माऊ-माऊ चळवळ : पूर्व आफ्रिका खंडातील विद्यमान केन्या प्रजासत्ताकातील एक गुप्तसंघटना व चळवळ. या संघटनेचा ध्वज किंवा लिखित दप्तर तसेच सभासदांची यादी इ. काहीच साहित्य उपलब्ध नाही. एवढेच नव्हे तर माऊ-माऊ या संज्ञेविषयीही निश्चित माहिती ज्ञात नाही.
विसाव्या शतकाच्या मध्यास दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व आफ्रिका खंडातील परकीय सत्तेविरुद्धच्या आंदोलनात किकुयू ही केन्यातील संख्येने मोठी व महत्त्वाची जमात नेतृत्व करीत होती. १९४८ च्या जनगणनेनुसार किकुयूंची लोकसंख्या ११,१५,००० होती. जोमो केन्याटा ह्या किकुयू नेत्याने शांततापूर्व मार्गाने आफ्रिकी जनतेचे संघटन करण्यास आरंभ केला होता; परंतु ब्रिटिश वर्चस्वाचा विरोध तीव्र करण्यासाठी आणि किकुयू जमातीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी माऊ-माऊ ही दहशतवादी गुप्तसंघटना उभी राहिली.
ही संघटना मुख्यतः किकुयूंची असली, तरी तिच्यामध्ये मेरू आणि एम्बू जमातींचाही सहभाग होता. गोऱ्या लोकांना दहशत बसावी, त्यांच्याशी सहकार्य करणाऱ्या आफ्रिकी लोकांचा सूड घ्यावा आणि आफ्रिकी वन्य चालीरीतींचे पुनरुज्जीवन करावे, ही माऊ-माऊची प्रमुख उद्दिष्टे दिसतात.
व्हाइट हाय-लॅन्ड्ज या नावाने परिचित असलेला सुपीक भूप्रदेश हा मूळ किकुयूंचा आहे आणि तेथील यूरोपियनांना हाकलून तो प्रदेश किकुयूंना मिळाला पाहिजे, या मूलभूत तत्त्वावर ही संघटना कार्यरत झाली.
या संघटनेच्या सभासदांना गोऱ्यांचे वर्चस्व झुगारून देऊन स्वकीयांची सत्ता आणण्याची जबर महत्त्वाकांक्षा होती. म्हणून सुरुवातीपासूनच त्यांनी खून व घातपात यांचा आश्रय घेऊन दहशतवादी धोरण अंगीकारले. या संघटनेच्या सभासदांना प्रारंभी गुप्ततेविषयी शपथ ध्यावी लागे आणि त्या संबंधीचा दीक्षाविधी समारंभ (रूरूइथिओ) संघटनेच्या कार्यालयात नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तपणे पार पडे.
हा विधी अत्यंत महत्त्वाचा तसाच धार्मिक दृष्ट्या श्रेष्ठ मानण्यात येई. जो किकुयू त्याचे उल्लंघन करील, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागे. दीक्षा घेतलेल्या सभासदास, ‘मी या पुढे गोऱ्यांचा निःपात करीन आणि माझ्या बंधूभावांवर झालेल्या अतिक्रमणाचा सर्वशक्तिनिशी प्रतिकार करीन,’ असे अभिवचन द्यावे लागे. आफ्रिकी जमातींमध्ये विविध आदिवासी प्रथा रूढ आहेत. विधिपूर्वक शपथ घेणे, ही त्यांतील एक आहे. असे शपथविधी वन्य स्वरूपाचे असतात आणि शपथ मोडणे अनैतिक समजले जाते.
अशा प्रकारे दीक्षाविधी घेतलेले माऊ-माऊ स्वयंसेवक खून, जाळपोळ, घातपात आदी मार्गांनी वसाहतवाल्यांना हैराण करू लागले. त्यांच्या दहशतवादाची झळ गोऱ्यांप्रमाणेच आफ्रिकी लोकांनाही पोहचली. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी या दहशतवादी चळवळीला शह बसावा, म्हणून १२ ऑगस्ट १९५० रोजी त्यावर बंदी घातली आणि किकुयूंच्या खास वस्त्यांवर तसेच माऊ-माऊंच्या गुप्त-कार्यालयांवर छापे घातले. तेव्हा जोमो केन्याटाने केन्या आफ्रिकन युनियन या पक्षातर्फे या संघटनेच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देऊन त्या चळवळीचा उपयोग करून घेऊन राजकीय जागृती करण्याचा प्रयत्न केला. माऊ-माऊंना उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली जोमो केन्याटा आणि इतर नेत्यांना १९५२ मध्ये अटक करण्यात आली. केन्याटाला सात वर्षांची सजा ठोठावण्यात येऊन केन्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली; तथापि चळळीने उग्र स्वरूप धारण केले.
चळवळ दडपण्यासाठी ग्रेट ब्रिटनमधून खास राखीव सैन्य आणण्यात आले. या सैन्याने व पोलीस दलाने असंख्य किकुयूंना ठार मारले; त्यांच्या वस्त्या उध्वस्त केल्या आणि अनेकांना अटक करून तुरुंगात डांबले. सु. ५०,००० किकुयूंना छलगृहात डांबण्यात आले. पोलीसांविरुद्धच्या तसेच सैन्याविरुद्धच्या संघर्षात सु. १२,००० किकुयू व अन्य आफ्रिकन मरण पावले. १९५१ ते १९५६ या पाच वर्षांच्या काळात केन्यात वसाहतवाल्यांनी सुव्यवस्था व शांतता प्रस्थापिण्यासाठी संचारबंदी, धरपकड इ. विविध मार्गांनी किकुयूंना हैराण केले. ही चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिश वसाहतवाल्यांना सु. ५० दशलक्ष पौंड एवढा खर्च आला; तथापि केन्याची स्वातंत्र्य चळवळ ते पूर्णतःरोखू शकले नाहीत. त्यामुळे आणीबाणी उठवून त्यांना नेत्यांशी समझोत्याचे धोरण अंगीकारावे लागले आणि केन्याच्या संसदेत आफ्रिकी लोकांना प्रतिनिधित्व द्यावे लागले. परिणामत केन्या पुढे स्वतंत्र झाला (१२ डिसेंबर १९६४).
या चळवळीविषयी पाश्चात्त्य व आफ्रिकी लेखकांमध्ये भिन्न मते आढळतात. पाश्चात्त्य लेखकांच्या मते ही दहशतवादी संघटना असून तिने किकुयूंचेच अतोनात नुकसान केले आणि केन्याचे स्वातंत्र्य लांबणीवर टाकले; परंतु आफ्रिकी लेखक या चळवळीचा उल्लेख राष्ट्रवादी चळवळ असा करतात आणि या चळवळीमुळेच केन्याला स्वातंत्र्य मिळाले व साम्राज्यवादी स्वार्थी मनोवृत्तीला आळा बसला, असे म्हणतात.
संदर्भ : 1. Majdalany, Fred, State of Emergency : the Full Story of Mau Mau Colony, London, 1963.
2. Rosberg, C. G.; Nottingham, John, The Myth of Mau Mau : Nationalism in Kenya,Stanford, 1966.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 5/4/2020
ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या...
ब्राह्मणवर्गाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्ध ब्राह्मण...
जळगाव येथील किशोर कुळकर्णी हे आपल्या सुंदर अक्षर च...
बर्ट्रड रसेल यांच्या प्रेरणेने जागतिक सुरक्षा व न...