंतिम स्वरूप देतो. मग प्रत्यक्ष उभारणीसाठी आपले वास्तुकल्पाचे नकाशे अभियंत्याकडे रचनात्मक नकाशे तयार करण्यासाठी पाठवितो. ते आल्यानंतर पुन्हा वास्तुतज्ञाची त्यास अंतिम मंजुरी दिली जाऊन मगच प्रत्यक्ष कामास प्रारंभ होतो. विशेषज्ञांच्या प्रत्येक बैठकीत वास्तुतज्ञ त्याच्या सौंदर्यसंकल्पनेला बाधा येऊ न देता, त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव वास्तु-विधानात करतो. अतिभव्य वास्तुप्रकल्पांत - उदा., नगररचना, विद्यापीठ-परिसर इ.- अनेक क्षेत्रांतील विशेषज्ञांची मदत वास्तुतज्ञाला घ्यावी लागते. त्यांत पर्यावरण- तज्ञ, भूगर्भ-तज्ञ, भूमापन आणि भूस्वरूप-तज्ञ इत्यादींचा समावेश होतो. या संलग्न क्षेत्रांतील विविध कल्पनांचा मेळ आज यशस्वीपणे अतिभव्य स्थापत्य-प्रकल्पांत घातला जातो. म्हणजे धरणे इ. सार्वजनिक प्रकल्पांतही सौंदर्यनिर्मितीच्या दृष्टीने आकार, अवकाश, बाह्यांग-अलंकरण या बाबतींत वास्तुतज्ञाचा सल्ला घेतला जातो.
ज्याप्रमाणे ध्वनीचे रूपांतर संगीतात आणि शब्दांचे रूपांतर वाङ्मयात होते, त्याचप्रमाणे वास्तुघटक, कार्य, तंत्र ह्यांचे रूपांतर वास्तुकलामाध्यमात केले जाते. विशिष्ट प्रदेश, तेथील लोकजीवन, संस्कृती, राजकारण, भाषा इत्यादींच्या वैचारिक आणि कलात्मक संकल्पनांचा परिणाम वास्तुकलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. शैली निर्माण होतात व कालौघात त्या प्रगत होत जातात, अथवा अस्तंगत होताना दिसतात. परंपरा हे त्यांना या प्रक्रियेत बांधून ठेवणारे सूत्र असते व त्यातूनच नवकल्पना, नवतंत्र, आकार, संस्कार अस्तित्वात येतात. या अभिव्यक्तिमध्ये - (१) आशय व (२) प्रतीकात्मकता हे विषयनिष्ठ घटक; तर (१) आकार, (२) अवकाश, (३) घनता, (४) आकृतिबंध, (५) रंग, (६) प्रकाश, (७) पोत, (८) परिसर व (९) अलंकरण हे पूरक वास्तुशास्त्रीय घटक आशयाचा परिपोष करतात. समाजाला वास्तुकला केवळ आपल्या प्रेरणांचे प्रतीक म्हणून नको असते, तर आपल्या व्यावहारिक गरजा भागविण्याचे साधन म्हणूनही हवी असते. या दोन्ही गोष्टींचा मिलाफ सहजपणे सामाजिक उद्दिष्टाच्या वास्तुनिर्मितीत घडलेला आढळतो. तसेच अवकाशीय नियोजनाव्यतिरिक्त आकार, प्रमाण इत्यादींद्वारे कार्यानुरूप वेगळेपण निर्मितीतून अभिव्यक्त होते. म्हणजे घरापेक्षा चर्च वेगळे दिसते. मंदिरापेक्षा बसस्थानक भिन्न वाटते. ही भिन्नता साकार होताना आपोआपच कार्यानुरूप संलग्न प्रतीकात्मकता आकारामधून रूढ होत जाते. ही प्रक्रिया संथ गतीने स्थिरावत जाते. शास्त्र, परंपरा, इतिहास, धर्म, तत्वज्ञान इ. क्षेत्रांतील सांस्कृतिक संचित बांधीव आकाराद्वारे व्यक्तवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जातो. शब्दांद्वारे हे संचित लिहिले जाते, स्वरांद्वारे संगीतबद्ध केले जाते, रंगरेषांद्वारे चित्रबद्ध केले जाते, तसेच लाकूड- दगड विटांच्या द्वारे वास्तुबद्ध केले जाते. वास्तुविधानात (प्लॅन) ही प्रतिकात्मकता चीन काळापासून निदर्शनास येते. हिंदूंची नगरे, मंदिरे, राजाप्रसाद यांची वास्तुविधाने ‘वास्तुपुरुष मंडल’ या वेदांमधील वैश्विक आकृतीवर आधारलेली असत. संपूर्ण विश्वाचे विधान त्या मंडलात केलेले असे, त्याच आधारावर वास्तुरचना कल्पिली जाते असे. ख्रिस्ती चर्चच्या विधानातील वर्तुळ, क्रॉस इ. आकार प्रबोधनकालीन वास्तुतज्ञांनी प्रतीकात्मक व परंपरागत मूल्यांमुळेच अंगीकारले. वास्तुविधानाबरोबरच दर्शनी भागावरही अशीच प्रतीकात्मकता साकार करण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून करण्यात आले. इस्लामी घुमट, बौद्ध स्तूप हे वैश्विक छत समजून प्रतीकात्मकतेने आकारबद्ध करण्यात आलेले आहेत. काही वास्तुरचनांत तर वास्तूच्या अंगप्रत्यंगांवर छोट्या-मोठ्या अलंकृत घटकांमधून भिन्न भिन्न प्रतीके शिल्पबद्ध करण्यात आली आहेत. उदा., हिंदू मंदिरातील शिखररचनेतील छोटीछोटी असंख्य मंदिरे. त्रिकोणी, ऊर्ध्वगामी, शंक्वाकृती, पिरॅमिडाकृती इ. आकारांतून प्रतीकात्मक पातळीवर देवस्थान, स्वर्ग, दिशा इ. सुचविण्याचा प्रयत्न अनेक धर्मांतील वास्तुरचनांत झालेला आढळतो. राजसत्तेचे महत्व मनोरा उभारून व्यक्त करण्याची प्रथा अतिप्राचीन संस्कृतीतील ‘मेनहीर’ च्या (किंवा मेगॅलिथः इ. स. पू. ४००० ते १००० या कालावधीतील वेगवेगळ्या अनियमित आकारांचे भव्य शिलाखंड) निर्मितीपासून आजही अस्तित्वात आहे. फक्त कालानुरूप त्यातील आकार, प्रमाण व साहित्य यांत बदल होत गेले. आकृतिबद्ध अलंकरणाद्वारे प्रतीकात्मकतेचा परिपोष करण्याचे तंत्रही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेच. त्यात वास्तुघटकां बरोबरीनेच चित्र, शिल्प, कुटि्टमचित्रण, भित्तिचित्रण, चित्रकाच यांद्वारे धर्म, सत्ता, देव यांचे प्रतीकात्मक चित्रण आढळते. हिंदू मंदिरांवरील शिल्पे, बायझंटिन चर्चवास्तूंमधील कुट्टिमचित्रे, गॉथिक कॅथीड्रलांमधील चित्रकाचयुक्त खिडक्या, प्रबोधनकालीन मानवी शिल्पे इ. ठळक उदाहरणे अलंकरणाद्वारे वास्तूच्या आशयाभिव्यक्तीला जास्तीत जास्त सधन करण्याच्या प्रयत्नांची कल्पना देऊ शकतात. विसाव्य शतकातील वास्तुकलेत या पद्धतीचा पूर्ण अभाव दिसतो. कारण इतर संलग्न कलाप्रकारांप्रमाणे या क्षेत्रातही अमूर्तता आली. प्रतीकात्मकतेच्या संकल्पनेतही कालानुरूप बदल झाले, किंबहुना विसाव्या शतकातील सर्व प्रेरणांचे प्रतीक व प्रतिबिंब अलंकरणहीन भौमितिक आकारांद्वारे व्यक्त होत असावे.
वास्तुनिर्मितीच्या प्रक्रियेत वास्तूचे कार्य हे सांस्कृतिक ज्ञानावर अवलंबून असते आणि तंत्र हे तत्कालीन शास्त्रप्रगतीने मर्यादित असते; परंतु वास्तूचा आकार हा सर्वस्वी वास्तुतज्ञाच्या प्रज्ञाशक्तीचा मुक्त आविष्कार असू शकतो. प्रत्येक वास्तुतज्ञ अर्थपूर्ण आकार-संकल्पना निर्माण करू शकत नाही; जसे प्रत्येक लेखक श्रेष्ठ वाङ्मयीन कलाकृती निर्माण करू शकत नाही, किंवा प्रत्येक चित्रकार ‘पिकासो’ होऊ शकत नाहीं. आकार ही वास्तुतज्ञाच्या प्रतिभेची भरारी असते. वास्तूचा आकार निर्माण होताना त्या प्रक्रियेत भरीव सघनता, त्यात सामावलेले अवकाश व आकार - अवकाशाच्या एकत्र गुंफणीतून निर्माण झालेला एकंदर बांधीव रचनाबंध (काँपोझिशन) यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. नंतर त्या रचनाबंधाला प्रकाशयोजना तेजस्वी करते; रंगसंगती भाववृत्ती बहाल करते आणि पोत, अलंकरण एकंदर कलाकृतीला वास्तुमत्त्व प्रदान करतात. अवकाशीय अनुभूती ही बघणाऱ्याला दिङ्मूढ करते. पण प्रथमदर्शनी जसजसा बघणारा त्या अनुभूतीशी एकरूप होतो, तसतसे नंतर त्यातील रचनात्मक बारकावे त्याला दिसू लागतात. अवकाशीय रचना हा या कलेचा आत्मा आहे. ही अवकाशीय क्रियाशीलता फक्त वास्तूच्या अंतर्भागापुरतीच मर्यादित नसते. ती वास्तूभोवतीचा परिसर, वास्तुसमूहामधील चौक, मैदान, चौफुली इ. नागरी अवकाश संकल्पनेतही अनुभवास येते. व्हेनिसचा ‘सान मार्क स्क्वेअर’, ‘रोममधील सेंट पीटर पीअॅझा’ इ. नागरी अवकाशीय आकृतिबंधाची उत्कृष्ट उदाहरणे मानता येतील. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणेच वास्तू तितक्या आकृती असे मानले जाते. [आकार, कलेतील].
प्रमाणभूततेच्या पद्धतीचा इतिहास म्हणजे वास्तुकलेतील एक मनोरंजक क्षेत्र आहे. इतिहासात प्रत्येक संस्कृतीतील विचारवंतांनी वेगवेगळ्या मापनप्रणालींचा अवलंब केला. वास्तूची उंची, रूंदी, लांबी यांप्रमाणेच खिडक्या, दारे, स्तंभ, कमानी, तुळई इ. अनेक वास्तुघटक बांधले गेले; ते काही प्रमाणसूत्रांना अनुसरूनच. ग्रीकांनी स्तंभाच्या तळाचा व्यास हा मूल-प्रमाणघटक मानला, तर भारतीयांनी ‘अंगुली’ म्हणजे बोटाची जाडी हे मूलप्रमाण मानले. ईजिप्शियन लोकांनी हाताच्या तळव्याची रुंदी हा प्रमाणाचा मूलघटक मानला. पुढे हे शास्त्रही प्रगत होत गेले; परंतु नवनवीन पद्धती शोधण्याचे कार्य विचारवंतांनी चालूच ठेवले. ते या शतकातील ल कॉर्ब्यूझ्येने शोधलेल्या रचनापरिमाणापर्यंत (मॉड्युलर) चालूच राहिले. मापनपद्धतीच्या शोधांमुळे वेळोवेळी प्रमाणबद्धतेचे सिद्धांत वास्तुशास्त्रात अवलंबिले गेले, ते बदलतही गेले. कधी मध्ययुगीन चर्चच्या बांधणीत तत्कालीन वास्तुतज्ञांनी भौमितिक आकारांचा आधार घेतला; तर प्रबोधनकाळातील वास्तुकारांच्या प्रमाणबद्धतेच्या कल्पना सांगीतिक आकृतिबंधांवर आधारलेल्या होत्या. लय-तालाच्या संकल्पना ज्याप्रमाणे एखाद्या बंदीशीला सुश्राव्य रागदारीत बांधतात, त्याचप्रमाणे प्रमाणबद्धतेची सूत्रे वास्तूच्या विविध अंगप्रत्यंगाना एका लयबद्ध बांधीव आकारात गुंफतात. या सर्व सूत्रांचे मूलभूत परिमाण म्हणजे माणसाची उंची किंवा त्याची आकृती होती. त्यानुसारच तत्कालीन किंवा सद्यकालीन वास्तुतज्ञास तो संकल्पित असलेल्या अवकाशाचा आकृतिबंध, त्याची व्याप्ती, परस्परघटकांचा संबंध, समतोल आणि एकूण कार्यकारणभावासाठी आवश्यक असणारे सुखद वातावरण आदी सर्व घटकांची कल्पना या प्रमाबद्धतेच्या सूत्रांनी आणि स्वतःच्या प्रतिभेच्या अनुमानाने येऊ शकते. प्रमाण (स्केल) आणि प्रमाणभूतता (प्रपोर्शन) या दोन गोष्टींचे वास्तुकलेत अनन्यसाधारण महत्व आहे. या क्षेत्रातील सर्जनशीलतेस अधिक चालना मिळाल्यानंतर जगातील प्रत्येक संस्कृतीने आपली मापन व सूत्रपद्धती विकसित केली. तरीदेखील विश्वव्यापी अनुसरण झाले, ते ग्रीकांनी शोधलेल्या ‘सुवर्णछेद’ (गोल्डन सेक्शन) या सूत्राचे. पायथॅगोरसने त्यानुसार संशोधन केले. प्रबोधनकालीन वास्तुतज्ञांनी ही पद्धती वास्तुविधानाच्या व दर्शनी भागाच्या संकल्पनेत वापरली व विसाव्या शतकातील थोर वास्तुतज्ञ ल कॉर्ब्यूझ्ये याने आपल्या रचनापरिमाणाच्या पद्धतीत त्याच तंत्राचा आधार घेतला. असे हे सुवर्णछेद रचनापरिमाण म्हणजे-एखाद्या रेषेचे, छेदाचे विभाजन करताना दोन भुजा असमान असतात; परंतु असमान भुजांचे परस्परप्रमाण सूत्रबद्ध असते. म्हणजे रेषेचे असमान भाग ‘अ’ आणि ‘ब’ मानल्यास छेदातील ‘अ’ चे ‘ब’ शी जे गुणोत्तर प्रमाण (रेशिओ) तेच ‘ब’ चे ‘अ+ब’ शी असते, थोडक्यात आयताची लांबी ‘अ+ब’ मानली तर रुंदी ‘ब’ येते व भुजांचे हेच परस्परप्रमाण वास्तु-संकल्पनेत विविध घटकांची लांबी ठरविताना विचारात घेतले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम जलद व प्रमाणबद्ध होते. रचनापरिमाणे जरी प्राचीन काळापासून अस्तित्वात असला, तरी आधुनिक काळातील तंत्राच्या आणि साधन-साहित्य-निर्मितीच्या प्रगतीमुळे त्यात सतत बदल घडत असतात. तरीदेखील मानवी उंची ही सर्वत्र प्रमाणभूत मानली जाते.
परिसर दिसण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. वास्तुकलेत प्रकाश ही गरज तसेच सोय असते. मानवी कार्यकारणासाठी बांधीव अवकाशात याचसाठी प्रकाश-नियंत्रण करणे, हा एक कलात्मक भाग असतो. कारण प्रकाशपतन सतत बदलत असते. विविध पृष्ठभागांवर प्रकाश पडल्यानंतर भिन्न-भिन्न प्रकारचे परावर्तित सूक्ष्म बदल होत जाऊन रंग, पोत, आकार यांचा आकृतिबंध सुस्पष्ट करतो. प्रकाश वास्तूच्या अंतर्भागी येऊन त्या बांधीव अवकाशाला नैसर्गिकता प्रदान करतो. तो वास्तुघटकांवर पडल्यानंतर निर्माण होणारे छायापतन आकारांना सौष्ठव देते. भव्य अंधाऱ्या पोकळीत शिखरावरून प्रकाश आत घेतला जातो; तेव्हा अवकाश व आकार हे नाट्यमय भाववृत्ती जागृत करतात. हवा आणि प्रकाश या अंतर्भागात यावेत, म्हणून मानवाने अनेक रचनात्मक संकल्पना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्याने वास्तूमध्ये झरोके, खिडक्या, शिरोभागी खिडक्या, चौक, प्रकाश-विहिरी, उत्तर प्रकाश-झोत इ. अनेक वास्तुघटकांचे कलात्मक संयोजन करून तिचे अंतरंग सजीव, चैतन्यमय केले आहे, अतिभव्य वास्तुप्रकल्पात प्रकाशनियोजन आणि नियंत्रण या गोष्टींद्वारे या कलेतील आकृतिबंधात आभासत्मक प्रतीकात्मकता साधलेली दिसते. प्रकाशाचा इतर वास्तुघटकांशी घातलेला समन्वय, त्याद्वारे वास्तूचे अंतर्बाह्य बदलत जाणारे रूप हे अनुभूती घेण्याचे क्षेत्र मानण्यात येते. वास्तूची त्वचा, तिचा पोत व रंग हे घटकही एकात्म सौंदर्यनिर्मितीस हातभार लावतात. ते वास्तुमत्त्व सघन करण्यास कारणीभूच होतात. रंग आणि मनोवृत्ती यांचा जवळचा संबंध असतो. वास्तुकलेत आशय, कार्य, परिसर यांद्वारे विशिष्ट प्रकारची भाववृत्ती अजाणता निर्माण होत असते. तिला पूरक ठरेल अशा कौशल्याने वास्तुतज्ञ पोत व रंग यांचा उपयोग कलात्मक सूचकतेने करतो. त्याचा इतर घटकांशी परस्परसंबंध, मेळ, नियंत्रण, संलग्नता, गुंफण यांद्वारे एक सजीव चैतन्यपूर्ण आकृतिबंध सुखद वास्तव्यासाठी माणसाला उपलब्ध होतो.
वास्तुकलेतील मानसशास्त्र हजारो वर्षांपासून विकसित होत गेले. भिन्न प्रदेशांत ते भिन्न मार्गांनी उत्क्रांत होत गेले. परंतु त्यामागील मानवी मन आणि गरज ही सर्वत्र व सदैव समानच राहिली. निवारा, संरक्षण व त्यांमागच्या वास्तुमय कल्पना स्थिर होत गेल्या. एखाद्या वास्तूमध्ये वावरताना होणाऱ्या मानवाच्या हालचालींमधील सुलभता, वास्तूची कार्यप्रकारांनुसारी उद्दिष्टे, मानवाच्या विश्रांतीच्या गरजा या घटकांनी वास्तूचे अवकाशनियोजन प्रमाणबद्ध केले. निसर्गाशी जवळीक कुठे साधावयाची, निसर्गापासून सुरक्षित व बंदिस्त कसे राहायचे, ह्याविषयीच्या अनुभवजन्य आडाख्यांमुळे अवकाशीय संकल्पना मानवी मनात प्रगत होत गेल्या. अतिप्राचीन काळापासून मानवाचे या क्षेत्रातील शिक्षण प्रयत्नप्रमाद पद्धतीने विकसित होत गेले. त्यायोगे वासतुनिर्मिती शक्य तितकी स्वस्त, उपयुक्त व सुखद होत गेली. वास्तुकलेच्या प्रत्येक घटकाशी मानसशास्त्र निगडित आहे. कारण कोणतीही गोष्ट पाहिल्यानंतर मानवी मनात तिच्या पूर्वसंकल्पनेच्या संदर्भानुसार नकळत प्रतिक्रिया उमटतात. काही रंग सुखद वाटतात; काही थंड, उष्ण, शांत असे मनोवृत्तीस पोषक किंवा दाहक असतात. त्यामुळे त्यांचा वापर वास्तुनिर्मितीत आशयसमृद्धीसाठी केला जातो. तीच गोष्ट आकार व अवकाश यांबाबतीत लागू होते. उदा., लहान मुले ‘घर’ खेळताना छोटेसे प्रमाणबद्ध घर खोलीच्या कोपऱ्यात कापडांनी, पाटांनी आच्छादून तयार करतात. पूर्ण खोली घर म्हणून स्वीकारत नाहीत. अतिभव्य शयनगृहात झोप येणे कठिण आहे. सुरक्षिततेची भावना अवकाशाशी फार निगडीत असते. पूर्वेकडे प्रवेशद्वार असावे, गोमुखी भूखंड असावे, व्याघ्रमुखी भूखंडावर वास्तू बांधू नये, अशांसारख्या संकेतांनी, लोकश्रद्धांनी वास्तुकलेचे व मानसशास्त्राचे नाते दृढ केले आहे. त्यामुळे वास्तुतज्ञाने विवेकी संबेदनशीलतेने निर्माण केलेली वास्तू मनाला भावनात्मक पातळीवर गोचर होते; तर वाईट रीतीने नियोजन केलेली वास्तू वास्तुतज्ञाच्या मनाचा, त्याने केलेल्या आकारांचा गोंधळ दर्शविते. वास्तुतज्ञाच्या वास्तुनिर्मितीतल्या कलात्मक जाणिवा आणि त्यात राहणाऱ्यांच्या श्रद्धायुक्त भावना यांची योग्य प्रकारे सांगड घातली गेली, तर ती वास्तुरचना कलात्मक दृष्ट्या आणि लौकिक दृष्ट्याही यशस्वी ठरते.
कोणत्याही कलेचा आस्वाद घेणे ही अत्यंत एकाग्र होऊन समन्वय साधण्याची क्रिया आहे. वास्तुकलेतील आस्वादप्रक्रिया अधिक समय घेणारी मानली जाते. कारण चित्र, शिल्प यांप्रमाणे केवळ बाह्यांग येथे पाहायचे नसते; तर अंतरंगात प्रवेश करून शारिरीक दृष्ट्या वावरायचे असते. वास्तुकला ही सर्व कलांची जननी असल्यामुळे वास्तुकलेच्या आस्वादप्रक्रियेत दृश्यात्मक अनुभवाइतकीच अवकाशीय अनुभूतीही महत्त्वाची असते. कैलास लेणे किंवा ताजमहाल पाहत असताना, मनात गाडीच्या वेळेचे विचार किंवा इतर विवंचना असल्यास आस्वादात अडथळा येतो. वास्तूशी पूर्णपणे तादाम्य पावून आस्वाद घेतला, तरच असंख्य तपशील, संरचना, प्रतीके, आकार, आकृतिबंध मनाला गोचर होऊ शकतात. पाहणे, बघणे आणि निरीक्षण करणे या तीन क्रियांमध्ये अभ्यासाच्या वाढत्या कक्षा ध्वनित होतात. कलास्वादात निरीक्षण करणे आवश्यक असते. वास्तूच्या चहूबाजूंनी फिरून तिचे त्या परिसरातील अस्तित्व, सभोवतालच्या निसर्गाशी एकरूप होऊन जाण्याची क्षमता, आकाराचे परस्परांशी, भरीव पृष्ठाचे पोकळीशी, रंगाचे पृष्ठाशी अशी अनेक नाती अभ्यासणे आवश्यक असते. त्यातही सूर्यप्रकाशामुळे तेजाळणारी वास्तू, तिच्या अंगप्रत्यंगावर खेळला जाणारा ऊनसावल्यांचा लपंडाव, घाटदार, ठाशीव, सपाट, वेगवान असे कितीतरी आकार इतर आकारांना घेऊन एक लय, ताल साधत असतात. आणखी थोडे निरखून पाहिले, तर आकृतिबंधातील प्रत्येक घटक एक वृत्ती दर्शवित असतो. रेषांचे विभिन्न प्रकार द्वंद्व निर्माण करतात. त्रयस्थपणे एक कलाकृती म्हणून वास्तूकडे पाहिल्यास मानवी भावनांप्रमाणेच वास्तूही काहीतरी बोलत असतात. काही भावना सांगण्याचा प्रयत्न करीत असतात, असे जाणवते. परंतु या निरामय आस्वादासाठी प्रेक्षकांची दृष्टी आणि मन सुसंस्कारांनी तयार झालेले असले पाहिजे. पाहण्या-बघण्यापेक्षा निरीक्षण करता आले पाहिजे. कलाघटकांशी मैत्री झाली पाहिजे, तरच एक व्यक्तिमत्व दुसऱ्या वास्तुमत्त्वाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू शकेल. एखादे निसर्गदृश्य नेमके सुंदर का वाटते, या अभ्यासापासून कलाघटकांचे विश्लेषण करता येते. एखादे गाणे श्रवणीय का वाटते, याचा विचार केल्यास ज्याप्रमाणे ताल, सूर, स्वर, बंदीश, शब्द व ती ऐकतानाची मनःस्थिती असे विविध निष्कर्ष आपण काढू शकतो; तीच बाब चित्र आणि शिल्प यांना लागू पडते. वास्तुकलेच्या बाबतीत समन्वयाचा काळ वास्तूच्या व्याप्तीमुळे जास्त असतो; पण तो जास्त काळ आनंद देणाराही असतो.
वास्तुनिर्मितीची प्रक्रिया आणि तिचे स्वरूप, गुणवैशिष्ट्ये मुख्यतः त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांवर अवलंबून असतात. एकदा एखादे साधन उपयोगात आणण्याचे ठरविल्यानंतर त्याचे तंत्र त्या साधनांच्या गुणधर्मांनुसार विकसित होत जाते. ही एखाद्या साधनाची तंत्रशुचिता विकसित होण्याची प्रक्रिया मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे त्या साधनाची उपलब्धता व उपयुक्तता आणि त्या साधनाचा वापर बांधकामात करू शकणाऱ्या कारागिरांची क्षमता. नवे साधन किंवा साहित्य हे बांधकामाचे साधन म्हणून जेव्हा समाजात मान्यता पावते; तेव्हा त्या साधनाची उपयुक्तता अनेक दृष्टिकोणांतून तपासली जाते. प्रत्यक्ष प्रयोग करून छोट्या प्रमाणावर बांधकाम करून, विविध प्रकारच्या हवामान बदलांस ते साहित्य कितपत टिकाऊ, भक्कम राहते; किंवा भारवाही घटक किती सक्षमतेने बांधीव आकारास सुस्थिरपणा देऊ शकतात, यावर त्यांची उपयुक्तता अवलंबून असते. अशा चाचण्या त्या साहित्यास शक्य तितक्या उपयुक्त बनवतात. त्यांची निर्मिती, आकार आणि बांधकाम तंत्र यांसंबंधी अनेक निष्कर्ष मांडले जातात. साहित्य नैसर्गिक स्वरूपात वापरायचे की त्यावर काही संस्करण करायचे? की भिन्न साधनमिश्रण करून त्याची उपयुक्तता वाढवायची, वगैरे तांत्रिक गोष्टी व त्यांची रूपरेषा निश्चित व्हायला बराच काळ जावा लागतो. चाचण्या आणि चुका व त्यानंतर पुनर्निर्माण हीच पद्धती मानवाने पहिल्यापासून अवलंबिलेली आढळते. अलीकडील दोनशे वर्षांत साधन- चिकित्सेचे क्षेत्र खूपच विकसित झाले. विविध प्रकारचे संशोधन तांत्रिक प्रगतीमुळे वेगाने होऊ लागले. परिणामतः नवीन वास्तुसाधने बाजारात येण्याचे प्रमाणही वाढत गेलेले आढळते. साधारणपणे सामान्य वास्तुतज्ञ सर्वस्वी नवीन साधने वापरण्याचे धाडस करीत नाही. त्याचे कारण प्रयोग करण्यास लागणारी संशोधनवृत्ती, त्यासाठी लागणारा वाढीव खर्च, टिकाऊपणाची हमी, वास्तुमालकाचा आपल्या सल्लागाराबाबताचा विश्वास या गोष्टींचा मेळ बसावा लागतो. त्यामुळे रूढ तंत्राने वास्तुनिर्मिती करण्याकडे सामान्यतः समाजाचा कल असतो. नव्या गोष्टी समाज त्वरित आत्मसात करीत नाही. त्यांना मान्यता मिळण्यासाठी पुरावे, म्हणजे वास्तुनिर्मिती झालेली असावी लागते. तिची सर्वंकष उपयुक्तता अनुभवल्यानंतर वापर केला जातो. या प्रक्रियेचा काळ आज खूपच कमी झाला आहे. किंबहुना मानवाच्या गरजा रूढ परंपरागत तंत्राने भागविता येणार नाहीत, या गोष्टीची जाण आज प्रगत देशांना झाली आहे. या बदलत्या दृष्टिकोणामुळे रोज नवनवीन तंत्रे व साहित्य यांचे संशोधन होऊन ते प्रचलित होत आहे. ही झाली प्रगतिशील देशांतील परिस्थिती. परंतु मागासलेल्या देशांत आजही भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे परंपरागत व सहज उपलब्ध साधनेच वास्तुनिर्मितीसाठी वापरली जातात आणि रूढ तंत्रानेच वास्तुनिर्मिती केली जाते.
कोणतेही बांधकाम हे विविध वास्तुशास्त्रीय घटकांनी बनलेले असते. त्यातील प्रत्येकाचे कार्य रचनात्मक दृष्टीने भिन्न असते. या कार्यानुसार त्याला आवश्यक असणारे गुणधर्म प्रत्येक साधनाची निवड करण्यात साहाय्यभूत ठरतात. म्हणजे खोल्यांतील जमिनीसाठी फरशीच्या लाद्या उपयुक्त वाटतात; पण छतासाठी त्या जड वाटतात. म्हणून छतासाठी कौले, पत्रे, काँक्रीटची छत - लादी (स्लॅब) इ. नवी साधने निर्माण करावी लागतात. संरचनेतील जे घटक जबाबदारी समर्थपणे पेलू शकतील, ज्यांचा खर्च आवाक्यातील असेल आणि ज्यांची प्रत्यक्ष बांधकामपद्धती सोपी, सहजसाध्य व कार्यक्षमतेच्या दृष्टीने टिकाऊ असेल - म्हणजेच छत गळके असून चालणार नाही, भिंती कमकुवत असून भागणार नाही - अशाच साधनघटकांची निवड वास्तुतज्ञाला करावी लागते.
लेखक : १) दीक्षित विजय
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/4/2020
मीएसव्हानडेररोअ, लूट्व्हिख : (२७ मार्च १८८६–१७ ऑग...
भारतीय द्वीपकल्पातील (भारत व पाकिस्तान) वास्तुकलेच...
गॉथिक’ ही संज्ञा प्रबोधनकालीन कलावंतांनी मध्ययुगीन...
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वास्तुकला या लेखा...