साधारणपणे माकडांचे दोन विभाग केले जातात. पहिल्या विभागात जुन्या जगातील (आशिया, यूरोप व आफ्रिका या खंडांतील) तर दुसऱ्या विभागात नव्या जगातील (उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांतील) माकडांचा समावेश केला जातो. अँथ्रोपॉयडिया या उपगणाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.
श्रेणी :
प्लॅटिऱ्हिनी
अधिकुल
सेबॉयडिया
कुल
कॅलिथ्रिसिडी; उदा., मार्मोसेट.
कुल
सेबिडी; उदा., स्पायडर माकड, हाउलर (ओरडणारे) माकड.
श्रेणी :
कॅटाऱ्हिनी
अधिकुल
सर्कोपिथेकॉयडिया;
कुल
सर्कोपिथेसिडी; उदा., जुन्या जगातील माकडे-लंगूर, मॅकॉक इ.
अधिकुल
:होमिनॉयडिया
कुल
:हायलोबेटिडी; उदा., गिबन
कुल
:पाँजिडी; उदा., चिंपँझी, गोरिला, ओरँगउटान
कुल
:होमिनिडी; उदा., आधुनिक मानव.
माकडे उष्ण कटीबंधातील प्रदेशात राहतात. ती चार पायांवर चालतात. मोठ्या आकारमानाचे बॅबून व मँड्रिल सोडून इतर सर्व माकडे वृक्षवासी आहेत. जमिनीवरून चालताना ती पायाचा सबंध तळवा जमिनीस टेकवून चालतात. ती ताठ बसू शकतात किंवा सरळ उभी राहू शकतात. यामुळे त्यांचे हात इतर कामे करण्यास मोकळे राहतात. माकडांचा चेहरा लहान व चपटा असतो. त्यांचे हात व पाय परिग्राही (पकड घेणारे) असून प्रत्येकास पाच बोटे असतात. हस्तांगुष्ठ (हाताचा अंगठा) व पादांगुष्ठ (पायाचा अंगठा) इतर बोटांपेक्षा भिन्न असतात. बोटांची नखे चपटी असतात. मार्मोसेट या माकडात बोटावर तिक्ष्ण नखरे (नख्या) असतात व फक्त अंगुष्ठावर चपटी नखे असतात. बहुतेक माकडे दिनचर आहेत. ही कळप करून राहतात व कळपाने भक्ष्याच्या शोधार्थ हिंडतात. झाडपाला, फळे, पक्ष्याची अंडी, लहान प्राणी किंवा कीटक यांवर यांचा उदरनिर्वाह चालतो. हाउलर आणि बॅबून या माकडांच्या कळपाचे नेतृत्व वयस्कर नराकडे असते.
नरवानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात. पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.
नव्या जगातील माकडे : यांचा समावेश प्लॅटिऱ्हिनी या श्रेणीत होतो. त्यांचे नाक रुंद असते. नाकपुड्या वरच्या बाजूस वळलेल्या व पसरट पडद्याने एकमेकींपासून विभागलेल्या असतात. जबड्याच्या प्रत्येक बाजूस, वरखाली तीन तीन उपदाढा असतात. यांना अंगठा बोटांसमोर आणता येत नाही. गालाच्या आतील बाजूस कपोलकोष्ठ (गालातील पिशव्या) नसतात. तसेच श्रोणि-किणही (ढुंगणावरील घट्टेही) नसतात. कानाच्या नळ्या अस्थिरहित असतात. कॅटाऱ्हिनी श्रेणीतील माकडांपेक्षा (जुन्या जगातील माकडांपेक्षा) यांच्या डोक्याच्या कवटीच्या हाडांची रचना निराळी असते. पहिले पडणारे दात (दुधाचे दात) २४ असतात व हे पडल्यावर कायमचे ३६ दात येतात. दंत्यसूत्र [⟶ दात] पुढीलप्रमाणे असते: कृं. २/२, सु १/१, उदा., ३/३, दा ३/३ = ३६. शेपूट लांब व काही जातींत परिग्राही असते. शेपटीच्या खालचे कातडे केशविरहित असते. यांचे डोळे लहान असतात. गर्भाशय साधा, वार चकतीप्रमाणे असते व मादीच्या छातीवर दोन स्तन असतात. काही जातींत बोटांवरील नखे पसरट असण्याऐवजी त्या ठिकाणी अणकुचीदार नखरे असतात. ही माकडे जात्या मंद व शांत स्वभावाची असतात. ती माणसाळविण्यास सोपी व आपल्या धन्यावर प्रेम करणारी असतात. यांचा प्रसार दक्षिण अमेरिकेत मेक्सिकोच्या दक्षिणेपासून ते अर्जेंटिनाच्या उत्तरे पर्यंत व पॅसिफिकपासून ते अटलांटिक किनाऱ्यापर्यंत झालेला अढळतो. या श्रेणीतील काही महत्त्वाच्या माकडांच्या गटांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
स्त्रोत :मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/2/2020
हु S S प... हु SS प... करत, माकड शिरले घरात । ध...
स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या अँथ्रोपॉयडिया या उपग...