অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऋतु

ऋतु

वर्षातून नियमित अनुक्रमाने येणारे व भिन्नभिन्न पण ठराविक जलवायुमानाचे (दीर्घावधीच्या सरासरी हवामानाच्या परिस्थितीचे) कालावधी. पृथ्वीच्या पृष्ठभागास व वातावरणास सूर्यापासून मिळणार्‍या ऊर्जेत फेरफार होत असल्यामुळे ऋतू निर्माण होतात. जागतिक दृष्ट्या हिवाळा व उन्हाळा हे दोनच ऋतू मानतात.

पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना तिचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी लंब नसून सु. ६६.५ अंशांचा कोन करतो. अक्ष विचलन (अक्ष एकीकडे झुकणे) विचारात घेतले नाही, तर कक्षेतील कोणत्याही स्थानी पृथ्वी असो, तिच्या अक्षाची दिशा अचर व एका विशिष्ट दिशेस समांतर राहत असते. पृथ्वीच्या अशा गतीमुळे पृथ्वीवरील कोणत्याही एकाच स्थानी लागोपाठच्या कोणत्याही दोन दिवशी मध्यान्हाचे सूर्यकिरण अगदी तोच कोन करून पडत नाहीत व पृथ्वीच्या पृष्ठावरील बहुतेक सर्व ठिकाणी संपातदिनांखेरीज (दिवस व रात्र समान कालावधीचे असलेल्या दिवसांखेरीज) इतर दिवशी दिनमान व रात्रिमान सारखेच असत नाही. येथे सूर्योदय व सूर्यास्त यांच्या वेळेवर, सूर्यबिंबाचा विस्तार व प्रकाशाचे प्रणमन (वक्रीभवन) यांचा होणारा परिणाम लक्षात घेतलेला नाही.

पृथ्वीचा प्रकाशित भाग अप्रकाशित भागापासून वेगळा करणार्‍या वर्तुळाला प्रकाशवृत्त म्हणतात. प्रकाशवृत्तामुळे विषुववृत्ताचे नेहमीच दोन जवळजवळ सारखे भाग होत असल्यामुळे विषुववृत्तावर दिवसाची व रात्रीची लांबी वर्षभर जवळजवळ सारखीच असते. परंतु विषुववृत्तापासून जो जो ध्रुवांकडे जावे तो तो कोणत्याही ठिकाणच्या अक्षवृत्ताचे प्रकाशवृत्ताने होणारे दोन भाग असमान होत जात असल्यामुळे दिनमान व रात्रिमान यांच्यातील कालविषमता वाढत जाते. उदा., २१ जून रोजी कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंब पडत असतात व तेथील दिनमान साडेतेरा तास असते. उलट २२ डिसेंबर रोजी कर्कवृत्तावर सूर्यकिरण सु. ४३ अंशांचा कोन करून पडतात व दिनमान साडेदहा तासांचे असते. २१ जूनला उत्तर ध्रुववृत्तावर दिनमान चोवीस तासांचे असते व सूर्यकिरण सु. ४७ अंशांचा कोन करून पडतात. उलट २२ डिसेंबर रोजी तेथे सूर्य उगवतच नाही. २१ मार्च ते २३ सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धातील प्रदेशांत सूर्यप्रकाश अधिक काळ मिळतो व सूर्यकिरण २३ सप्टेंबर ते २१ मार्च या वर्षार्धातील कोनांपेक्षा अधिक उच्च कोन करून पडत असतात, म्हणून त्या प्रदेशांत सौरऊर्जा अधिक प्रमाणात मिळक असते. त्यामुळे तेथे उन्हाळा असतो. २३ सप्टेंबर ते २१ मार्च या कालात सौरऊर्जा बर्‍याच कमी प्रमाणात मिळत असल्याने उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धाच्या अगदी उलट परिस्थिती असते.

 

पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेशी विवक्षित कोन करून सातत्याने रहात असल्याने व पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रममाचा काल नियमित असल्यामुळे वर उल्लेख केलेले फेरफार नियमितपणे होत असतात. म्हणून ऋतूही नियमित अनुक्रमाने येत असतात.

विषुववृत्तावर कोणत्याही दिवसाचे दिनमान नेहमी जवळजवळ सारखेच असते व सूर्यकिरणही लंब किंवा उच्च कोन करून पडत असतात. तेथे सौरऊर्जेचा पुरवठा वर्षभर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे तेथे उन्हाळा व हिवाळा असे भिन्न ऋतू प्रत्ययास येत नाहीत. विषुववृत्ताजवळच्या प्रदेशांत सौरतापनाच्या वार्षिक वाटचालीपेक्षा प्रचलित वार्‍यांच्या पद्धतींचे विस्तीर्ण पट्टे माध्यस्थानापासून ऋतूंप्रमाणे वर-खाली सरकत असल्यामुळे हवामानात बदल होऊन तेथे ओला व कोरडा असे कालखंड एकाआड एक येतात. ओल्या कालखंडातील सरासरी तापमान कोरड्या कालखंडातील तापमानापेक्षा बरेच कमी असते. याच भागातील विषुववृत्त व पाच अंश उत्तर अक्षवृत्तामधील काही प्रदेशांत मात्र वर्षातून दोन कोरडे व दोन ओले असे चार कालखंड स्पष्ट दिसतात. ज्या विषुववृत्तीय भागांत वर्षभर पाऊस पडतो तेथे भिन्न ऋतू स्पष्टपणे ओळखू येणे कठीण असते. उष्णकटिबंधात हिवाळा तीव्रपणे जाणवत नाही, कारण वर्षभर सूर्यकिरण उच्च कोन करूनच पडत असतता. शिवाय ज्या काळात मध्यान्हीचा सूर्य माथ्यावर येतो त्या काळामागोमाग पर्जन्यकालाला सुरुवात होते. शीतोष्ण कटिबंधांत (२३.५ ते ६६.५ अक्षांश) तापमान हा हवामानाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे उन्हाळा व हिवाळा हे दोन ऋतू स्पष्ट असतातच, परंतु उन्हाळ्याच्या सुरुवातीचे हवामान सौम्य असल्याने तो कालखंड वसंत ऋतू व हिवाळ्याचा प्रारंभीचा कालखंड शरद ऋतू म्हणून ओळखला जातो. उष्णकटिबंधातही अनेक खंडांतर्गत पुष्कळ ठिकाणी वसंत व शरद हे ऋतू असतात. ध्रुवीय प्रदेशांत (ध्रुव ते ५५.५ अक्षांश) सूर्यकिरण नेहमी बरेच तिरपे पडत असतात व ठराविक कालात तेथे सूर्यकिरण पडतच नाहीत. त्यामुळे तापमानात बराच फरक पडतो. म्हणून तेथे लहान सौम्य उन्हाळा व दीर्घ तीव्र हिवाळा असे दोन ऋतू अनुभवास येतात. प्रत्यक्ष ध्रुवांवर सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असल्याने तेथे अंधाराचा काळ (हिवाळा) व उजेडाचा काळ (उन्हाळा) हेच दोन ऋतू असतात.

भारतात उष्ण व शीतोष्ण अशा दोन्ही कटिबंधांतील वैशिष्ट्ये आढळतात. शिवाय नैर्ऋत्य व ईशान्य मॉन्सून वारे ही भारतीय उपखंडाची लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तेथे पावसाळी व त्यामानाने कोरडा असे कालखंड एकाआड एक येत असतात. डिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने थंड व कोरडे, मार्च ते मध्य जून हे महिने उष्ण व कोरडे आणि मध्य जून ते नोव्हेंबर ते महिने पावसाळी जलवायुमानीय परिस्थितीचे असतात. भारतीय वातावरणविज्ञानीय खात्याने वर्षाची पुढील चार ऋतूंमध्ये विभागणी केलेली आहे : (१) हिवाळा किंवा ईशान्य मॉन्सून वार्‍यांचा कालखंड – डिसेंबर ते फेब्रुवारी, (२) उन्हाळ – मार्च ते मे, (३) नैर्ऋत्य मॉन्सून वार्‍यांचा कालखंड – जून ते सप्टेंबर आणि (४) परतणार्‍या नैर्ऋत्य मॉन्सून वार्‍यांचा कालखंड किंवा संक्रमण कालखंड – ऑक्टोबर ते नोव्हेंबर.

उत्तर गोलार्धातील २१ जून हा सर्वांत मोठ्या दिनमानाचा दिवस असला तरी अपेक्षेप्रमाणे उच्चतम तापमान त्या दिवशी नसते. ते त्यानंतर काही आठवड्यांनी म्हणजे साधारपणे जुलैच्या मध्यास अनुभवास येते. उत्तर गोलार्धातील सर्व भूखंडीय प्रदेशांत जुलैचे सरासरी तापमान हे वर्षातील सरासरी उच्चतम तापमान असते. त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात वर्षातील सरासरी नीचतम तापमान २२ डिसेंबर या सर्वांत लहान दिनमानाच्या दिवशी नसते, तर त्यानंतर काही आठवड्यांनी म्हणजे साधारपणे जानेवरीच्या मध्यास असते. उष्णकटिबंधात उच्चतम तापमानाचा काल मध्यान्हीचा सूर्य माथ्यावर येण्याच्या काळापाठोपाठ येतो. तेथे ही परिस्थिती पावसाळ्याच्या आरंभी व पावसाळ्यानंतर अशी वर्षातून दोनदा येते. दिवसातील उच्चतम तापमान भर दुपारनंतर तर नीचतम तापमान सूर्योदयाच्या सुमारास असते.

ऋग्वेदात ऋतूचा हंगाम या अर्थी उल्लेख असून वसंत, ग्रीष्म व शरद हे तीन ऋतू दिलेले आहेत. आर्य पूर्वकडे जात असताना ऋतूंची संख्या पाच झाली असावी. काही ठिकाणी हेमंत व शिशिर तर काही ठिकाणी वर्षा व शरद हे एकत्र करून पाच ऋतू दिलेले आढळतात. तैतिरीयसंहितेत मात्र वसंत (चैत्र-वैशाख), ग्रीष्म (ज्येष्ठ-आषाढ), वर्षा (श्रावण-भाद्रपद), शरद (आश्विन-कार्तिक), हेमंत (मार्गशीर्ष-पौष) व शिशिर (माघ-फाल्गुन) या सहा ऋतूंचा उल्लेख आढळतो. तैतिरीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, बह्‌वृच ब्राह्मण, यजुर्वेद, अश्वलायन, श्रौत सूत्र इत्यादींत ऋतूंचा उल्लेख आढळतो. वेदांमध्ये व गीतेत ऋतूंपैकी वसंत महत्त्वाचा मानला आहे. रामायणात ऋतूंची सुंदर वर्णने असून कालिदासाने ऋतुसंहारात ऋतूंमधील बदल व त्यांचा मानावर होणारा परिणाम यांचे कल्पकतापूर्ण वर्णन केलेले आहे. प्राचीन काळी ऋतूच्या प्रारंभी बळी देत, तर बुद्धपूर्व काळी यज्ञ करीत असत. श्राद्धात ऋतूंची प्रार्थना करतात. वसंत हे शिर, ग्रीष्म हा उजवा पंखा, वर्षा ही शेपटी, शरद हा डावा पंख आणि हेमंत हे उदर असे अवयव असलेला संवत्सर-पक्षी कल्पिलेला आहे.

पूर्वी ऋतू या शब्दाचा अर्थ सूर्याला दोन संक्रांती भोगण्यास लागणारा काळ असा करीत. त्यामुळे बारा राशींत सहा ऋतू होऊन ऋतुचक्र पूर्ण होई. ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात व ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते, हे महाभारत काळी माहीत होते. चैत्रारंभ हाच वसंतारंभ ही कल्पना महाभारत काळानंतरची आहे. त्यामुळे सध्याच्या ऋतुचक्राचा चैत्रादी चांद्र महिन्यांशी मेळ बसत नाही. सूर्यस्थितीवर ऋतू अवलंबून असल्याने ऋतूंचे प्रारंभ व तिथी यांचाही संबंध नसतो. श्रावण-भाद्रपद हा वर्षा ऋतूचा काल समजला जातो, परंतु हल्ली आषाढातच पाऊस सुरू होत असतो. म्हणजे ऋतू सु. एक महिना मागे पडल्यासारखे दिसतात. त्यामुळे सूर्य मेषेऐवजी मीनेत गेला म्हणजे वसंत सुरू झाला असे मानतात.

 

लेखक: अ. ना. ठाकूर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate