१. दलित - ग्रामीण साहित्य शब्दकोश व सूची
दलित आणि ग्रामीण साहित्य हे आजच्या मराठी साहित्यातील महत्त्वाचे असे दोन प्रवाह आहेत. अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्यप्रयोग यांमुळे हे साहित्य काही प्रमाणात नागर वाचकांच्या दृष्टीने दुर्बोधही राहिले आहे. लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नाही. ह्या साहित्यामधून जे नवनवीन आणि अपरिचित शब्द मिळतात ते प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने असे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ, व्याकरणिक तपशिलांसह या कोशात दिले जातील. तो विशिष्ट शब्द असलेले मूळ वाक्यही वाचकांच्या संदर्भासाठी त्या त्या नोंदीमध्येच दिलेले असेल.
दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश या प्रकल्पातील पहिल्या खंडाचे (अ ते घ) प्रकाशन, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दिनांक २७ फेब्रुवारी २०१२ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. यापुढील खंडांचे प्रकाशन लवकरच करण्यात येईल.
दलित-ग्रामीण साहित्य : रूढी, प्रथा, परंपरा विधी कोश
दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश या प्रकल्पाच्या अंतर्गतच हे काम करण्यात येत असून लवकरच या कोशाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
२. वस्त्रनिर्मिति माहितीकोश
विविध व्यवसायांचे शिक्षण सहजपणे मराठीतून उपलब्ध झाल्यास ते भाषिक आणि सामाजिक दृष्टीने फार उपयुक्त होईल असे संस्थेला वाटते. मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भात वस्त्रोद्योगाला प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान आहे हे लक्षात घेऊन संस्थेने या विषयाचा मराठीतून अभ्यास करू इच्छिणाऱ्यासाठी तसेच या विषयाचे मराठीतून शिक्षण घेणाऱ्यांसाठी व त्यावर मराठीतून लेखन करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा वस्त्रनिर्मिती माहितीकोश तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्थेच्या सहकार्याने हे काम चालू आहे. भारतीय भाषांमध्ये आजमितीस तरी अशा प्रकारचा कोश नाही. त्यामुळे मराठीमध्ये तो तयार झाल्यास मराठीच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात ही एक अजोड कामगिरी ठरेल. सदर माहितीकोश पुढीलप्रमाणे आठ खंडांमधून प्रकाशित होईल:
तंतुनिर्माण व तंतुविज्ञान २) सूतनिर्माण ३) कापडनिर्माण ४) वस्त्रनिर्माणातील रासायनिक प्रक्रिया ५) वस्त्रप्रावरणे व तंत्रोपयोगी वस्त्रे ६) वस्त्रोद्योग व्यवस्थापन ७) वस्त्रसंकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार ८) वस्त्रोद्योग परिभाषाकोश या खंडांपैकी १) तंतुनिर्माण व तंतुविज्ञान २) सूतनिर्माण ३) कापडनिर्माण हे पहिले तीन खंड प्रकाशित झाले असून उर्वरित खंड लवकरच प्रकाशित होतील.
३. मराठी ग्रंथसूचीमाला (१९५१-२०००)
कै. शं. ग. दाते यांनी १९५० पर्यंतच्या मराठी ग्रंथांची सूची दोन खंडांत तयार केलेली आहे. त्याचे नवीन परिशिष्टांसह पुनर्मुद्रण संस्थेने केले आहे परंतु सन १९५० नंतर मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एकत्रित अशी विषयवार ग्रंथसूची अजून तयार झालेली नाही. ही उणीव दूर करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने 'मराठी ग्रंथसूचीमाला' हा प्रकल्प घेतला असून त्यात सन १९५१ ते २००० या कालखंडातील ग्रंथांची सूची श्री.शरद साठे व इतर काही संपादकांकडून करून घेण्यात येत आहे. या मालेतील तीन खंडांचे (१९५१-१९६२, १९६३-७० १९७१-७८ ) प्रकाशन झाले आहे. उर्वरित खंडांचे काम चालू असून ते यापुढील काळात प्रकाशित करण्यात येतील.
४. बृहन्महाराष्ट्रासाठी केले जाणारे कार्य
मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश इत्यादी प्रांतांतील मराठीच्या स्थितिगतीचा विचार करीत असते. १९९४ पासून संस्थेने आंध्रप्रदेशातील व मध्यप्रदेशातील मराठी पाठ्यपुस्तकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घातले असून तेथील विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. याच प्रकारचे काम गुजरात राज्याच्या संदर्भात संस्था आवश्यकतेनुसार करीत असते. बृहन्महाराष्ट्रातील मराठी वाचकांना दर्जेदार मराठी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत या उद्देशाने संस्थेने २००३ पासून ‘ग्रंथालयांना पुस्तक भेट’ हा उपक्रम हाती घेतला आहे. आजपर्यंत हैदराबाद , बेळगाव, भोपाळ, सुरत, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, राजस्थान, रायपूर, इंदूर, राजकोट, जबलपूर आदी ठिकाणच्या २३ ग्रंथालयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट म्हणून पाठविण्यात आली आहेत. मा. मुख्यमंत्री यांनी अमेरिकेतील मराठी मंडळांना दिलेल्या आश्वासनानुसार शासनाच्या वतीने राज्य मराठी विकास संस्थेने तीन वर्षे ललित साहित्याची पुस्तके या मराठी मंडळांना पाठवली आहेत. हैदराबाद व अहमदाबाद येथील काही शाळांना मराठी वर्तमानपत्रे नियमितपणे पाठविली जातात.
५. विधी व न्याय व्यवहारात मराठीचा वापर
महाराष्ट्र शासनाने निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीचे सदस्यत्व संस्थेला देण्यात आलेले असून या सर्व कामामध्ये भाषिकदृष्ट्या गुणवत्ता निर्माण व्हावी यासाठी संस्था त्यांना सहकार्य करते.
६. संगणकावर मराठी
संगणकावर मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी संस्था प्रयत्नतशील आहे. विशेषतः प्रमाणीकरण (स्टॅण्डर्डायझेशन) व कन्व्हर्जन या कामी संगणकतज्ज्ञांना भाषिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्याचे कार्य संस्थेने केले आहे. कळफलकाच्या एकरूपतेसाठीही मराठी वर्णमालेचे प्रमाणीकरण तसेच मराठीतील अकारविल्हे रचना (sorting orders) निश्चित करणे आवश्यक होते. ही गरज ओळखून संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि भाषातज्ज्ञ व संगणकतज्ज्ञ यांच्या सहकार्याने काम पूर्ण केले आहे. या अहवालानुसार महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी वर्णमाला आणि वर्णलिपिविषयक शासननिर्णय (शासन निर्णय, क्रमांक – मभावा-२००४/(प्र.क्र./२५/२००४)/२० ब दिनांक ६ नोव्हेंबर २००९) प्रसृत केला.
या विषयासंदर्भातील अनेक उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सी-डॅक या संस्थेबरोबर राज्य मराठी विकास संस्था कार्यरत आहे.
७. मराठी संकेतस्थळांची स्पर्धा
अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाण-घेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे. ह्या व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य मराठी विकास संस्था संकेतस्थळांची स्पर्धा आयोजित करत असते. २००६, २०१०, २०१२, २०१३ ह्या वर्षी संस्थेने अशा मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धा आयोजित केल्या.
८. विज्ञानविषयक लोकलक्ष्यी पुस्तकांची मराठी भाषांतरे
विज्ञानप्रसार, दिल्ली ह्या संस्थेच्या विज्ञानविषयक लोकलक्ष्यी अशा ५ पुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याचे काम राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी विज्ञान परिषद ह्यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत चालले आहे.
९. मराठी उत्तमोत्तम साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके (Talk Books)
मराठीतील राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींपैकी निवडक अशा काही कलाकृती त्याप्रमाणे संतवाङ्मय श्राव्य पुस्तकांच्या स्वरूपात जतन करण्याच्या हेतूने राज्य मराठी विकास संस्थेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांचे ‘प्रवासी पक्षी’ व ‘रसयात्रा’ तसेच विंदा करंदीकर यांचे ‘संहिता’ व ‘आदिमाया’ हे काव्यसंग्रह तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ’ व संत वाङ्मयातील ‘श्री दासबोध’ यांचे श्राव्य पुस्तकांत रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यापुढील काळात ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा तसेच पुरस्कार प्राप्त साहित्यकृतींचे श्राव्य पुस्तकात रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. ही श्राव्य पुस्तके राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर जनतेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
१०. संगणकासाठी युनिकोड आधारित मराठी टंकांची (fonts) निर्मिती
सध्या महाजालावर आणि संगणकावर युनिकोड ही संकेतप्रणाली वापरून मराठीचा वापर वाढत असला तरी मराठी मजकूर दिसण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित टंक संख्येन बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यांतील बहुसंख्य टंक हे महाराष्ट्र शासनाने प्रसृत केलेल्या दिनांक ६ नोव्हेंबर २००९ च्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात मान्य केलेल्या निकषांप्रमाणे नाहीत. त्यामुळे उपरोक्त शासन निर्णयांतील निकषांशी जुळणारे असे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित टंक तयार करून घेऊन ते जनतेला मुक्त वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे.
११. मोडी हस्तलिखितांचे देवनागरीकरण
तंजावूर येथील सरस्वती महाल ग्रंथालय व तमिळ विद्यापीठ येथे अनेक मोडी हस्तलिखिते उपलब्ध आहेत.या हस्तलिखितांचे देवनागरीकरण करण्याचा प्रकल्प संस्था लवकरच हाती घेणार आहे. या हस्तलिखितांचे देवनागरीकरण झाल्याने आतापर्यंत अनुपलब्ध असलेल्या वाङ्मयाचा मोठा साठा अभ्यासकांना उपलब्ध होईल.
१२. शासकीय प्रकाशनांचे प्रदर्शन
विविध शासकीय विभाग तसेच शासनपुरस्कृत संस्था उत्तम, दर्जेदार पुस्तके प्रकाशित करत असतात. तथापि ती सर्वसामान्य वाचकांपर्यत पोहोचत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. सन २००२ हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय पुस्तकवर्ष म्हणून जाहीर केले होते. त्याचे निमित्त साधून संस्थेने पहिल्यांदा शासकीय विभागांनी व शासनपुरस्कृत संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मुंबईत आयोजित केले. त्यानंतर अशा प्रकारची प्रदर्शने दरवर्षी संस्था आयोजित करीत असते. या प्रदर्शनांना लोकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अशी प्रदर्शने आयोजित करण्याचा संस्थेचा विचार आहे.
१३. इतर प्रसंगोपात्त उपक्रम
मराठीचा गुणवत्तापूर्वक विकास करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील मराठीचा वापर वाढविण्यासाठी संस्था वेळोवेळी अनेक चर्चासत्रे, कार्यशाळा, सर्वेक्षणे आयोजित करीत असते.
मराठी भाषेखेरीज एखादी अन्य भारतीय/विदेशी भाषा ही मातृभाषा असलेल्या अमराठी-परभाषक लोकांना मराठीचे शिक्षण देणारी द्विभाषी पाठ्यपुस्तके प्रकाशित करणे.
व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देणाऱ्या कमी कालावधीच्या कार्यशाळांचे-प्रशिक्षण वर्गाचे आयोजन तसेच श्राव्य पुस्तके (Talk Books), खिशात ठेवता येण्याजोगी पुस्तके (Pocket Books) तयार करणे.
वर नमूद केलेल्या उपक्रमांखेरीज अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व भाषाविषयक प्रकल्प संस्थेच्या विचाराधीन आहेत. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रकल्प हाती घेण्यात येतील. राज्य मराठी विकास संस्थेला आजवर अनेक व्यक्तींचे व संस्थांचे आणि शासनाचे चांगले सहकार्य लाभलेले आहे. तसेच सहकार्य पुढील काळातही मिळत राहील अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी जेवढी शासनाची तेवढीच सर्वसामान्य मराठी भाषिकांचीही आहे. भाषेचा विकास आणि भाषिकांचा विकास या एकमेकांशी निगडित असणाऱ्या गोष्टी आहेत. या दोन्ही घटकांचे सुजाण साहचर्य निर्माण करीत विविधांगी प्रगतीची वाट चालावी लागणार आहे. मानवी व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्राचा ‘भाषा’ हा एक महत्त्वाचा अंगभूत घटक आहे हे ध्यानात घेऊन संस्था आपले एकेक कार्यक्षेत्र ठरवून उपक्रम हाती घेत जाईल. सर्व मराठी माणसांची आस्था,कर्तव्यबुद्धी आणि उपक्रमशीलता यांना देशातील व प्रांतातील आजच्या भाषिक परिस्थितीने आव्हान दिलेले आहे. त्यांनी ते मोठया जिद्दीने पेलून दाखविणे फार गरजेचे आहे. विविध योजनाबद्ध उपक्रमांचे सातत्य राखल्यास आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखणाऱ्या आस्थेवाईक वृत्तीच्या लोकांचे सहकार्य मिळविता आल्यास आजच्या भाषाविषयक परिस्थितीत अपेक्षित बदल घडू शकेल, असा विश्वास राज्य मराठी विकास संस्थेला वाटतो.
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 1/30/2020
अर्वाचीन मराठी साहित्य विषयक माहिती.
प्राचीन मराठी संतकविता आणि पंडिती काव्य या दोहोंच्...
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांत सु...
19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घ...