अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वास्तुकला या लेखात अभिप्रेत आहे. ‘अमेरिकन कला’ अशा व्यापक संज्ञेने उत्तर, दक्षिण व मध्य अमेरिकेतील ज्या कलांचा निर्देश केला जातो, त्यांत मूळच्या देशी कला, वसाहतकालीन संक्रमणदर्शक कला व नंतर उत्क्रांत झालेल्या राष्ट्रीय कला, अशा तीन ठळक प्रकारांचे संमिश्रण झालेले आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वास्तुकलेलाही ‘प्वेब्लो’ संस्कृतीच्या वास्तुकलेची त्रोटक पार्श्वभूमी आहे. त्या संस्कृतीच्या सुरुवातीला (सु. १०५०) पहाडघरे रूढ होती व अठराव्या शतकात मजले असलेली धाब्याची घरे बांधली जात.
सतराव्या शतकात प्रथम इंग्रज व नंतर अन्य यूरोपीय लोकांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. वसाहतकाळाच्या आरंभी लाकडी ओंडक्यांची व फळ्यांची घरे बांधत. वसाहतींना स्थैर्य लाभल्यावर नगररचनेच्या दृष्टीने पक्की घरे बांधण्यात आली. त्यांवर यूरोपीय व विशेषतः इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच व डच वास्तुरचनेचा प्रभाव होता. मात्र स्थानिक हवामान व लाकडाचे विशिष्ट रचनातंत्र यांमुळे वसाहतकालीन गृहरचना मूळ यूरोपीय नमुन्यांहून काहीशी वेगळी करणे भाग होते. लाकडी चौकटीत बांधलेल्या विटांच्या भिंती व रस्त्यावर सज्ज्याप्रमाणे झुकविलेला दुसरा मजला ही न्यू इंग्लंड व व्हर्जिनिया येथील घरांची वैशिष्ट्ये होती. या घरांची छपरे उंच व निमुळती असत आणि खिडक्यांची तावदाने शिशाच्या चौकटीत बसविलेली असत. अमेरिकेतील कडक थंडीमुळे लाकडी बांधकाम आकसे व घरास तडे जात; म्हणून घराच्या बाहेरून लाकडी फळ्यांचे आच्छादन करीत. घरातील शेकोट्या व घरावरील धुराडी यांचीही सोय करण्यात येई.
अठराव्या शतकात इंग्लंडमधील जॉर्जियन पद्धतीची गृहरचना लोकप्रिय झाली. ही घरे ऐसपैस व माळवदी छपरांची असत. नक्षीचे कठडे, क्वचित घुमट व रोमन पद्धतीची अंतर्बाह्य सजावट हे विशेष जॉर्जियन गृहरचनेत होते. शाळा, चर्च, सरकारी इमारत व बँक यांसारख्या लोकोपयोगी इमारतींवर, ⇨सर क्रिस्टोफर रेन (१६३२–१७२३) या इंग्रज वास्तुशास्त्रज्ञाच्या शैलीचा प्रभाव होता. व्हर्जिनियाची राजधानी विल्यम्सबर्ग येथील एक इमारतही स्वतः रेनने निर्माण केली आहे. बॉस्टन, फिलाडेल्फिया इ. ठिकाणी सार्वजनिक इमारती व सधन लोकांची सदने मोठ्या संख्येने बांधण्यात आली. फिलाडेल्फिया शहरी डॉ. जॉन केओर्सली व अँड् रू हॅमिल्टन यांनी स्वातंत्र्याचे सभागृह बांधले.
स्वातंत्र्ययुद्धानंतर (१७७५–८३) साधारणपणे १७९० पर्यंत अमेरिकन वास्तुकलेवर प्राचीन ग्रीक व रोमन वास्तुकलांचा पगडा होता. टॉमस जेफर्सन या वास्तुविशारदाने अभिजात ग्रीक व रोमन कलांचा पुरस्कार केला. त्या कलांत स्वतंत्र अमेरिकन राष्ट्राला स्वतःच्या मनोवृत्तींचे व आदर्शाचे प्रतिबिंब दिसले. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यानेही वरील विचारसरणीस पाठिंबा दिला. अमेरिकन वास्तुकलेवर ग्रीक वास्तुकलेचा प्रभाव अधिक होता. या कालखंडातील बेंजामिन लाट्रोब (१७६४– १८२०) हा पहिला प्रशिक्षित व व्यावसायिक वास्तुविशारद होय.
याच सुमारास पूर्व व पश्चिम अमेरिकेत इंग्रजी जॉर्जियन व रेनेसान्स पद्धतींच्या संयोगातून प्रदेशविशिष्ट अशी वास्तुकला उदयास आली. इंग्लंडमधील रॉबर्ट अॅडॅमच्या वास्तुशैलीपासून स्फूर्ती घेऊन मॅकिंटायर याने सुंदर वास्तुरचना रूढ केली. यूरोपातील ‘गॉथिक’ शैलीचेही अनुकरण करण्यात आले. जाळीदार, वक्राकार व नाजूक अशा बिडाच्या कठड्यांचे ढंगदार वळण अमेरिकन गृहरचनेत दिसू लागले. यादवी युद्धानंतर (१८६१–६५) अमेरिकेत उद्योगधंद्यांची व शहरांची वाढ झाली. वास्तुरचनेत पूर्वनियोजन आले. ‘एकोल-दे-बोझा आर्ट’ या पॅरिसच्या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले वास्तुशिल्पी व्यावसायिक हेतूने अमेरिकेत येऊ लागले. त्यांच्या वास्तुरचनेवर रोमन व यूरोपीय शैंलीचा प्रभाव होता.
विसाव्या शतकापूर्वीच काँक्रीट, पोलाद व काच यांसारख्या वास्तुद्रव्यांचे उत्पादन होऊ लागले. शहरा- तील वाढत्या वस्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी गगनचुंबी इमारतींची गरज निर्माण झाली. अशा इमारतींचा व आधुनिक वास्तुकलेचा प्रणेता लूइस सलिव्हन (१८५६–१९२४) याने वास्तुरचनेत नवे चैतन्य निर्माण केले. हेन्री रिचर्ड्सन (१८३८–८६) याने वास्तुरचनेतील आत्माभिव्यक्तीचे तत्त्व रूढ केले. ⇨फ्रँक लॉइड राइट (१८६९–१९५९) या सलिव्हनच्या शिष्याने वास्तूतील खुले अंतर्योजन (ओपन इंटीरिअर प्लॅनिंग) आणि वास्तूचा रंग व पोत आशा नव्या सौदर्यघटकांचा पुरस्कार केला.
या सर्वांच्या विचारांचा परिणाम होऊन आधुनिक अमेरिकन वास्तुकला अवतीर्ण झाली. वास्तूचा आकार, तिची अवकाशव्याप्ती, तिच्या पृष्ठभागाचे पोत व रंग आणि या सर्वांच्या परस्परसंबंधांतून येणारी कलात्मक अनुभूती यांना तिच्यात महत्त्व देण्यात आले. आज यांत्रिक व तांत्रिक प्रगतीमुळे वास्तुरचनेचे विविध प्रकारचे साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे अमेरिकन वास्तूस एक नवाच आकार येत आहे. १९३० नंतरच्या काळात ⇨वॉल्टर ग्रोपिअस, मीएस व्हान डेर रोअ, मार्सेल ब्रॉयर, रिचर्ड नूट्र व सारिनेन यांसारखे नामांकित यूरोपीय वास्तुशास्त्राज्ञ अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी अमेरिकन वास्तुकलेस जागतिक दर्जा मिळवून दिला.
यांचा उल्लेख करता येईल. सध्याच्या अमेरिकन वास्तुकलेत वास्तूचे रंग, रूप, पोत, आकार, अवकाश व छाया- प्रकाश-योजना हे घटक मानवी मनात कोणती भावना निर्माण करतात, यास महत्त्व दिले जाते. विशिष्ट भावनाजागृतीचे उद्दिष्ट पुढे ठेवून वास्तूचे संयोजन केले जाते.
संदर्भ : 1. Burchard, John; Bush-Brook, Albert, The Architecture of America, London, 1966.
2. Fletcher, Banister, A History of Architecture, London, 1961.
लेखक: कृ. ब. गटणे,
माहिती स्रोत :मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/27/2023
मानवाच्या ज्या मूलभूत गरजा-अन्न, वस्त्र, निवारा-त्...
गॉथिक’ ही संज्ञा प्रबोधनकालीन कलावंतांनी मध्ययुगीन...
अमेरिकन इंडियन जमातींच्या पुराणकथा विषयक माहिती.
भारतीय द्वीपकल्पातील (भारत व पाकिस्तान) वास्तुकलेच...