परसात, देवळात व शेतांच्या कडेनेही लावतात. उंची ६-९ मी.; पाने मोठी, संयुक्त, पिसासारखी (पिच्छाकृती); दले १५-३० जोड्या; फुले वर्षात अनेक वेळा येतात तथापि खरा बहर ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत असतो. ती पांढरी किंवा लाल, मोठी (५-८ सेंमी.) व पतंगरूप [→ फूल] असतात. संदले ५, अंशत : जुळलेली, संवर्त घंटेसारखा; पुष्पमुकुट मोठा, बाहेर झुकलेला व प्रत्येक सुट्या पाकळीस फार लहान
देठ (नखर) असतो. पाच पाकळ्यांपैकी ेक मोठी, सर्वांत बाहेरची पाकळी पताकेसारखी (ध्वज) पसरट असून दोन बाजूंच्या लहान पाकळ्या पंखाप्रमाणे पसरलेल्या; उरलेल्या दोन्ही अंशत : जुळून त्यांचा नौकासारखा उभट भाग ध्वजकासमोर येतो व यातच केसरदले व किंजलदल अंशत : दडलेली असतात. दहा केसरदलांपैकी एक सुटा व उरलेल्या नवांचा अंशत : जुळलेला एक गट असे द्विसंध केसरमंडल बनते. किंजदल एकच व किंजमंडल ऊर्ध्वस्थ (वरच्या पातळीवर) असते; किंजल वाकडा व किंजल्क अर्धगोलाकार असतो. किंजपुटात अनेक बीजके एकाच रांगेत चिकटलेली असतात ) धारास्थित बीजकविन्यास). केसरदलांच्या नळीत तळाशी मध असून तो लुटून नेण्यास येणारा कीटक परपरागण [→ परागण] घडवून आणतो. शेंग (शिंबा) ५० सेंमी. लांब, साधारण गोलसर व आत अनेक आडव्या पडद्यांनी अनेक बीजे अलग झालेली असतात.याचे लाकूड मऊ व पांढरे असते; आगपेट्यातील काड्यांकरिता उपयुक्त. कोवळा पाला, फुले व शेंगा भाजीकरिता वापरतात. ही झाडे शोभेकरितांही लावतात. साल, मूळ, पाने व फुले औषधी असतात. साल स्तंभक (आकुंचन करणारी) व पौष्टिक; देवी आल्यास सालीचा काढा देतात. मूळ उगाळून त्याचा लेप संधिवातावर देतात; रस मधाबरोबर खोकल्यावर गुणाकारी. खरचटल्यावर पानांचे पोटीस बांधतात; दृष्टिमांद्यावर (दृष्टी कमी होणे) फुलांचा रस डोळ्यात व अर्धशिशीवर विरूद्ध बाजूच्या नाकपुडीत घालतात; पानांचाही रस अर्धशिशीवर चालतो. ह्या वनस्पतीच्या सर्व भागांत अ जीवनसत्त्व असते.
लेखक: परांडेकर, शं. आ.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020