অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झेनोफन

झेनोफन

झेनोफन

(इ. स. पू. सु. ४३०―इ. स. पू. ३५५). प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार, निबंधकार आणि सेनानी. अथेन्समधील एका सधन घराण्यात जन्म. त्याच्या वडिलांचे नाव ग्रिलस. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो सॉक्रेटीसचा शिष्य व अनुयायी होता. त्याने अनेक तत्कालीन युद्धांत भाग घेतला होता. इ. स. पू. ४०१ मध्ये तो तरुण सायरसबरोबर इराणच्या स्वारीमध्ये सहभागी झाला. दुसऱ्या डरायसच्या मृत्यूनंतर सायरस (किरॉस) व आर्टक्झर्क्सीझ या त्याच्या मुलांत वैर निर्माण झाले आणि झेनोफनने सायरसची बाजू घेतली. सायरस क्यूनॅक्सच्या लढाईत मारला गेला आणि अनेक ग्रीक सेनानीही मारले गेले. तेव्हा झेनोफनकडे नेतृत्व आले. त्याने दहा हजार सैनिकांची फौज सु. १,५०० किमी. अंतराचा प्रवास करून सुखरूप अशा अज्ञात स्थळी नेली आणि यशस्वी रीत्या माघार घेतली. या मोहिमेचा वृत्तांत त्याने ⇨ आनाबासिस या ग्रंथात विशद केला आहे. पुढे काही दिवस तो कॉर्निया येथे राहिला (इ. स. पू. ३९४). या वेळी अजेसिलेअस या स्पार्टाच्या राजने त्याला भरपूर पैसा दिला. तो घेऊन तो काही वर्षे एलिस व पुढे कॉरिथला राहिला आणि उर्वरित आयुष्य त्याने लेखनकार्यात व्यतीत केले. स्पार्टाशी मैत्री केल्यामुळे त्याचे अथेनियन नागरिकत्व काही दिवस रद्द करण्यात आले होते; पण नंतर ते पुन्हा देण्यात आले. या सुमारास त्याने फिलेशिया या युवतीबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्यास दोन मुलगे झाले. आनाबासिस हा त्याचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ असून त्याचे सात भाग आहेत. तो प्रथम त्याने सिराक्यूस येथून थेमिस्टॉगेनिझ या टोपण नावाखाली प्रसिद्ध केला. याशिवाय त्याने आणखी काही ग्रंथ आणि निबंध लिहिले. त्यांपैकी हेलेनिका (ग्रीसचा इतिहास),सायरोपेडिया (सायरसची जीवनकथा), मेमोराबिलिया (सॉक्रेटीसचे जीवन व शिकवण), अंपोलॉजिया सॉक्रेटीस, सिंम्योसियम(सॉक्रेटीसबरोबरचे संभाषण) वगैरे काही प्रसिद्ध असून शिक्षण, घोडदौड आणि शिकार यांविषयींचे त्याचे निबंधही लोकप्रिय झाले.

हीरॉडोटस व थ्यूसिडिडीझ यांच्या इतकेच झेनोफनचे इतिहासकार म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्याची लेखनशैली साधी व सुटसुटीत असून त्याच्या लेखनाचा लॅटिन साहित्यावर हीरॉडोटस किंवा थ्यूसिडिडीझ यांपेक्षा अधिक परिणाम झाला. त्याच्या ग्रंथांचे बहुतेक यूरोपीय भाषांत सोळाव्या शतकापर्यंत भाषांतर झाले होते. काही तज्ञ तर त्याचा पहिला वृत्तपत्रकार म्हणून उल्लेख करतात. कारण त्याने आपले व्यक्तिगत अनुभव लिहून ठेवून तत्कालीन व्यक्तींसंबंधी आपली मते व्यक्त केली आहेत.


संदर्भ : Jacks, L. V. Xenophon, Soldier of Fortune, London, 1930.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate