आगामुहम्मद याह्याखान : (४ फेब्रुवारी १९१७−१० ऑगस्ट १९८०). पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष (१९६९–७१) आणि एक कुशल सेनानी. त्याचा जन्म नादिरशाहच्या वंशजांपैकी लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात पेशावर येथे झाला. त्याच्या पूर्वजीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याने पंजाब विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन डेहराडूनच्या लष्करी अकादमीतून पदवी घेतली. नंतर ब्रिटिश सैन्यात सेकंड लेफ्टनंट या पदावर त्याची नियुक्ती झाली. दुसऱ्या महायुद्धात (१९३९–४५) त्याने इटली आणि मध्यपूर्वेत ब्रिटिश सैन्यात चांगली कामगिरी केली. भारत–पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्याने पाकिस्तानच्या लष्करात काम केले. या सुमारास त्याने पाकिस्तानात लष्करी सेवेसाठी स्टाफ कॉलेज स्थापन केले (१९४७). भारताबरोबरच्या काश्मीर युद्धात त्याने पराक्रम दाखविल्याबद्दल लष्करात ब्रिगेडियर या उच्च पदावर त्याची नियुक्ती झाली. हे पद मिळालेला स्वतंत्र पाकिस्तानचा तो पहिला सैनिक होय. पुढे तो जनरल झाला आणि १९६६ मध्ये त्याला सेनाप्रमुख करण्यात आले.
आयूबखान (कार. १९५८–६९) हा पाकिस्तानचा फिल्ड मार्शल असताना त्याने पाकिस्तानमधील राजकीय उठाव मोडण्याचे महत्त्वाचे काम त्याच्याकडे सुपूर्त केले. या वेळी पुन्हा राजकीय परिस्थिती चिघळल्यामुळे मार्शल लॉ पुकारण्यात आला. याह्याखानची प्रमुख प्रशासक म्हणून आयूबखानाने नियुक्ती केली. मार्च १९६९ मध्ये आयूबखानाने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याची राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाली. पाकिस्तानात अवामी लीग, भुट्टोंची पीपल्स पार्टी इत्यादींत सत्तेसाठी चुरस चालू होती. शेख मुजीबूर रहमान यांनी अवामी लीगला पूर्व पाकिस्तानात स्वायत्त अधिकार असावेत, याचा आग्रह धरला आणि कायदेभंगाची चळवळ सुरू केली. याह्याखानाने सैन्याच्या मदतीने ही चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. मुजीबूरांच्या मुक्तिवाहिनीने प्रतिकार लढा तीव्र केला. सैन्याने लोकांवर अनन्वित अत्याचार केले. भारताने या लढ्यास सक्रिय पाठिंबा देऊन पाकिस्तानच्या लष्कराचा दारुण पराभव केला व बांगला देशाची निर्मिती झाली (डिसेंबर १९७१). या यादवी युद्धानंतर पश्चिम पाकिस्तानात असंतोषाची लाट उसळली. परिणामतः याह्याखानास राजीनामा द्यावा लागला (२० डिसेंबर १९७१). त्याच्या जागी झुल्फिकार भुट्टोनी सर्व सूत्रे हाती घेऊन याह्याखानास नजर कैदेत ठेवले. यातून त्याची १९७४ मध्ये सुटका करण्यात आली. तुरुंगात त्याला अर्धांगाचा झटका आला. त्यामुळे उर्वरित जीवनात तो सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिला. त्याचे रावळपिंडीत निधन झाले.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/26/2020
गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिके...
फिलीपीन्सचा लोकप्रिय तिसरा राष्ट्राध्यक्ष रामॉन मा...
टांझानिया प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष व ए...
ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष आणि ख्यातनाम राजनीतिज्ञ...