(इं. कॉमन सेस्बॅन, ईजिप्शियन रॅटल पॉड; लॅ. सेस्बॅनिया सेस्बॅन, से. ईजिप्शियाका; कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी एक झुडूपवजा, अल्पायुषी, जलद वाढणारी उपयुक्त वनस्पती. शेवरीचे झाड सु. ६ मी. उंच वाढते व त्याच्या खोडाचा व्यास सु. १५ सेंमी. असतो. भारतात सपाट मैदानी प्रदेशात सु.१,२०० मी. उंचीपर्यंत त्याची लागवड केलेली आढळते. हळद, चहा, संत्रे या पिकांमध्ये व कापसाच्या उन्हाळी पिकांमध्ये सावलीकरिता शेवरी लावतात; कुंपणाकरिता आणि भातशेतीतील बांधावर शेवरी लावलेली आढळते. पानमळ्यांत व द्राक्षांच्या मळ्यांत वाऱ्यापासून संरक्षण देण्यासही शेवरीचा उपयोग करतात. शेवरीची संयुक्त व पिसासारखी पाने सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली) व सु. ७.५-१५ सेंमी. लांब असून दलांच्या ८-२० जोड्या असतात. फुले द्विलिंगी, मध्यम आकाराची व पतंगरूप, पिवळी अथवा मिश्ररंगाची, ८-१० आणि विरळ मंजरीवर, पानांच्या बगलेत, साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबरात येतात.
फळ लोंबत्या शेंगेप्रमाणे, काहीशी पिळीव, गाठाळ व टोकदार असून बिया २०-३० आणि परस्परांपासून लहान पडद्यांनी अलग असतात. फुलाची संरचना व इतर शारीरिक लक्षणे लेग्युमिनोजी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फुलांच्या रंगातील फरक लक्षात घेऊन शेवरीचे टिपिका, पिक्टा आणि बायकलर असे तीन प्रकार आढळतात.
अमेरिकेखेरीज उष्ण कटिबंधातील इतर देशांत शेवरी आढळते. शेवरीची लागवड भिन्नभिन्न हवामानांत होत असल्याने भरपूर हिरवळीचे खत मिळविण्यास ती सोयीस्कर असते. तथापि ठराविक काळात पुराच्या पाण्याखाली राहणाऱ्या व नंतर कोरड्या राहणाऱ्या जमिनीत, तसेच पाणथळ जमिनीत आणि अम्लयुक्त जमिनीतही शेवरीची लागवड चांगली होते, असे आढळले आहे; हिमतुषारामुळे पाने व शेंगा वाळून जातात. लागवडीकरिता बी वापरतात; इतर पिकांच्या मळ्यात शेवरीची लागवड समांतर रेषेत व साधारणपणे ३० सेंमी. अंतरावर करतात. गाळाच्या सकस जमिनीवर एका ऋतूत शेवरीची झाडे सु. ४.५-६ मी. उंच होतात. बेवड करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या वनस्पतीप्रमाणे शेवरीची लागवड करीत नाहीत.
शेवरीची फुले, पाने व बिया जनावरांना खाद्य म्हणून उपयुक्त आहेत. जमिनीचा पोत सुधारण्यास शेवरीचे हिरवळीचे खत वापरतात. सालीपासून तंतू काढून दोर बनवितात. लाकूड पांढरे व नरम असते. त्याच्या कोळशापासून बंदुकीची दारू तयार करतात. बिया उत्तेजक, स्तंभक व आर्तवजनक असून त्यांपासून बनविलेले मलम चर्मविकारांवर उपयुक्त आहे.
किडीपासून व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी कवकनाशके वापरणे, कवक असलेली पाने नष्ट करणे वा अशी संपूर्ण झाडेच जाळून टाकणे हे उपाय करतात.
लेखक: शं. आ. परांडेकर
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020