(हिं. कोची, रिठा; गु. चीकाखाई, सातला; क. सीगेबळ्ळी; सं. सप्तला, शात्तला, चर्मकषा, विमला; इं. सोप-पॉड ट्री; लॅ. अॅकेशिया सिन्युअॅटा, अॅ. कॉन्सिन्ना; कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-मिमोजॉइडी). फुलझाडांपैकी [द्विदलिकित वनस्पती → वनस्पती, आवृतबीज उपविभाग] ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात (दख्खन, कोकण व उ. कारवार, आंध्र प्रदेश, आसाम व बिहार), तसेच चीन, मलाया व म्यानमार या देशांत आढळते. बाजारात ‘शिकेकाई’ या नावाने तिच्या शेंगा मिळतात.
⇨ बाभूळ, ⇨ खैर व ⇨ हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. ह्या वनस्पतींच्याअॅकेशिया ह्या प्रजातीतील एकूण ७०० जातींपैकी भारतात फक्त सु. २५ आढळतात. शिकेकाईचे खोड जाडजूड असून फांद्यांवर लहान पांढरट ठिपके [छिद्रे; → वल्करंध्र] व टोकास वाकडे लहान काटे असतात. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी असून मध्यशिरेवर बारीक वाकडे काटे व देठाच्या मध्यभागी खालच्या बाजूस ग्रंथी असतात. दलांच्या ४-८ जोड्या व दलकांच्या १०-२० जोड्या असतात. फुले गोलसर झुपक्यात [स्तबकासारख्या; → पुष्पबंध] येतात. ती लहान व पिवळी असून मार्च ते मे महिन्यांमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (अथवा शिंबावंत कुलात) व मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शुष्क फळ (शेंग) चपटे, जाड, ७·५-१२·५ X २-२·८ सेंमी., लालसर पिंगट, सुरकुतलेले व काहीसे गाठाळ असते. बिया ६-१०, काळ्या व गुळगुळीत असून फळे तडकून त्या बाहेर पडतात.
स्त्रोत : मराठी विश्वकोश,
अंतिम सुधारित : 10/7/2020
सजीव कुंपणासाठी घायपात, विलायती बाभूळ, निर्गुडी, क...
वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला...