मातेचे दूध हे बाळासाठी संतुलित आहार आहे. बाळाला मातेच्या दुधावर जोपासणे इतकी दुसरी कोणतीही मोठी गुंतवणूक असू शकत नाही. मातेचे दूध न मिळाल्यामुळे जगात 13 लाख ते साडेअठरा लाख बालकांचा मृत्यू होतो. यावर मात करण्यासाठी मातृदुग्ध पेढी ही संकल्पना जगभर राबविली जाते. जगभर 517 मातृदुग्ध पेढ्या कार्यरत आहेत. पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातही नोव्हेंबर 2013 पासून मातृदुग्ध पेढी कार्यरत आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनिसेफच्या संयुक्त विधानाप्रमाणे ‘जे बाळ आपल्या मातेचे दूध घेऊ शकत नाही अशा बाळास आपल्याच मातेचे काढलेले किंवा मातृदुग्ध पेढीतले दूध सर्वात उत्तम आहे. भारतात जेथे जीवंत प्रसुतीमागे बाळमृत्यू प्रमाण प्रतिहजारी 87 आणि पहिल्या महिन्यात बालमृत्यू प्रमाण हे प्रतिहजारी 43 इतके आहे तेथे मातृदुग्ध पेढीची प्रतिबंधक वैद्यकीय उपाय योजना उपयोगी पडू शकते. भारतात सध्या 13 मातृदुग्ध पेढ्या असून त्यापैकी मुंबईत पाच आहेत. त्यामध्ये जे.जे. हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल, ठाणे, के.ई.एम. हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल यांचा समावेश आहे. इतर मातृदुग्ध पेढ्या गोवा, बडोदा, सूरत, हैदराबाद, होशगाबाद, उदयपूर व पुणे येथे बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून हॉस्पिटल आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा दोन मातृदुग्ध पेढ्या पुण्यात आहेत. ही एक अशी संस्था आहे जिथे दान केलेल्या मातृ दुधाचे संकलन, तपासणी, प्रक्रिया, साठवण वाटप केले जाते. हे दूध अशा बालकांसाठी वापरले जाते ज्यांचे या मातांशी कुठलेही नाते संबंध नसतात.
बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात नोव्हेंबर 2013 मध्ये कार्यान्वित मातृदुग्ध पेढीसाठी बँक ऑफ बडोदाने 11 लाख 55 हजार रुपयांची देणगी दिली. ही मातृदुग्ध पेढी स्थापन करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची दूरदृष्टी व बालरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. संध्या खडसे यांचे परिश्रम फलदायी ठरले.
मातृदुग्ध पेढीचे स्थान हे नवजात शिशु अतिदक्षता कक्ष किंवा प्रसूती पश्चात कक्षाशेजारी असते. पेढीचा प्रमुख हा मातृदूग्ध पेढीचे पर्यवेक्षण, नियोजन, विकास आणि मूल्यमापन यांची अंमलबजावणी करतो. दुग्धन व्यवस्थापन परिचारिका, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, जीवरसायन शास्त्रज्ञ, परिचर, सामाजिक कार्यकर्ता व समुपदेशक असे कर्मचारी असतात.
आईचे दूध हे बाळ व मातेमधील एक सुरेख, भावनिक, पोषक व बौद्धिक बंध आहे. प्रत्येक प्रजातीसाठी ते वैशिष्ट्यपूर्ण असते. आईच्या दुधातील प्रत्येक घटक हा बाळाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ असते. आईच्या दुधात रोगप्रतिकारक क्षमता असते. तसेच विविध अत्यावश्यक पोषक द्रव्ये व संप्रेरके यांनी ते परिपूर्ण असते. मानवाने कितीही प्रगती केली तरी आईच्या दुधाची तुलना इतर प्राणी मात्राच्या दुधाशी होऊ शकत नाही. ज्याअर्थी भारतामध्ये कमी वजनाच्या बाळांची व मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांना नियमितपणे पुरेशी दुधाची पुरवणी झालीच पाहिजे. यासाठी मातृदुग्ध पेढीची गरज अतुलनीय आहे. तसेच मातृदुग्ध पेढी ही एक स्वस्त संकल्पना असून ती नवजात शिशुच्या संपूर्ण जपणुकीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
- डॉ. सोमनाथ सलगर,
सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र विभाग,
बै.जी. शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे-०१
संपर्क : ९८८१२८७०६५
ईमेल-drsomnathsalgar@gmail.com
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/23/2020
या विभागात बाळ जन्मल्याबरोबर काय आणि कशी काळजी घ्य...
या विभागात छोट्या बालकांसाठी वेगवेगळ्या पाक कृतीं...
दुस-या वर्षभरात बाळाचे वजन सुमारे 2.5 किलोने वाढते...
प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूक...